10 March, 2012

काझीरंगा
आजचा दिवस प्रत्येकाचा होता. सहलीत सहभागी झालेल्या मंडळींचा, छायाचित्रकारांचा, हत्तीवरून सफारी घडवणार्‍या माहूतांचा, जीप सफारीला घेऊन जाणार्‍या चक्रधरांचा आणि काझीरंगातल्या वन्यजिवांचाही. प्रत्येकाला आपलं कसब आणि झलक दाखवायची संधी होती. पहाटे साडेपाचला पहिल्या हत्तीवरच्या सफरीला जायला मंडळी उत्सुक होतीच. अंधूक प्रकाशात काझीरंगाच्या बागोरी गेटकडे जीप निघाल्या तेव्हा उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

राष्ट्रीय महामार्ग ३७ वरून जेव्हा आम्ही बागोरी गेटकडे जात होतो तेव्हा आजूबाजूला प्राणी आणि पक्षांचं अस्तित्व जाणवायला लागलं होतं. पण प्रत्यक्ष हत्तीवर बसून जंगलात प्रवेश करायला आम्ही उतावीळ झालो होतो. आजपर्यंत नुसतं ऎकलेलं, पुस्तकातून वाचलेलं, पडद्यावर बघितलेलं आणि छायाचित्रातून दर्शन देणारं काझीरंगा याची देही याची डोळा पाहायचं होतं ना? जागतीक वारसा लाभलेलं हे सुंदर हिरवंगार ४३० वर्ग कि.मी. राष्ट्रीय उद्यान. वन्यजीव, प्राणी, पक्षी, झाडं यानी समृद्ध असं हे जंगल आता उजेडात चांगलच दिसू लागलं होतं. सुर्य अजून वर यायचा होता. बागोरी गेट जवळ वाहन पोहोचली तसे आम्ही लगबगीने हत्तीवर स्वार होण्यासाठी निघालो. सहा सहा माणसं हत्तीवर बसली आणि माहुताने हत्ती जंगलाच्या दिशेने वळवला.
 
थोडीशी मोकळी जागा पारकरून हत्ती त्याच्या एवढ्याच उंच गवतात शिरला. या गवताला एलिफंट ग्रास असंच म्हणतात. हत्तीला जे प्रचंड खाणं लागतं ते या गवतामुळेच त्याला मिळतं. समोर अफाट पसरलेलं मनमोहक जंगल असलं तरी आमची नजर एकशिंगी गेड्याला शोधत होती. तो दिसावा अशी इच्छा असताना अचानक समोरून एक हरणाची जोडी दौडत गेली. चला शुभारंभ झाला तर. एवढ्यात माहुताने हत्ती मोकळ्या जागेत नेला, थोड्या अंतरावर एक धुड गवताआड दिसत होतं, माहुताने हत्ती तिकडे न्यायला सुरूवात केली. तो गेंडाच होता. सगळ्यांचेच श्वास रोखले गेले. हत्ती जवळ जवळ जात होता तसा तो गेंडा मोकळ्या जागेत आला. त्याने दर्शन दिलं. आम्ही धन्य झालो. एकशिंगी गेंड्याचा आधीवास असलेलं हे जंगल जगभरात ज्यासाठी प्रसिद्ध आहे तो महाराजा आमच्या समोर अगदी काही हातांच्या अंतरावर होता. कॅमेरे सरसाऊन त्याचे फोटो घेतले. तिकडे सुर्यदेव वर वर सरकत होता.
 
तो गेंडा जसा पुन्हा वगतात शिरला तसा माहुताने हत्ती जागचा हलवला. गवत सोडून हत्ती त्याच्या पायवाटेवर आला. आजूबाजूला महाकाय झाडं, मधूनच डोकावणारी सुर्यकिरणं, गवतावर हलकेच येवून बसणारे पक्षी, बागडणारी हरणं असं नेत्रसुख घेत असतानाच दोन जंगली डुक्कर सरसरत गेले. या गवतात अशी अनेक स्वापदं होती तर. आम्ही हत्तीवर बसलो होतो म्हणून सुखरूप होतो. पुन्हा हत्ती थांबला, गेंडीण आणि तीचं बाळ (याला काय म्हणायचं गेंड्याची मादी आणि छोटा गेंडा?) सकाळच्या नाष्टयाला निघाले होते. आता सगळीकडे गेंडे दिसायला लागले. पक्षांचे थवे उडताना दिसत होते. जमीनीवर काही पक्षी किटक, किडे खाण्यात मग्न होते. रान फुलांची पखरण झाली होती, रुईची झाडं सभोवार फुलंली होती. त्या रमणीय वातावरणात एक तास कधी संपला ते समजलच नाही. माहुताने हत्ती पुन्हा माघारी आणला होता. एक एक करत मंडळी उतरत होती. आमच्या गटाचे दोन हत्ती अजून यायचे बाकी होते म्हणून आम्ही थांबलो होतो, तेव्हढयात दोन रान रेडे उधळत आले, सगळ्याची पळापळ झाली, वनखात्याच्या गार्डनी बंदूका सरसावल्या, ती धुडं आली तशी वेगात निघून गेली. सकाळची सफारी फटाक्याची माळ लावतात तशा रेड्यांच्या आतषबाजीत संपली.

साडेआठच्या दरम्यान रिसॉर्टवर परतलो. काल रात्रीच्या काळोखात आणि पहाटेच्या अंधूक प्रकाशात पाहिलेला रिसॉर्टचा परिसर आताच्या लख्ख उजेडात मनाला मोहून टाकत होता. काझीरंगाला खेटून असलेल्या त्या परिसरात थोडं उंचावर असलेलं ते रिसॉर्ट म्हणजे आत्माने निवडलेलं सुंदर ठिकाण होतं. मंडळी भलतीच खुश झाली होती. जेवणाच्या आधी जवळच्याच गावात फेरफटका मारावा म्हणून आम्ही बाहेर पडलो. नारळ-सुपारीच्या बागांबरोबरच, बांबूची बेटं असलेलं ते छोटेखानी गाव सगळ्यांनाच आवडलं. वाटेत चहाचे मळे लागले. ते मागे पडतात तोच शेतं लागली. एका ठिकाणी काही लोक जमून एका भल्या मोठ्या कावलीत काहीतरी शिजवत होते. आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर खिजडी शिजत होती. तो दिवस महाशिवरात्रीचा असल्याने गावची मंडळी एकत्र येवून खिचडी बनवतात. प्रत्येक घरातून शिधा येतो. पुढे एका घराजवळ बरीच मुलं पंगतीला बसली होती. घरची गृहिणी त्यांना केळीच्या पानावर प्रसाद वाढत होती. आम्ही तिथे  पोहोचलो. आमच्याही हातावर प्रसाद ठेवला गेला. फुगऊन सोललेले हिरवे मुग, हरभरे असच काही होतं. आसामी लोकांची शिवरात्र बघायला मिळाली. मुलं, माणसं आनंदी दिसत होती. दिड पावणेदोन तासाचा फेरफटका मारून परतलो तेव्हा  उकाडा थोडा वाढला होता.

सकाळी सफारीवरून परतताना मुख्य रस्त्यावरून पोपटांचे थवेच्या थवे आजूबाजूच्या गवतात दिसत होते त्याच ठिकाणी आता गेंडे दिसत होते. आता त्यांचं तेवढं कौतूक वाटत नव्हतं. दोन वाजण्याच्या सुमारास दुपारची जीपसफारी सुरू झाली. कोहारा गेटवरून उघड्या जीप निघाल्या, नागमोडी वाटा पार करत एका लाकडाच्या पुलावरून जीप जात होती. काझीरंगात ओढ्यावर सगळीकडेच असे लाकडी पुल आहेत. जीप असल्याने थोड्याच वेळात आम्ही जंगल्याच्या आंतवर पोहोचलो. हरणं, सांबरं, रान रेडे, गेंडे नजर वेधून घेत होते. रान हत्तींनी दर्शन दिलं, पक्षी ही मुबलक प्रमाणात दिसत होते. एवढ्यात जीप हळू हळू होत थांबली. रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली रान कोंबडा तोर्‍यात उभा होता. त्याने फोटोला पोजही दिली. जीपच्या ड्रायव्हरची नजर सरावलेली होती. प्राण्याची चाहूल लागताच तो जीप थांबवत होता. एका टेहाळणीसाठी मुद्दाम बनवलेल्या टॉवर जवळ त्याने जीप थांबवली. आम्ही वर चढून गेलो. तीनशे साठ अंशात सारा परिसर नजरेच्या टप्प्यात दिसत होता. पलिकडच्या पाणवठयावरून दोन गेंडे आमच्याच दिशेने येत होते. आता जंगल मनसोक्त पाहाता येत होतं. हवे तसे फोटो घेता येत होते. त्यानीही कॉट वॉक केलं. बघा किती बघायचंय ते...!

आता उन्हं तीरपी होत होती. सावल्या लांबवर पसरायला लागल्या होत्या. टॉवरवरून खाली उतरलो. पुन्हा जीपमध्ये बसलो. थोडा वेळ एक रुट करून परतीच्या वाटेला लागलो. आमचा उत्साह बघून ड्रायव्हरने एका मचाणाजवळ जीप थांबवली. मी आणि साळवी साहेब वर चढून गेलो. जंगल शांत शांत वाटत होतं. खाली सरसर झाली. रान कोंबडा घाईघाईत जमीन उकरत होता. एका फांदीवर स्पॉटेड डोव्ह बसलं होतं. वर पक्षांचे थवे परतताना दिसले. दोन पेलीकन जवळून उडत गेले. आता उन्हं सरली होती. लगबगीने हरण पलिकडे जाताना दिसली. एक गेंडा रस्ता ओलांडून जंगलात निघून गेला. कबूतर झाडामध्ये उडून गेलं. कोंबडा पतार्‍यात दिसेनासा झाला. संधीप्रकाशाचं साम्राज्य पसरायला लागलं तसे आम्ही मचाणावरून पायउतार झालो. आमची जीप गुरगुरत जंगला बाहेर निघाली आणि खर्‍या अर्थाने जंगली प्राण्यांचा दिवस सुरू झाला....!   

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates