16 February, 2010

ज्युलियन हॉलिकची ग्रेट भेट

ज्युलियन हॉलिक हे पत्रकार आणि लेखक आहेत. बीबीसी रेडिओ फोर आणि बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या अनेक कार्यक्रमांचे निर्माते, द टाइम्स ऑफ इंडिया आणि द हिंदू या वृत्तपत्रांचे स्तंभलेखक. फ्रान्समध्ये वास्तव्यास असलेले पत्रकार हॉलिक मला पहिल्यांदा भेटले ते त्यांच्या ॥गंगा॥ या पुस्तकाच्या माध्यमातून. गंगेबद्दल अपार श्रद्धा आणि प्रेम तमाम भारतीयांच्या मनात असतच पण ज्युलियन हॉलिक या विदेशी माणसाला ते का आहे याच्या बद्दल मनात कुतूहल होतं. गंगाजल नॅचर फाउंडेशनचे विजय मुडशिंगीकर याच्यामुळे ज्युलियन हॉलिक यांना भेटण्याचा योग आला. भायखळा येथील स्पार्क या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयात प्रथम त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. मुंबईतील झोपडपट्टीत, विशेषतः मुस्लिमबहूल भागात गेली दहा-बारा वर्ष ज्युलियन हॉलिक कार्यरत आहेत.

गंगाजल नॅचर फाउंडेशनच्या जन जोडो गंगा अभियानाच्या निमित्ताने मुडशिंगीकरांना ज्युलियन हॉलिक यांना भेटायच होतं ती भेट आज आमच्या घरी व्हायची होती. हॉलिक येणार म्हणून सकाळपासूनच उत्सुकता होती. दिलेल्यावेळी ते आले. चर्चा झाली. इतका मोठा माणूस पण तेवढाच मोकळा. स्पष्ट बोलणारा. कसलाच बडेजाव नाही. जेवल्यावर त्यांचं ताट मी उचललं तर इतर दोघांची ताटं उचलून माझ्या मागून येताना बघून मी ताठच झालो.

आम्हा मराठी प्रेमी लोकांसाठीही त्यांनी एक संदेश न बोलताच दिला. आमचं सगळ बोलणं इंग्रजी मधून होत होतं. पण त्यांनी लिहिलेल्या ॥गंगा॥ या पुस्तकावर स्वाक्षरी देताना त्यानी संदेश मात्र फेंच भाषेतच लिहिला.


7 comments:

  1. > पुस्तकावर स्वाक्षरी देताना त्यानी संदेश मात्र फेंच भाषेतच लिहिला.
    >

    फ़्रेञ्च भाषा न ज़ाणणार्‍या भारतात श्री हॉलिक यांनी पुस्तकावर स्वाक्षरी देताना त्या भाषेत संदेश का दिला?

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  2. त्यांना आपल्या मातृभाषेबद्दल तेवढा अभिमान असावा.

    ReplyDelete
  3. केवळ थेम्स नदीच्य काठी बालपण गेल या पार्श्वभूमीवर एक विदेशी त्यांना गंगानदीचे आकर्षण निर्माण होते. आणि ते आपल्य आयुष्यातील अनेक वर्षे, भारताची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी महानदी 'गंगा' हीच्यावर अभ्यासार्थ खर्ची घालतात. आपली निरीक्षणे,अंदाज, निष्कर्ष तसेच प्रदूषणावर काम करणा-या अनेक स्वंयसेवी संस्था तसेच व्यक्ती यांच्यासी संवाद साधतात. त्या सगळ्यांची मतं संकलीत करतात. शासकीय संस्था तसेच आधिकारी व मंत्री यांच्यासीही संवाद साधतात. त्या बरोबरच ते सर्वसामान्यंनाही विसरत नाहीत त्यांचा गंगानदी विषयीचा आदर हळूवार शब्दात मांडतात. गंगनदीचा पौराणिक संदर्भ तिचे धार्मिक महत्व याचे पदर उलघडण्या बरोबरच शेतीसाठी गंगानदीच्या पण्याचा होणार अतीवापर तसेच कारखानदारी व नागरी वस्त्याच्या सांडपाण्यामुळे होणा-या गंगाप्रदूषणावर ते टीकेची झोंड उठ्वतात. तितक्याच हळुवारपणे गंगाजलातील अगम्य गुढ, त्याला आपण अम्रुत का म्हणतो ते उलघवडण्याचा भावस्पर्षी प्रयत्न करतात. आणि तेवढ्याच कठोरपणे गंगेच देवत्वच कसं गंगानदीच्या मुळावर आलयं ते पटवूनही देतात.
    कानपूर ते कोलकोता हा प्रवास बोटीतून करण्यासाठी लागणा-या अनुमतीसाठी केंद्रसरकारच्या प्रशासकिय अधीका-याच्या भेटी दरम्यान ‘फराक्का’ बाधांच्या संदर्भात काहिही न लिहीण्याची प्रशासकिय अधीका-याची सूचना फेटाळून केवळ सर्वसामांन्य भारतीयांना कळावे म्हणुन बिहार मधील आजच्या पूरस्थितीला जाबादार असलेल्या ‘फराक्का’ बांधावर आभ्यसपुर्ण असे एक प्रकरण लिहितात.
    "हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती हैं" म्हणत आम्ही भारतीय मात्र काय करतोय ? प्रांतवाद, भाषावाद !
    देशापेक्षा आपला प्रांत आणि आपली भाषा महत्वाची मग निसर्ग, नद्यां, जंगलाचं काय घेवून बसताय ?

    ReplyDelete
  4. विजय मुडशिंगीकर, नमस्कार आपल्या मताशी मी पण सहमत आहे. हॉलिक यांचं कार्य फार मोठं आहे. तरी पण त्यानीसुद्धा आईला आई आणि दाईला दाईच म्हटलं पाहिजे म्हणून संदेश लिहिताना तो फ्रेंच भाषेत लिहिला.

    ReplyDelete
  5. श्री नरेन्द्र प्रभू : हॉलिक यांनी फ़्रेंच भाषेत संदेश लिहिला, हे केवळ एक उदाहरण झालं. त्यानी काही सिद्‌ध होतं असं नाही. रा स्व संघाच्या गोळवलकर गुरुजींनी मृत्युपत्र हिंदीत लिहिलं होतं. ती माझी मातृभाषाच नाही, मराठी काय समृद्‌ध नाही का, घटनेत ती अधिकृत राज्यभाषा आहे हा, असले प्रश्न ते विचारत बसले नाहीत. ती ४९.८ टक्क्यांची अल्पमतातली भाषा आहे की ५१.२ टक्के लोकांची भाषा आहे, असले अल्पमती प्रश्नही त्यांनी विचारले नाहीत. अखिल भारतीय संघटनेचं आपण नेतृत्व करतो, त्याच्यासाठी सर्वात सोयीची भाषा हिन्दी, हा साधा विचार त्यांनी केला. सावरकरही अन्दमानात हिन्दी येणार्‍यांनी मराठी, बंगाली, तेलुगु वगैरे भाषा शिकावी, पण हिन्दी येत नसल्यास पहिले ती शिकावी, हेच धोरण ठेवलं.

    शिवाजीनी व्यंकोजीला दक्षिणेत पाठवलं, होळकर इंदूरला गेले, विष्णु दिगंबरांनी मराठी गायक देशभर संगीतप्रचाराला पाठवले, आणि केरळच्या शंकराचार्यांनी भारताच्या चार कोपर्‍यात अधिकारी नेमले. ही परम्परा आहे. बिहारी लोकांच्या गुंडगिरीचं कोणी समर्थन करु नये, पण आपण बिहारात जन्मून हवालदिल झालो असतो तर आपलेही मुंबई, बंगलोरकडे डोळे लागले असते.

    भारतावर अन्याय होतो, मराठीवर अन्याय होतो, ही मानसिकता सोपी आहे, आणि खोटीही आहे. भारतभर मला चांगले अनुभव आहेत आणि क्वचित वाईटही आहेत. तसेच बाहेरच्यांना महाराष्ट्रात चांगले अनुभव जास्त यायचे, ते तसेच येत रहावेत. 'आपला बिहार' दु:स्थितीत आहे असं मानून आपल्यातले किती लोक तिथे काम करायला ज़ातात? मी दुसर्‍यांकडे बोट दाखवत नाही, कारण मी ही त्यांच्यासाठी काही करत नाही. इतरांनी त्यांना सुधारण्यापेक्षा बिहारी लोकांवर बिहारची जास्त मोठी ज़बाबदारी आहे, हे पण मान्य. पण ठाकरे शैलीचं द्‌वेषाचं राजकारण करु नये. एरवी सरळ मराठी लोकांचं स्वतंत्र राष्ट्र मागा, चळवळ करा. त्यात प्रामाणिकपणा तरी राहील. आणि 'अन्याय, अन्याय' ओरडत मराठी माणूस स्वत:च आपल्या भाषेची कदर करत नाही, त्याप्रमाणे वेगळा देश मागून स्वत:च देशाची कदर न करता सबंध देशासाठी लढलेल्यांच्या ध्येयावर छान बोळाही फिरवता येईल.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  6. नानिवडेकर साहेब नमस्कार. देशाची एकच भाषा असती तर हा प्रश्नच आला नसता. बिहारींना हाकलून लावावे या मताचा मी पण नाही. पण त्याचं राजकारण करू नये. दुसर्‍या राज्यात आपली विकृती घेव्वोन जायचं आणि त्याला गोंजारत बसायचं. स्वतंत्र मतदार संघाची मागणी करायची. कंपूशाही चं राजकारण करायचं. ज्या कार्यालयात बहुसंख्य आहेत तीथे माजोरी दाखवायची, आमच्यात असं असतं अशी शेखी मिरवायची हे कसं सहन करायचं? शेवटी भाषावार प्रांतरचना का झाली? काश्मीर, पॉन्डेचरी मध्ये तुम्ही एक इंच जागा घेऊ शकत नाहीच ना?

    ReplyDelete
  7. अधिकारांचा गैरवापर, कंपूशाही हा मानवी स्वभाव आहे; आणि बिहारी लोक तर गुंड असल्यामुळे त्यांच्यात तो जास्त आहे. आंबेडकरांच्या पुतळ्यावरून हरिजन समाज़ाला त्रस्त करतात. एके काळी ब्राह्‌मण त्यांना सार्वजनिक तळ्याचं पाणी वापरू देत नसत. हे सगळंच असमर्थनीय आहे. माझ्या मते तत्त्वत: कोणीही कुठल्याही राज्यात ज़ावं, पण व्यवहारत: अमुक भूमी अमुक भाषावाल्यांची ही भावना असते हे मला मान्य आहे. तरीही सहानुभूती बाळगून प्रश्नाचा विचार करावा. माझ्या एका ऑफ़ीसात एका खोलीत दहापैकी चार लोक मराठी होते. आम्ही चक्क मराठीत बोलायचो. हे चूक होतं, पण आमचा आनन्द (किंवा मग्रूरी) पाहून इतर कॅलिफ़ोर्नियावासी बिचारे सहन करत. इतर लोकच आपली भाषा मिरवतात, हा एक न्यूनगंडातून आलेला कांगावा आहे.

    अनेक समृद्‌ध भाषा हे भारताचं फार फार मोठं वैभव आहे. 'एकच भाषा असती तर' हा ज़र-तरचा भाग झाला. भाषावार प्रांतरचना का झाली, ती योग्य का अयोग्य, हे सर्व मला अजिबात कळत नाही. म्हणून मी त्याविषयी कधीच कुठेच मत देत नाही.

    काश्मीरात आज़ ज़ागा घेता येत नाही, पण २०-३०-४० वर्षांनी, १०० वर्षांनी घेऊ शकू का, काय करावं लागेल, याचा विचार झाला पाहिजे. जिथे मुसलमान बहुसंख्य होते त्या पाकिस्तान, काश्मिर, बांगला देश भागांत हिंदुंना त्रास दिल्या गेला. आज़ दिल्ली, हैद्राबाद, कोलकत्यात मराठी माणूस सुखात आहे. पंजाबी लोक 'तुम्ही नामदेवाच्या भागातले का' असं आनन्दानी विचारतो आहे. हे दोन मुद्‌दे पूर्णत: वेगळे आहेत. माझी ३-४ पाकिस्तानी मुसलमानांशी मैत्री आहे. त्यातले काही भारतात जन्मलेले पण १९४७ मधे पळालेले आहेत. पण ही मैत्री व्यक्तिगत पातळीवरच आहे. ते जास्त झाले की त्यांना ६०-७० टक्के बहुसंख्या पुरत नाही, ती १००% करण्याची तळमळ लागते. गैरमराठी भारतीयांशी मराठी माणसाचे तसे संबंध नाहीत. म्हणून डोळस सहानुभूती हवी, एरवी 'सारे भारतीय माझे बांधव आहेत' ही एक अप्रामाणिक प्रतिज्ञा ठरेल.

    - डी एन

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates