30 October, 2009

महाराष्ट्रातील पर्यावरणीय बदल भाग ३


(प्रतिभा दिवाळी अंक २००९ मधून प्रसिद्ध झालेला माझा लेख)

भ्रष्ट सरकारी यंत्रणा, राजकारणी, नफेबाज व्यापारी, निर्ढावलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या हे सर्व घटक जसे याला कारणीभूत आहेत तसेच आपणही याला कळत नक़ळत हातभार लावत आहोत. आपण या समाजाचाच एक भाग आहोत. तेव्हा ही परिस्थितीही आपणच बदलू शकतो. त्या साठी काही सवई बदलाव्या लागतील, थोडे नियम पाळावे लागतील. स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगण्या साठी आपण काय करू शकतो ते बघा. आवश्यक नसलेल्या ठिकाणचे विजेचे दिवे, पंखे बंद ठेवणे, सण समारंभातील विद्युत रोषणाईला आवर घालणे, प्लॅस्टीकच्या पिशव्यांचा वापर बंद करणे, फटाक्यांना फाटा देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आवाजावर नियंत्रण, निर्माल्य तसेच जैविक कचर्‍यापासून कंपोष्ट खत निर्मिती, ग्रामिण भागात जंगलांची, झाडांची जोपासना, शहरी भागात अशी झाडे उद्याने, सोसायट्यांच्या आवारात लावता येतील. प्रत्येक घरात एक तरी असा कोपरा असतो की जिथे आपण जास्त नाही पण दोन तरी कुंडीतली झाडे लाऊ शकतो. इमारतीच्या गच्चीत फुलांची बाग फुलवू शकतो.

तिसरं महायुदध्द झाल तर ते पाण्यावरून होईल असे म्हटसे जाते. हे पाणी वाचवण्यासाठी आपण खुप काही करू शकतो. दाढी करत असताना बेसिनचा नळ चालू न ठेवणे, फ्लशच्या लाहान टाक्या बसवणे किंवा मोठ्या टाक्या असतील तर त्यात एक प्लास्टीकची बाटली भरून ठेवल्यास प्रत्येकवेळी एक लिटर पाण्याची बचत होवू शकते. ‘ रेन वॉटर हार्वेस्टींग ‘ म्हणजे पावसाच्या वाहून जाणार्‍या पाण्याची साठवण करून त्याचा वापर करणे तसेच ते पाणी जमीनीत मुरवणे या सारखे उपाय योजून पाण्याच्या समस्येवर यशस्वी मात केली जावू शकते. मुंबईतल्या चेंबूरमधील म्हैसूर कॉलनीगेली चार वर्षे करण्यात आलेल्या पर्जन्य जलसंधारणाने सोसायटीला २४ तास पाण्याचा पुरवठा होतो शिवाय खर्चात बचतही झाली आहे. तिकडे धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील काही गावे केवळ ३५० मिलिमीटर पाऊस पडूनही पाण्याबाबत तृप्त आहेत. कारण पावसाचे पाणी जिथले तिथेच अडवा-जिरवा, ते स्थानिकांना वापरू द्या! अशी साधी व सोपी संकल्पना राबवून तेथील ग्रामस्थांनी तिथल्या नदी-नाल्यांना पुन्हा जिवंत केले आहे. असे काही पथदर्शी प्रकल्प आपणाला अजून वेळ गेलेली नाही, प्रयत्न केले तर आपणच आपली मदत करू शकतो हे दाखवून देतात. आपल्या महाराष्ट्रात पडणारा पाऊस आणि सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यांमधून खळाळत जाणारं पाणी ठिकठिकाणी अडवले तर त्यावर छोटे-छोटे जलविद्युत प्रकल्प उभे राहू शकतात. अशा प्रकल्पांसाठी तसेच कचर्‍यातून वीज निर्मिती साठी संघटीत प्रयत्न करणे, दबावगट तयार करणे आवश्यक आहे. सुर्यप्रकाशाची अक्षय उर्जा उपलब्ध असलेल्या आपल्या राज्यात सौरउर्जेचा प्रभावी वापर होणे गरजेचे आहे. सेंद्रीय खतांचा वापर करून जमीनीचा पोत आपण सुधारू शकतो. देवराया, तळी, डोह यांचे संवर्धन तसेच जपणूक करून पर्यावरणाच्या समतोलाला आपण हातभार लावुया. अन्यथा कवीच्या या ओळी खार्‍या ठरतील.

केवळ त्या नंतर

जेव्हा शेवटचं झाड तोडलं जाईल.

केवळ त्या नंतर

जेव्हा शेवटच्या विहिरीचं पाणी विषारी होईल.

केवळ त्या नंतर

जेव्हा शेवटचा मासा पकडला जाईल.

केवळ त्या नंतर

तुम्हाला समजेल, की पैसा खाता येत नाही.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates