07 January, 2009

नंदीग्राम एक्सप्रेस मधले नंदी

" नागपूर मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस २१.५५ को आनेकी संभावना है । " अशी सुचना ध्वनिक्षेपकावरुन देण्यात आली आणि म्हटलं झालं म्हणजे गाडी अर्धा तास उशिराने येतेय. कधी नव्हे ते एक तास आधी आम्ही औरंगाबाद स्टेशनला आलो होतो, त्यात आणखी अर्ध्यातासाची भर पडली, असो. गप्पा मारत वेळ जाईल म्हणून फलाटावर बसकण मारली.

थोड्या गप्पा झाल्या असतील नसतील, तेवढ्यात दिड-पावणेदोनशे विद्यार्थी फलाटावर येऊन दाखल झाले. वेगवेगळ्या बोगीसाठी पसरून उभे राहीले. म्हणजे त्यांच्या सरांनी आधीच ठरवल्या प्रमाणे ते सर्वजण आरक्षण नसताना सर्व आरक्षित डब्यांमध्ये विभागून चढणार होते. आमच्या बोगीच्या वाट्याचे आसपास उभे राहीले. ते मनमाडला उतरून पुढे कोलकात्याला जाणार होते. चला आज काही झोप नाही मी मनात विचार केला. राष्ट्रीय स्थरावरच्या तिरंदाजी आणि इतर स्पर्धांसाठी आलेल्या या स्पर्धकांची ( भावी पदक विजेत्यांची ) तिकीटं नेम धरून काढली नव्हती.

गाडी २२.१० ला आली नशिबाने माझ्या समोरच आमच्या बोगीचा दरवाजा आला, चपळाईने आत शिरलो आणि आरक्षित असलेल्या ४१,४२ व ४४ बर्थपाशी पोहोचलो. आधीच स्थानपन्न झालेल्या प्रवाशांना उठवलं, बसणार एवढ्यात मी खाली करवलेल्या बर्थवर आणखी एकजण येऊन बसला, नाही आडवा झाला पुढे अर्ध्या-पाऊण तास चाललेल्या नाटकाची ही नांदी होती. गाडीने वेग घेतला होताच, तशात आरक्षित तेवढेच अनारक्षित वेटींगवाले प्रवासी, वर उल्लेखलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड सामान, इकडून तिकडे हालचाल करण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, त्यात एकाच बर्थवर हक्क सांगणारे दोन-दोन प्रवासी. मी माझं तिकीट दाखऊन त्या आडव्या मारूतीला उठवायचा प्रयत्न करत होतो. तो पक्का होता " अरे हमको ए टिटि ने नांदेडमेही सीट लिखके दीया है भाई, हम कैसन उठेगा ? “ याः वर त्याचा आणि माझा संवाद पुढील प्रमाणे झाला.

मीः तुम कैसाभी उठो, मैने तीन महीना पहलेसे यह तिकीट बुक किया है और कनफर्म है.

तोः ऎसा कैसा कनफरम है । हमको टिटि ने जो दिया हुवा है ।

मीः टिटि ने तुमको दीया दिया की बत्ती दिया उससे मुझे क्या मतलब । यह देखो मेरे पास छपा हुवा है । आप किधर जा रहे हो ? ( जवळच उतरणार असेल तर तो पर्यंत बसूदे म्हणून )

तोः हम बि.टी. स्टेसन जा रहे है बंबई मे ।

मीः महाराष्ट्र मे बि.टी. नामका कोइ स्टेशन नही है । ( माझ्यातला मराठी माणूस जागा झाला ) क्या करेगा उधर जा के ?

तोः हम रेल्वेमे नौकरी करता हूँ बि.टी. स्टेसनपर ।

मीः एsss बि.टी. स्टेशन नही है , बिटी काँटन है कपासका बिज  (त्या परिस्थितीतही माझा विनोद करण्याचा प्रयत्न )

तो ऎकायला तयार नव्हता. माझा सय्यम सुटत चालला होता. आमची बाजू मांडण्यासाठी दुसरी टीम म्हणून मी बायकोला पुढे केलं, म्हटलं याला सांग तुझ्या भाषेत. तिने मोर्चा सांभाळत त्याला उठवण्याचे प्रयत्न सुरू केले. माझं छुपं सैन्य पाहून तो प्रथमच वरमला.' टिटि को ही पुछेंगे ' म्हणत खाली आला. कुणीतरी म्हाणालं तिकडे टि.सी. आहे. तिकडे जाऊन माझ्या बायकोने प्रकरण सोडवलं. आम्हाला ४६,४७ व ४९ बर्थ मिळाले. अरे बापरे आता पुन्हा लढाई ? पण तिथे गेलो तर तिथले घुसखोर समंजस निघाले, उठून बसले, आम्ही सामान आणलं, बसलो. असं कसं झालं ? आठ ऎवजी नऊ बर्थ बसवल्याने हा गोंधळ झाला होता. म्हणजे खरा व्हीलन तो नववा बर्थ होता. रेल्वे प्रशासनाची बेपर्वाई तर बघायलाच नको.

पहीला अंक संपला निजानिज झाली, या प्रकरणावर पडदा पडला, चार दोन प्रवासी पायाजवळ बसले. आम्ही झोपलो. मनमाड स्टेशन आलं ते तिरंदाज उतरले. थोडे गाडीतच होते, राजस्थानला जाणारे. एक ग्रहस्थ, दोन बाया, खांद्यावर कोवळं मुल, आले. आल्या आल्या त्या ग्रहस्थाने फर्मान सोडलं ' लाईट लगाओ ' त्याचं ऎकतो कोण इथे, मग तो स्वतःच सरसावला सगळी बटनं चालू केली, सगळे पंखे चालू झाले लाईट बंद. आजुबाजुला आम्ही सगळे सरावलेले, जात्यातून बाहेर आलेले, त्याला मुठीत पहात होतो. त्याने त्वेषाने दुसर्‍या बाजूची बटनं चालू केली. आपले बर्थनंबर तपासले आणि आधीच हैराण झालेल्या दोघा प्रवाशाना हात घातला. चलो उतरो. त्या दोघातला एक विद्यार्थी निघाला दुसरी २४-२५ वर्षाची मुलगी. तिला पण तो खाली खेचू लागला. आता मी मध्ये पडलो. त्या नवव्या बर्थचा फंडा त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागलो. पण कसचं काय तो, त्या बाया ऎकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हत्या. उठो जाओ तुम्हारा सिट है तो टि.सी. को लेके आओ, त्याने त्या दोघांना बजावलं. मनमाडला बराच वेळ गाडी थांबली होती. फलाटावर टि.सी. महाशय दिसले दोघांनीही तिकडे धाव घेतली. नवीन आलेल्यांना वेगळे नंबर दिले गेले. ते आपली दुसरी लढाई लढण्यासाठी ' और कही ' गेले.

रात्रीचा एक वाजुन गेला होता. सगळ्यांच्या झोपेचं खोबरं नाही खोबर्‍याचा रसच निघाला होता. काय हा ' संशय कल्ल्होळ ' एकजण म्हणाला, संशय कल्ल्होळ कसा हा तर ' गोंधळात गोंधळ ' मी म्हणालो. नंदीग्राम एक्सप्रेस कसली आम्ही सगळे नंदी, काही गायी-वासरं सगळे कोंडवाड्यात कोंडलेल्या गुरांसारखे कोंडले गेलो होतो त्या अर्थाने सर्वांकडे बघून हे मला नंदीग्रामच भासू लागलं. पैसे देऊन असह्य त्रास सहन करणारे आपण. त्या पेक्षा सकाळी घृष्णेश्वर मंदिरात पहुडलेला नंदी पाहीला त्याचा मला हेवा वाटू लागला. तो किती मजेत पहुडला होता.


लेखकः नरेंद्र  प्रभू



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates