30 November, 2008

विक्रम अवाक् झाला

विक्रमा, आटपाट नगरात एक विलासी राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. अनेक यातनांनी पिडलेली जनता देवाच्या आणि दैवाच्या भरवश्यावर जगत होती. राजा मात्र सम्राज्ञीच्या आशिर्वादाने सर्व सुखे भोगत होता. ना कश्याचा खेद ना कश्याची खंत. नगर महापुरात बुडो कि आगडॊंबात होरपळो कश्याचीच म्हणुन त्याला पर्वा नव्हती त्याचा एक राजपुत्र नाट्यकलेत पारंगत होता. त्याच्याकडुन धडे गिरवून राजा समर प्रसंगी गंभीर रहाण्याचा प्रयत्न करित असे पण जे अंगात नाही ते कोपरात काय फाटणार ?

हा खरा राजा नव्ह्ताच पण सम्राज्ञीने त्याला वाघाचं कातडं घालुन नगरात राजा म्हणुन बसवल होतं. त्यामुळे इतर सरदार त्याला जुमानत नसत. अश्यावेळी राजा आपल्या खुशमस्कर-यांबरोबर माकडचेष्टा करतच केवळ नशिबाने मिळालेले राज्य उपभोगत रहायचा. एके दिवशी राज्यावर परचक्राचा घाला आला. आकांत माजला. आम जनता जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पाळु लागली. सैनिकानी छातीचा कोट करुन शत्रुचा सामना केला. युध्द अजुन सुरुच होतं. एका बाजुला महाल, जनपथ, मदिरालये, भोजनालये अग्निला बळी चढवली जात होती तर त्याच वेळी राज्याच्या शुर योध्यांच्या चिता रचल्या जात होत्या. धगधगत होत्या. पण त्याची धग या राजाला लागत नव्हती. तो मलबारी वर्षावात नाचगाण्यात दंग होता.

प्रजाजन असहाय्य होते, व्याकुळ होते. पण असं असलं तरी कर्तव्य भावनेने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी घरदार सोडुन संग्रामात उडी घेत होते. संपुर्ण नगरच युध्दभुमी झालं असताना राजा मात्र सुखोपभोग घेत असल्यामुळे तिकडे युध्दभुमीवर प्रजा निर्नायकीच वावरत होती. शत्रुची संख्या काय ? आपण कोणाबरोबर लढतोय ? आपल्या जिवाचा घोट घ्यायला कोण टपलाय ? काहीच कळेनास झालं होतं.

राजा दर्शन देईल, धीराच्या चार गोष्टी सांगेल, परचक्राचा मुकाबला करेल अशी आशा बाळगून असलेली जनता पुन्हा एकदा भयभीत झाली, तिला वाटलं आभाळ कोसळलं समस्त जन सैरावैरा पळू लागले. महाल, प्रासाद, निवासस्थाने, बाजार सर्वांची द्वारे बंद झाली, वाह्तूक थंडावली. सर्व जण जीव मुठित घेऊन जीव जाण्याची वाट बघत राहीले. बराच वेळ झाला जीव घ्यायला कुणीच आलं नाही म्हणून ते सुटले. मग कुणीतरी सांगितलं ' पान पडलं होतं '. अर्धमेली झालेली जनता पुन्हा कामाला जुंपली.

मातृभुमीसाठी काहीही करायला तयार असणा-या जनतेच्या पाठींब्याने घनघोर युध्दाअंती योध्यांनी शत्रुचा खातमा केला. कित्तेक योध्ये कामी आले.

सगळीकडे भीषण शांतता पसरली तसा राजा बिळातुन बाहेर आला. पुन्हा एकदा विलासात लोळायला तयार झाला. त्याला अजुन शत्रुची संख्या धड माहित नव्हती. बोटं मोजत, एवढेच होते तेवढेच होते चा घोष सुरु झाला. अमुल्य जीव गमावलेल्या योध्यांच्या कुटुंबियाना राज्याच्या धनातुन काही तुकडे फेकले गेले. इतराना काही मिळवायचं असेल तर मराव लागतं याचा धडा दिला गेला.

पण जनतेला अजुन खात्री होती की शत्रु अद्याप दबा धरुन बसलेला आहे. राजाला सुध्दा असावी कारण त्याने आपल्या रथावरचा लाल दिवा काढुन टाकण्याचे आदेश दिले होते. ( लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशींदा मरता नये ना ? ) सिंहासनासाठी मात्र तो सम्राज्ञीकडे लाचारी होता.

शत्रु घरात शिरला तरी आपल्याच सिंहासनाची काळजी करणारा हा राजा सरपंच होण्याच्या तरी लायकीचा होता काय ? योग्य प्रकारची चिलखतं मिळाली नाहीत म्हणुन योध्यांना विरगती प्राप्त झाली. स्वतःच्या सोय-याना आणि बगलबच्च्यांना राज्याची संपत्ती खिरापती प्रमाणे वाटताना त्याचे हात झडले कसे नाहीत ? एवढे होऊनही हा निसुक राजा, नाच्यांना घेऊन युध्दभुमीवर कसा गेला ? पाच सहस्र लोक मारण्याची शत्रुची योजना होती त्या ऎवजी १८२ च मेले आत्महत्या केलेल्या शेतक-यांपेक्षा हा आकडा किती तोकडा ?

विक्रमाला सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देता येत नव्ह्ती विक्रम अवाक् झाला. वेताळ त्याच्या पाठीवरुन उतरेनाचं.

ले : नरेन्द्र प्रभुLinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates