15 December, 2010

पर्यावरण साहित्य संमेलन – दापोली



या वर्षी पावसाळा बराच काळ लांबला, युरोप बरोबरच आपल्या देशातील लेह-लडाख आणि श्रीनगर सारख्या उत्तरेकडच्या भागात तुफान हिमवर्षाव होऊन उच्चांक गाठला गेला. आता आणखी पुढे काय वाढून ठेवलय? जागतिक तापमान वाढ आणि त्याचे होणारे परिणाम या बद्दल आता जनसामान्यात देखील चर्चा होताना दिसते. प्रसार माध्यमातसुद्धा आता हा चर्चेचा विषय होऊन राहिला आहे. हे सर्व मुद्दे विचारात घेऊन पर्यावरण विषयक साहित्याला वाहिलेलं असं अनोखं साहित्य संमेलन पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांच्या पुढाकाराने दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन १७  १८ डिसेंबरला जालगाव-ब्राह्मणवाडी येथील ज्ञानप्रसाद मंगल कार्यालयात होईल. संमेलनाचे उद्‌घाटन १७ डिसेंबरला दुपारी वाजता होईल. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या नैसर्गिक साधनसंपत्ती विकास प्रकल्पाचे जी. वासुदेव हे उद्‌घाटक म्हणून लाभले आहेत. याच दिवशी जैवविविधता : स्वरूप आणि महत्त्व या विषयावर डॉ. प्रकाश गोळे यांचे बीजभाषण, पर्यावरणविषयक अनुबोधपटांच्या निर्मात्यांच्या मुलाखती, नव्या पुस्तकांची प्रकाशने व रात्री प्रबोधक अनुबोधपटांचे प्रदर्शन हे कार्यक्रम होतील. १८ ला पर्यावरण साहित्याचा आढावा, पर्यावरणविषयक पुस्तके, नियतकालिके, शैक्षणिक साहित्य, अनुबोधपट वाहिन्या, संकेतस्थळे आदींचा आढावा घेण्यात येईल. वृत्तपत्रातून सातत्याने पर्यावरण विषयक लेखन करणारे लोकसत्ताचे उपसंपादक श्री. अभिजित घोरपडे, गंगाजलचे श्री. विजय मुडशिंगीकर यांचाही या संमेलनात सहभाग असणार आहे. पर्यावरण हा आता केवळ तज्ज्ञांचाच विषय राहिला नसून सामान्य माणसांमध्येही त्याबद्दल  जागृती निर्माण व्हावी असा या संमेलना मागचा उद्देश आहे. 
 

09 December, 2010

सोन्याचा धूर


कोणे एके काळी या भारतभूमीमधून सोन्याचा धूर निघत होता. प्रजा विशेषतः राजा गुण्यागोविंदाने नांदत होती. अयोध्येच्या रामापासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत असे अनेक प्रजाहितदक्षी राजे होऊन गेले. असं असलं तरी वारंवार या भरतभूमीवर परकीयांची आक्रमणं झाली, उद्देश मात्र एकमेव होता इथली संपत्ती लुटण्याचा. महंमद्द घोरी असो की बाबर सगळे आक्रमक आले ते इथला सोन्याचा धूर बघूनच. अगदी अलिकडच्या काळात आले ते गोर्‍या कातडीचे इंग्रज, व्यापाराचा बहाणा करून त्यानी नंतर या देशावर दिडशे वर्ष राज्य केलं ते इथली संपत्ती लुटण्यासाठीच. लाखो प्राणांची आहूती दिल्यावर आणि स्वातंत्र्य सैनिकानी सळोकीपळो करून सोडल्यावर ब्रिटीशांनी काढता पाय घेतला आणि स्वातंत्र्याचा उदय झाला. तरीही इथे सोन्याचा धूर निघतोच आहे. आणि लुटेरे ते सोनं लुटतच आहेत. पण आता लुटणारे इथलेच आहेत. दक्षिणेचा राजा आणि उत्तरेचा सिंग (मुलायम). लाखो कोटी लुटताहेत आणि पचवताहेत. कधी मधी पाणी थोडं डुचमळतं खाली सांडतं. थोडी गडबड होते. मग पुन्हा सगळं शांत... शांत. नवीन घोटाळ्याची चाहूल लागे पर्यंत. निर्लज्जपणाचा आदर्श असा की चक्रवर्ती अशोकाचं नाव धारण करणारा माजी चालक म्हणतो झाल्या त्या प्रशासकीय त्रूटी याला घोटाळा म्हणायचं नाही. नाही म्हणणार बाबा, घोटाळा = प्रशासकीय त्रूटी असा अर्थ असलेला नवा विश्व कोश निर्माण करा, सत्ता तर आपलीच आहे.

एकमात्र समाधान आहे, या भारतभूमी मधून अजूनही सोन्याचा धूर निघतो आहे. कित्येक परकीय लुटून गेले आता स्वकीयच लुटूत आहेत. गरिबाच्या तोंडचा घास हिरावला जात आहे.                       

04 December, 2010

अवघा रंग एकचि झाला, सर्वांग सुंदर संगीत नाटक



कालच अवघा रंग एकचि झाला हे नाटक बघीतलं. बर्‍याच वर्षांनंतर संगीत नाटक बघायला गेलो होतो, गेल्या काही वर्षात संगीत नाटकाची परंपरा खंडीत झाल्यासारखी झाली होती. जुने कलाकार पडद्याआड गेले आणि नव्या पिढीला संगीत नाटक आवडेल की नाही किंवा जुनी संगीत नाटकं आताच्या काळानुरूप नसल्याने ती चालतील का? या साठमारीत प्रेक्षक संगीत नाटकांना मुकले होते, पण अवघा रंग एकचि झाला या नाटकाने ती उणीव भरून काढली असं नाटक पाहिल्यावर आपण नक्की  म्हणू शकतो. किंबहूना जुनी आणि नवी पिढी यातला वैचारीक संघर्ष, जनरेशन गॅप, आणि मुळात स्वार्थी नसल्याने जमवून घेण्याची वृत्ती हाच या नाटकाचा मुळ गाभा आहे. जुनं ते सोनंच पण ते नव्या युगात मंडताना त्याला झाळाळी कशी प्राप्त होईल हे पाहिलं पाहिजे हा नव्या पिढीचा आग्रह शेवटी मान्य होतो.

अमोल बावडेकर
ग्लोबल खेड्यात आता जात, धर्म या गोष्टींना थारा नाही. माणसं मनाने एकत्र आली पाहिजेत मग भाषा, प्रांत, जात, देश यांची बंधनं तुटून पडतात आणि अशी जवळ आलेली माणसं गुण्यागोविंदाने एकत्र नांदू शकतात हा संदेश या नाटकाने दिला आहे.

प्रसाद सावकार, अमोल बावडेकर, गौतम मुर्डेश्वर, जान्हवी पणशीकर, रश्मी मोघे या सर्वांचेच अभिनय आणि गायकी यांना प्रेक्षकांची दाद मिळत राहते आणि नाटक उत्तरोत्तर रंगतच जातं.  नाट्यसंपदाचं हे नाटकही यांच्या लौकीकाला शोभेलसच आहे. लवकरच या नाटकाचा तीनशेवा प्रयोग सादर होणार आहे. आपल्या जवळच्या नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग लागेल तेव्हा तो पहाच, आपल्याला एक सर्वांग सुंदर संगीत नाटक पाहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल.  
           

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates