21 February, 2011

प्रगतीचा एक्स्प्रेस वे
कोणतीही मेहनत करायला तयार असणार्‍या मराठी उद्योजकासाठी, काहीतरी नविन करून दाखवण्याची जिद्द बाळगणार्‍या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरणारं असं एक पुस्तक नुकतच प्रकाशित झालं आहे. सध्याच्या काळात समाजप्रबोधन करायला कुणालाच वेळ नाही, कॉर्पोरेट क्षेत्रातल्या व्यक्तिंना तर नाहीच नाही. पण आपल्या व्यस्त दिनचर्येतून मुद्दामहून वेळ काढून मराठी समाजासाठी मनोरंजनापेक्षा मनोअंजनाचे काम करणारे लेख गेल्या दोन वर्षात  कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार सातत्याने लिहित आहेत. त्याच लेखांचं संपादन करुन प्रगतीचा एक्स्प्रेस वे हे पुस्तक साकार झालं आहे.

मराठी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ताजसारख्या प्रतिष्ठीत आणि पंचतारांकीत हॉटेल मध्ये होतो हेच मुळी उत्साहवर्धक आहे. मराठी उद्योग क्षेत्रातले बहुतेक मान्यवर उद्योगपती, प्रसारमाध्यमांचे मराठी प्रमुख यावेळी उपस्थित होते या वरून या पुस्तकाचं उद्योग क्षेत्रातील स्थान आपल्या लक्षात येईल. मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झाला..  हे या वेळी श्री. पोतदारानी सप्रमाण सिद्ध केलं. मराठी माणूस चाकरमानी आहे हे कुणी ठरवलं? तसा सर्वे कुणी आणि कधी केलाय? आपण मराठी माणसाचा प्रामाणिकपणा हा कमकुवतपणा का समजतो? प्रामाणिकपणा हा ब्रॅन्ड होवू शकत नाही का? किती मराठी माणसं जागतिक पातळीवर उद्योगांचं, बॅंकांचं यशस्वी नेतृत्व करताहेत याची जंत्रीच त्यानी यावेळी सादर केली. मराठी माणूसच असा आहे की जो आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाबरोबर एखादातरी छंद जोपासतो आहे. हा छंदच त्याला उद्योजकतेकडे घेऊन जाईल असं श्री. पोतदारांच म्हणणं आहे.

या पुस्तकात असलेले लेख जेव्हा वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले तेव्हा त्या लेखांना महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अभूतपुर्व असा प्रतिसाद लाभला होता. तूमचा लेख वाचून आयुष्यात पुन्हा उभं राहायची संधी मिळाली हा एक प्रातिनिधीक अभिप्राय. आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द बाळगणार्‍या धडपडणार्‍या व्यक्तिंसाठी तर हे पुस्तक म्हणजे सातत्याने चेतना निर्माण करणारा अखंड झराच आहे. या पुस्तकातून मराठी समाजापुढे मांडलेले विचार हे मार्गदर्शक तर आहेतच पण वर्षानुवर्ष मराठी मनाला मानसिक गरिबीत ठेवणार्‍या विचाराला नक्कीच छेद देणारे आहेत.


भारतीय चित्रपटउद्योगाचे जनक दादासाहेब फाळके यांना हे पुस्तक समर्पित केलं आहे, या वरून नितीन पोतदारांची पुस्तक लिहिण्यामागची तळमळ दिसून येते. यशासाठी राईटॅ टर्न घ्यायचा  असेल तर हे पुस्तक जरूर संग्रही ठेवा. तुर्तास एवढच.      
                  

05 February, 2011

झेप
ही झेप तुझी ग इवलीशी
बाजुच्या फांदीवर बसशी
त्यातून दिसे ती उद्याची
तुझी भरारी उंचीची

गगनाला करीशी ठेंगणे
धृवावर बसूनी गाशी गाणे
आकांक्षा उन्मेषाची
प्रगतिची अन् जिद्दीची

बळ पंखाचे एकवटूनी
उतुंग यशाच्या वाटेवरूनी
जिथे जिथे तू जाशी
मम आशिष तव पाठीशी

नरेंद्र प्रभू

03 February, 2011

सखये येसाद घालतो तूला ग वारा
माझ्या मनीचे गुज सांगतो
कुजबुज हळव्या पानांमधली
रान पक्षी हा निरोप देतो

निळ्या-जांभळ्या आकाशातील
एकच तारा जेव्हा उगवे
तू ये सखये तरू तळी त्या
सुगंध पसरीत जाई-जुई सवे

तू एकांती, प्रफुल्ल कांती
धुसर वाटांवरी चांदणे
मी ही निवलो, तुझ्यात विरलो
नक्षत्रांचे वरती लेणे

नरेंद्र प्रभू

 

01 February, 2011

आकांक्षा पुढती जिथे गगन ठेगणे...!
या वर्षी थंडी चांगली पडली. इथे मुंबईत तसं प्लेझंट वातावरण आहे, त्यालाच थंडी म्हणायचा इथे प्रघात आहे. तिकडे उत्तरेत मात्र जबरदस्त थंडी आहे. त्याच्या बातम्याही आपण रोज वाचतो. श्रीनगरचं दल लेक गोठलं आहे हे ही बहुतेकाना माहित असेल. आता एवढे सगळे प्रांत थंडीने गारठून गेल्यावर लेह-लडाखची तर बातच नको. तिकडे वजा विस तपमान आहे. सगळीकडे बर्फच बर्फ. माझा मित्र आत्माराम परब या कडाक्याच्या थंडीत चार दिवसांपुर्वी लडाखला व्हिंटर लडाखची टूर घेऊन निघाला तेव्हा माझ्या मनात थोडी धाकधुकच होती. काय होतय? कसं होतय ? असं सारखं वाटत होतं. त्यात तो लेहला उतरला तेव्हा सकाळी बाहेरचं तपमान वजा विस होतं. म्हटलं झालं कल्याण. हे लोक कशी थंडी सहन करणार? खर तर या ट्रिपवर स्मिता ग्रुप लिडर म्हणून जाणार होती. पण आयत्या वेळी आत्मारामने स्वत: जायचा निर्णय घेतला. ते ही बरोबर होतं म्हणा.  लडाखला या दिवसात सगळीकडे बर्फाचच राज्य असतं. अंटार्टीका सारख्या प्रदेशात जाव तसं. सगळे रस्ते बर्फमय, नद्या गोठलेल्या. चादर ट्रेक करतात तो याच दिवसात.

काल संध्याकाळी आत्माचा फोन आला. माझ्या शरिरात एक थंड लहर येऊन गेली. तो पठ्या मात्र भलताच उत्साहात होता. काय केलं होतं त्याने? तो या हिवाळ्याच्या दिवसात चक्क पॅगॉंग लेकला जाऊन आला होता. सोबत सहलीला गेलेले सगळे लोकही होते. (हा.... आता त्याना लोक म्हणणं म्हणजे त्यांच्यावर आन्याय केल्या सारखं होणार. ते केव्हाच (किंवा तेव्हाच) आत्मामय होवून गेले असणार.) काय नजारा असेल तिथला. पॅगॉंग लेक सत्तर टक्के गोठलेला होता. हे यक्ष/ किन्नरासारखे तिथे त्या गोठलेल्या तलावावरून चालले आणि धन्य झाले. परत फिरले ते विजयी विरासारखे.

मे महिन्यापासून लडाखचा उन्हाळा सुरू होतो. तेव्हा उन्हाळ्यातही काहीवेळा पॅगॉंग लेकला जाणं शक्य होत नाही आणि या कडक हिवाळ्यात आत्मा तिथे पोहोचला म्हणजे कमालच झाली. ही बातमी जम्मू-काश्मीरच्या पर्यटन खात्याला समजली. त्यानी लगेच आत्माशी संपर्क साधला. नोहेंबर मध्ये झालेल्या व्हिंटर लडाख प्रदर्शना विषयी आत्माने त्याना माहिती दिली. या दिवसात ट्रेकर्स मंडळीच अगदी अभावाने तिकडे जातात तर आत्मा चक्क टुरीस्ट घेऊन लडाखला पोहोचला म्हणून जम्मू-काश्मीरच्या पर्यटन खात्याने एकादिवसात हालचाल करून त्याला प्रशस्ती पत्रक बहाल केलं. विमानातून लेहला उतरणं वेगळं आणि छांगला पास (जगातला दुसरा सर्वात उंच मोटरवाहतूकीचा रस्ता) पार करून पॅगॉंग लेकला जाणं वेगळं. हे धाडस आत्माच करू जाणे. तो हिमालयावरसुद्धा स्वार झाला........ माझ्या अंगावर मुठभर मास चढलं.           

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates