25 May, 2012

तवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग दोन
चोहीकडे बर्फ, अंधूक होत चाललेला प्रकाश आणि वाढत चाललेली थंडी अशा वातावरणात प्रवास चालूच होता. दिवसभरच्या प्रवासामुळे आलेला शिण आणि बाहेर काही दिसत नसल्याने प्रवास लाबतचालला आहे असं वाटत होतं. सेला पास मागे टाकून वळणावळणाच्या रस्त्याने गाडी खाली उतरत होती. बाहेर मिट्ट काळोख, क्रिष्णाच्या( आमचा ड्रायव्हर) भरोशावर सगळं चाललं होतं. रस्ते खराब असल्याने मध्येच धुळीचे लोळ उसळत होते. आता हॉटेलवर पोहोचायची वाट पहाणं एवढच काम उरलं होतं. क्रिष्णाला रस्ता माहित होता बाकी आमचा प्रवास अज्ञाताकडे होतो तसा चालला होता. दूर उंचावर दिवे दिसायला लागले, ते तवांग होतं. पुन्हा गाड्या चढाला लागल्या, सात सव्वासातच्या दरम्यान हॉटेलवर पोहोचलो. गरम गरम चहा कॉफीने स्वागत झालं. हॉटेलच्या उबदार वातावरणात पुन्हा उत्साह संचारला.

पहाटे लवकर जाग आली. कडाक्याची बोचरी थंडी असल्याने अंथरूण सोडवत नव्हतं. हळूहळू आकाश मोकळं व्हायला लागलं तशी तवांग फिरायचा उत्साह दुणावत होता. मुख्य म्हणजे तवांगची एकशे आठ तळी मला एकसारखी खुणावत होती. त्या सर्व तळ्यांचा मुकुटमणी संगेत्सर लेक बघायला मिळणार की नाही अशी शंका वाटत होती. करण हॉटेल मधल्याच एकाबाजूच्या खोल्यांमध्ये नळाचं पाणी येत नव्हतं. म्हणजे बाहेर सगळी कडे बर्फाचं साम्राज्य असणार आणि तवांग पासून आणखी वर १४,५०० फुटांवर असलेली ही तळी तर पुर्ण गोठलेलीच असणार आणि पुढे संगेत्सर लेक जवळ जाणारा रस्ता मोकळा नसणार असा अंदाज होता. बघू काय होतं ते.

आठच्या सुमारास तळ्यांच्या दिशेने गाड्या पळू लागल्या. संपुर्ण तवांग शहराचं दर्शन वरून होत होतं. एका खडकावर श्री. छत्रपती शिवाजी मार्ग असं कोरलेलं होतं. मराठा रेजीमेंट च्या जवानांनी महाराजांचं नाव कोरलेलं असावं. मागच्या वेळी मला मराठी जवान भेटले होते. या वेळी भेटतील का? संध्याकाळी युद्ध स्मारकाला भेट द्यायची होती तेव्हा कदाचीत भेट घडेल. जस जसे वर जात होतो तसतशी हवा मोकळी होत गेली, सकाळपासून दाटून आलेल्या कुंद वातावरणात फरक पडला आणि सुर्याची किरण आमच्या पर्यंत पोहोचली. एवढया रम्य प्रदेशात आल्यावर जर स्वच्छ सुर्यप्रकाश नसला तर मनासारखे फोटो घेता येत नाहीत. सुर्य किरणांबरोबरच कॅमेर्‍यांनी केस बाहेर डोकी काढली. दुरदर्शनेचे कसलेले फोटोग्राफर अनिल साळवी मनोमन सुखावले असणार, त्यांनी चालत्या गाडीमधून फोटो घ्यायला सुरूवात केली. बाहेरचा नजारा नेत्रसुख म्हणजे काय असतं त्याचा प्रत्यय देत होता.

एका गोठलेल्या तळ्याजवळ गाड्या थांबल्या आणि प्रत्येक मोठं माणूसही मुल होवून गेलं. सगळे बफ्रावर झरझर चालत गेले, घसरगुंडीचा खेळ सूरू झाला. शुभ्र ताज्या बर्फात कुणी लोळण घेत होतं, बर्फाचे चेंडू उडवले जात होते, फेकले जात होते, फेकून मारले जात होते. बर्फाचीच उधळण चालू होती. कुणीही थांबायला तयार नव्हतं. मज्जा…………..च मज्जा काही काळ तरी आम्ही स्वर्गात होतो. खेळ इथले संपत नव्हते.                     

संगेत्सर लेकच्या दिशेने निघालो, TCP Y JUNCTION असा बोर्ड लागला,  इथे गाड्या चालवाव्या लागतात. पुढे जायचं असेल तर इथे लष्कराची परवानगी घ्यावी लागते. संगेत्सर लेक जवळ जाणारा रस्ता धोकादायक असल्याने परवानगी मिळाली नाही. पण त्याच कुणाला काही वाटलं नाही. कारण अलिकडच्याच तळ्यावर मनोसोक्त खेळून झालं होतं. जवानांची भेट, फोटो काढणं झालं. चहू बाजूला  पसरलेला शुभ्र बर्फ न्याहाळण्यात मंडळी रंगून गेली होती. ले कॅम्प, गोरडोंग, वांगडुंग अशी चीन मधली आणि लुनग्रोला, केरेटेंग, संगेत्सर लेक अशा भारतातील ठिकाणांच्या अंतरांचा बोर्ड दिसला. चीन पासून अवघ्या तीस किमी अंतरावर आम्ही होतो. हाच तो सगळा अरुणाचलचा प्रदेश ज्या साठी चीन ने भारतावर युद्ध लादलं आणि अजून चीन या प्रदेशावर दावा करतं.

File:Sakyamuni Buddha.jpg
शाक्यमुनी बुद्ध
शाक्यमुनी बुद्धाची मुर्ती असलेल्या तवांग मॉनेस्ट्रीला भेट देण्याचा पुढचा कार्यकम होता. तिबेट मधल्या ल्हासा येथील मॉनेस्ट्री नंतरची ही सर्वात जगातली सर्वात मोठी मॉनेस्ट्री. लडाखच्या मॉनेस्ट्रीज पेक्षा थोडा वेगळेपणा जाणवला या ठिकाणी. मुख्य म्हणजे या ठिकाणी गेट पर्यंत गाडीने जाता येतं.   

चीन-भारत युद्ध स्मारक
जसवंत सिंहांचा पुतळा
चीन-भारत युद्ध स्मारकाची भेट ही आमच्यासाठी महत्वाची गोष्ट होती. माजोरडया  राजकारण्यांमुळे प्राणाला मुकलेले जवान प्राण पणाला लावून आपल्या सिमांचं रक्षण करतात. कारगील युद्धात शत्रूला धुळ चारण्यात आपले जवान यशश्वी झाले त्यामुळे द्रास वॉर मेमोरीयल आणि इथे तवांगला भेट देताना वेगवेगळ्या भावना मनात दाटून येतात. नेहरू. त्यावेळचे संरक्षणमंत्री श्री. कृष्णमेनन यांच्या आत्ममग्न आणि दुराभिमानी वागण्याच्या आठवणींनी मन विषण्ण झालं.
नुरानांग चा धबधबा 

तवांगचा निरोप घेताना थोडं जड वाटत होतं. त्या दिवशी येताना जे भाग काळोखात बुडाला होता तो आज पाहायला मिळणार होता. नुरानांग चा धबधबा हा त्या पैकी एक होता. उंचावरुन कोसळणारा प्रपात पाहून दिल खुश झालं. नागमोडी रस्ते पार करत आम्ही जसवंत गडच्या दिशेने जात होतो. जसवंत सिंह हा एक बहादर. चीन बरोबरच्या युद्धात ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला त्या विर जवानांत जसवंत सिंहांच नाव अग्रभागी आहे. जसवंत गढच्या जवानांच्या हातचा गरम गरम चहा खरंच अमृत तुल्य वाटला. अशा ठिकाणी गेल्या वर वाटत राहतं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत         

 जसवंत गड

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates