04 August, 2012

जाता बुद्धाच्या देशा –भूतान भाग : 2


भारत-भूतान प्रवेशद्वार

सकाळचे सात वाजले तरी अजून चहा मिळाला नाही म्हणून मंडळींची चुळबूळ सुरू होती. भूतान मधील फुन्तशोलींग मधल्या हॉटेल मध्ये आम्ही होतो तरीपण भारतातल्या जयगावमधलेच कामगार तिथल्या हॉटेलमध्ये कामाला होते आणि साडेसात वाजल्याशिवाय त्यांना भूतान मध्ये प्रवेश मिळणार नव्हता. ते कामगार आल्यावरच चहा बनणार होता. आपल्याला कितीही घाई असली तरी त्या त्या ठिकाणचे व्यवहार तिथल्या पद्धती प्रमाणेच चालतात. चिंता मत करो साबजी, सब हो जायेगा अशी आश्वासनं गंभिरपणे घ्यायची नसतात. एरवी अंथरूणात लोळतपडणारे आपण अशा ठिकाणी गेलो की, विशेषत: हिमालयात गेल्यावर लवकर उठतो, तिथल्या हवामानामुळेच आपल्याला ताजतवानं वाटून लवकर जाग येते. थंड हवामान आणि उठल्या उठल्या लागणारा चहा या सवयीमुळे चहाला लागणारा उशीर नकोसा होतो.

स्वच्छ, सुंदर  भूतान
चहा मिळाला, नाश्ता तयार होईपर्यंत बाहेर फेरफटका मारून यावं म्हणून हॉटेलच्या बाहेर आलो. काल काळोखात निट न पाहिलेला भूतान-भारत सिमेवरचा भाग बघावा म्हणून तिकडे वळलो. भूतान मधले रस्ते झाडून स्वच्छ केल्यासारखे होते तर पलिकडचे जयगावचे रस्ते कचर्‍याने भरून गेले होते. काही पावलांच्या अंतरात हा जमीनास्मानाचा फरक होता. हा वृत्तीतला आणि वागणूकीतला फरक आहे. भूतान मधले लोक आपला परीसर स्वच्छ ठेवू शकतात तर आपण भारतिय का नाही? आपण भारतातले आहोत आणि घाण करणारे हेच ते लोक अशा नजरेने आपल्याकडे सगळे भुतानी पहात आहेत असा माला भास होवू लागला. सार्वजनिक स्वच्छतेबद्दल भूतानची जनता जागरूक आहेच.

फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य
नाश्ता आटोपून निघण्याच्या तयारीने बाहेर पडलो. आज आमची गाडी सलीम चालवत होता. हा सलीम म्हणजे माहितीचा खजिनाच होता. (सलिम बद्दल वेगळं पोस्ट लिहायचा माझा विचार आहे.) शंभर सव्वाशे मिटर अंतर गेल्यावर फुन्तशोलींग शहर संपले आणि चढाव सुरू झाला. गाडी एक डोंगर चढत होती, असे सात डोंगर पार करून आम्ही १८० कि.मी. वरच्या थिंपू या भूतानच्या राजधानीच्या शहरात पोहोचणार होतो. उंचावरून फुन्तशोलींगचं विहंगम दृश्य दिसत होतं. एका वळणावर इंजिनीअरींग कॉलेज दिसलं, हे भूतान मधलं एकमेव इअंजिनीअरींग  कॉलेज, सलीमने माहिती पुरवली. संपूर्ण भूतान हिमालयात वसलेलं असूनही इथले रस्ते दृष्ट लागावेत एवढे उत्तम आहेत. हे भूतानचे रस्ते आपल्या लष्कराच्याच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या Dantak  या कंपनीने बनवलेले आहेत. भूतान मध्ये १९६० पर्यंत मोटरवाहतूकीचे रस्तेच नव्हते. त्यानंतर भारताशी झालेल्या करारानुसार तिथे रस्ते बांधले गेले. भूतानची संरक्षण व्यवस्थाही भारतच पाहतो. त्यामुळे तिथे आपलं भारतिय सैन्य खडा पाहा देत होतं.  

शिस्तबद्ध वाहतूक
वाटेत भारतिय लष्कराच्याच एका कॅंटीनमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. पुणे सातार्‍यकडचे काही सैनिक आम्हाला तिथे भेटले, पण मालवणी बोलणारा कणकवली जवळचा एक सैनिक भेटला तेव्हा तर आम्हाला खुप आनंद झाला. प्रसन्न करणारा गारवा आणि सृष्टी सौदर्याची मजा घेत आमचा प्रवास सुरू होता. वाटेत कुठेतरी रस्त्याचं काम सुरू होतं म्हणून गाड्या थांबल्या. पाय मोकळे करायला आम्ही गाडी बाहेर पडलो. थोड्याच वेळात वाहनांची रांग लागली. रस्त्यात एका मागोमाग एक थोडं अंतर ठेवून थांबलेल्या गाड्या पाहून त्यांच्या शिस्तीचं कौतूक वाटलं. पुढे जायची गडबड नाही की कर्कश हॉर्न वाजवणं नाही. साधारण तासाभराने वाहतूक पुन्हा सुरू झाली. दिवस मावळतीला चालला असतानाच आम्ही थिंपू शहरात प्रवेश करते झालो. ताबा इथे असलेलं वागचुक रिसॉर्ट येईपर्यंत दिवस काळोखात बुडाला. शहरापासून दूर टेकडीवर असलेल्या रिसॉर्टमध्ये पोहोचलो तेव्हा कडाक्याच्या थंडीने गारठायला होत होतं.

वांगचूक रिसॉर्ट
वांगचूक रिसॉर्ट हे थिंपू मधलं फोर स्टार हॉटेल आहे. गेल्या गेल्या गरमागरम चहाने आमचं स्वागत झालं. हॉटेलच्या मुलींनी आमच्या सामानाचा ताबा घेतला. मॅनेजरपासून कुकपर्यंत सगळ्या मुलीच कामं करताना दिसत होत्या. अप्रतिम रुम्स आणि आतलं वातावरण पाहून प्रवासाचा शिण कुठल्याकुठे निघून गेला. गरम पाण्याने आंघोळी झाल्यावर प्रशस्थ अशा डायनींग हॉलमध्ये मंडळी जमली पण बुखार्‍याजवळ गर्दी करून उभं राहण्यातच जास्त मजा येत होती. थंडीचा कडाका अजूनच वाढला होता.  

   

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates