16 July, 2010

छत्री


त्री, डोक्यावर असली की कसं सुरक्षित वाटतं. उन्हा-पावसापासून जसं संरक्षण मिळतं तसं दुष्ट कावळ्याने जरी नेम धरून कार्यभाग उरकला तरी छत्री असली, म्हणजे..., डोक्यावर उघडी असली की त्या कावळ्याचा हेतू सफल होत नाही. अगोदर फक्त राजे-रजवाड्यांच्याच डोक्यावर असणारी छत्री आता सगळेच जण राखून असतात. चीन्यानी तर तिची किंमत एवढी कमी केली आहे की संक्रांतीला वान म्हणून कुणी छत्र्या वाटल्या तर फारसं आश्चर्य वाटायला नको. पण या चीनी छत्र्या राजकारण्यांनीच वाटाव्यात, मतादानाच्या आधी वाटल्या की निवडणूकीचा निकाल लागेपर्यंत मोडल्याच म्हणून समजा, अगदी त्यांच्या आश्वासनांसारख्या. असो.. ही छत्री ज्याने कुणी शोधून काढली त्याचं मला नेहमी कौतूक वाटतं. त्या छत्रीचा आकार आणि रचना मला नेहमीच भुरळ घालत आलीय. छत्री उघडताना एखाद्या धनुर्धराच्या आवेशात ती उघडावी आणि अस्मानी संकटापासून मुक्तता करून घ्यावी. पण बटनछत्री आल्यापासून तो रुबाब राहीला नाही. बटनछत्री उघडायला गेली की कित्येकदा ती उघडण्या ऎवजी क्षेपणास्त्रासारखी दुसरीचकडे जाऊन पडते आणि लॉंचींग पॅड सारखा दांडा हातातच राहतो. शिवाय इज्जतीचं खोबरं होतं ते वेग़ळच. आजुबाजुचे लोक अशा काही नजरेने आपल्याकडे बघतात की ही जगातली अशी पहिलीच घटना असावी. तो पर्यंत आपण लाजुन चुर..., छत्री चिखलाने माखलेली...., आणि वरून पाऊस असल्याने भिजलेले.... ठासणीची बंदुक काखेत धरून त्यात दारू भरावी तसा दांड्यात दांडा अडकवेपर्यंत आपण घामाघूम होतो. इतका वेळ गुप्ती प्रमाणे बाळगलेली ती छत्री आपले सुप्तगुण दाखावयला सुरवात करते. तशी छत्रीधारी माणसंही तिचा अनेक प्रकारे उपयोग करतात. कधी समोरून येणार्‍या माणसाला चुकवणयासाठी, कधी तोंड लपवण्यासाठी, तर कधी म्हातार्‍या व्यक्तीला टेकायची काठी म्हणूनही छत्रीचा उपयोग होतो. माझ्या ओळखीतल्या एक काकू भल्या पहाटे दुध आणायला जाताना नेहमी छत्री घेऊनच बाहेर पडत. एकदा कडाक्याच्या थंडीत मी पहाटे फिरायला बाहेर पडत असताना इमारतीच्या खिंडीत (गेटवर) मी त्याना अडवलं आणि विचारलं तुम्ही नेहमी ही छत्री घेऊन दुध आणायला का जाता ?  क्षणाचाही विलंब न लवता त्या मला म्हणाल्या अरे कुत्री किती वाढलीत, सारखी भुंकतात आणि अंगावर येतात. त्यांना हाकलायला ही छत्रीच बरी पडते, आणि तुझ्यासारख्यांच्या टाळक्यातही घालता येते त्यांच्या या उत्तराने माझं शंकानिरसन झालं असलं तरी त्या दिवशी पासून मी त्यांच्या पासून छत्रीभर अंतर राखूनच असतो. तरी मनात अजून एक शंका आहेच, पावसाळ्यात या काकू दोन छत्र्या घेवून निघतात की काय. एक कुत्र्यांपासून आणि दुसरी पावसापासून संरक्षणासाठी. पण मी आता हे येत्या पावसाळ्यात दुरूनच बघणार असं ठरवलं असतानाच त्या काकू मला परत दिसल्या जांभळीच्या झाडाखाली जांभळं वेचताना. मी दुर कुत्र्यांसोबत घुटमळत त्यांच्यावर नजर ठेवून पाहू लागलो, तर काय वेचलेली जांभळं त्या छत्रीत गोळा करत होत्या. छत्र्रीचा असाही उपयोग होईल असा मी कधी विचारही केला नव्हता. गरज ही शोधाची जननी आहे हेच खरं. आता इथे या प्रकरणात ‘गरज’ या शब्दाबरोबर ‘हाव’ हा दुसरा शब्दही जोडायला हरकत नाही. उपयोगाएवढ्या छत्र्या बाळगायच्या तर काकूंसारख्याना अर्धा डझन तरी छत्र्या लागतील यात शंका नाही.
माझ्या लहानपणी मामांनी आमच्यासाठी वेताचे दांडे असलेल्या छत्र्या आणल्या होत्या. माझ्यापेक्षा उंच असलेली ती छत्री घेऊन मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा ती धरायला माझा एक छत्री नसलेला मित्र असायचा म्हणून बरं, नाहीतर ‘भिजलो चालेल, छत्री नको’ अशी आणखी एक म्हण प्रचलित झाली असती. मामांनी आणलेली आपली छत्री इतरांपेक्षा जास्त टिकली पाहीजे म्हणून माझ्या भावाने एक वेगळीच शक्कल लढवली. त्याने आपल्या छत्रीला डंबर फासलं. आधीच जड असलेली ती छत्री आणखी जड झाली. शिवाय डांबर सुकल्याने आयत्या वेळी ती उघडेनाच. महत्प्रयासाने त्याने ती उघडली तर पुन्हा बंद व्हायचं नाव नाही. छत्री बंद करण्याच्या खटाटोपात त्याच्या हाताला तिची तार लागून रक्त आलं, पहील्याच दिवशी वजनाने त्याची बेळकूटं भरून आली. शेवटी त्याने ती छत्री गरम पाण्याच्या हंड्यात बुडवली आणि डांबर काढण्याचा प्रयत्न केला. डांबर काही निघालं नाही पण आईने घातलेल्या धपाट्यामुळे त्याच्या पाठीवर मात्र छत्री उमटली. पावसाळा संपला तशी ती छत्री खुंटीला टांगली गेली. हिवाळ्यात एका रात्री सगळेजण गाढ झोपले असताना माणसाचं धुड पडावं तसा आवाज झाला. वडील उठले, त्यानी चाहूल घेतली, खुप वेळ कुणाचाच आवाज नाही. दिवा लावून त्यानी पाहीलं पण कसलीच जागमाग नाही. सकाळी आईने कचरा काढताना पाहीलं तर काय माझ्या भावाची, वेताचा दांडा असलेली ती वजनदार छत्री खुंटीला सोडून खाली पडली होती. दांडा सरळ झालेला. हल्ली पुन्हा तसली छत्री वापरणारे लोक दिसतात तेव्हा मझ्या समोर तो प्रसंग उभा राहतो.
गावी आठवडा बाजाराला येणारा कासार भली थोरली छत्री घेऊन यायचा तेव्हा याचं कुटूंब खुप मोठ्ठ असणार असं मला वाटायच. बाजार उलगल्यावर ती छत्री उलटी खांद्यावर मारून तो निघायचा तेव्हा एखादा बंदूकधारी इसम चालल्याचा भास व्हायचा. आता छत्र्या नॅनो झाल्या, एक सोडून तिला दोन फोल्ड आले. काळ्या रंगाचा मक्ता मोडून छत्रीने इतर रंगांचे कपडे परिधान केले. त्यावर जाहिराती आल्या. मोठा झाल्यावर कासाराची छत्री मोठी का ते समजल, पण लेडीज छत्री लहान का असते हा अजून मला पडलेला यक्ष प्रश्न कुणी सोडवेल का ?

नरेन्द्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates