17 May, 2010

गंगोत्रीकाल अक्षय तृतीयेला गंगोत्री यमुनोत्रीची कपाट उघडली म्हणजेच ही मंदीरं भाविकांना दर्शनासाठी खुली झाली. हे ऎकतानाच माझ्या मनात गतवर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या. गेल्यावर्षी जुन महिन्यात माझे मित्र विजय मुडशिंगीकर (गंगाजल नॅचर फाउंडेशन चे अध्यक्ष) आणि मी गंगोत्रीला गेलो होतो. मे महिन्यातला उकाडा जाणवू लागला की मला प्रत्येक उन्हाळ्यात हिमालयाची शिखरं साद घालू लागतात. तुम्ही एकदा हिमालयात गेलात की मग तो तुमच्यावर असं काही गारूड करतो की फिरायला निघायचं म्हटलं की आपल्याला हिमालयच आठवतो. संपुर्ण जगातल्या पर्यटकाना तो आकृष्ट करत असतो. आपण भारतवासी एवढे नशीबावान की हिमालय आपल्या इतक्या जवळ आहे. तर उत्तरकाशीला जाईपर्यंत हवा गरमच होती. उत्तरकाशीहून गंगोत्रीला निघालो आणि काही वेळातच हवेत गारवा जाणवायला लागला. अरूंद रस्ता एकाबाजूला उंचच उंच पर्वत आणि दुसर्‍या बाजूला खोल खोल दर्‍या मध्येच आपलं पवित्र दर्शन देणारी भागिरथी (गंगा नदीला त्या भागात भागिरथी म्हणतात.) चिड आणि पाईनचे डेरेदार वृक्ष, समोरचं विलोभनीय दृष्य न्याहाळत आमचा प्रवास सुरू होता. हर्षीलला नदीचं पात्र अगदी जवळून दिसलं. हिच ती गंगा नदी, गंगेच्या उगमाच्या दिशेने आम्ही चाललो होतो. मनात अनेक भाव-भावनांनी गर्दी केली होती. अतिशय शुद्ध हवा आणि निर्मळ वातावरण. गंगोत्रीला पोहोचलो तेव्हा दिवेलागण झाली होती. गंगोत्री मंदीर, आजूबाजूच्या मठ, मंदीर, आश्रमात सांजारतीची लगबग चालू होती. वाहन तळाजवळच असलेला बाजार आणि गर्दी मला तेवढीशी आवडली नाही. आमचा मुक्काम क्रिष्णाश्रमात होता. आधी पाठिवरची सॅक तिकडे ठेवावी म्हणून तिकडे चाललो तर काय, गंगेचा तो  प्रचंड प्रवाह सामोरा आला, तो धिरगंभिर आवाज, उसळता प्रपात, पर्वताच्या मधून वाट काढून घाईने निघालेली माता गंगा........, मी मनोमन नतमस्तक झालो. पुढचा प्रत्येक क्षण हा भारलेला होता. अशा ठिकाणी गेल्यावर मला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. विजेचा लपंडाव चालू होता पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती. मोकळ्या आकाशाखाली आश्रमातली पंगत बसली होती, आम्हीही त्यात सामील झालो. थंडी बरीच होती. उसळत्या प्रवाहाचा निनाद ऎकत कधी झोपी गेलो समजलच नाही.

पहाटे लवकर जाग आली. आम्हाला आज गोमुखला जायचं होतं. आश्रमातली काकडआरती संपऊन लगबगीने गोमुखच्या दिशेने निघालो. नुकतच गंगोत्री नॅशनल पार्क घोषीत झाल्याने वनखात्याची लेखी परवानगी आणि फी भरल्याशिवाय गोमुखला प्रवेश करता येत नाही. ते सोपस्कार पार पडले आणि अठरा किलोमिटर दूर असलेल्या गोमुखकडे निघालो. वाटेत गोमुखकडे जाणारे आणि परतणारे यात्री भेटत होते. त्यात बहूतेक कावड-यात्री होते. जय भोलेनाथ म्हणून ते एकमेकांच्या उत्साहात भर घालत होते. जसजसे आम्ही उंचावर जात होतो तसतसा थकवा जाणवायला लागला. एवढ्यात चिडबासा हे ठिकाण लागलं. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून तिथे थांबलो. पुन्हा उठताना पाय कुरकुर करू लागले. आम्हीतर त्याच दिवशी परतणार म्हणून ठरवलं होतं. ती एक पायवाट होती. दगड धोंड्यानी भरलेली. जरा जपूनच चालावं लागत होतं. मनात गोमुख पाहण्याची ओढ होती. पण पाय हाळूहळू चालत होते.

हा परिसर आता नॅशनल पार्क असल्याने वाटेत काही खाण्या पिण्याची सोय नव्हती. बरोबर आणलेली बिस्किट, ड्रायफ्रूटस् खावीत, वाहत्या झर्‍याचं स्वच्छ गोड पाणी प्यावं आणि मार्गक्रमण करीत रहावं असं चालू होतं. वाटेत ठिकठिकाणी कचरा टाकण्याची सोय केलेली होती. आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची विनंती करणारे बोर्ड लावले होते. आमची वाटचाल सूरू होती. एवढ्यात कच्ची ढांग लागली. विजयजी अनेकदा गोमुखला येऊन गेल्याने ते मला सतत सुचना देत होते. हा दिडेक किलोमिटरचा भाग ठिसूळ मातीचा होता. वरून दगड सुटत होते आणि खाली दरीत कोसळत होते. त्यामुळे सतत सावधान रहावं लागत होतं. एक ठिकाण तर असं आलं की तिथली माती,दगड-ढोंडे वरून खाली घसरत चालले होते. त्यावरून घसरायला झालं तर गोमुख सोडून दरीच्या दिशेने प्रवास सुरू व्हायचा. खुप काळजीपुर्वक आणि जीवाच नाव शिवा ठेऊन मी तो रस्ता पार केला. खेचरावरून जाणारे तर जीव मुठीत धरूनच चालले होते. अपरंपार श्रद्धा किंवा हौस या सगळ्या अडचणींवर मात करत होती. शेवटी भोजबासा जवळ आलं. लालबाबाच्या आश्रमात मुक्काम ठोकावा लागला. कारण आम्ही आधी ठरवल्या प्रमाणे त्याच दिवशी परतणं शक्य नव्हतं.

सांध्याकळचे चार वाजून गेले होते. अजून दिड किलोमीटर चालल्यावर गोमुख दर्शन होणार होतं. आजच जाणं भाग होतं निघालो....... पाय उचलवत नव्हते. दूरूनच प्रवाह दिसला. वाटलं आलो. पण.... दिसणं आणि असणं यात फरक पडतोच. अजून बरच अंतर चालायचं होतं. वाटेत भरल दिसले. त्यांचा मान राखला. फोटो काढले निघालो.... शेवटी त्या प्रवाहापाशी येऊन पोहोचलो...... उभे राहिलो......... बसलो...... नतमस्तक झालो. समोरचं दृष्य विलक्षण होतं. हेच ते ठिकाण, जिथे गंगा स्वर्गातून अवतीर्ण झाली असं आपण मानतो. समोरचा देखावा तर स्वर्गीयच होता. प्रचड मोठा असा हिमाच्छादीत प्रदेश, ग्लेशर आणि त्याच्या आतून जोरदार मुसंडी मारत निघालेला एक प्रवाह. याच त्या शिव-शंकराच्या जटा. पलिकडे शिवलिंग पर्वताचं शिखर सोनेरी उन्हात न्हाऊन निघालं होतं. बरोबर आणलेल्या बाटल्यांमध्ये गंगाजल भारून घेण्यासाठी मी प्रवाहा जवळ गेलो. हात गारठून टाकणारं स्पटीक मिश्रीत निर्मळ जल भरून घेतलं. त्याने आम्हाला कधीचच भारून टाकलं होतं. शक्य तेवढा वेळ थांबून ते दृष्य डोळ्यात साठऊन घेतलं आणि पुन्हा आश्रमाकडे वळलो.
पहाटे जाग आली तेव्हा बाहेर येऊन पाहिलं तर ढग दाटून आले होते. सगळीकडे धुकं भरून राहिलं होतं. दोन-तीन मिटरवरचंही निट दिसत नव्हतं. हिमालयातलं वातावरण कधी कोणतं रुप घेईल सांगता येत नाही. आम्ही परतीच्या वाटेला लागलो. पुन्हा ती कच्ची ढांग. कालचा अनुभव गाठीशी होताच. पण आज दृष्यमानता कमी होती शिवाय वरच्या वाजूला भरल उड्या मारत होते. त्यांच्या पायाखालचे दगड निसटून खाली येत होते. ते जाईपर्यंत थांबलो. भोज वृक्षाचे फोटो काढले. हेच ते वृक्ष ज्यांच्या पानांवर (भुर्जपत्रावर) पुर्वीचे ऋषी-मुनी ग्रंथ लेखन करायचे. पुन्हा चिडबासा आलं. विजयजी मागच्या प्रवासातील आठवणी सांगत होते. चालणं सुरू होतं. काल चाललेली वाट आज ओळखीची वाटत होती. दूरवरून मोबाईलचे मनोरे दिसू लागले. गंगोत्री जवळ आल्याचं ते निदर्शक होते. शंभरेक पायर्‍या उतरून गंगा मंदीराच्या प्रांगणात आलो. आयुष्यात एकदातरी करावं असं गोमुखचं दर्शन करून आम्ही तृप्त झालो होतो. सुर्य कुंडातून उसळणार्‍या गंगाजला बरोबर मनातही भावनांचा कल्लोळ सुरू होता. आज पर्यंत जे केवळ ऎकलं होतं ते प्रत्यक्षात पाहून मी धन्य झालो होतो.                                       
                  
LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates