04 May, 2010

गिरचे अभयारण्य


गिरच्या अभयारण्यातील सिंहांची संख्या वाढली ही बातमी वाचली आणि मी त्या अभयारण्यात अनुभवलेला थरात आठवला. २००२ च्या नोहेंबर महिन्यात आम्ही द्वारका, सोमनाथ  गिर अशी सहल केली होती. वेरावळहून गिर अभयारण्याच्या दिशेने निघालो. आम्ही मुख्य गेटजवळ पोहोचलो तेव्हा पर्यटकांना सफारीसाठी घेऊन जाणारं वाहन निघून गेलं होतं. आणखी दुसरं सरकारी वाहन तीथे नव्हतं. आम्ही मारुती व्हॅन घेऊन गेलो होतो तीच घेऊन आत जाता येईल असं समजल्यावर बरं वाटलं कारण आमची बरीच रखडपट्टी झाली असती. चार-साडेचार वर्षाची ऋचा, मी आणि हर्षदा अशी आम्ही तीघं व्हॅनमध्ये पाठीमागे बसलो होतो. पुढे वन विभागाचा एक गार्ड आणि ड्रायव्हर. त्या व्हानने जंगलात प्रवेश केला. सगळीकडे खुरटी काटेरी झुडपं. तसा रुक्ष प्रदेश. मधेच एखादं झाड बाकी जंगल म्हणावं असं काही नाही. दुरवर एक सिंह दिसला. मी कॅमेरा घेऊन तयारीतच बसलो होतो. त्याचा फोटो काढला. पुढे एक सिंहीण आपल्या तीन छाव्यांना घेऊन एका झाडाखाली बसली होती. थोडं अंतर राखून आमची गाडी उभी राहीली, तर ती गुरगुरायला लागली. आमच्या उपस्थितीमुळे ती थोडी नाराजच झाली होती. गार्डने गाडी पुढे न्यायला सांगितलं. आमची काहीच हरकत नव्हती. आलो तसे सिंहांच दर्शन तर झालं होतं. आता एका वाटेच्या फाट्याजवळ आलो तर समोरून तीन सिंहीणी येताना दिसल्या. आता आम्ही त्या जंगलाला सरावल्या सारखे झालो होतो. माझ्या वाजूचं व्हॅनचं दार उघड होतं. समोरून येणार्‍या सिंहीणींचा मी एक फोटो काढला. त्या आणखी जवळ आल्या दुसरा फोटो काढला. एक मागोमाग येणार्‍या त्या सिंहीणी समोरच्या वाटेने जाणार असं वाटत असतानाच त्यातली एक आमच्या दिशेने वळली. मी आणखी एक फोटो घेतला, हा फोटो घेतेवेळी  झालेल्या शटरच्या आवाजाने किंवा आमच्या वासाने ती जवळ आली असावी. ती आणखी जवळ आली. मी फोकस करतच होतो. ती खुपच जवळ आली. पुर्ण फ्रेम भरली. नकळत जोरजोरात श्वास सुरू झाला. सगळे जण श्वास रोखुन पहात राहिले. तीचे मासल पंजे माझ्या अधिकच जवळ आले. आता मी तिच्या रेंज मध्ये होतो.  फोकस केला असतानाही मी शटरचा आवाज होईल म्हणून फोटो काढला नाही. म्हटलं उगाच तीचा गैरसमज नको किंवा काहिहि समज असो तीचा मान राखलेला बरा. थोडावेळ हुंगून ती निघून गेली. तीने मला माफ केलं होतं.  
                       

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates