28 February, 2009

पैठण

औरंगाबादच्या दक्षिणेस ५८ कि.मी. अंतरावर पैठण गाव आहे. औरंगाबादहून निघालो. वाटेत औरंगाबाद सिल्क मिल पाहिली. सुती चादरी, ड्रेस मटेरीयल, शाली यंत्र मागावर बनवल्या जातात. सुतापासून हे सर्व कापड कसं विणलं जातं त्याचं प्रात्यक्षिक पाहता आलं. सोलापुरला आपण चादरी बघण्यासाठी जातो. इथल्या चादरी पण बर्‍या वाटल्या, काही घेतल्या. पुढे वाटेत व्हिडीओकॉन, व्होकार्ड वैगरे कंपन्या लागल्या. औरंगाबाद परीसरात बरीच औद्योगिक वसाहत आहे. वाटेत वाहतूक संथ झाली, पुढे ऊस वाहून नेणार्‍या बैलगाड्यांची रांग लागली होती, श्री. ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात ऊस घालायला शेतकरी रांगा लावून होते. ऊस घालून झालेले शेतकरी बैलांना चारा देत होते. एकजण बैलाच्या खुरांना नाल ठोकण्यासाठी त्याला खाली पाडत होता. " बैलाला पाडीताना फोटोघ्या की " एक शाळकरी मुलगा मला म्हणाला. मला टींग्याची आठवण झाली.

मी फोटो काढायला तयार आहे हे पाहून त्यानी बैलाला खाली पाडायचे प्रयत्न सुरु केले. फोटो काढला, सगळा विधी पार पडला. तेवढ्यात आमचा ड्रायव्हर ताजा ऊस घेवून आला. ऊस तोडून खात खात पुन्हा प्रवास सुरू झाला.

पैठण पासून पुढे १५ कि.मी. अंतरावर संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आपेगाव आहे. तिथे ज्ञानेश्वरांचं छोटसं घुमटीवजा मंदिर आहे. आजुबाजुला भक्तनिवास सारखं बांधकाम चालू होतं. मागे गोदावरी नदीचं पात्र कोरडं पडलेलं. १०-१२ ट्रॅक्टर नदीपात्रातून रेतीचा उपसा करत होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म ज्या मातीत झाला ती माती कपाळी लावावी म्हणून तिकडे गेलो, बाकी तिथे जागेवर कसलीच व्यवस्था दिसत नव्हती. भाव-देव सगळं गायब.

पैठणला गोदावरी नदीत संत एकनाथांनी जल समाधी घेतली. त्या घाटावर पुढे भक्तानी मंदिर बांधलं ते नाथ समाधीमंदिर म्हणून प्रसिध्द आहे. मागे गोदावरी नदीत 

अनेक भक्त आंघोळ करत होते. मंदिरा बाहेर अबीर, गुलाल, पिंजर यांचे पिंडीच्या आकाराचे सुरेख थर लावलेले होते. पैठण गावात जिथे संत एकनाथाचं राहतं घर होतं ते आता नाथमंदिर म्हणून ओळखलं जातं. गोदावरीत स्नान करून नाथ येत, एक माणूस त्यांच्यावर थूंकत असे ते पुन्हा स्नान करून येत, तो मार्ग समजून घेतला. नाथमंदिराला भेट देणारा त्या वेळी मी एकटाच होतो.

नाथसागर/जायकवाडी धरण हे देशातील सर्वात मोठं मातीच धरण बघितलं. गोदावरी नदीवर बांधलेलं हे धरण विशाल आहे. पॉंन्डहेरॉन, बगळया सारखे पक्षी सहजच दिसत होते. चार दोन पर्यटकही दिसले. तिथून पुढे संत ज्ञानेश्वर उद्यानात गेलो. १२४ हेक्टरवर विकसीत केलेलं हे उद्यान त्या भागातलं उत्तम समजलं जातं. बर्‍याच शाळांच्या 

सहली तिकडे आल्या होत्या. काळोख पडल्यावर संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे हे त्याचं मुख्य आकर्षण, पण त्या आधी होणारा कठपुतळी बाहुल्यांचा 

नाच मला जास्त भावला. बाकी उद्यानची देखभाल म्हणावी तशी नाही. दिवस मावळताचं हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला होता. सायंआरतीची वेळ झाली असावी, लहानपणा पासून आरती-भजनात म्हटलेली पैठण, आपेगाव ही गावं प्रत्यक्षात पाहून झाली होती.

लेखकः नरेंद्र  प्रभू




2 comments:

  1. Fantastic!!! very good photography alongwith writeups. gr8!!!! Regards Madhuri Aralkar

    ReplyDelete
  2. माधूरी, धन्यवाद. आपल्या प्रतिक्रीयेमुळे मी आज पुन्हा हे फोटो आणि माहिती वाचली.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates