17 January, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग १)

पश्चिम एक्सप्रेसने मुंबई सोडली आणि आम्ही चंदीगढच्या दिशेने निघालो. खरं तर मनाने आठ दिवस आधीच मुंबई सोडली होती. जेव्हा आत्माने ( हा आत्मा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. ) पूर्वतयारीसाठी दादरला एकत्र बोलावलं तेव्हापासूनच मी बेचैन होतो, जाण्याचा दिव

स येत नव्हता म्हणून. वाटेत कसलाही त्रास न होता आम्ही चंदीगढला उतरलो तेव्हा दोन दिवसांची सहल संपल्याचा भास होत होता. गाडीत खूप छान गप्पा झाल्या होत्या. लडाखला जायचा उत्साह आणखी वाढला. पाच- सहा तास विश्रांती घेऊन चंदीगढहून निघालो, आता रात्रीचा प्रवास करुन सकाळी मनाली गाठायची असा कार्यक्रम होता. पण सकाळी पाचच्या सुमारास चहाला थांबलो तेव्हापासून डुलकी घ्यायची वेळच आली नाही. कारण बाहेर निसर्गाचा सोहळा सुरू होता. रिमझिमणारा पाऊस, एका बाजूला पूर्ण जोशात वाहणारी बियास नदी, रस्त्याच्या बाजूने सफरचंदानी लगडलेली झाडं, जवळ जवळ चार तास हे नेत्रसुख अनुभवत आम्ही मनालीला पोहोचलो तर तिथेही पाऊस आमच्या स्वागताला हजर होता.

आतापर्यंत प्रवासवर्णनात वाचलेली, दृश्यमाध्यमातून पाहीलेली आणि कवितांमधून भेटलेली मित्र मनाली दोन्ही बाहू पसरून बोलावित होती, चिंब पावसात भिजायला.

तासा- दिडतासात ताजेतवाने होऊन आम्ही मनालीचा बाजार पालथा घातला. पुढे थंडीचा सामना करण्यासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी केली. दुपारनंतर हिडींबा मंदिर, मनू मंदिर, वशिष्ट मंदिर, गंघकमिश्रित गरम पाण्याचे झरे इत्यादी बघत आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही मनालीभर हुंदडत होतो. पावसाला, बियास नदीला आणि त्या बरोबर आमच्या मनाला उधाण आलं होतं. कुणाला कशाचीच पर्वा नव्हती. पण आत्माच्या चेहर्‍यावर मी काळजी बघत होतो. अंधारुन आलं आणि आकाशात नक्षत्रांच्या वेली दिसु लागल्या तीन दिवस पडणार्‍या पावसाने माघार घेतली तसा आत्माचा चेहरा फुलला. कारण उद्या लेहच्या दिशेने जाताना त्याला पाऊस नको होता. वातावरण आत्तापासूनच स्वछ व्हायला सुरुवात झाली होती.

(अपुर्ण....)                                    जायचय  लडाखला ? चला.....

लेखकः नरेंद्र  प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates