22 June, 2009

अजी म्या ब्रम्ह पाहीले ....!
साडेबारा टनाचा प्रसाद जो सकाळपासून संध्याकाळ पर्यंत अखंड वाहणार्‍या जनप्रवाहाला मुक्तहस्ते वाटला जातोय. दिड-दोन दिवस अव्याहतपणे चाळीस आचारी आणि शंभरच्यावर स्वयंसेवक झटताहेत. यंत्राच्या वेगाने द्रोण भरले जाताहेत आणि ते भरलेली ताटं मिनीटात रिकामी होताहेत. हे काही कोण्या मुजोर राजकीय पुढार्‍याच्या पोराच्या लग्नातलं लक्षभोजन नव्हे तर हे वास्तव आहे सामाजाने समाजासाठी केलेलं आणि मी याची देही याची डोळा पाहीलेलं, अनुभवलेलं.

देवाच्या आळंदीपासून निघालेला लाखो जनांचा प्रवाह त्या विठूरायाच्या ओढीने अडीजशे किलोमीटरच्यावर रस्ता तुडवत पण शिस्तबध्द रितीने चाललाय, आस एकच केवळ विठूभक्तिची आणि चंद्रभागेत स्नानाची. कुणी दाखवलेलं कसलं प्रलोभन नाही की कसला स्वार्थ नाही. असं असूनही ही प्रचंड सकारात्मक ऊर्जा विठ्ठलमय होवून वहात होती. हा सोहळा पाहून खरोखर भगवंताचं विश्वरूप दर्शन झालं असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. लक्षावधी बाया-बापड्या, मुलं-बाळं, कर्ते-सवरते आणि वृध्द सारे सारे जात-पात, ऊच्च्य-निच सारं विसरून एकाच नावाने पुकारले जातात माऊली...! एरवी अणू-रेणू समान असलेली ही माणसं आज आकाशा एवढी झालेली भासली. दिवसभर १८-२० किलोमीटर वाहत जाणारा हा जनसागर माऊली म्हणून ओळखला जातो. माऊली किती सार्थ नाव. ज्ञानेश्वर माऊली जिच्या ठायी विश्वाचं आर्त प्रकटलं ती आई म्हणजे माऊली आणि त्या नावानेच ओळखला जातोय प्रत्येकजण. माऊली या एका शब्दाने सागळं कसं सोपं होवून गेलं होतं. माऊली जरा थांबा, माऊली वाटं द्या, माऊली पाणी द्या, माऊली प्रसाद घ्या. देणारे, घेणारे, घेणारे सगळे सगळे माऊली. ते एकच तत्व सगळीकडे पुरून उरणारं.

आषाढी एकादशी साठी कानाकोपर्‍यातून निघालेला लक्षावधी वारकरी हे महाराष्ट्राचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव अगदी जवळून बघण्याचा योग आला. धन्य धन्य झालो. या वारी दरम्यान वारकर्‍याला एक सुखाचा घास देता यावा म्हणून झटणारेही तसेच. संपूर्ण वारी करू शकत नाही पण ती करणार्‍यांचा उत्साह वाढावा, त्याना मदत व्हावी म्हणून दरवर्षी न चुकता जेजुरी जवळ जाऊन सेवा करणारे. कसला बढेजाव नाही की कसला आव नाही. वर उल्लेखलेला प्रसाद देता यावा म्हणून झटणारे, वारकर्‍यांच्या औषध पाण्याची सोय करणारे, त्यांच्यावर उपचार करणारे सगळेच माऊली. दुसर्‍या दिवशी त्यातले कुणी भिवंडीकर असतील, कुणी सोपारकर असतील पण त्या दिवशी सगळेच माऊली होते. माऊलीमय झाले होते. एकरूप झाले होते. अवघेची जाहले देह ब्रम्ह.

लेखकः नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates