17 August, 2010

‘कॉमन वेल्थ’ मराठी अभिमानगीत                                  स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी गोरेगावच्या
अ.भि. गोरेगांवकर शाळेच्या १६०० विद्यार्थ्यांनी मराठी अभिमानगीत एका सुरात म्हटलं. दूरचित्रवाणी संचावर बातम्यांच्या गदारोळात ही बातमी बघून खुप बरं वाटलं. संगीतकार कौशल इनामदार यांनी मराठी अभिमानगीताच्या माध्यमातून मराठीची एक असाधारण सेवा केली आहे. मराठीसाठी एवढी भव्य दिव्य गोष्ट गेली जवळ जवळ दोन वर्ष सात्यत्याने काम केल्यानेच ते करू शकले. या दोन वर्षात त्यानी बाकीची सर्व कामं बाजूला ठेऊन केवळ या गीताचाच ध्यास घेतला होता. सुप्रसिद्ध कवी, गीतकार, गझलाकार सुरेश भटांचे शब्द आणि ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५० हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत म्हणजे मराठी माणसासाठी एक स्फुर्तीगीतच आहे. सामान्य माणसांकडून (त्यात काही असामान्यही आहेत) प्रत्येकी पाचशे रुपये जमा झाले आणि त्या रकमेतून हे गाणं साकार झालं. त्या अर्थाने ही कॉमन वेल्थ आहे, मराठी माणसाची सांसकृतीक ठेव आहे. मराठीच्या हकासाठी आपण भांडत असतो पण मराठीसाठी असलेलं आपलं कर्तव्य तर आपण विसरलो नाहीना? असा प्रश्न मला पडला तो कौशल इनामदार यांचं फेसबूक वरचं आवाहन वाचलं तेव्हा. आपणही ते वाचा, विचार करूया आणि मुख्य म्हणजे कृती करूया. 

कौशल इनामदार यांचं फेसबूक वरचं आवाहन:
मराठी अभिमानगीताचा दुवा आपल्याला देत आहे. आपण जरूर ऐकावं, आवडलं तर आपल्या मित्रांनाही तो आनंद द्यावा. मराठीचा अभिमान जागृत करायचा असेल तर एक अहिंसक व्यासपीठ असणंही गरजेचं आहे, आणि संगीतापेक्षा संयुक्तिक माध्यम आणखी काय असू शकतं. अमराठी लोकांना आपल्या भाषेचा आदर करायला सांगण्याआधी मराठी लोकांमध्ये अभिमान जागृत करण्याची अधिक गरज आहे. सुरेश भटांचे शब्द ११२ प्रस्थापित गायक आणि ३५६ समूह गायक अशा ४५०हून अधिक गायकांनी गायलेलं हे गीत बाकी काही नाही तर एक चैतन्य जरूर निर्माण करेल यावर माझा विश्वास आहे. महाराष्ट्रगीताबाबत आपण एक चूक केली. ५० वर्षांमध्ये आपण या गीताशी रोजचा संपर्कही ठेवला नाही. आज मराठीच्या दुरवस्थेला आपली अनास्था हे एक मोठं कारण आहे. ही चूक आपण (मराठी माणसं) मराठी अभिमानगीताबाबतीत करू नये असं मला वाटतं. आज अ.भि. गोरेगांवकर शाळेच्या १६०० विद्यार्थ्यांनी हे गाणं एका सुरात म्हटलं. मराठी भाषेला छोट्या मुलांसारखा दुसरा ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर नाही! आपल्या माध्यमातून आपण हे मराठी अभिमानगीत पोचवलंत तर आमच्या कार्याला मदत होईल. धन्यवाद.

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates