10 November, 2012

सुख पाहता




अलिकडे वृत्तपत्रांची पहिली पानं सुख विकणार्‍या जाहिरातींनी भरलेली असतात. घर, ते सजवणारं सामान या पासून कडधान्यापर्यंत आणि इच्छित स्थळी पोहोचवणारी किंवा इच्छित स्थळी ठेवण्यासाठी असलेली गाडी या पासून ती चालत असताना कान, डोळे यांना सुखावणारी यंत्र (इलेक्ट्रॉनीक गॅझेटस) अशा अनेक प्रकारच्या जाहिराती सकाळी सकाळीच दृष्टीस पडतात. मित्रांनो सुख विकणारे हे दलाल असे प्रभातकालीच आपल्या घरात घुसखोरी करतात आणि मग तिन्ही त्रिकाळ आपला पिच्छा पुरवत असतात. टि.व्ही. हा आता जाहिराती पाहण्यासाठीच असतो. अधून मधून एखादं गाणं, चार संवाद, बातम्या या त्या जाहिरातींदरम्यान दाखवल्या जातात. घरात हा जाच सहन करावा लागत असल्याने जरा बाहेर पडावं तर बाहेरचं जग तुम्हाला सुखी करण्यासाठी जय्यत तयार असतं. रस्ते, बाजुचे मॉल, दुकानं, फुटपाथ आणि त्यातून वाट काढत कसेबसे आपण पुढे गेलो की ट्रेन आणि बस मध्येही हे सगळे देवदूत हजर असतात. (हल्ली स्वप्न ही मॉल मधलीच पडतात.) एवढं पार करून कामाकडे लक्ष द्यावं म्हटलं तर संगणकावर महाजालात या जाहिराती आपला पिच्छा सोडत नाहीत.

या जाहिराती हिच आपली सुख मोजायची पट्टी झालीय. जाहिरातीत दिलेल्या किंमतीपेक्षा एखादी वस्तू आपल्याला स्वस्त मिळाली की आपण सुखाऊन जातो. किंवा ती घ्यायला अधिर होतो. (भले त्या वस्तूची आपल्याला गरज असो नसो.) थोडक्यात जाहिराती शिवायचं जीवन ही कल्पनाच करवत नाही एवढी त्याची आपल्याला सवय झाली आहे.  मित्रांनो सुख हे असं विकत मिळतं का? केवळ इंद्रियांच सुख (ते सुद्धा दुसरे म्हणतात म्हणून) म्हणजेच सुख का? या जाहिरातींनी वाढवलेल्या उन्मादामुळे किंवा आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना तरी मिळूदे म्हणून हट्टाने आणलेल्या वस्तूंमुळे आपण सुखी होणार का? आता दिवाळीचं निमित्त, पण त्या आधी आलेल्या आणि पुढे येणार्‍या सणांच्या वेळी सर्वच प्रकारचं प्रदूषण करणारे आपण कोणतं सुख निर्माण करत असतो? असे अनेक प्रश्न आजकाल सारखे सतावू लागलेत.

या सगळ्या गलबल्यात आपण एका जागी शांत बसूही शकत नाही आणि त्यामुळे मनं शांतच होत नाही. हा सगळा गडबडीचा गाळ खाली बसल्याशिवाय प्रसन्न कसं वाटणार? एवढ्या सगळ्या गोंधळामुळे आपण आपल्या संवेदनासुद्धा हरवून बसलो आहोत. त्या संवेदना, निर्व्याज आनंद परत मिळवायचा असेल तर शांतता निर्माण केली पाहिजे किंवा एखाद्या शांत ठिकाणी गेलं पाहिजे आणि ते शक्य नसेलतर एका जागी शांत बसून डोळे बंद करून गतजीवनातले तृप्तीचे क्षण आठवले पाहिजेत मग ती एखाद्या पक्षाची शिळ असेल, नदीचा किनारा असेल, समुद्राची गाज असेल, पौर्णिमेचं चांदणं असेल, खळातता प्रवाह असेल, रिमझिमणारा पाऊस असेल, पर्वत शिखरं असतील, हरणाचं बागडणं असेल, अगदी मांजरीचं पायात घोटाळणं असेल किंवा तूमच्या बाळाचं पडणारं पहिलं पाऊल असेल, शांत बसून डोळे बंद करून हे सगळं आठवण्याचा प्रयत्न करा, खरा आनंद, उत्कटतेचे ते क्षण नक्कीच आपल्याला आनंद देतील. मी या दिवाळीत हे करून पाहणार आहे. सुख, सुख म्हणतात ते हेच असेल......!
हि दिवाळी आपणा सर्वांना सुखमय आणि आनंददायी जावो.   


1 comment:

  1. विचार आवडला.
    निसर्गाच्या सानिध्यात खरी मन शांती मिळेल.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates