22 November, 2011

देवा काय देऊ तुला?

श्रेष्ठ संगीतकार, गीतकार, कवी, गायक आणि विशेष म्हणजे खरोखरीचा देवमाणूस असलेलं एक उमदं व्यक्तीमत्व म्हणजे यशवंत देव. काल माटुंग्याच्या यशवंत नाट्य गृहात त्यांचा माझा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. वयाची पंच्याऎशी वर्ष पुर्ण करणार्‍या यशवंत देवांना नुकताच माहाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्या पुरस्काराची पुर्ण रक्कम रुपये दोन लाख यशवंत देवांनी दिवंगत संगीतकार श्रीनीवास खळे यांच्या कुटुंबीयांना तत्काल देऊन टाकली. या त्यांच्या दातृत्वामुळे भारावून गेलेल्या अशोक मुळे या वल्ली ने हा सत्काराचा घाट घातला होता.

अशोक मुळेंनी आयोजीत केलेला हा देवा... काय देऊ तुला? नामक सोहळा असल्याने नाट्य मंदिर हाऊस फुल्ल होतं हे वेगळं सागायला नकोच. भाऊ मराठेंनी निवेदनासाठी ध्वनीक्षेपक हातात घ्यायच्याआधी मुळे काका स्टेजवर आले (तसे ते स्टेज, नाट्यगृह, आत-बाहेर सगळीकडेच वावरत होते. कारण कार्यक्रमाची धुरा ते एकहाती वाहत होते.) कार्यक्रम हाऊस फुल्ल असूनही समोरच्या काही खुर्च्यांमध्ये अजूनही माणसं नाहीत हे पाहाताच त्यांनी तिथून स्टेजवरूनच पास घेऊन जाणार्‍यांची कडक शब्दात हजेरी घेतली. मिटींगावर मिटींगा आणि हजार कामं होती तर पास मागितलेच कशाला? फुकट आहेत म्हणून? अशोक मुळे कडाडले. चला कार्यक्रमाचा नारळ अशा रितीने फुटला म्हणजे आता मजा येणार असं मनातल्या मनात म्हणत मी सावरून बसलो (मुळे काकांचा कार्यक्रम म्हणजे जे काही म्हणायचं ते मनातल्या मनातच, उघड बोलायची कुणाची हिम्मत आहे? ते सत्कार मुर्तीचीही पत्रास ठेवत नाहीत, मग आपण कोण पामर? शिवाय त्यांचा तो सर्वत्र होणारा संचार पाहाता कधी समोर प्रगट होतील असं सारखं वाटत राहतं.) सगळे कलाकार फुकट गायला-वाजवायला तयार झाले असले तरी आज त्यांना दोन दोन पाकळ्या देणार आहे मुळेंनी दुसरा षटकार मारला. सभागृह हास्यात बुडून गेलं. मांगिरीश इस्टेट्स चे नितिन नेरूरकर यांनी हा कार्यक्रम प्रायोजित केला आहे असं नमूद करून त्यांनी त्याना आणि महाराष्ट्र टाईम्सचे संपादक अशोक पानवलकर यांना स्टेजवर यायची विनंती केली आणि ते येत असतानाच म्हणाले मला कार्यक्रम करायचा असला की पैसे कमी पडत नाहीत. कोण ना कोण देतच, आजच्या या कार्यक्रमाला नेरूरकरांनी दिले. लागतील ते सगळे पैसे त्यानी दिलेत. हो, हा आता पुष्पगुच्छ दोतोय ना, तो सुद्धा त्यांच्या पैशातून घेतला आहे. (प्रचंड हशा) वाटत होतं मुळे काकांनीच बोलतच रहावं. एखादी मैफल जमून जाते. या गोष्टी ठरवून होत नसतात. कालची मैफल उत्तरोत्तर रंगतच गेली. खरच बहार आली राजे हो...!         

भाऊ मराठेंनी निवेदनाला सुरूवात केली, खुमासदार किस्से आणि आठवणीचे पट उलगडताना देव हा शब्द केंद्रस्थानी ठेऊन गाणी म्हटली जात होती. देव देव्हर्‍यात नाही, देवा दया तुझी ही, देवाचीये दारी, देह देवाचे मंदिर अशी अनेक गाणी सादर होत होती. अरविंद पिळगावकर, अजित परब, अमोल बावडेकर, बकुळ पंडीत, सोनाली कर्णीक, अर्चना गोरे, निलिमा, मधुरा कुंभार, श्रीरंग भावे असे दिग्गज कलाकार आणि साथीला कमलेश भडकमकर, जगदीश मयेकर आणि त्यांची टिम, मध्यंतर कधी आला कळलच नाही.
  

मध्यंतरानंतर पडदा दूर झाला तेव्हा मुळे काका व्यासपीठावर अवतरले ते दोन खुर्च्या घेऊनच. त्यांनी पुन्हा माईक हाती घेतला. सेकंड इनींगला बॅटीगला आल्यासारखे ते बोलायला लागले, सगळं बोलणं अनौपचारीक होतं. यशवंत देवांचा सत्कार म्हणून त्यांचीच गाणी पाहिजेत असं कुठे आहे? ही गाणी मी निवडलीत. त्यांची एक दोन ठेवलीत. जीवनात ही घडी अशीच राहू दे हे गाणं माझ्यासाठी ठेवलं. अजून घडी तशीच आहे...... काही घडलं नाही..... गायकांना सुद्धा सागितलं मी सांगेन ते गाणं म्हणायचं. बस्स...! तुमची ती संथ गाणी नकोत, कुणी म्हणालं, पण हे बरं वाटतं....., वाटू दे ...., ते तू घरी म्हण. इकडे सगळं कसं दणक्यात झालं पाहिजे. देवांनी सत्काराची एवढी मोठी रक्कम खळेंच्या कुटूंबीयांना दिली म्हणून सत्कार करावासा वाटला. त्यांच्या हृदयात करूणा आहे. ती त्यांना सोडून गेली नाही. यांचा सत्कार केलाच पाहिजे. नाही तर ते तसं नको. घराताच एकमेकांना पुरस्कार द्यायचे आणि वर म्हणायचं मी हल्ली पुरस्कार स्विकारत नाही. इथं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, सगळे प्रेमाने येतात. हा साउंडवाला टिट्टू फार बिझी असतो, झाकिर हुसेनलाही हाच लागतो, म्हटल हा बिझी आहे, दुसर्‍याल बोलाऊया. पण हाच म्हणाला, मी येणारच, दुसरा आला तरी बाजूला लावेन. हे असं प्रेम आहे. म्हणून हा उत्सव होतो. (प्रत्येक गायक कलाकार सांगत होते मुळे काकांचा आदेश असतो, विनंती नाही. आम्ही तो पाळतोच.) मी मानपत्र अजिबात देत नाही. ज्यांना मानपत्र द्यायचं त्यांनाच त्यांची माहिती विचारायची आणि पुन्हा तेच त्याला माहीत असलेलच लिहून द्यायचं, हे असलं मी करणार नाही. बोलण्यात जरा वेळच झाला पण सगळं अनौपचारीक होतं, पुन्हा म्हणाले आता निवेदन फार नको, पानवलकर बोलतील, मग भाऊ, मग यशवंत देव

देवांचा सत्कार झाला. पानवलकर, भाऊंची भाषणं झाली. देव उत्तराला उभे राहिले. म्हणाले या माणसात माणूसकी आहे म्हणून सगळे बोलावल्या बरोबर येतात. हे मुळे नेहमी पांढर्‍या कपड्यात असतात. हा माणूस जसा बाहेरून तसा आतूनही आहे. यांचे अंतरंग आणि बहीर्रंगही पांढरे........ हौस भारी.... म्हणून यांना मी व्हाईट हौस म्हणतो. तुम्हाला यांनी खुप हसवलं. तुम्ही आता खुप हसलात, हसलच पाहिजे. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की जो हसतो.  तुमच्या चेहर्‍यावरची हास्य रेषा हीच खरी भाग्य रेषा आहे. त्या नंतर एक शाम, हसी के नाम ही कविता त्यांनी म्हटली, रसिकांनीही कवितेचा भरपूर आनंद घेतला. पुढे यशवंत देव म्हणाले देव असतो की नाही हे माहित नाही पण प्रत्येक माणसात परमेश्वर असतो हे मी ठामपणे सांगू शकतो. नंतर ते आपल्या बालपणीच्या मित्राच्या आठवणीत रमून गेले. 

सोळावं वरीस होतं, मी मुंबईच्या शाळेत
मुरलीधर जयसिंगाने धरला माझा हात.

जयसिंग या मित्रामुळे आपण संगीताच्या क्षेत्रात आलो, आकाशवाणीवर गेलो. अशा आठवणी सांगताना देव साहेब सद्गदीत झाले होते.  

रात्र बरीच चढली होती. उत्तरार्धाचा शेवटही जवळ येत होता. भाऊ.... चार गाणी एका निवेदनात मोकळी करा मुळे काकांचा हुकूम झाला. पुन्हा गाण्यांची मैफल सुरू झाली आणि आधी बिज एकले या संत तुकाराम चित्रपटाच्या गाण्याने सांगता झाली. आसनाला खिळून राहिलेले देव साहेबांचे चाहते रसिक उठले, पण सगळ्यांच्याच ह्रदयात भाव होते. 

देवा काय देऊ मी तुला?
गीत दिले तू मला...!

नरेंद्र प्रभू

                                                     
LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates