07 December, 2009

चला पर्यावरणाशी मैत्री करूया भाग २


आणखी एक अनुभव सुप्रसिद्ध लोणार सरोवराजवळचा. लोणार सरोवर जागतिक वारसा लाभलेलं एक महत्वाचं ठिकाण आहे. सुमारे पन्नास हजार वर्षांपुर्वी अवकाशातून अशनीपात होऊन या ठिकाणी १८७५ मीटर व्यासाचं एक सरोवर तयार झालं. जगातील अशनीपातापासून तयार झालेलं हे तिसर्‍या क्रमांकाचं मोठं सरोवर आहे. आजुबाजुला गोड्या पाण्याचे स्त्रोत असले तरी या विवरात साठलेलं पाणी मात्र समुद्राच्या पाण्यापेक्षा खारट आहे. देश-विदेशातून अनेक विज्ञान प्रेमी तिथे कायम भेट देत असतात. भारतीय पुरातत्व खात्याने हा भाग संरक्षित म्हाणून जाहीर केलेला आहे. अशा परिसराची आपण नेहमीच काळजी घेतली पाहीजे. लोणार सरोवर पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. गावातल्याच एका तरूण, अनुभवी, माहितगार वाटाड्याला सोबत घेऊन तो भाग, सरोवर, त्याकाठची मंदीरं पाहून परतत असतानाच वरून तेरा-चौदा वर्षांची मुलं हसत खिदळत धडाधड धावत खाली येत होती. बहूतेक सगळ्यांच्या हातात लेज, कुरकुरे सदृष्य पाकीटं होती. मागोमाग त्या मुलांचे शिक्षक होते. आता ही मुलं हातातले खाद्य पदार्थ खाऊन झाल्यावर पिशव्या तशाच तिकडे टाकणार हे नक्की, कारण तिकडे तसा प्लास्टीकचा कचरा आधीच पडलेला दिसत होता. मी त्या शिक्षकांजवळ चौकशी केली, ही सहल कसली ? वर्षातून एकदा अशी शैक्षणिक सहल न्यावी लागते त्या नियमानुसार आपण ही सहल आणली आहे असं त्यांच उत्तर. प्लास्टीकच्या कचर्‍याविषयी मी शंका उपस्थित केली, तर टाकतात काय करणार असं त्यांचं उत्तर.

थोडक्यात काय तर आपल्या देशात कुठेही जा, मग ते शहर असो की खेडं पर्यावरणाविषयीची ही बेपर्वा वृत्ती सगळीकडे सारख्याच प्रमाणात दिसून येते. पाणी, हवा, जमीन, आवाज यांचं प्रदुषण आपण कळत नकळत करतच असतो. वरील तिन्ही प्रसंगात आपण प्रदुषणात भर घालतो आहोत हे त्या मंडळींच्या गावीही नव्हतं. अगदी लहान वयातच पर्यावरणासंबंधीचे संस्कार होणे गरजेचे आहे. आजपर्यंत आपल्याच चुकीमुळे पर्यावरणाची अपरिमीत हानी झाली आहे आणि आत त्याचे दृष्य परिणाम आपल्या लक्षातही येवू लागले आहेत. प्रदुषणकारी फटाके, रंग, किटकनाशके, जंतूनाशके, रासायनीक कचरा, प्लास्टीक हे तर आहेच पण सहज म्हणून केलेल्या काही कृती पर्यावरणाच्या र्‍हासाला कारणीभूत ठरत आहेत. प्राणीसंग्रहात गेलं असता अनेक मुलं आणि त्यांच्या जोडीने आलेले पालक पिंजर्‍यातील प्राण्यांना पॉपकॉर्न खायला घालताना दिसतात. आपण दाखवलेली ही भुतदया त्या प्राण्यांच्या प्राणांवर बेतण्याची शक्यता असते. प्राण्यांना असे खाद्यपदार्थ खायला घालू नये असे फलक अशा ठिकाणी लावलेले असतात त्याकडे सर्रास दुर्लक्ष केला जातो. जंगलात किंवा डोंगराळ भागात उन्हाळ्याच्या दिवसात पालापाचोळा सुकलेला असतो अशा ठिकाणी पडलेली एक ठिणगी प्रचंड वणव्यात रुपांतरीत होऊ शकते. डोंगरावर लागलेले असे वणवे आपण नेहमी पहातो. निष्काळजी पणाने फेकून दिलेली विडी-सिगारेटची थोटकं याला बर्‍याचवेळा कारण ठरतात. कोकणात अजूनही बर्‍याच प्रमाणात गायरानं, देवराया टिकून आहेत. अशा देवरायांचा परिसर हा देवांसाठी सोडलेला आहेत असा समज असल्याने त्या ठीकाणची काडीसुद्धा तिथले ग्रामस्त उचलत नाहीत. या देवराया आपल्या पुर्वजांनी जाणीवपुर्वक जोपासल्या होत्या. अनेक प्राकारच्या एरवी नष्ट होणार्‍या झाडांच्या प्रजाती इथे अजूनही तग धरून आहेत. एक प्रकारची ही पुर्वांपार जपून ठेवलेली जिनस् बॅंकच आहे. पण या देवरायांचा मुळ उद्देशच आता हरवत चालला आहे. अंधश्रद्धेने अनेक लोक इथल्या दगडांना शेंदूर फासत आहेत आणि नवस म्हणून अनेक अघोरी प्रकार इथे होत आहेत. प्राण्यांचे बळी दिले जात आहेत. अशा गोष्टी करता करता आता या देवरायात अनेक ठिकाणी प्लास्टीकच्या बाटल्या, पिशव्या जमा झालेल्या दिसतात. संक्रातीचा सण दरवर्षीच उत्साहाने साजरा केला जातो. त्यावेळी आकाशात पतंगांची गर्दी झालेली असते. पतंगांच्या मागोमाग त्याला आकाशात घेऊन जाणारा मांजा हा बर्‍याच वेळा पक्षांच्या प्राणांवर बेततो. साध्या हलक्या दोरानेही पतंग उडवला जावू शकतो पण पतंगांची काटाकाट करण्याच्या हव्यासापोटी मांज्याला काचेचा चुरा फासला जातो आणि ते एक धारदार शस्त्र बनून आकाशात उडत असते. झाडंवर गुरफटून बसते आणि काही वेळा दुर्मिळ पक्षांचा जीव जातो.

अशा छोट्या छोट्या वाटणार्‍या पण पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणार्‍या गोष्टी टाळणं आपल्याच हातात आहे. थोडीशी काळजी घेतली आणि सतर्कता बाळगली तरी आपण आपल्या आजुबाजुच्या वातावरणाची काळजी घेऊ शकतो. पर्यावरण संवर्धनाला हातभार लाऊ शकतो. आपल्या खाण्यात येणार्‍या फळांच्या बीया कचराकुंडीत न टाकता त्या साठऊन ठेवल्या आणि आपण जंगलात किंवा डोंगरात जातो तेव्हा तिकडे पसरून टाकल्या तर त्यांची झाडं उगवतील आणि निसर्गाकडून नुसतच न घेता आपणही त्याला काही दिल्यासारखं होईल. सामाजिक वनीकरण, वनविभाग, नगरपालिका, महानगरपालिका आणि काही स्वयंसेवी संस्था पावसाळ्याच्या सुरवातीला मोफत रोपांचं वाटप करतात अशी रोपं आपल्या आजुबाजुच्या परिसरात लाऊन त्याची योग्य देखभाल केली तर आपला परिसर हिरवागार दिसेलच पण पक्षांच्या अधिवासाने गजबजून जाईल आणि ज्या मधूर गुंजनाला आपण आसूसलेले असतो ते पक्षाचे गाणे आपल्याला नित्यनव्याने ऎकता येईल. मन प्रसन्न होईल.

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates