10 December, 2012

डॉ. रामाणी – अखंड उर्जा स्रोत



यश हे अमृत झाले हा ग्रंथालीने आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे निमंत्रितांना उर्जा प्रदान करणारा होता. कार्यक्रम संपायच्या आधीच मन तृप्त झालं होतं आणि कार्यक्रमानंतर असलेली मेजवानी हा बोनस होता. डॉ. प्रेमानंद शांताराम रामाणी हे जागतिक किर्तीचे न्यूरोस्पायन सर्जन, त्यांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही पण कालच्या कार्यक्रमाला जे हजर होते त्यांना डॉक्टरांची पुन्हा नव्याने आणखीन ओळख झाली यात शंका नाही. गरिबीतून वर आलेली व्यक्ती वृध्दत्वाकडे झुकू लागली आणि वर्तमानात कितीही श्रीमंत असली तरी आपण भोगलेल्या हालपेष्टांचं भांडवल करत आपण किती कठीण परिस्थितीचा सामना केला ते सतत सांगण्यात धन्यता मानते. डॉ. रामाणी अशा गरिबीतून वर आले पण वर येताच त्यानी आपल्या गोव्यातील वाडी गावापासून कर्मभुमी मुंबई पर्यंत सगळ्याच अडलेल्या पडलेल्याला मदत करून समाजाचं ऋण फेडलं आणि आजही फेडत आहेत. आपल्या जन्मगावाचा तर त्यानी कायापालट केला. जागतिक किर्ती प्राप्त झाल्यावर तर भले भले प्रसंगी आपल्या मायदेशालासुध्दा भिक घालत नाहीत पण डॉ. रामाणी ते सगळं बाजूला ठेवून पुन्हा आपल्या देशाच्या क्षितीजावरच उगवतात.

पंच्याहत्तर वर्ष पुर्ण झाल्यावर माणूस किती थकला असेल असं वाटतं पण काल अखंड उर्जेचा स्रोत समोर वाहताना बघून धन्य झालो. आणि डॉक्टर ती उर्जा सभागृहातल्या प्रत्येकाला वाटत होते. सर्व सभागृह त्यात न्हाऊन निघालं होतं. तबला वादन, ट्रेकिंग, मॅरॉथॉन, लेखन ही वैद्यकीय व्यवसायापासून भिन्न असलेली क्षेत्रं धुंडाळताना ते त्या त्या क्षेत्रात तेवढेच लिलया वावरत असताना बघून हे त्यांचं आत्मिक बळ आहे हे सतत जाणवत राहात.

मुंबई विद्यापिठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख डॉ. रामाणींबद्दल बोलताना म्हणाल्या की शस्त्रक्रिया केल्यावर रामाणीसर त्याचं श्रेय घेण्यासाठी कधीच थांबत नसत. पण श्रेय सोडाच पण आपला अधिकार असला तरी त्या बद्दल आग्रही न राहण्याची ऋजूता डॉक्टरांच्या ठायी आहे हे मी माझे मित्र आत्माराम परब यांच्या कडून ऎकलं आहे, अनुभवलं आहे. लेह-लडाखच्या सहलीवर असताना आपली खरी ओळख न देताच डॉ. रामाणी इतर सहयात्रीं प्रमाणे सहलीत सामिल झाले होते आणि ओळख उघड झाल्यावरही कुठल्याही विशेष सोयीसवलतींना नकार देत राहीले. त्या सहलीत उत्साही मुलाप्रमाणे डॉक्टरांनी सर्व ग्रुपचे फोटो त्यांच्या त्यांच्या कॅमेर्‍यातून काढून दिले. प्रत्येक क्षण नव्याने जगण्याची ही हातोटी रामाणीसरांजवळ आहे म्हणून पंच्याहत्तरीत ते त्या वयाचे वाटत नाहीत.

जीवन आणि स्वास्थ्य या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचं, सत्तरीचे बोलच्या चौथ्या आणि ताठ कणाच्या पंधराव्या आवृत्तीचं प्रकाशन काल संपन्न झालं. डॉ. रामाणींच्या लेखनावर वाचक एवढं प्रेम का करतात? त्याचं कारण म्हणजे सगळं अनुभव कथन हे प्रामाणिक असतं आणि म्हणूनच मनाला भिडणार असतं. गंथालीने ही पुस्तकं अतिशय नेटकी आणि उत्तम दर्जाच्या स्वरूपात वाचकांना सादर केली आहेत ( ही पुस्तकं वाचनीय आहेत हे वेगळं सांगायला नको.)

या कार्यक्रमाचा परमोच्च्य बिंदू होता तो म्हणजे डॉ. रामाणींचा हृदय संवाद. ऍलोपथीचे एक डॉक्टर असूनही त्यांनी तिथे धडे दिले ते आयुर्वेदाचे. नियमीत व्यायाम, मेंदूला चालना देण्याचे खेळ, जीवन जगण्यासाठी परमेश्वराने दिलेलं जीवन म्हणजे पाणी त्याचं सेवन, फळं आणि पालेभाज्यांचं महत्व, लसूण, हळद, कांदा, टोमॅटो, सोयाबीन, फ्लॉवर, ब्रोकोली यांचं महत्व सांगताना डॉ. आयुर्बेदाचार्यच भासत होते. निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरूकिल्ली देणारा हा ऋषी पुढील पन्नास वर्ष आम्हाला मार्गदर्शक होवो. देवा जवळ दुसरं काय मागायचं?             


नरेंद्र प्रभू
               

3 comments:

  1. फार चांगली ओळख करून दिली.

    ReplyDelete
  2. Thanks for sharing, nice post! Post really provice useful information!

    Giaonhan247 chuyên dịch vụ vận chuyển hàng đi mỹ cũng như dịch vụ ship hàng mỹ từ dịch vụ nhận mua hộ hàng mỹ từ trang ebay vn cùng với dịch vụ mua hàng amazon về VN uy tín, giá rẻ.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates