19 February, 2009

लडाख – अनुभूति अध्यात्माची आणि निसर्गाची (भाग ८)

आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. पत्थरसाहेब गुरूद्वारा, मॅग्नेटीक हिल, सिंधु आणि झंस्कारचा संगम, आल्ची हि लडाखमधील प्राचीन गुंफा याना भेट देत आम्ही जेव्हा मूनलँडवर पोहोचलो, तेव्हा पुन्हा एकदा कॅमेरे सुरूच राहीले. चंद्रभूमिला स्पर्श केल्याच्या जोशात आम्ही नमकिला पास पार करून कारगिल केव्हा गाठलं ते समजलच नाही. आता माणसांची चेहरेपट्टी, वागणं बदललं होतं. युध्दाच्या आठवणी दाटून आल्या. दुसर्‍या 

दिवशी द्रास येथील युध्दस्मारकाला भेट दिली तेव्हा डोळे पाणावले. टायगर हिल, तोलोलिंग टेकड्या आशा जवळून पाहून आपल्या सैनिकानी काय दिव्याला तोंड दिलं त्याची कल्पना आली. तिथे २६ जुलैच्या विजय दिनाची तयारी सुरू होती. ऑपरेशन विजयच्या खाणाखुणा मिरवत हे स्मारक मोठ्या दिमाखात उभं आहे.

सोनमर्गला " भारतीय सेना आपका स्वागत करती है " असा फलक बघून आमचे पाय जमिनीवर आले. लहान असतो तर पुन्हा लडाखला जायचय म्हणून हट्ट धरला असता. एवढा सुंदर प्रदेश बघितल्यावर मला सोनमर्ग, श्रीनगर मध्ये स्वारस्य नव्हतं. गेल्या ८ - १० दिवसात आम्ही आयुष्यभर पुरेल एवढा ठेवा मिळवला होता, नवीन ओळखी पक्क्या झाल्या होत्या, मैत्री दृढ झाली होती. आता आपापल्या घरी जायचं हे मानायला मन तयार होत नव्हतं. लडाखी लोकांचं आदरातिथ्य आणि आमचे संयोजक आत्माराम परब यांच्या सहवासाला आम्ही मुकणार होतो. सुंदरशा भेट कार्डाद्वारे आभार मानून त्यानीही आमच्या भावनांना दाद दिली. भरलेल्या अंतःकरणाने आणि भारावलेल्या मनःस्थितीत आम्ही लडाखला रामराम केला तरी अजून संपूर्ण लडाख मनात घर करून आहे. हिमालयाशी दोस्ती करून आम्ही परतलो ते पुन्हा भेटण्याचं नक्की करूनच !    


(समाप्त)                                    जायचय  लडाखला चला.....


लेखकः नरेंद्र  प्रभू


 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates