04 October, 2012

ज्ञातव्य – एक नेत्रसुखद अनुभव




ज्ञातव्य हे सुलेखनकार सुभाष गोंधळे यांचं चित्रप्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरीत सध्या सुरू आहे. कालच हे चित्र प्रदर्शन पाहाण्याचा योग आला आणि वाट वाकडी करून आर्टीस्ट सेंटर गॅलरीत गेल्याचं समाधान वाटलं. नुसती अक्षरं, शब्द पण ते सुलेखनाच्या माध्यमातून समोर आले की स्तिमीत व्हायला होतं. देवनागरी लिपीतील स्वर आणि व्यंजनं, त्यांच्या उच्चारणातील सुलभता आणि काठीण्य चित्रांच्या माध्यमातून किती सहजतेने हाताळलेलं आहे ते ती चित्र पाहाताच लक्षात येतं.

सुलेखनकार सुभाष गोंधळे (सुगो)
ॐ नम: शिवाय हा मंत्र तर आपल्याला थेट मंदीराच्या गाभार्‍यात घेऊन जातो. मंत्रोच्चारानंतर निर्माण होणारी स्पंदनं आणि आवर्तनं ही चित्रांच्या माध्यमातून कॅनव्हारवर प्रकट करणं हे सुगोंच्या शैलीचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल. कराग्रे वसते लक्ष्मी या मंत्राचे भावही कॅनव्हासवर तेवढयाच ताकदीने साकार झाले आहेत.


हे अक्षरांनो मंत्र व्हा असं जर म्हटलं आणि खरोखरच ती अक्षरं मंत्र झाली आणि आपल्याशी बोलू लागली तर? अक्षरं, शब्द आपल्या अर्थ, भावासहीत आपल्याला सामोरी आली तर काय बहार येईल? सुगो अर्थात सुभाष गोंधळे हे सुलेखनकार ज्ञातव्य (समजण्यास सोपे) या आपल्या प्रदर्शनाव्दारे आपल्याला ही संधी उपलब्ध करून देत आहेत. सुलेखनाच्या माध्यमातून त्यांनी शब्दांना असे आकार दिले आहेत की ते शब्द आपल्याशी त्यांच्या अर्थासहीत बोलू लागतात. आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतात.

केवळ अक्षरांना आकार देऊन पाहाणार्याला आध्यात्मिक अनुभवाचा प्रत्यय देण्याचं  काम सुगो करतात ते पाहून अचंबीत व्हायला होतं. , स्वस्तिकअशा चिन्हांना सुगोंनी ज्या रंगसंगतीत सादर केलं आहे ती पाहाताना ध्यान धारणेची प्रभावळ पाहिल्याचा आनंद मिळाला तर नवल वाटू नये.

देवनागरी लिपीचं सौंदर्य मंत्रांच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवतांना सुगोंनी त्या भाषेचा आत्मा, नजाकत याला नक्कीच न्याय दिला आहे. प्रत्येक अक्षराला त्याचं स्वत:चं व्यक्तित्व, स्वभाव आणि लय प्राप्त करून देताना सुगोंच्या कुंचल्यातून सादर झालेली एक अप्रतिम अदाकारी पाहाताना मन मोहून जातं. सुलेखन ही एक कला तर आहेच पण ते एक व्यक्त होण्याचं साधनही आहे. आपल्याशी बोलणारी ही अक्षरं, ते शब्द, मंत्र याचा आनंदानुभव घ्यायचा असेल तर सुगोंच्या प्रदर्शनाला अवश्य भेट दिली पाहिजे. सदर प्रदर्शन आर्टीस्ट सेंटर गॅलरी, ऍडोर हाऊस, ६ के दुभाष मार्ग, जहांगीर आर्ट गॅलरी जवळ, काळाघोडा, फोर्ट मुंबई ४०० ००१ या ठिकाणी, १ ते ७ ऑक्टोबर २०१२ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहील. बोलणारे शब्द थेट हृदयाशी संवाद साधतात याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येईल.    


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates