06 November, 2009

जन आंदोलनाची केंद्रं, कोकणातील मंदीरं


सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कळणे हे गाव असो की रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर, विकासाच्या नावाखाली या गावांच्या पर्यायाने संपूर्ण कोकणाच्याच गळ्याला नख लावण्याचा घाट घातला जात आहे. नितांत सुंदर अशा आणि जैव विविधतेने नटलेल्या कोणणाचा कायापालट करण्याच्या भुलथापा अनेक वर्ष मारल्या गेल्या, नंतर आता अचानक तेथील जमीनींवर धनदांडग्यांची आणि राजकारण्यांची वाईट नजर पडली आहे.

कळणे येथील जमीनी द्यायला नकार देताच त्या येणकेण प्रकारेण ताब्यात घेण्यासाठी साम दाम दंड भेद नितीचा वापर गेलं जवळजवळ वर्ष दीड वर्ष करण्यात येत आहे. जेवढा दबाव वाढवला जात आहे तेवढाच तिव्र प्रतिकार तेथील ग्रामस्थ करीत आहेत. गावातली लहानथोर सर्व मंडळी न चुकता देवळात येवून आपला संघर्ष चालू राहील याची काळजी घेत आहेत. जवळच्याच रेडी गावात आलेल्या खाण प्रकल्पाने कोणाचा फायदा झाला याची पुरेपूर जाण असलेला गावकरी आता भुलथापाना बळी पडणार नाही.

जैतापूरचा प्रश्न तर अधिकच चिंता उत्पन्न करणारा आहे. अणु उर्जा प्रकल्प हा भुकंप प्रवण क्षेत्रात असता कामा नये हा साधा नियम न पाळता किंवा त्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करून या प्रकल्पासाठी जमीन संपादनाची कारवाई केली जात आहे. गेल्या विस वर्षात किमान चारवेळा त्या भागात पाच रिश्टर स्केलपेक्षा मोठे भुकंप झाले आहेत. प्रकल्पाची उभारणी झाली आणि मोठा भुकंप झाला तर जी जिवीत हानी होईल त्याची भरपाई कधीच होणार नाही. उर्जा प्रकल्पा मुळे किरणोत्सर्ग होवून ग्रामस्थांवर होणारे कायमचे परिणाम, कोकणच राजा हापूस आंबा नष्ट होणं, मासे नाहीसे होणं, निसर्गाची वाताहात लागणं, ग्रामस्थाना विस्थापिताचं जीणं जगावं लागणं, समुद्रात प्रकल्पाचं गरम पाणी सोडल्यामुळे अनेक जलचर, मासे, वनस्पती नष्ट होणं या मुळे तो परिसर भकास तर होईलच पण या प्रकल्पामुळे निर्माण होणार्‍या विजेच्या कितीतरी पट अधिक कायमचे नुकसान त्या परिसराचं होईल यात शंका नाही. कोकणात पडणार्‍या पावसाच्या पाण्यावर आधारीत जलविद्युत प्रकल्प राबवून या समस्येवर सहज मात करता येईल आणि पर्यावरण रक्षणाचं पुण्य ही पदरात पडेल. पण लक्षात कोण घेतो?

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates