28 March, 2012

तेजपूरदैत्यराज बाणासुराने भगवान शंकराची उपासना करून हजार बाहूंच बळ मिळवलं होतं. त्या मुळे त्याच्याशी कुणीच युद्धाला तयार होत नसत. तो अपराजित असा झाला होता आणि त्याला आपल्या ताकदीचा अहंकार झाला होता. बरिच वर्ष त्याच्याशी कुणीच युद्ध केलं नसल्याने तो अस्वस्थ झाला होता. कुणीच त्याच्याशी युद्धाला तयार होईना तेव्हा तो शंकराला शरण गेला आणि म्हणाला हे भगवन मला युद्ध करण्याची अनिवार इच्छा होत असून माझ्याशी कुणीही युद्ध करायला तयार नाही तेव्हा आता आपण स्वत: माझ्याशी युद्धाला तयार व्हा. त्याचं हे मुर्ख पणाचं बोलणं ऎकून भगवान शंकराला खुप राग आला. पण बाणासुर त्याचा भक्त असल्याने त्याने राग आवरत त्याला सांगितलं की अरे मुर्खा तुझा अहंकार मातीत मिळवणारा या आधीच जन्माला आला आहे. तुझ्या महाला वरचा द्वज जेव्हा खाले पडेल तेव्हा समज की तुझा शत्रू जवळ आला आहे.
 
बाणासुराची उषा नावाची मुलगी होती. एका रात्री तिच्या स्वपनात एक राजबिंडा तरूण आला आणि ती त्याचं सौंदर्य पाहून मोहीत झाली. स्वप्नातून जाग आल्यावरही ती त्याला विसरू शकत नव्हती. ती त्याच्या आठवणी ने बेचैन व्हायला लागली. तीला उदास पाहून तीची हुशार मैत्रिण चित्रलेखा तीच्या जवळ आली. उषेने आपली व्यथा तीला सांगताच चित्रलेखानी आपल्या मायावी सामर्थ्याने त्याचा पुतळा बनवला. उषेने त्याला लगेच ओळखले. आता मी याच्या शिवाय राहू शकत नाही असा ती आलाप करू लागली. तो श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध होता. चित्रलेखा द्वारकेला गेली आणि झोपलेल्या अनिरुद्धाला पलंगासहीत घेवून आली. जेव्हा अनिरुद्ध झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने आपल्याजवळ एका रुपवतीला पाहिलं. उषा त्याला सामोरी गेली आणि म्हणाली की ती त्याच्याशी विवाह करू इच्छीते. अनिरुद्धही मोहित झाला होता, तो तिच्या बरोबर तिच्याच महालात वास्तव्य करू लागला. बाहेर पहारेकर्‍यांना याची चाहूल लागली. त्यांनी बाणासुराला सुचीत केलं. बाणासुर महालाच्या बाहेर आला आणि त्याला आपल्या माहाला वरचा ध्वज खाली आलेला दिसला. आपला शत्रूच उषेच्या महालात लपून बसला असल्याची त्याला खात्री पटली आणि तो शस्त्रासह उषेच्या महालात गेला. अनिरुद्धाला पाहाताच त्याला क्रोध अनावर झाला. लागलीच त्याने अनिरुद्धाला युद्धासाठी ललकारले. अनिरुद्धाने लोखंडाचा अजस्त्र खांब उचकटून फिरवला आणि बाणासुराच्या अंगरक्षकांना ठार केलं. बाणासुर आणि अनिरुद्धामध्ये घनघोर युद्ध झालं पण कुणीच हरेना शेवटी बाणासुराने अनिरुद्धाला नागपाशाने बांधून टाकलं आणि बंदी बनवलं.
 
इकडे द्वारकेत अनिरुद्धाची शोधाशोध सुरू झाली, एवढ्यात देवर्षी नारद तेथे पोहोचले आणि त्यानी अनिरुद्धाचा ठावठिकाणा सांगितला. मग श्रीकृष्ण, बलराम, प्रदयुम्न, सात्यिकी, गद, सांब आदी वीर आपली चतुरंगिणी सेना घेवून शोणितपूरात पोहोचले. आपल्या राज्यावर आक्रमण झालेलं पाहून बाणासुर युद्धाला तयर झाला. भगवान शंकर आपल्या भक्ताच्या सहाय्याला कार्तिकेय, भुत, प्रेत पिशाच्य, यक्ष, राक्षसासह धावून आले. घनघोर युद्ध झालं. श्रीकृष्णाने ब्रम्हास्त्राचा प्रयोग करून शंकराची सगळी अस्त्र निकामी केली. बाणासुराचे चार हात सोडून सगळे हात तोडून टाकले. शेवटी शंकराने बाणासुराला श्रीकृष्णाला शरण जायचं आवाहन केलं. बाणासुर श्रीकृष्णाच्या पायावर लेळण घेवून त्याला शरण गेला. त्याने आपली मुलगी उषेचा विवाह अनिरुद्धाबरोबर लावून दिला.                   
 

बाणासुर नगरीत त्या युद्धात रक्ताचे पाट वाहिले म्हाणून त्याचं नाव शोणीत असं पडलं.  संकृतमधल्या शोणीतपूरचं असमीया भाषेतलं भाषांतर म्हणजेच तेजपूर. बाणासुराच्या राजधानीचा भाग म्हणजे आजचे अग्नीगढ, त्याला लागूनच चित्रलेखा गार्डन आहे. (एक चांगला कलेक्टर आला त्याने कचर्‍याचा ढिग असलेल्या या जागेवर सुंदर उद्यान उभं केलं आहे.) पच्शिम सम मधले बोडो, लखिमपूर भागातले मिसिड आपल्याला बाणासुराचे वंशज समजतात. बाणासुराला या भागात बान राजा म्हटले जाते.   
 
अग्नीगढ  आणि चित्रलेखा गार्डन शहरात असूनही तिथे गेल्यावर प्रसन्न वाटतं. दोन्ही बागांची देखभाल उत्तम रितीने केलेली आहे. तिथली स्वच्छता तर वाखाणण्याजोगी. झाडानाही भार झालेली फुलं पाहून मन हरखून जातं. तवांगच्या वाटेकडे निघताना छान मुड तयार झाला.

 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates