30 August, 2009

प्रवास रंगे, स्वाईन फ्लू संगे

मित्रहो स्वाईन फ्लूने जी काही दहशत माजवली आहे त्यामुळे अनेकांना श्वास रोखावा लागत आहे. बाजूचा माणूस शिंकाला किंवा खोकला तर आता पुढचा श्वास आपण घ्यायचा की नाही हा प्रश्न पडतो. मग काय श्वास रोखला जातो. घाईघाईने रुमाल नाकाला लावला जातो आणि न चुकता एक जळजळीत कटाक्ष त्या शिंकणार्‍यावर टाकला जातो. तो शिंकणारा मात्र दुसरी शिंक आळवण्यात मग्न असतो.

हा स्वाईन फ्लू कुणाला पर्वणी, कुणाला वर्गणी तर कुणाला खंडणी देणारा ठरला. आमच्या सौ साठी मात्र ही पर्वणी ठरली. मुलीच्या शाळेला अनपेक्षीत सुट्टी मिळल्याने आणि परीक्षा रद्द झाल्याने मुलगी स्वाईन फ्लू जिंदाबाद ओरडत आली आणि ती सुट्टी आम्ही अक्षरश: साजरी केली. रेल्वेची तत्काळ सेवा कामाला आली. मला फिरायला आणि तीला माहेरी जायला फार आवडतं. एका दिवसात तयारी झाली. तीने शेजारी-पाजारी, मैत्रिणींना ती आनंदवार्ता कळवली. काहीजणांनी असूयेपोटी म्हटलं सुद्धा एसीने जाताय ना ? एसी मध्येच स्वाईन फ्लू जास्त पसरतो असं ऎकलय हीला जायचं तर होतं पण पुन्हा दहशतीने शंका उत्पन्न केली, खरच काय हो एसी मध्ये स्वाईन फ्लू पसरतो ?

मी.: नाही ग, तसं काही नाही, तसा तो पसरायला कुणीतरी स्वाईन फ्लूवाला आला पाहीजे ना आपल्या डब्यात.

सौ,: अहो कशाला पाहीजे तो.

मी.: स्वाईन फ्लू पसरवायला.

सौ.: माझी मैत्रिण म्हणत होती मास्क घेऊन जा म्हणून. मास्क आणूया काय हो ?

मी.: नको, बाकी सगळ्यांनी लावले म्हणजे आपण सेफ.

सौ.: काय हे, अशा परिस्थितीत सुद्धा तुम्हाला विनोद सुचतात.

मी.: आणि तुला माहेर.

तर अशा पाश्वभुमीवर आम्ही कोकणच्या प्रवसाला निघालो. ट्रेन मध्ये बसलो. मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतर प्रवाशांची वाट पहात होतो. एवढ्यात एक कुटूंब मुसक्या बांधून आलं. (चला यांच्या पासून आपल्याला काही अपाय नाही. मी मनातल्या मनात म्हटलं. माझ्या या मनातल्या मनातला हीने नजरेनेच दाद दिली.) डॅडा-डॅडी नव्हे डॅडा-मम्मी आणि दोन बाळं. आल्या आल्या पाण्याच्या बाटलीसाठी त्यांची धावपळ सुरू झाली. म्हणजे बघा, पाणी भरपूर पिलं पाहीजे तर यांच्या जवळ पाणीच नाही. ही माझ्या कानात कुजबुजली. गाडीला पॅट्रीकार आहे, पाणी येईल मी त्याना दिलासा दिला. आणखी एक लेकुरवाळी आली. सगळ्या जागा भरल्या, गाडी सुरू झाली, त्याना पाणी मिळालं.ती बाळं बर्थला लोंबकळू लागली, सुरपारंब्यांचा खेळ सुरू झाला. कोकणातली वानरं बिघडतील अशी मला भिती वाटू लागली. त्यांच्या चेहर्‍यांवरचे मास्क गळाले, खाली पडले, पायाखाली लोळले. या गडबडीत आमची निंद हराम आणि डॅडा-मम्मीला मात्र आराम. दोघही डाराडूर झोपलेली. मध्येच डॅडा उठले Where is your mask ? म्हणून ओरडले. आता ती बाळं खाली पडलेले मास्क उचलून एकमेकाकडे फेकू लागले ( स्टाईल: टोपीविक्या आणि माकड ) डॅडाची पुन्हा ओरड सुरू, ते मास्क त्यांच्या तोंडावर गेले. थोड्या वेळाने एक मास्क खाली आला तो त्या डॅडाचा होता. डॅडा मस्त झोपेत. मी सहज मम्मीकडे पाहीलं तीचा मास्क अंगाखाली होता.

जेवणाला सगळे उठले. जेवताना मास्क गळ्यात आले, पाणी आणि बिर्याणी मास्कनासुद्धा मिळाली. संध्याकाळ पर्यंत ते रंगरुपाने बदलले. मंडळींचं स्टेशन आलं. पुन्हा मास्क चढवले गेले. मंडळी ऎटीत उतरली. आमचा प्रवास अजून सुरूच होता. मास्क न लावल्यामुळे आपण किती सुरक्षित आहोत याचा साक्षात्कार झालेला होता. शेवटी आम्हीही उतरलो. आम्हाला न्यायला आलेली मंडळी तोंडावर रुमाल दाबून गर्दीत आमचा शोध घेत होती. इतर लोकांना नजरेनेही टाळत होती, जणू आम्ही सोडून सर्व जीवाणू होते.

आमचं स्वागत करण्यासाठी घरी अडुळशाचा पाला घालून गरम केलेलं पाणी आंघोळीसाठी तयार होतं. बाधीत प्रदेशातून आल्यामुळे आमचे कपडे त्या पाण्यात बुडवले गेले. पाऊस असल्याने पुढचे तीन दिवस ते सुकले नाहीत. दरम्यान अळंबी, मासे, शहाळी, अळू, पालेभाज्या अशा पदार्थांचा आस्वाद घेत आम्ही प्रतिकार शक्ती वाढवली आणि पुन्हा कर्मभुमी कडे वळलो.

नरेन्द्र प्रभू


13 August, 2009

रोगराई पसरवणारे मास्क


स्वाईन फ्लू मुळे अचानक शहरांचं चित्र बदलत चाललं आहे. अगोदर पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांच्या तोंडावर आणि शस्त्रक्रिया विभागात दिसणारे मास्क आता सर्रास सगळ्यांच्या तोंडावर दिसू लागले आहेत पण त्याच्या तर्‍हा तरी किती ? सर्जिकल,एन 95, साधे, थर्मल पासून हात रूमाल, ओढण्या, पदर सगळच तोंडावर आलं आहे. बरं हे सगळं तोंडावर असलं तर ठिक आहे. गळ्यात, कपाळावर, नाका खाली, हातात. मास्क ताईता सारखे जवळ असले म्हणजे झालं. ज्या रुमालाने हात फुसणार तोच तोंडावर. या सगळ्या गडबडीत जीव जंतूंचं भांडार घेऊनच आपण फिरतो आहोत याच भान नसतं. कित्तेक लोक मास्क बाजूला करुन थुंकताना दिसले, शिंकताना दिसले. हेच मास्क आता रस्त्या रस्त्यावर पडलेले आढळतात. मास्क स्वच्छ पाहिजेत, रोज बदलले पाहिजेत, ते दुसर्‍याच्या संपर्कात य्रेता कामा नयेत. थोडक्यात मास्कची काळजी घेतली तर ते आपल्या आरोग्याची काळजी घेणार. असो, सद्या शिंप्यांची दुकान तेजीत आहेत आणि साठेबाजांची चलती आहे एवढं खरं.


11 August, 2009

स्वाईन फ्लूची दहशत

देशात विशेषतः महाराष्ट्रात सध्या स्वाईन फ्लूचा धुमाकूळ चालू आहे. त्याच्या उन्माद माजवणार्‍या बातम्या प्रसारमाध्यमातून ऎकायला मिळाताहेतच पण अशा वेळी मायबाप सरकार कडून सामान्य नागरीकांची जी अपेक्षा आहे ती मात्र पुर्ण होताना दिसत नाही. दहशत मग ती २६/११ ची असो की स्वाईन फ्लूची जनता निर्नायकी असल्यासारखी आहे. ज्यांनी नेतृत्व करायच ते हात वर करून बसलेत. लोक हवालदील झाले असताना राज्याला दिशानिर्देश देणारं सरकार नाही की कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. राज्य सरकार काही निर्णय घेणार नाही, मग निर्णय कुणी घ्यायचे तर स्वयंघेषीत सुभेदारांनी, जिल्हाधिकार्‍यानी, शाळाचालकांनी, महापालिका आयुक्तांनी आणि सरते शेवटी मुलांच्या पालकांनी. आम्ही फक्त मलीदा खाणार, अर्धवट बांधकाम झालेल्या पुलांची उद्घाटन करणार, नवीन टेंडरं काढणार, स्वतःची थोबाडं असलेले बोर्ड लावून अनाहूत सल्ले देणार आणि शहर विद्रूप करणार, नवीन टोल नाके उभे करणार, भुखंड हडप करणार्‍या या डुक्करांनीच दहशतीच्या स्वाईन फ्लूची लागण व्हायला दिली आहे, जेणे करून येत्या निवडणूकीत जनतेने महागाई विसरावी, आपली शेखी मिरवण्यासाठी याना दही-हंडी, गणेशोत्सव पाहीजे. सज्जनतेचे आव आणलेली यांची कटाआऊट मोठी आणि शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक शोधावे लागतात.

या सगळ्या सावळ्यागोंधळात एकेका सुभेदाराचं फावलय. एक दादा आपल्या जिल्ह्यातली शाळा-कॉलेजं बंद ठेवतो तर शाळांचे सुभेदार मनमानी निर्णय घेताहेत. एकाच रस्त्यावरची एक शाळा बंद तर दुसरी उघडी. मेडिकलवाले दामदुप्पटीने पैसे वसुल करून मास्क विकताहेत. लोक आता स्वाईन फ्लू विसरे पर्यंत एकच मास्क लावून फिरणार त्यामुळे स्वाईन फ्लू राहिला बाजूला पण दुसर्‍याच रोगाची शिकार होणार. पण एक आशेचा किरण दिसतो आहे वसई-विरारचा धडा राजकारण्यांनी विसरू नये. तोपर्यंत असे दादा, भाई, रावजी, पंत आजुबाजुला फिरकलेच तर जरा त्यांच्या तोंडावर खोका. प्रतिक्रीया पहा.


10 August, 2009

रोहित पक्षीमुंबईच्या माहूल गावात दिड वर्षा पुर्वी टिपलेले हे काही रोहित पक्षांचे फोटो. बघा आवडतात का? खासकरून हे साधकासाठी...!
09 August, 2009

पक्षी निरिक्षण - वसईसाध्या पावसाने दडी मारली आहे, असं असलं तरी सगळीकडे कसं हिरवं गार आहे. आजच मी वसई जवळच्या मोडा गावात गेलो होतो. पाणथळ भागात आढळणारे रोहित, कुदळ्या, स्पुनबील या पक्षानी छान दर्शन दिलं. रस्त्यावर आलो तर एका मोठ्या झाडावर अनेक बग़ळे, पाणकावळे यांची घरटी होती, पिल्लांचा कॅक-कॅक असा आवाज चालू होता. गावचं वातावरण आणि पक्षांच सहवास खुप मज्जा आली. सगळीकडेच हे वातावरण आहे जरा नजर टाकली पाहीजे.

08 August, 2009

आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:२)निलम ताईंना या पुर्वी प्रत्यक्ष पाहिल होतं पण बाळ कुडतरकरांना प्रथमच पहात होतो. खरच ते अडिज तीन तास मंतरलेले होते. वयाच्या ८८ व्या वर्षीसुद्धा असलेला कुडतरकरांचा खणखणीत आवाज आणि उमदा स्वभाव, रसिकांची सतत मिळणारी दाद याने धुरूसभागृह एका चांगल्या कार्यक्रमाचं साक्षीदार बनलं. जुन १९३९ पासून आकाशवाणीच्या सेवेत असलेल्या कुडतरकरांनी आकाशवाणीच्या सुवर्णकाळाचा लेखाजोखा मांडला आणि सभागृह त्या भुतकाळात रमून गेलं. गम्मत-जम्मत, वनिता मंडळ, प्रपंच, पुन्हा प्रपंच, या कार्यक्रमांची निर्मिती प्रक्रिया सांगताना तेव्हा कार्यक्रमासाठी किती मेहनत घेतली जायची हे ऎकून चांगल्या कार्यक्रमा मागे काय साय्यास असायचे याची कल्पना आली.

महिन्याचा पगार २५ रुपये असताना तेव्हा एम्पायर सिनेमा हॉल मध्ये सुंदराबाईंचा असलेला गाण्याचा कार्यक्रम आणि त्याचं पहिल्या काही रांगांसाठी असलेलं ५० रुपये तिकीट, त्या कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे हैदराबादचे निज़ाम, पुढे सुंदराबाईंची झालेली परवड, झेड. ए. बुखारी या स्टेशन डायरेक्टरनी त्याची घेतलेली दखल आणि आता हल्ली बाळ कुडतरकर आकाशवाणीत गेले असताना या सुंदराबाई कोण? आणि ही कोणती गाणी? असा त्याना विचारलेला प्रश्न, या गोष्टी मुळातून ऎकण्या सारख्या होत्या.

पुन्हा प्रपंचसाठी वि. आ. बुवा, शं.ना. नवरे, शाम फडके आदी लेखकांची फळी कशी काम करत होती. त्याच वेळी तो कार्यक्रम सादर करणारे आम्हाला पहायचे आहेत म्हणून दिलीपकुमार आणि विजय मर्चट या दिग्गजांची मागणी, पुन्हा प्रपंच ची १२ वर्ष, अमेरीकन शिष्टमंडळाची भेट, योग्य शब्दोच्चारांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची घेतलेली भेट इथपासून अंधेरीच्या ‘पुन्हा प्रपंच’ को,ऑ.सोसायटीचा किस्सा हे सगळं ऎकुन एका वेगळ्याच दुनियेत गेल्याचा भास झाला.

त्या नंतर आवाजाचे चढ-उतार आणि भावना श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसं बोलावं याचं प्रात्यक्षीक म्हणून ‘गुंतता ह्रदय हे’ या नाटकातील प्रवेशाचं सादरीकरण ऎकून कान तृप्त झाले. आकाशवाणीचा बेताब बादशहा प्रभाकर पंत आणि मीना वहिनींची पुन्हा एकदा भेट घडवून आणल्या बद्दल दादर सार्वजनीक वाचनालय आणि श्री. विलास गुर्जर यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

नरेन्द्र प्रभू

07 August, 2009

आकाशवाणीचे मुकुटमणी (भाग:१)श्री. बाळ कुडतरकरआठवणी सांगताना शेजारी सौ. करूणा देव 
प्रसार माध्यमांची ताकत आणि प्रभाव या बद्द्ल वेगळं काही सांगायला नको. ती आपल्या नित्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेली आहेत. या माध्यमांपैकी कोणत्या माध्यमांवर विश्वास ठेवायचा आणि कुणावर ठेवू नय़े याची निवड मात्र आपल्याला फार काळजीपुर्वक करावी लागते, कारण सध्या एका एका उद्योग समुहाच्या किंवा घराण्याच्या मालकीची वर्तमानपत्रे, दुरदर्शन वाहीन्या, रेडीओ केंद्रे निघाली आहेत. सध्याच्या काळात आकाशवाणी, दुरदर्शनच्या सह्याद्री, नॅशनल चॅनेलवरील बातम्या विश्वासार्ह असतात. एक काळ असा होता की आकाशवाणी (All India Radio) वरून उच्चारलेल्या शब्दांना प्रमाण मानले जात असे. त्या आकाशवाणीच्या सुवर्णकाळाचे कर्ते, ज्यांच्या अथक परिश्रमांमुळे रेडिओ विशेषतः मराठी कार्यक्रम श्रवणीय होत असत. त्या खर्‍याखुर्‍या स्टार्सना काल भेटायची, ऎकायची संधी मिळाली. दादर सार्वजनीक वाचनालयाने आयोजित केलेल्या ‘ऑल इंडीया रेडीओ ते आकाशवाणी’ या कार्यक्रमात श्री. बाळ कुडतरकर आणि सौ. करूणा देव ( निलम प्रभू ) या कलाकाराना भेटता आलं, ऎकता आलं. दुरदर्शनचं अतिक्रमण होण्यापुर्वीचा जो काळ होता तो खरच आकाशवाणीचा सुवर्णकाळ होता. मी अगदी पाचवीत असल्या पासून रेडीओवरचे मंगल प्रभात ते रात्री आपली आवड पर्यंतचे सर्व कार्यक्रम नेमाने ऎकत असे. त्यात कामगार सभा, युववाणी, सर्व बातम्या, नाटकं, श्रुतिका, असे सगळेच कार्यक्रम असत. पण पुन्हा प्रपंचची गोष्ट काही वेगळीच होती. प्रभाकर पंत, मीना वहिनी आणि टेकाडे भाओजी ( अनुक्रमे बाळ कुडतरकर, निलम प्रभू [करूणा देव], प्रभाकर जोशी) हे अगदी आपले वाटत. सामान्यांचे प्रश्न आणि तशीच वागणूक त्या मुळे तो कार्यक्रम मनाला स्पर्श करून जाई.
नरेन्द्र प्रभू

03 August, 2009

प्रिय मित्र

त्या वाटेवर जरूर येऊन भेटेन तुला
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं मला

मैत्री म्हणजे काय असतं? माहीत नव्हतं
आपलं मात्र एक नातं नक्कीच होतं

दुर्वांकुरांवर दव कधी विचारून पडतं ?
इवल्याश्या तृणाला फुल कधी जड होतं ?

कोवळ्या उन्हातही दव मात्र विरून जातं
सरत्या दिवसा बरोबर फुलसुद्धा सुकून जातं

मैत्रीचे ते दिवसही असेच भुर्कन उडून गेले
बघता बघता किती पावसाळे सरून गेले !

त्या वाटेवर ते दव अजून पडतं
त्याच माळावर तृणपात्याला फुलही फुलतं

त्याच वाटेवर जरूर येऊन भेटेन तुला
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं मला


नरेन्द्र प्रभू


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates