16 April, 2010

लालबाग परळ – लागली वाट मुंबईची

परवा लालबाग परळ झाली मुंबई सोन्याची हा चित्रपट पाहीला. मन सुन्न झालं. महेश मांजरेकरचा हा शिवाजीराजे नंतरचा आणखी एक चांगला चित्रपट. हा चित्रपट पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १९८३ चा जानेवारी महिना असावा. कणकवली जवळच्या तरळा या गावी डॉ. दत्ता सामंतांची एक सभा होती. दीर्घकाळ चाललेल्या गिरणी संपामुळे चाकरमान्याने कधीचीच मुंबई सोडली होती. संपकर्‍यांसाठी त्या सभेचं आयोजन केलेलं होतं. सरकार आपल्या एकी समोर नमत घेईल, केंद्रीय वस्त्रोंद्योग मंत्री विश्वनाथ प्रताप सिंगना लक्ष घालावं लागेल अशा प्रकारे डॉक्टर कामगारांची समजूत घालत होते. पण गिरण्या मंबईला आणि संपामुळे विस्थापीत झालेला कामगार कोकणात, त्यांच्या समोरची ती सभा म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी अवस्था होती. आमच्या गावातल्या एका कुटुंबातले पाचच्या पाच भाऊ गिरणीत कामाला होते. ते गणपतीला गावाला येत तेव्हा त्यांचा रुबाब बघण्यासारखा होता. पण त्या संपाने त्यांची रया गेली. ते कुटुंब देशोधडीला लागलं तशी लाखो कुटुंबांची हालत झाली. त्यांच्या टाळूवरचं लोणी राजकारणी आणि गिरणी मालकांनी खाल्लं. अजूनही खाताहेत. दादर येथील गोल्ड मोहर मिलला २० मार्च २०१० रोजी भीषण आग लागली होती, ती रॉकेल ओतून लावली होती. (वाचा: गोल्ड मोहर मिलला रॉकेल टाकून आग लावल्याचा अहवाल) तशा सगळ्याच आगी लावलेल्या असाव्यात. त्या आगीत गिरणी कामगारांच्या चार तरी पिढ्या खाक झाल्या. चित्रपटात ते वास्तव पहायला मिळतं.                  


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates