28 September, 2009

कासचं पठार
सातारा जिल्ह्यात पाचगणी-महाबळेश्वरला आपण जातोच पण ऑगष्ट ते ऑक्टोबर मध्ये गेलात तर सातार्‍यापासून जवळच असलेल्या कासच्या पठारावर अवश्य जा. "व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' पाहण्यासाठी आपण दूर हिमालयात जातो. तोच आनंद मिळवायचा असेल तर कासला भेट द्यायला पाहीजे. रान फुलांचा गालीचा, दर चार-आठ दिवसागणीक बदलणारा. कधी पिवळीजर्द चादर, तर कधी गुलाबी तिरड्यांची आरास. १५-२० दिवसांचं आयुष्य असणार्‍या असंख्य वनस्पती तिथे फुलत असतात, कोमेजत असतात तेव्हाच त्यांची जागा घ्यायला दुसरी फुलं तयार असतात. नजर जाईल तिथे इवली-इवली सानूली फुलं वार्‍याच्या झोक़्यावर झुलत असतात. दर दोन-तीन दिवसानी रुपं बदलणारी ही फॅशन परेड पाहून थक्क व्हायला होतं. मन हरकून जातं. भान हरपून जातं. गेल्यावर्षी मात्र मला बघायला मिळाली ती निळाई. सात वर्षानी फुलून येणारी कारवी ऎन बहरात होती तेव्हाच आम्ही तिथे पोहोचलो. आता ती फुलं पहायला अजून सहा वर्ष थांबावं लागणार, तरी काही बिघडत नाही. आपल्या स्वागताला इतर फुलं हसत हसत डुलत आहेतच. कासच्या पठाराबरोबरच कास तलाव, तापोळे, बामणोली, वासोटा, ठोसेघर ही रमणीय ठीकाणं आणि सज्जनगड, प्रतापगड यांसारखे ऐतिहासिक किल्ले या परिसरात आहेत त्याना अवश्य भेट द्यावी.

नरेन्द्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates