28 January, 2011

रोगी मारण्यात पटाईत


रविवारच्या लोकसत्तामध्ये सर्किट हे सदर वाचलं आणि मला आजपर्यंत भेटलेल्या तर्‍हेवाईक माणसांविषयी लिहावसं वाटलं. अशी जगावेगळी माणसं भेटली की ती कायमची लक्षात रहातात. अशी माणसं कधी लग्नात, ट्रेनमध्ये, मित्राच्या घरी, सहलीत कुठे वाट्टेल तिथे भेटू शकतात. हे असेच कोकणात भेटलेले बापू.

बापूंचं घर मुंबई गोवा महामार्गाला लागून. हे त्यांचं जुन्यापद्धतीच माडीचं घर, पार स्वातंत्र्यापुर्वीचं. हायवे झाला त्या आधीपासूनचं. त्यामुळे आता ते महामार्गाला जरा खेटूनच उभं आहे. घराशेजारच्या जागेवर बापूंचा पुर्वीचा मांगर होता (गुरांचा गोठा). गायी-गुरं विकल्यावर बापूंनी तिथे एक चाळ बांधली, पुढच्या बाजूला दुकानासाठीचे गाळे आणि मागच्या बाजूला भाड्याने देण्यासाठी दोन-दोन खोल्या. शेती सोडल्यावर संसाराला तेवढाच हातभार.

रस्त्याला लागूनच घर असल्याने शाळेतल्या शिक्षकांना किंवा नोकरदार वर्गाला बापूंच्या जागा सोईच्या होत, तीच गोष्ट व्यवसाय करणार्‍यांचीही. असेच एक दिवस दुपार टळून गेल्यावर मी बापूंकडे पोहोचलो. बापू माझी आणि आतून येणार्‍या चहाची वाट पहात आरामखुर्चीत पहूडले होते. एवढ्यात एक गृहस्थ घाई-घाईत बांपूंच्या ओट्यावर येऊन दाखल झाले. कोण बॉ ? बापूंचा प्रश्न,
तो:  नाय, भाड्याने जागा होई होती
बापू: खयची? रवाची काय गाळ्याची?
तो: गाळ्याची
बापू: कसला दुकान टाकतात? 
तो: दुकान नाय, मी डॉक्टर आसय
बापू: होय, माका वाटला दुकान...
.....

बापू: आमच्याकडे भाड्याक एक डॉक्टर आसत, रोगी मारण्यात पटाईत, तुमी कसले? (आर्. एम्. पी. म्हणजे Registered Medical Practitioner त्यालाच बापू रोगी मारण्यात पटाईत म्हणत होते.)   
तो: आर्. एम्. पीच
बापू: हो.....!, मग ते एक असताना तुमी कित्या आणखी?
......
बापू: दुसरा कायतरी करा...!
तो माणूस उठून गेला.
मी बापूना म्हटलं, करेना होता का तो धंदा, तुम्हाला भाडं मिळालं असतं.
अरे, मेलो हो पण आर्. एम्. पीच, भाडा खयसून देतोलो? माय.......... बापूनी एक जोरदार शिवी हासडली. 
बापूना समोर आलेला चहा रोजच्यापेक्षा गोड लागला असावा.

4 comments:

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates