27 December, 2009

पाणी नाही मिळत तर दारू प्या


‘पाणी नाही मिळत तर दारू प्या’ ही महाराष्ट्र सरकारची सद्याची निती दिसते. आजच एका आदेशाद्वारे वर्षाचा शेवट आणि वर्षारंभ या दोन दिवशी बार सकाळी पाच वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा सरकारने दिली आहे. असं या पुर्वी कधी घडलं नव्हतं. पण आता पुन्हा निवडून आल्यावर या मंडळीनी अगदीच ताळतंत्र सोडलेलं दिसतय. ‘खातं’ कोणतही असूदे या मंत्र्याना सदा सर्व काळ मोहात पाडते ती दारू. वन खात्याच्या मंत्र्याला मोहाची दारू. अन्नमंत्र्याला ज्वारी, बाजरी धांन्याची दारू, आणि आता दारुबंदी आणि उत्पादन शुल्क मंत्र्याने आपल्या खात्याचं नाव ‘दारू खुली आणि उत्पादन सुरू’ असं केलेलं दिसतय. संपुर्ण राज्यात पाण्याची टंचाई असताना आणि आता दिवस दिवस पाणी गायब असताना दारू मात्र चौवीस तास वाहताना दिसेल. हा पुरोगामी महाराष्ट्र दारूगामी होणार काय ?


काठोकाठ भरू द्या पेला, फेस भराभर उसळू द्या

नसेल पाणी घोटभरी तरी, चोवीस तास दारू प्या.


26 December, 2009

ग्रंथालीचा वाचकदिन


दादरच्या कीर्ती महाविद्यालयाच्या प्रागंणात काल ग्रंथालीचावाचकदिन..कृतज्ञता दिन साजरा झाला. यावेळी तिथे सरस्वतीच्या उपासकांची झुंबडच उडाली होती. यावर्षीचा हा वाचकदिन विशेष महत्वाचा होता, कारण गंथाली आता पस्तीस वर्षाची झालीय अणि तिचे संस्थापक कार्यक्रमाचे उत्सवमुर्ती दिनकर गांगल सत्तर वर्षाचे. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते दिनकर गांगल यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी बोलताना डॉ. बंग म्हणाले की नावात ‘ग’ असूनही गांगलाना ग ची बाधा कधीच झाली नाही. चॅनल आणि मॉलच्या व्यसनात नवी पिढी अडकली असल्यानी आता पुर्वीसारख्या चळवळी होताना दिसत नाहीत. पण परिवर्तन होतच आहे. उच्चवर्णीय आणि दलित यांच्यातील दरी कमी करण्याचं मोलाच काम जे महाराष्ट्राच्या बाबतीत गांधीजीनाही जमलं नाहे ते ग्रंथालीने करून दाखवलं. ग्रंथालीच्या या कार्याला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात तोड नाही या शब्दात त्यानी ग्रंथालीचा गौरव केला.

प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले सारस्वत बॅकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांनी या वेळी मराठी साहित्य विश्वाला मोठी भेट जाहीर केली. दुर्मिळ ग्रंथांची पुनर्निमिती आणि उत्तमोत्तम ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी बँकेतर्फे ५० कोटी रुपयांचे कर्ज अवघ्या १ टक्का व्याजाने दिले जाणार आहे. येत्या १० वर्षात ही रक्कम १०० कोटी रुपयांपर्यंत नेण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डॉ. विजया राजाध्यक्ष, दिनकर गांगल, अरुण साधू आदी साहित्यिकांची समितीही स्थापन करण्यात येईल असही त्यानी जाहीर केलं.

केंद्रीय उर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. अंधाराकडून उजेडाकडी नेणारी ही गंथालीची चळवळ आही आणि गंथालीने आजवर ४५० ग्रंथ प्रकाशीत केले याचा त्यानी गौरवपुर्ण उल्लेख केला. एकच तुतारी नाही तर अशा अनेक तुतार्‍या निर्माण करून तळागाळातल्या समाजाच्या आवाजाला वाट मोकळी करून दिली. गांगल संचालक पदावरून निवृत्त होत असले तरी त्यांचा चळवळ्या स्वभाव त्यांना गप्प बसू देणार नाही असा विश्वासही त्यानी व्यक्त केला आणि नवीन संचालक मंडळ तेवढ्याच जबाबदारीने काम करेल अशी खात्री असल्याचं नमूद केलं.

उपराकार लक्ष्मण माने, विजया राजाध्यक्ष, अच्यूत गोडबोले, कवी शंकर वैद्य, अरूण राधू, कुमार केतकर, डॉ. प्रेमानंद रामाणी, रामदास फुटाणे असे नामवंत, किर्तिवंत लेखक, कवी हजर होते. दिनकर गांगल यांच्या पत्नी अनुराधा गांगल यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. ग्रंथालीला ३५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रकाश चव्हाण यांचे उदई’, सुधीर व नंदिनी थत्ते यांचे नोबेलनगरीतील नवलस्वप्ने’, भगवान इंगळे यांचे भिडूही पुस्तके व गोविंद काजरेकर यांचे उरल्या सुरल्या जगण्याचं रिमिक्स’, अंजली कुलकर्णी यांचे बदलत गेलेली सही’, शंकरराव दिघे यांचे या शतकाचा सात-बाराच होईल कोराया कवितासंग्रहाचे प्रकाशन कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य केंकरे व उषा मेहता यांच्या हस्ते करण्यात आले.


21 December, 2009

वि. स. खांडेकरांचं निवासस्थान


वि. स. खांडेकर शिरोड्याला शिक्षक होते तेव्हा शिरोड्यापासून दोन किलोमीटरवर असलेल्या आरवली या गावी रहात असत. त्यांच्या त्या नाडकर्णीवाड्यातल्या निवासस्थानी मी नुकताच गेलो होतो. एवढा मोठा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त करणारा साहित्यिक जिथे रहात होता ते घर अजून तसच आहे. ज्या घरात स्वातंत्र्यवीर सावरकर, कवि माधव जुलिअन, यशवंत, गिरीश, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर राहून गेले ते घर आता असं आहे.

20 December, 2009

पुर्वांचलाची चित्र सफर भाग ६


तवांगच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि माणसांची चेहेरेपट्टी बदलत गेली. वाटेत एका ठिकाणी ही गोड मुलं दिसली, त्यांचं निरागस हास्य मनाला प्रसन्न करून गेलं. मुलं तशी झाडंही विविध आकारातली, रंगातली. हे सगळ पाहात तवांग आलं आणि मन हरखून गेलं. चारशे वर्ष जुनी बौध गुंफा आणि हिमशिखरांशी स्पर्धा करणारे ते अध्यात्मिक झेंडे सारच लाजवाब....!



19 December, 2009

जयवंत दळवींच्या घरात


शिरोडा, आरवली ही सिंधुदूर्गातली नितांत सुंदर गावं. निसर्गाचा जसा वरदहस्त या भुमीला लाभला आहे तसा साहित्यिकांचा वारसाही लाभलेला आहे. संत सोयराजी आंबयेपासून चिं.त्रं खानोलकरांपर्यंत आणि वि.स खांडेकरांपासून आताच्या आघाडीच्या गुरू ठाकूरपर्यंत अनेक लेखक, कवी या मातीने मराठीच्या पदरी घातले. जयवंत दळवीं हे त्या पैकी एक. नुकताच त्यांच्या आरवलीच्या घरात जाण्याचा योग आला. ज्या घरात, माडीवर बसून त्यांनी अनेक पुस्तकं लिहीली त्या ठिकाणी जाऊन ते घर प्रत्यक्ष पाहताना उर भरून आलं. ती माडी, त्या भिंती, तो जिना, ती विहीर, ते अंगण लेखकाला स्फुर्ती देण्यासाठी अजून तिथे आहे फ्क्त उणीव भासली ती स्वतः लेखक जयवंत दळवींची.





18 December, 2009

आनंद


उल्हास प्रत्येक क्षणात

भरून राहूदे जीवनात

आनंदाचं बिज

आपल्या मध्येच असतं

सकारात्मक विचारांचं

खतपाणी त्याला घालावं लागतं

आनंद शिशुचं हास्य असतं

आनंद चैतन्याचा श्वास असतो

मक्तेदारी कुणाची नाही फक्त

आनंद पाहत नाही गरीब श्रीमंत

आनंद एक अनुभूती असते

निरांजनातील ज्योती असते

त्या ज्योतीने तन-मन उजळून निघतं

सगळच जग सुंदर दिसतं


नरेन्द्र प्रभू

08 December, 2009

समृद्धी आली?


जुन्या पिढीतला एखादा प्रज्ञावंत घ्या, किंवा आपल्या घरातली मागची पिढी घ्या तीस चाळीस वर्षांपूर्वीचं उदाहरण घेतलं तरी आपल्याला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्या काळातल्या बहुतेक जणांचं बालपण फार हलाकीत गेलं. अन्न, वस्र आणि निवारा या तीनही प्राथमिक गरजा भागवण्यासाठी त्यांना अपार कष्ट उपसावे लागले. प्रसंगी मानहानी पत्करावी लागली. पण शिक्षणाच्या, वैचारीक सामर्थ्याच्या बळावर त्यांनी आपलं जीवन समृद्ध केलं. भौतिक साधनांची कमतरता असतानाही मनाच्या श्रीमंतीपुढे त्यांना त्याची पर्वा वाटली नाही. मैलोन् मैल रस्ते तुडवत शाळा, कार्यालयं, कामाचं ठिकाण गाठलं. एकमेकांना सहकार्याचा हात देताना मैत्रीचे धागे घट्ट होत गेले. गरिबी असली तरी औदासीन्य आणि वैफल्य या मध्ये ते बुडून राहीले नाहीत. एकमेकांच्या अडचणीच्या काळात त्यांनी परस्परांना मदतीचा हात दिला. ओसरीवर थारा दिला आणि आपल्यातलं घासभर अन्नही दिलं.

आज आपण कितीही नाकारलं तरी प्रगतीचे वारे खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत, गावागावात रस्ते गेले, ज्या घरात सायकलही नव्हती त्या घरातल्या पुढच्या पिढीकडे मोटरसायकल आली, झालच तर चार चाकाची मोटार आली. आदिवासी भाग वगळता दोन वेळच्या अन्नासाठी महाग झालेला समाज काही अपवाद वगळता आता पहायला मिळत नाही. ज्याला शिकायची इच्छा आहे अशांना मोफत शिक्षणाची दारं उघडी झालेली आहेत. स्वातंत्र्यानंतर फार नाही पण एवढी तरी प्रगती आपल्या देशाने केली आहे. पण या भौतिक प्रगती बरोबर माणसाच्या मनाची श्रीमंती मात्र कुठे तरी हरवताना दिसत आहे. गावागावात दूरचित्रवाणी संचासमोर बसलेली मंडळी घ्या किंवा शहरात तासन् तास मॉलमध्ये भटकणारे नवश्रीमंत घ्या अगोदरचा शेजार्‍याबरोबर असलेला संवाद हरवून बसले आहेत. शुभंकरोती, परवचा कधीच इतिहासजमा झाली. आजीच्या गोष्टी गेल्या आणि त्या जागी ‘शिन्चांन’ आला. आजीने रसभरीत वर्णन करून सांगितलेल्या गोष्टी ऎकता ऎकता तो प्रसंग डोळ्यासमोर उभा करताना मुलांची कल्पनाशक्ती, तो प्रसंग अंतःपटलावर उमटणं, याबरोबर एक प्रकारचे संस्कार मनावर होत जात. काय वाईट, काय बरं. अनुकरण कुणाचं करायचं? रामाचं की रावणाचं? अगदी बालवयातच विचार पक्के व्हायचे. जीवनाची दिशा ठरवताना, प्रलोभनांशी सामना करताना, संकटांशी दोन हात करताना आतला आवाज मदत करायचा.

पेज थ्रीचं स्थान दिवाणखान्यात किंवा आताच्या हॉलमध्ये यायच्या आधी पुस्तकांचं एक कपाट असायचं. अगदी ज्ञानेश्वर, तुकोबांपासून ते गदिमा, पुलं पर्यंत काही संत, साहित्तिकांची पुस्तकं आपली जीवनसाथी असायची. काही रुपयांची पुस्तकं लाख मोलाचे विचार द्यायची. आयुष्य समृद्ध करायची. दूरचित्रवाणी संच आला आणि ती पुस्तकं कधी गायब झाली समजलच नाही. समोरच्या संचातून हावभावासहीत बोलणं, नाचणं गाणं सुरू झालं आणि रेडीमेड विचारांबरोबर आपण विचार करणं सोडलं. शेजार पाजारचा, मित्रा मित्रांमधला सोडा घरातलाच संवाद आपण हरवून बसलो. संध्याकाळ झाली की येणार्‍या गुरा-वासरांसारखे घरातले सदस्य घरा घरात निवार्‍याला येऊ लागले. फक्त खाणं आणि रहाणं या गरजा जिथे भागवल्या जातात त्याला घर म्हणायचं का? यालाच समृद्धी म्हणायचं का? चार पैसे गाठीशी असले, भौतिक साधनं मिळाली म्हणजे माणूस सुखी होतो का? रात्री बेरात्री पर्यंत चालणार्‍या पार्ट्यांच्या झगमगाटात किंवा सिनेमांच्या कोलाहलात शितल चांदणं किंवा प्राजक्ताचा सुगंध, पहाटवार्‍याबरोबरचं निसर्गाचं गाणं आपण कधी अनुभवणार?

07 December, 2009

चला पर्यावरणाशी मैत्री करूया भाग २


आणखी एक अनुभव सुप्रसिद्ध लोणार सरोवराजवळचा. लोणार सरोवर जागतिक वारसा लाभलेलं एक महत्वाचं ठिकाण आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपुर्वी अवकाशातून अशनीपात होऊन या ठिकाणी १८७५ मीटर व्यासाचं एक सरोवर तयार झालं. जगातील अशनीपातापासून तयार झालेलं हे तिसर्‍या क्रमांकाचं मोठं सरोवर आहे. आजुबाजुला गोड्या पाण्याचे स्त्रोत असले तरी या विवरात साठलेलं पाणी मात्र समुद्राच्या पाण्यापेक्षा खारट आहे. देश-विदेशातून अनेक विज्ञान प्रेमी तिथे कायम भेट देत असतात. भारतीय पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित म्हाणून जाहीर केलेला आहे. अशा परिसराची आपण नेहमीच काळजी घेतली पाहीजे. लोणार सरोवर पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. गावातल्याच एका तरूण, अनुभवी, माहितगार वाटाड्याला सोबत घेऊन तो भाग, सरोवर, त्याकाठची मंदीरं पाहून परतत असतानाच वरून तेरा-चौदा वर्षांची मुलं हसत खिदळत धडाधड धावत खाली येत होती. बहूतेक सगळ्यांच्या हातात लेज, कुरकुरे सदृष्य पाकीटं होती. मागोमाग त्या मुलांचे शिक्षक होते. आता ही मुलं हातातले खाद्य पदार्थ खाऊन झाल्यावर पिशव्या तशाच तिकडे टाकणार हे नक्की, कारण तिकडे तसा प्लास्टीकचा कचरा आधीच पडलेला दिसत होता. मी त्या शिक्षकांजवळ चौकशी केली, ही सहल कसली ? वर्षातून एकदा अशी शैक्षणिक सहल न्यावी लागते त्या नियमानुसार आपण ही सहल आणली आहे असं त्यांच उत्तर. प्लास्टीकच्या कचर्‍याविषयी मी शंका उपस्थित केली, तर टाकतात काय करणार असं त्यांचं उत्तर.

थोडक्यात काय तर आपल्या देशात कुठेही जा, मग ते शहर असो की खेडं पर्यावरणाविषयीची ही बेपर्वा वृत्ती सगळीकडे सारख्याच प्रमाणात दिसून येते. पाणी, हवा, जमीन, आवाज यांचं प्रदुषण आपण कळत नकळत करतच असतो. वरील तिन्ही प्रसंगात आपण प्रदुषणात भर घालतो आहोत हे त्या मंडळींच्या गावीही नव्हतं. अगदी लहान वयातच पर्यावरणासंबंधीचे संस्कार होणे गरजेचे आहे. आजपर्यंत आपल्याच चुकीमुळे पर्यावरणाची अपरिमीत हानी झाली आहे आणि आत त्याचे दृष्य परिणाम आपल्या लक्षातही येवू लागले आहेत. प्रदुषणकारी फटाके, रंग, किटकनाशके, जंतूनाशके, रासायनीक कचरा, प्लास्टीक हे तर आहेच पण सहज म्हणून केलेल्या काही कृती पर्यावरणाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरत आहेत. प्राणीसंग्रहात गेलं असता अनेक मुलं आणि त्यांच्या जोडीने आलेले पालक पिंजर्‍यातील प्राण्यांना पॉपकॉर्न खायला घालताना दिसतात. आपण दाखवलेली ही भुतदया त्या प्राण्यांच्या प्राणांवर बेतण्याची शक्यता असते. प्राण्यांना असे खाद्यपदार्थ खायला घालू नये असे फलक अशा ठिकाणी लावलेले असतात त्याकडे सर्रास दुर्लक्ष केला जातो. जंगलात किंवा डोंगराळ भागात उन्हाळ्याच्या दिवसात पालापाचोळा सुकलेला असतो अशा ठिकाणी पडलेली एक ठिणगी प्रचंड वणव्यात रुपांतरीत होऊ शकते. डोंगरावर लागलेले असे वणवे आपण नेहमी पहातो. निष्काळजी पणाने फेकून दिलेली विडी-सिगारेटची थोटकं याला बर्‍याचवेळा कारण ठरतात. कोकणात अजूनही बर्‍याच प्रमाणात गायरानं, देवराया टिकून आहेत. अशा देवरायांचा परिसर हा देवांसाठी सोडलेला आहेत असा समज असल्याने त्या ठीकाणची काडीसुद्धा तिथले ग्रामस्त उचलत नाहीत. या देवराया आपल्या पुर्वजांनी जाणीवपुर्वक जोपासल्या होत्या. अनेक प्राकारच्या एरवी नष्ट होणार्‍या झाडांच्या प्रजाती इथे अजूनही तग धरून आहेत. एक प्रकारची ही पुर्वांपार जपून ठेवलेली जिनस् बॅंकच आहे. पण या देवरायांचा मुळ उद्देशच आता हरवत चालला आहे. अंधश्रद्धेने अनेक लोक इथल्या दगडांना शेंदूर फासत आहेत आणि नवस म्हणून अनेक अघोरी प्रकार इथे होत आहेत. प्राण्यांचे बळी दिले जात आहेत. अशा गोष्टी करता करता आता या देवरायात अनेक ठिकाणी प्लास्टीकच्या बाटल्या, पिशव्या जमा झालेल्या दिसतात. संक्रातीचा सण दरवर्षीच उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी आकाशात पतंगांची गर्दी झालेली असते. पतंगांच्या मागोमाग त्याला आकाशात घेऊन जाणारा मांजा हा बर्‍याच वेळा पक्षांच्या प्राणांवर बेततो. साध्या हलक्या दोरानेही पतंग उडवला जावू शकतो पण पतंगांची काटाकाट करण्याच्या हव्यासापोटी मांज्याला काचेचा चुरा फासला जातो आणि ते एक धारदार शस्त्र बनून आकाशात उडत असते. झाडंवर गुरफटून बसते आणि काही वेळा दुर्मिळ पक्षांचा जीव जातो.

अशा छोट्या छोट्या वाटणार्‍या पण पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणार्‍या गोष्टी टाळणं आपल्याच हातात आहे. थोडीशी काळजी घेतली आणि सतर्कता बाळगली तरी आपण आपल्या आजुबाजुच्या वातावरणाची काळजी घेऊ शकतो. पर्यावरण संवर्धनाला हातभार लाऊ शकतो. आपल्या खाण्यात येणार्‍या फळांच्या बीया कचराकुंडीत न टाकता त्या साठऊन ठेवल्या आणि आपण जंगलात किंवा डोंगरात जातो तेव्हा तिकडे पसरून टाकल्या तर त्यांची झाडं उगवतील आणि निसर्गाकडून नुसतच न घेता आपणही त्याला काही दिल्यासारखं होईल. सामाजिक वनीकरण, वनविभाग, नगरपालिका, महानगरपालिका आणि काही स्वयंसेवी संस्था पावसाळ्याच्या सुरवातीला मोफत रोपांचं वाटप करतात अशी रोपं आपल्या आजुबाजुच्या परिसरात लाऊन त्याची योग्य देखभाल केली तर आपला परिसर हिरवागार दिसेलच पण पक्षांच्या अधिवासाने गजबजून जाईल आणि ज्या मधूर गुंजनाला आपण आसूसलेले असतो ते पक्षाचे गाणे आपल्याला नित्यनव्याने ऎकता येईल. मन प्रसन्न होईल.

05 December, 2009

तु असताना



शब्दगाऽऽरवा या श्री. प्रमोद देव यानी प्रकाशीत केलेल्या "महाजालीय शारदीय" अंकात प्रसिद्ध झालेली माझी तू असताना, तू नसताना ही कविता.


तु असताना नाचत असते

फुल पाखरू मोहक सुंदर

तु नसताना मनात माझ्या

दाटून येते धुकेच धुसर


तु असताना दरवळतो तो

सुगंध तनीचा वातावरणी

तु नसताना तजेलाच तो

निघून जातो कसा ग सजणी ?


तु असताना होतो माझा

क्षण क्षण अती उल्हासाचा

तु नसताना अथांग सागर

बुडवत जातो काळोखाचा


तु असताना संध्या हसते

लाल रुपेरी ढगां आडूनी

तु नसताना मेघाच्छादीत

रवीही जातो असाच बुडूनी


तु असताना चंद्र चांदणे

उगाच हसते तुला पाहूनी

तु नसताना चंद्रकोरही

अशीच जाते झाडां मागूनी


तु असताना तु हसताना

चैतन्यच ते भरून उरते

तु नसताना तु रुसताना

मन पाखरू उदास बसते

नरेन्द्र प्रभू

चला पर्यावरणाशी मैत्री करूया भाग १


(आपलं पर्यावरणच्या नोहेंबर २००९ च्या अंकामधून प्रसिद्ध झालेला माझा लेख)


मित्रहो, समजा मी तुमच्या घरी आलो. आल्या आल्या तुम्ही दिलेला किंवा मीच आणलेला खाऊचा पुडा, फरसाण खाता खाता इकडे तिकडे उडवली, प्लास्टीकची पिशवी तिथेच टाकली, डेकवर मोठ्ठ्या आवाजात गाणी लाऊन नाचलो आणि जाताना माझं आणि बायकोचं नाव भिंतीवर कोरून गेलो तर ? ( हे करण्याचं सोडून द्या या तीन ओळी वाचताच तुम्ही मला वेड्यात काढलं असेल.) बरोबर आहे खरच हा वेडेपणा आहे. असभ्यपणाचा कळस आहे, कारण मी या गोष्टी तुमच्या घरात येऊन करणार होतो. अगदी या प्रकारे मी माझ्या घरात वागलो तरी ते समर्थनीय ठरणार नाही. आपण सगळे चांगले शिकलेले, सुशिक्षीत झालच तर सुसंस्कृत, पुढारलेले मग आपण असं वर्तन कसं करू ? नाहीच करणार कारण आपण घराच्या आतल्या स्वच्छतेविषयी कमालीचे सतर्क असतो पण तीच काळजी आपण घराबाहेर पडल्यावर घेतो का? हाच खरा प्रश्न आहे.

असाच एकदा मी आणी माझा मित्र अहमदाबादला रेल्वेने जात होतो. वातानुकूलीत २ टायरचा डबा, आम्ही आमच्या जाग्यावर बसलो, गाडी सुटली. समोरची आसनं रिकामीच होती. बोरीवली स्थानकावर दोन तरूण आत आले, समोरची आसनं त्यांची होती. गाडीने मुंबई सोडल्यावर मी आणि माझा मित्र गप्पात रंगून गेलो. ते दोघे त्यांचा लॅपटॉप उघडून बसले. खाणं सुरू झालं. सुखद प्रवासात खाणं जरा जास्तच होतं. तसच काहीसं चालू होतं. खाता खाता ते पदार्थ आजूबाजूला पडत होते, झटकून टाकले जात होते. खाणं संपलं तशी ती फरसाणची पिशवी सीटवरच ठेवली गेली. थोड्या वेळाने ती खाली पडली. मंडळीनी आणखी काहीतरी खायला सुरवात केली. बोलण्यावरून दोघे इंजिनीअर वाटत होते. एवढ्या शिकलेल्या माणसाना आपण काय शिकवणार आणि अशी माणसं ऎकण्याऎवजी एकेरीवरच येण्याचा जास्त संभव असतो म्हणून आम्ही गप्पच राहीलो. मात्र आमच्या बाजूला येणारा एखादा कागद उचलून आम्ही अडकवलेल्या एका पिशवीत टाकत होतो. लांबचा प्रवास असला म्हणजे अशी एक पिशवी ठेवली की कचरा कुठे टाकू असा प्रश्न पडत नाही. तासा दिडतासाने त्यांना बोलण्यातून (खाण्यातून सुद्धा) उसंत मिळाली तसे ते उठले आळोखे-पिळोखे देताना त्यांचं लक्ष त्यानीच केलेल्या कचर्‍याकडे गेलं. आम्हीसुद्धा खाणं खात होतो पण कचरा एका पिशवीत जमा केला होता तो त्यानी पाहीला. मंडळी जरा समजूतदार होती. त्याना आपली चूक समजली होती. पायानेच कचरा एकत्र करून चहाच्या रिकाम्या झालेल्या कपात त्यानी तो टाकला. आता तो कप कुठे टाकायचा असा प्रश्न होता मी आमची पिशवी दाखवली. आभार प्रदर्शन झालं. आधीच्या त्यांच्या प्रदर्शनामुळे न बोलताच सगळं समजलं होतं. गाडीच्या खिडक्या उघड्या असत्या तर हा कचरा आधीच बाहेर गेला असता.

दुसरी गोष्ट आहे प्रवासातलीच. हिमालयाच्या उतूंग पर्वतरांगांमधून वळणं घेत गाडी चालली होती. दूरवर दिसणारी हिमाच्छादीत शिखरं न्याहाळत, निसर्गाचा तो अनुपम ठेवा पहात असतानाच अचानक एका वळणानंतर पाहीलं तर काय एक मोटार थांबलेली होती. त्या मोटारीत मोठ्या आवाजात डेक लावला होता. त्या रोंबा-सोंबा गाण्यावर चार-पाच तरूण वेडे-वाकडे हातवारे करून नाचत होते. तो निसर्ग म्हणजेच एक संगीत होतं. एवढा वेळ त्यात रममाण झालेलं माझं मन, लागलेली समाधी भंग पावली. एक रम्य संध्याकाळ जी आपण केवळ मुकपणेच अनुभवावी तिला कुठेतरी तडा जात होता आणि तसं करणार्‍यांच्या ते गावीही नव्हतं. आजुबाजुचे प्राणी-पक्षी केव्हाच भिऊन पळाले असावेत.

क्रमशः


04 December, 2009

काळ पुढे गेला पण रुढी तशाच राहील्या


माणसाने काळाबरोबर चालावं म्हणतात. काळ बदलत जातो त्याबरोबर माणसाने बदलणं हेही आलच. सामाजिक रुढी, परंपरा या काही विशिष्ट काळात त्या त्या परिस्थितीनुरूप आकार घेतात. पुढे ती परिस्थिती बदलते, सामाजिक व्यवस्था बदलते तशा त्या रुढी, परंपरा विचारपुर्वक बदलल्या पाहिजेत. विशेषत: लग्न, मुंजी, बारसा असे समारंभ साजरे करताना डामडौल, थाट आणि जेवणावळी यासाठी जो वारेमाप खर्च केला जातो तो करताना किंवा दुसर्‍याकडून करवताना विचार केला पाहिजे. धनिक मंडळी काहीतरी कारण काढून त्यांच्याजवळ असलेल्या गडगंज संपत्तीचं, श्रीमंतीचं प्रदर्शन करत असतात. त्याना करुदेत पण ते करतात म्हणून त्यांच अनुकरण आपण का करायचं? तसा आपल्यावर आलं की खर्च न करणारे दुसर्‍याने तो करावा म्हणून आग्रह धरतात. सगळेच श्रीमंत असतात असं नाही. इथे बाजू कुठची एवढाच प्रश्न असतो. मुलाकडची मंडळी वधूपित्याला जमेल तेवढे नागवाण्यासाठी अनेक क्लुप्त्या योजतात. कालच एका लग्नाला जाण्याचा योग आला, मुलाकडची मंडळी माझ्या चांगलीच परिचयातली. एरवी रुपया वाचतो म्हणून पुढच्या स्टॉप पर्यंत चालत जाणारे हे लोक मुलीच्या बाजूने लाटता येतं म्हणून वातानुकूलीत हॉल, हजार रुपयाचं ताट असे थाट करून ऎट मारतात तेव्हा खरच वाटतं काळ पुढे गेला पण रुढी तशाच राहील्या.


वेळेचं महत्व


मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या हल्ली मुंबईत वेळेवर धावतात ते पाहून खुप बरं वाटतं. पुर्वी याच गाड्या फार उशीराने धावायच्या. त्याला कारणं अनेक असतील पण आता परिस्थिती सुधारली आहे, मात्र हे घडत असताना आधी वेळेच्या बाबतीत नाव ठेवायला जागा नसलेली पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक नेहमीच विलंबाने होताना दिसते. हे असं का घडतं? एखादी संस्था असो किंवा व्यक्ती वेळ न पाळल्याने ते किती जणांचं नुकसान करत असतात. व्यक्तीगत पातळीपासून देशाच्या पातळीपर्यंत वेळ पाळली नाही तर त्याचा विकास कसा होणार? वेळ हातातून निघून गेल्यावर जागं होवून काय उपयोग? व्यवस्थेतली ढिलाई जर अंगवळणी पडली तर मग ती सवय होते आणि नंतर मात्र कायमचं नुकसान होतं. या वेळ होण्याला ‘इंडीयन स्टॅन्डर्ड टाईम’ म्हणून हसण्यावारी नेण्यात येतं पण ही दुसर्‍यासाठी शिवी ठरते. वेळ का झाला याची कारण देण्यात काही अर्थ नाही, तर ती आपणच शोधून त्यावर उपाय केला पाहीजे. समजा आपल्याला जन्म दिल्यावर जर देवाला आठवलं, अरे याला डोळे, नाक, कान लावायचे राहीले तर वेळ निघून गेल्यावर ते आठवून काय उपयोग? (काही अभागी माणसांच्या बाबतीत हे होतं तेव्हा त्यांचे काय हाल होतात हे आपण पहातोच.)

दुसर्‍याला दिलेली वेळ पाळणं फार गरजेचं आहे. ती न पाळून आपण सतत त्याचा अपमान तर करतोच पण आपलीही किंमत त्याच्या लेखी कमी होत असते. वेळ का झाला याची कारणं नक्कीच समर्थनीय नसतात किंवा अपवादात्मक वेळा त्याला माफी असते. तुम्ही काय घरीच अहात ना? किंवा ऑफीसलाच बसलात ना? असं म्हणून आपण दुसर्‍याला गृहीत धरतो, बस मिळाली नाही, ट्राफिक जाम, अशी कारणं आपण सहज दुसर्‍याच्या तोंडावर फेकतो पण हेच कारण विमान, किंवा लांब पल्ल्याच्या गाड्याना चालत नाही याची आपणाला चांगलीच कल्पना असते, तेव्हा मात्र वेळा पाळल्या जातात. काळ कुणासाठी थांबत नाही हे एक उत्तम आहे नाही तर त्यालाही या लेट लतीफानी कारणं सांगून बेजार केलं असतं. असो, त्याचं काय झालं माझ्या एका मित्राला सकाळी सात वाजताची वेळ दिल्याने तो बिचारा साडेसहा वाजताच आपल्या कार्यालयात येऊन बसला आणि वेळ देणारे महाशय आठ वाजून गेले तरी तिकडे फिरकले नव्हते आता बोला...!

03 December, 2009

सुख वाटे जीवा......!


एखद्या दिवशी पहाटे उठल्यापासून संपूर्ण दिवसभर गाण्याची एक ओळ सारखी ओठावर येत असते. घरात, प्रवासात, कार्यालयात कुठेही गेलं तरी मग ते गाणं आपली पाठ सोडत नाही. मनात सारखं रुंजी घालत राहतं. कित्येक दिवस न ऎकलेलं हे गाणं मनात येतं कुठून? रात्रीच्या झोपे नंतर, विश्रांतीनंतर गाण्याची ती ओळ एकदा का ओठावर आली की सतत येत राहते. मन प्रफुल्लीत करत राहते. त्या दिवसाचं सोनं होतं. कोण वाजवतं ती तबकडी मनात. आज पर्यंत ऎकलेल्या असंख्य गाण्यांमधून नेमकी हीच ओळ का? बर ती गुणगुणल्यानंतर समाधान का मिळतं? परत परत त्याच त्या ओळीवर येऊन ती आपण का गात राहतो? एक गंम्मतच आहे नाही? आज उठल्या उठल्या भिमसेन जोशींनी गायीलेली

जातां पंढरीस सुख वाटे जीवा।
आनंदे केशवा भेटतांचि

ही ओळ ओठावर आली, सारखी येतच राहीली.

02 December, 2009

या टोपीखाली दडलय काय?


मुंबई पोलिस काय किंवा महाराष्ट्र पोलिस काय सगळं पोलिस खातं सध्या चर्चेचा विषय झालं आहे. नुकतच २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यांना एक वर्ष पुर्ण झालं. प्रसिद्धी माध्यमांमधून सुरक्षेवर पर्यायाने पोलिस खात्यावर उलटसुलट चर्चा झाली. नोकरीत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी एकेमेकांवर तोंडसुख घेतलं. त्या निमित्ताने पोलिसांमध्ये असलेल्या गटबाजीच प्रदर्शन झालं. राजकारण्यांना लाजवेल अशाप्रकारे आय्.पी.एस्. अधिकारी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले. कर्तबगार पण हांजी हांजी न करणारे अधिकारी साईड पोस्टींगला आणि ताटाखालची मांजरं मोक्याच्या जागेवर ही आजची आपल्या पोलिस खात्याची स्थिती. माजी पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर एकेठिकाणी म्हणाले की पोलिसांचा वचक राहिलेला नाही. हुजरेगिरी करण्यात आणि चिरीमिरी घेण्यात गुंतल्याने त्यांचं आपल्या कामात लक्ष नाही. (हल्ली प्रशिक्षणाच्या वेळीच हे शिक्षण सुद्धा दिलं जातं.) पोलिस ड्रेसकोड पाळत नाहीत. टोपी घालत नाहीत. पण आज ती टोपी दुरचित्रवाणीवर वारंवार दिसत होती. त्याचं काय झालं, लातुर सत्र न्यायालयातून एका खुनाच्या आरोपीला पोलिस पुन्हा कारागृहात घेवून चालले होते. वाटेत या कायद्याच्या रक्षकाना भुक लागली, तहान लागली. मग त्या पोलिसानी आरोपीकडे पाहीलं. तो पण भुकेला होता. पोलिसांमधील माणूस (लाचार) जागा झाला. त्यानी त्या आरोपीला घेऊन तहान आणि भुक दोन्ही भागवायचं ठरवलं. ते बार अँड रेस्टॉरंट जवळ आले. त्या आधी त्या आरोपीचा खिसा चाचपला. सरकारी वाहन थांबवलं. बेड्या असताना आरोपीला धड खाता पीता येणार नाही म्हणून त्याच्या हातातल्या बेड्या काढल्या. बार मध्ये मटणाचं ताट जेवायला (प्यायलासुद्धा) बसले. जवळच्याच बाकड्यावर बेड्या ठेवल्या, त्यावर टोपी ठेवली. डोळे मिटून उदरभरणाचं यज्ञकर्म करताना मात्र कॅमेर्‍याने हे दृष्य टिपलं.

आता सांगा हे असे पोलिस कुणाच्या मिठाला जागणार खुन्याच्या की सरकारच्या?


26 November, 2009

राजकारण्यांचं पुनर्वसन झालं बाधीतांचं कधी होणार?


बरोबर एक वर्षापुर्वी साधारण याच वेळी मी दूरचित्रवाणीवर मुंबईवरच्या हल्ल्याची बातमी पाहीली. पार्ल्याच्या पुलाजवळ झालोल्या बॉम्बस्पोटचा आवाज मला घरी बसूनच ऎकू आला. काहीतरी अघटीत घडतय याची जाणीव झाली. आपण सुरक्षित नाही असं वाटत राहीलं. पुढचे तीन दिवस मग तो विध्वंस उघड्या डोळ्यांनी पहातच होतो. त्याचीच एक प्रतिक्रीया म्हणून हा ब्लॉग सुरू केला. आज २६/११ च्या त्या घटनेला एक वर्ष पुर्ण होतय. काय सुधारणा झालीय आपल्यात, पोलिसात? एक NSG सेंटर, काही वाहनं. तीच बुलेटप्रूफ जॅकेट आणि त्याच बंदूका. एक गोष्ट मात्र तत्परतेने केली गेली, ती म्हणजे राजकिय पुढार्‍यांचं पुनर्वसन. चार महिन्यात विलासराव केंद्रात मंत्री झाले. वर्षाच्या आत आबा त्याच गृहमंत्री पदावर आले. शिवराज पाटील वाट बघताहेत.

या हल्यात जे शहीद झाले त्यांच्या कुटूंबियांचं, जे जखमी झाले त्यांचं पुनर्वसन कधी होणार? ते आता पहायच. आपण शहीदाना श्रद्धांजली अर्पण करू शकतो आणि जखमींना सहानभुती.



तुम्ही तिथे होता, म्हणून आम्ही जिवंत आहोत.
आपल्या शौर्यला प्रणाम.

23 November, 2009

पुर्वांचलाची चित्र सफर भाग ५


सकाळी भालुकपाँग सोडलं तेव्हा अजून सहा वाजायचे होते. आज आम्हाला तवांग गाठायचं होतं. भालुकपाँग हे असम राज्यातलं शेवटचं गाव. जीप मध्ये बसल्या-बसल्या दूसर्‍या मिनीटाला अरूणाचल प्रदेश हे राज्य सुरू झालं. मग तवांग येईपर्यंतचे निसर्गाचे विभ्रम केवळ पहात राहण्यासारखे.




22 November, 2009

वस्त्रहरणचा पाच हजारी प्रयोग


प्रयोग पाच हजारावा

काल षण्मुखानंद हॉलमध्ये वस्त्रहरणचा पाच हजारावा प्रयोग जल्लोषात साजरा झाला. गेल्या आठ दिवसांपुर्वीच शो हाऊसफुल्ल झाल्याच्या बातम्या होत्या. प्रेक्षागृह तुडुंब भरलं होतं. सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती मछिंद्र कांबळींवरचा स्नेह प्रगट करत होती. पाहुणे कलाकर सर्वश्री प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, अतुल परचुरे, सिद्धार्थ जाधव, पंढरीनाथ कांबळे, जितेंद्र जोशी, किशोर चौघुले, जयवंत वाडकर यांनी तर बहारच उडवून दिली होती. एवढा हशा त्या प्रेक्षाग़ृहाने क्वचितच पाहीला असेल. नेहमी समरस झाल्याचं नाटक करणारे राजकिय नेते खुर्चीला खिळून होते.

मच्छिंद्र कांबळीं हे विनोदाचे बादशहा होते हे निर्विवादपणे मान्य करावं लागेल. नाटक मग ते मालवणी असो की मराठी रंगमंचावर प्रवेश केल्याक्षणी ‘तो आला, त्याने पाहीलं आणि त्याने जिंकलं’ हे समिकरणच होवून गेलं होतं. मच्छिंद्र कांबळींची अनेक नाटकं पाहीली संवाद फेक, टायमींग आणि अभिनय या सर्वातच तो ‘बाप’ माणूस होता. कारकीर्दीच्या अत्युच्य शिखरावर असतानाच त्यानी घेतलेलीच एक्झीट म्हणूनच चटका लावणारी होती. कालचा प्रयोग जसा उत्सवी होता तसाच तो मच्छिंद्र कांबळींना आदरांजली वाहणारा पण होता. जातीचा कलावंत असलेल्या मच्छिंद्र कांबळींनी मालवणीला प्रतिष्ठा मिळवून दिली तिला सातासमुद्रापलिकडे नेलं. त्या मालवणी राजाक मानाचो मुजरो.

21 November, 2009

यांचा निषेध केलाच पाहीजे...!


काल आय्.बी.एन्. लोकमत वाहिनीच्या मुंबई आणि पुणे कार्यालयांवर हल्ला झाला. महिलासहीत पत्रकार, कर्मचार्‍यांना मारहाण झाली. त्याची दृष्य आपण सर्वांनी दूरचित्रवाणीवर पाहीली. त्या हल्ल्यांचा सर्व प्रथम मी निषेध करतो. हा लोकशाहीच्या चौथ्यास्तंभावरचा पर्यायाने लोकशाहीवरचा हल्ला आहे हेही तेवढच खरं. पण या राज्यात कायद्याची भिती आहे कुणाला?

एका वृत्तपत्रवाहिनीवर हल्ला झाला, तो थेट दाखवला जात होता, पोलिसाना लगेच कल्पना दिली गेली तरीपण पोलिस पाऊण तासानंतर आले. मुंबई म्हणजे काही भामरागड किंवा गडचिरोली नव्हे, पोचायला वेळ लागतो. जाणूनबुजून उशिरा येणार्‍या पोलिसांचाही निषेध झालाच पाहिजे.

या आधी लोकसत्ताचे संपादक श्री. कुमार केतकर यांच्या घरावर जिवघेणा हल्ला झाला, त्या हल्याच्या बाबतीत काय कारवाई झाली? त्या हल्यामागचा सुत्रधार म्हणून आमदार मेटेना राष्ट्रवादी पक्षातून काढून टाकलं आणि पुन्हा (लोकांची स्मृती अल्पकाळ टिकते असं मानून) पक्षात सामावून घेतलं. आताचे गृहमंत्री आर्.आर.पाटील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले असतात. त्यांचा ही निषेध झालाच पाहिजे.

स्वाभिमान संघटनेच्या गुंडांनी काही दिवसांपुर्वी निरपराघ तरूणाला मारहाण केली होती. त्याचं काय झाल? कुणाला शिक्षा झाली? त्याच्या सुत्रधाराला काय शिक्षा झाली? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.

दोनच दिवसांपुर्वी पोलिस प्रशिक्षणात हप्तेवसुलीचा कळस झाला आहे अशी लोकसत्ताची हेड लाईन होती वाचाळ आबा त्यावर मात्र मुग गिळून गप्प का आहेत? त्याचाही निषेध झालाच पाहिजे.

19 November, 2009

हप्तावसुलीचे बुम्बरँग


आजच्या लोकसत्ता मध्ये हप्तावसुलीचे धडे ही अस्वस्थ करणारी बातमी वाचली. शिर्षक वाचून वाटलं नवीन पोलीस कामावर रुजू झाल्यावर वरीष्ठ अधिकार्‍यांकडून त्याना हप्ता वसुल करायला लावला जातो, पण तसं नाही तर प्रशिक्षण घेतानाच त्यात असलेल्या कसरती, व्यायाम यातून सवलत मिळण्यासाठी हे हप्ते घेतले जातात. हे भयंकर आहे. उद्या घरबसल्या प्रशिक्षण पुर्ण केलं म्हणूनही दाखला देतील हे लोक. बोगस डिगर्‍या तसे बोगस प्रशिक्षण. कमांडो प्रशिक्षणाचीही तीच गत. वा आनंद आहे. आता कुणा दहशतवाद्याना हल्ला करायलाच नको. कुणीही येईल आणि पोलिसाना टपली मारून जाईल. हातात रायफल आहे पण ती चालवता येत नाही अशी स्थिती आहे.

याला जबाबदार आपण, समाज आणि राजकारणी हेही तेवढच खरं. हे वर पासूनच झिरपत आहे. पण ते आता त्यांच्यावरच उलटणार आहे. संरक्षणासाठी दिलेला पोलिस लाच देऊन पास झाला की खराच प्रशिक्षीत आहे याची खात्री कशी देणार आणि तो कसलं संरक्षण करणार. पुढार्‍यांनो तुम्हीच सांभाळा. जनता तुम्ही आधीच वार्‍यावर सोडलेली आहे. (आता पुढार्‍यांबरोबर खाजगी बॉडीगार्ड दिसले तर नवल वाटायला नको) पोलिस आता वॉचमन सारखे होतील.

पण असा त्रागा करून कसं चालेल, हे असं व्हायचच. २६/११ ला वर्ष व्हायच्या आत तेव्हा नापास म्हणून काढून टाकलेले (त्यांच्या भाषेत नैतिक जबाबदारी) आबा पुन्हा गृहमंत्री म्हणून विराजमान झालेच ना? त्यानी कसलं प्रशिक्षण घेतलं?


17 November, 2009

अनावर ‘मोह’ आणि मोहाची फुले


सरकार बनवण्याच्या ओढाताणीत पंधरा दिवस गेले. मालदार, मलईदार वगैरे खाती वाटली गेली. कुणाच्या मुखी लोणी तर कुणाच्या तोंडी अंधार आला. पण मंत्री कल्पक असेल तर कुठचही खातं कमावत होवू शकतं. पुर्वी पक्षातून निलंबीत झालेले पण नंतर गोड मानून घेतलेले ह.भ.प. मंत्री अशा पैकीच एक. मागच्या वेळी त्याना वन खातं मिळालं तेव्हा महाराष्ट्रातील एकूण वन क्षेत्र कमी झालं. बाकीच्या वन जमीनीचा त्यानी ‘विकास’ केला. आता आदिवासी विकास करण्यासाठी जाणत्या राजाने त्याना नेमलं. त्यांची नजर मोहावर आधीपासूनच होती. जंगलात गेल्यावर त्याना मोहाची फुलं दिसायची. आदिवासी त्या फुलांपासून दारू बनवतात हे त्यानी हेरलं. खात्याचा कारभार हाती आल्या आल्या त्याना त्या मोहाची ‘हर्बल लिकर’ बनवावी असा साक्षात्कार झाला. आदिवासींच तेवढच एक अन्न सरकारी कचाट्यातून सुटलेलं. तेसुद्धा आता हे ह.भ.प. हिरावून घेवू पहाताहेत.

उसाची शेती करून शेतकरी श्रीमंत झाला नाही ना कारखाना मात्र संचालक मंडळ हवेली पासून हवाला पर्यंत पोहोचलं. द्राक्ष बागायतदार उपाशी आणि वाईनरीवाले तुपाशी. आता या ‘हर्बल लिकर’मुळे काय होणार ते वेगळं सांगायला हवं का?

16 November, 2009

सुखांत – एक चर्चा


येत्या वीस तारीखला सुखांत हा एक वेगळ्या विषयावरचा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक – संजय सुरकर, निर्माती- अनुया म्हैसकर, लेखक – किरण यज्ञोपवीत, कलाकार- अतुल कुलकर्णी, ज्योती चांदेकर, कविता मेढेकर, तुषार दळवी अशी टिम आहे.

एका आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलाला वाढवून त्याला मोठं केलं, नावारूपाला आणलं. ती आईच एका दिवशी अपघातात सापडते. तिचं शिर सोडून संपूर्ण शरीर निकामी होतं. संवेदना जातात. मुलगा, सुन तिचं सगळं करायला तयार असतात पण त्या स्वाभिमानी स्त्रीला इच्छामरण पाहीजे असतं. आपल्याच वकिल मुलाला ती आपला खटला न्यायालयात लढायला लावते. आईवर अतिशय प्रेम करणारा मुलगाच न्यायालयात तिच्यासाठी दयामरण मागतो. नको असताना जगवण, की हवं असताना मरण देणं म्हणजे प्रेम? खरा न्याय कोणता? इच्छा-मरण कायद्याने मंजूर करावं का? असा प्रश्न विचारणारा हा चित्रपट आहे.

वरील कलाकार, निर्माती, लेखक यांच्या संवादाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचा नुकताच योग आला. चर्चेतून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली. अतुल कुलकर्णीचा नेहमी प्रमाणे वेगळ्या धाटणीचा एक चित्रपट, पहायला हवा.

कळी उमलताना

माझ्या मित्राच्या फर्माईशीमुळे ही कविता पोस्ट करतो आहे.


एक कळी उमलताना

रोज पाहतो खुलताना

खोड काढली कधीतर

फुरंगटून बसताना


एक कळी उमलताना

पहाटवारा झेलताना

डोळे अर्धेच उघडून

शाळेसाठी जाताना


एक कळी उमलताना

आनंदाने बागडताना

अभ्यासाच कोडं सोडवत

थकुन जाते निजताना


एक कळी उमलताना

क्षणोक्षणी फुलताना

मी मात्र रमुन जातो

तिचं बालपण आठवताना


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates