29 October, 2009

महाराष्ट्रातील पर्यावरणीय बदल भाग २


(प्रतिभा दिवाळी अंक २००९ मधून प्रसिद्ध झालेला माझा लेख)

कोकणातील निसर्गसंपंन जमीनींवर आता धनदांडग्यांची नजर पडलेली आहे. खनीज उद्योजकांनी गोव्याची दुर्दशा केल्यावर आता त्याना जवळचा सिंधुदूर्ग-रत्नागिरी पादाक्रांत करायचा आहे. कळणे येथील ग्रामस्थांच्या विरोधाला न जुमानता तिथे खाण उद्योगाला परवानगी देऊन सरकार आपण पर्यावरण विरोधी आहोत हे सिद्ध करत आहेच पण औष्णिकउर्जा प्रकल्प, सेझ सारखे प्रकल्प कोकणात आणून आपण त्या भागाचा विकास साधतो असे सांगून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. जे कोकणात तेच पश्चिम महाराष्ट्रात, लवासा सारखे प्रकल्प उभारताना अतोनात झालेली वृक्षतोड, डोगरांचे सपाटीकरण यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलाशयांच्या पर्जन्य क्षेत्राची हानी झाली आहे. यामुळे जमीनीची धुप होऊन तलावात गाळ जमा होईलच परंतू पर्जन्यामानात घट होण्याचाही धोका आहे.

औद्योगिक प्रगती बरोबर शहरे बकाल झालीच पण कारखान्यांचे दूषित आणि विषारी पाणी तसेच शहरातील सांडपाणी नद्या-नाल्यांमध्ये कोणतीही प्रक्रीया न करता वर्षोंवर्ष सोडल्याने जमीनीवरील तसेच भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. नद्या तेच पाणी शहरांना साभार परत करत आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी आणि त्या पाण्याची धनदांडग्यांकडून होणारी चोरी हे आता गुपित राहीलेले नाही. नदी पात्रातून होणारा वाळूचा उपसा एवढा अनियंत्रीत आहे की नदी पात्रात अनेक ठीकाणी डोह निर्माण झाले आहेत. ही रेती नद्यांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक असते तसेच नद्यांवर बांधलेल्या पुलांचे संरक्षण करते. नदी वाहती रहाण्यासाठी जसे पाणी पाहीजे तशी ही रेती सुद्धा हवीच. वीस-पंचवीस वर्षांपुर्वी बारमाही वाहणार्‍या नद्या आता पावसाळा संपताच क़ोरड्या पडत आहेत. जिथे कुठे नदीत पाणी दिसते ते कारखान्यातले काळं, प्रदुषित मृत पाणी असते. ज्या मध्ये केवळ जिवाणूंची आणि विषाणूंची निर्मिती होऊ शकते. मुंबईत असलेला मिठी नाला एके काळी नदी होती हे सर्वच विसरून गेले आहेत. पुण्याची मुठा नदी असो की कोल्हापूरची पंचगंगा जिथे म्हणून ती शहरांच्या संपर्कात आली भ्रष्ट झाली, प्रदुषित झाली. दुसरीकडे नळ-पाणी योजनांमुळे विहिरी, तळी, तलाव अशांचे महत्व कमी होत गेले आणि ती नष्ट झाली किंवा प्रदुषित झाली.

शेती आणि ग्रामिण भाग वगळता शहरांचा विचार केला असता तेथील स्थिती अधिक भयावह आहे. जवळ जवळ सर्वच शहरांमधून रोज टनावारी घनकचरा उत्पन्न केला जातो. प्रक्रिया न करता सांडपाणी नद्या-समुद्रात सोडले जाते. वीजेचा अपव्यय, प्रकाशझोतातील क्रिकेटचे सामने, विद्युत रोषणाई, प्लॅस्टीकच्या पिशव्या, फटाक्यांची आतषबाजी, वाहनां मधून सोडला जाणारा धुर, कर्णकर्कश आवाज करणारी साधनं, प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती, रासायनीक रंग, गुलाल, निर्माल्य, डास प्रतीबंधक फवारे, कृत्रिम फुले, थर्माकोल, स्वतःचं घर सोडून इतर सर्वत्र टाकलेला कचरा, इ-कचरा, हॉस्पिटल मधून बाहेर टाकला जाणारा कचरा हे सगळे प्रदुषण करणारे दृश्य घटक पर्यावरणाचा र्‍हास करत आहेत. या शिवाय इमारतीना बाहेरून लावलेल्या काचा, वातानुकूल यंत्रे, सौंदर्य प्रसाधने, फर्निचर, या पासूनही प्रदुषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. प्रदुषणात शहरीकरणामुळे वाढच होत चालली आहे.

निसर्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात घाव घातल्यावर तो कोपला नाही तरच नवल. निसर्ग दयामाया दाखवत नाही हे २६ जुलै २००५ ला मुंबईकरांना आणि त्या नंतर लगेचच सांगली, कोल्हापूरकरांना नाकातोंडात पाणी गेल्यावर समजले. गेल्यावर्षी तीच परिस्थिती गोदावरीकाठच्या नाशिककरांनी अनुभवली. सर्व भौतिक गोष्टींचा उपभोग घेता घेता माणूस हे विसरतो की तो या निसर्गाचाच एक भाग आहे. निसर्गाविरूद्ध वागणे म्हणजे स्वतःचा खड्डा स्वतः खोदणे हे आपल्याला कधी समजणार ? रासायनिक खते परवडली असे म्हणायला लावणारे जेनेटीक बदल घडवून आणलेले अन्न आता खाद्यबाजाराचा ताबा घेण्याच्या मार्गावर आहे. आपल्या देशात अजून या अन्नधान्याला परवानगी नसली तरी सुस्त सरकारी व्यवस्था आणि भ्रष्टाचार यामुळे कायदा कागदावरच राहतो हे आपण पदोपदी अनुभवतोच. ......(क्रमशः)

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates