22 December, 2013

त्या कळ्या


त्या तुझ्या उंबर्‍यावरती
मी कळ्या ठेवल्या होत्या
झाली फुले तयांची ?
कोमेजून गेल्या का त्या ?

मी उंबर्‍यात अडखळलो
माघारी तेथून फिरलो
निश्वास काळ्यांचा का त्या
तुज समजाऊन घेता आला ?


मी दूर दूर जाताना
अवचीत मागे वळलो
त्या धूसर वाटांवरती
कोलाहल झाला होता

वळणांच्या पुढती वळणे
तू अनोळखी झालीस
अशी त्याच उंबर्‍यावरती
परतून जरी आलीस

नरेंद्र प्रभू

    


19 December, 2013

विपश्यना

समर्पण भावना
आनापान क्रिया
शांतीची कामना
आज असे

शील, सदाचार
प्रज्ञा व्यवहार
मन ताळ्यावर
येत असे

रागव्देष विकार
अंतराच्या पार
भवदु:ख हर  
हिच आस

स्थितप्रज्ञ वृत्ती
सजग प्रवृत्ती
संवेदना जागती
देहभर

मन हो निर्मळ
करुणेचे बळ
मैत्रीच केवळ
आता उरे

समाधी लागता
हरती भवचिंता
न उरे आता
दु:ख, लोभ

आपुलेच रुप
पाहिले मी डोळा
अनुपम्य सोहळा
होत असे  

अखंड ती धारा
वेदने निचरा
जाणीव करीतो  
अनित्यबोध

समर्थ तो धर्म
करील सकळा
अंतरी उमाळा  
मंगलमैत्री  
  

नरेंद्र प्रभू 

30 November, 2013

तो हलकाच
मेणबत्त्या पेटवत राहील्या
तरी ती जळतच आहे
तीला कोण जाळतो
त्या वरून मेणबत्तीचं जळणं
ठरतं आहे.
ती जळते धुतराष्ट्राच्या दरबारात
दुर्योधनाच्या दरार्‍यात
राजाश्रायात
ती जळते
माध्यमांच्या कोलाहलात
राजगृहात
पेटवल्या नाहीत मेणबत्त्या
म्हणून आग थोडीच विझणार ?
आगीची झळ लागून मात्र
मेण, बत्ती नसली तरी वितळणार

20 November, 2013

उंच भरारी घे


घे भरारी, उंच भरारी, उंच भरारी घे
तू करारी, तू प्रहारी, तू उभारी घे

असे आजचा दिस हा उत्सवाचा
करी सार्थ वा मुर्त, का कापरे ?
उदासीनतेचा नसे मार्ग साचा
जरी वाटते काय आता खरे ? 

नको चिंतू आता उद्याच्या क्षणांचे
करी मोकळे हास्य आता बरे
नको रात्र बेरात्र घालू उसासे
जगायास हा निमिष आता पूरे

धुके दाटलेले असेना सभोवती
तुझा एक किरण त्याला पुरे
सरे रात्र अंधार ज्या पावलाने
उषा तूच हो, गगन कर साजीरे  

नरेन्द्र प्रभू   


  
 

  

18 November, 2013

पु.ल. भेटतच राहातात


न्यू यॉर्क येथील महाराष्ट्र मंडळाच्या स्नेहदीपदिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख.
  

कोट्ट्याधीश पुल आपल्यात नाहीत असं ते गेले तरी वाटत नाही, कारण ते मराठी माणसाला जेव्हापासून माहित झाले त्यानंतर ते सतत भेटतच राहीले. मार्मिक कोट्या
आणि नर्म विनोद ही पुलंची हातोटी असल्याने कुणीही कोटी केली किंवा आपल्याला एखादी कोटी सुचली तरी त्या बरोबरच पुलंची हमखास आठवण येते. आपण ऎकलेल्या कोटी बरोबरच पुलंनी केलेल्या अनेक कोट्या आठवतात आणि आपण हसत सुटतो. विनोदबुद्धी, शब्दावर प्रभूत्व आणि हजरजबाबीपणा असल्यामुळे  पुल कोट्या करायचे आणि लोक त्याना दाद द्यायचे.

या कोट्यांबरोबरच भेटलेल्या माणसांमधले बारकावे, त्यांची देहबोली, बोलणं आणि स्वभाव यांचं पुलंनी केलेलं निरिक्षण अफलातूनच होतं. तरी बरं पुल रत्नागीरीच्या अंतू बर्व्या पर्यंतच पोहोचले जर ते पुढे मालवणात गेले असते तर त्याना व्यक्ती आणि वल्ली चे शंभर भाग काढावे लागले असते एवढे बर...वे..., कर...वे, बाग...वे, नाग...वे पुलंना वे बाय वे (रस्तो रस्ती हो) भेटतच गेले असते. आमचा कोकणी खास करून मालवणी माणूस हा दुसर्‍याची टोपी उडवणं हा आपला जन्मसिद्ध हक्कच आहे असं मानत आला आहे. आपल्या अंगावर फाटके कपडे असले तरी दुसर्‍याच्या टोप्या उडवणं हा त्याचा आणखी एक स्वभाव धर्म आहे.

तळ कोकणात तिठ्या तिठ्यावर आणि चव्हट्या चव्ह्याट्यावर (अजून त्या ठिकाणांचं नामकरण त्रिपाठी किंवा चौपाठी चौक असं झालेलं नाही, येत्या निवडणूकीपुर्वी कदाचीत दादा, भाई किंवा बाई ते आश्वासन देतील की काय अशी मात्र साधार भिती वाटते.) अशी माणसं गिर्‍हाईकं हेरत बसलेली असतात. काही तर सायकलवरून जाता जाता  दिसेल त्याची टोपी उडवत जातात. इथली माणसं घाटावरच्या माणसांसारखी  प्रत्यक्ष टोपी घालत नसली तरी उडवणार्‍याला ती दिसतच असते.  असाच एक देवचार मालवणात सायकल वरून फिरत होता. लांब गडग्यावर ( गडगा म्हणजे मराठीत  कंपाउंड वॉल) बाबल्या पेपर वाचत बसला होता. मी माझ्या मित्रासोबत सिधुदुर्ग किल्ल्यावर जायच्या गडबडीत झपझप चाललो होतो. पण त्या काही क्षणात त्या देवचार आणि बाबल्यामध्ये जे संवाद झाले ते असे:
देवचार: कायरे बाबल्या आज पेपर वाचतस की काय? (माणूस समोर काय करतोय ते दिसत असूनही त्याला खोचक पण प्रश्न विचारणे हा त्याचा आणखी एक स्वभाव धर्म.)
बाबलो: होय तर, हो बग आज पासून लोकमत नविन पेपर सुरू झालोहा, एका रुपयात कितकी पाना बग. आणि हो फोटो बग केदो मोठो.

बाबल्याला लोकमतच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचं मनोमन कौतून वाटत होतं. देवचाराची प्रतिक्रीया पहायला मला वेळ नव्हता. आम्ही तसेच पुढे निघून गेलो. दोन-अडीज तासांनी किल्ल्यावरून आम्ही परतलो तरी बाबल्या त्याच ठिकाणी बसून आल्यागेल्या माणसाला  लोकमतचं कौतूक सांगत होता. तेवढ्यात तो देवचार पुन्हा सायकलवरून आला बाबल्याच लोकमत कौतूक चालूच होत ते पाहून त्याने विचारलं काय रे बाबल्या उद्याचो लोकमत व्हयो? बाबल्या कसंनुसं हसला आणि लोक मात्र खोखो हसत सुटले. त्या दिवसापुरतं तरी लोकमत देवचाराने जिंकलं होतं.      


अशी इरसाल माणसं कोकणात भेटतच रहातात आता हे बापूच बघा ना.  बापूंचं घर मुंबई गोवा महामार्गाला लागून. हे त्यांचं जुन्यापद्धतीच माडीचं घर, पार स्वातंत्र्यापुर्वीचं. हायवे झाला त्या आधीपासूनचं. त्या मुळे आता ते महामार्गाला जरा खेटूनच उभं आहे. घराशेजारच्या जागेवर बापूंचा पुर्वीचा मांगर होता (गुरांचा गोठा). गायी-गुरं विकल्यावर बापूंनी तिथे एक चाळ बांधली, पुढच्या बाजूला दुकानांसाठीचे गाळे आणि मागच्या बाजूला भाड्याने देण्यासाठी दोन-दोन खोल्या. शेती सोडल्यावर त्यांचा संसाराला तेवढाच हातभार.

रस्त्याला लागूनच घर असल्याने शाळेतल्या शिक्षकांना किंवा नोकरदार वर्गाला बापूंच्या जागा भाड्याने राहाण्यासाठी सोईच्या होत्या, तीच गोष्ट व्यवसाय करणार्‍यांचीही. असाच एक दिवस दुपार टळून गेल्यावर मी बापूंकडे पोहोचलो. बापू माझी आणि आतून येणार्‍या चहाची वाट पहात आरामखुर्चीत पहूडले होते. एवढ्यात एक गृहस्थ घाई-घाईत बांपूंच्या ओट्यावर येऊन दाखल झाले.
कोण बॉ ? बापूंचा प्रश्न,
तो:  नाय, भाड्याने जागा होई होती
बापू: खयची? रवाची काय गाळ्याची?
तो: गाळ्याची
बापू: कसला दुकान टाकतात?
तो: दुकान नाय, मी डॉक्टर आसय
बापू: होय, माका वाटला दुकान...
.....
बापू: आमच्याकडे भाड्याक एक डॉक्टर आसत, रोगी मारण्यात पटाईत, तुमी कसले? (आर. एम. पी. म्हणजे Registered Medical Practitioner त्यालाच बापू रोगी मारण्यात पटाईत म्हणत होते. 
तो: आर. एम. पीच
बापू: हो.....!, मग ते एक असताना तुमी कित्या आणखी?
......
बापू: दुसरा कायतरी करा...!
तो माणूस उठून गेला.
मी बापूना म्हटलं, करेना होता का तो व्यवसाय, तुम्हाला भाडं मिळालं असतं ना?
अरे, मेलो हो पण आर. एम. पीच, भाडा खयसून देतोलो? माय.......... बापूनी एक जोरदार शिवी हासडली. 
बापूना समोर आलेला चहा रोजच्यापेक्षा गोड लागला असावा.


आजचा आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार, त्यांच्या बाबतीत घडलेला हा रत्नागीरीचा किस्सा. अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन रत्नागिरीला भरलं होतं तेव्हाची गोष्ट. त्या संमेलनाच्या पुर्वसंधेला मराठी अभिमान गीताचं सामुहीक गायन रत्नागिरीतल्या शांळांमधली मुलं एकत्र येवून करणार होती. कौशल इनामदार त्यासाठी मुद्दामहून रत्नागिरीत दाखल झाले होते. गुळगुळीत दाढी करावी आणि जरा फ़्रेश होवून कार्यक्रमाला जावं म्हणून ते तिथल्या एका सलून मध्ये गेले. त्या हुशार न्हाव्याने हा माणूस बाहेरून आला आहे हे हेरून विचारलं, काय संमेलनाला का?  कौशलनी हो म्हणताच तो पुढे म्हणाला नुसती संमेलन कसली करताय, आज ते लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गाणं हजारो मुलं गाणार आहेत ते बघायला स्टेडीयम वर जा, आणि ते गाणं तुम्ही पण म्हणा. सलूनमध्ये आलेल्या अनोळखी गिर्‍हाईकाला असा सल्ला तो कोकणी न्हावीच देवू शकतो.          

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा मुंबईत येऊन गेले त्यावेळचा हा किस्सा. ओबामा आले आणि त्यानी सर्वच मुंबईकरांची मनं जिंकली. जगातील एकमेव महासत्ता असलेल्या देशाचा प्रमुख असूनही कसलीच प्रौढी त्यानी मिरवली नाही. ज्यांना ओबामांची प्रत्यक्ष  भेट लाभली ते खरच सुदैवी म्हटले पाहिजेत. चौपाटीवरच्या मणीभवनची ओबामांची भेट गाजली. पण त्या आधी त्याच मणीभवन मध्ये एक नाट्य रंगलं होतं. मणीभवन मध्ये ओबामा येणार म्हणून अमेरिकन अधिकारी तिकडे गेले. ओबामा आल्यावर कोणी कुठे किती अंशाच्या कोनात वाकून उभं रहायचं, काय करायचं, काय बोलायचं याच्या सुचना दिल्या जात होत्या. तिथल्या वाचनालयात ते अधिकारी गेल्यावर एक गांधीवादी मात्र म्हणाला हे जमणार नाही. अधिकारी चक्रावले. का? असं आवासून त्यानी विचारलं तेव्हा मला माझ्या पुर्व नियोजीत कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाला येता येईल असं वाटत नाही असं तो गांधीवादी म्हणाला. अधिक चौकशी केल्यावर समजलं की त्या जेष्ठ गांचीवाद्याने कोकणकन्या एक्सप्रेसचं तिकिट काढलं होतं आणि भेटीच्या आदल्या रात्री त्यांना कोकणकन्याने कोकणात जायचं होतं. प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी आपला गावीजायचा बेत न बदलणारा हा माणूस पुलंच्या अंतु बर्व्याच्याच गावचा. उभी हयात मुंबईत काढली तरी गावावर मनापासून प्रेम करणारा. त्याला महत्त्वाचं काय? ओबामांची भेट की मोठय़ा मुश्किलीने मिळालेले कोकणकन्या एक्स्प्रेसचे तिकीट? त्याने महासत्तेच्या अधिपतीचे भेट न घेता आपलं गाव गाठणं अधिक पसंत केलं.                    
  
अशी माणसं भेटली किंवा त्यांचे किस्से ऎकले की पुलंची हमखास आठवण येते आणि पुलं या रुपात भेटतच राहातात.  

नरेंद्र प्रभू


03 November, 2013

तुच तेजतुच दिप, तुच तेज
अंतरात दिप ज्योत
धरी प्रकाश, करी प्रकाश
तिमिराचा कर विनाश

उजळो तन, उजळो मन
उसळो रवी गात्रातून
तेजपूर्ण होवूदे
आरास तुझ्या नेत्रातून

तुच तुझ्या विश्वाचा
भास्कर हो प्रकाशाचा
सुख शांती करूणेचा
दिपस्तंभ आशेचा

वाट सुकर होईल
शिखरावर जाईल
यशवंत ध्वज तुझा
डौलाने फडकेल 

 नरेन्द्र प्रभू

27 October, 2013

दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने


लडाख....
....... प्रवास अजून सुरू आहे. 

या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीच्यावेळी मी केलेल्या भाषणाचा गोषवारा. 

मित्रहो, आपल्या मध्ये मी आज बोलायला उभा आहे तो या सन्माननीय व्यक्तींमध्ये माझा मित्र आत्माराम परब असल्यामुळेच. मित्रहो, ह्या मिलींदजींनी माझा उल्लेख काका म्हणून केला पण या माणसाच्या सहवासात आल्यापासून मी रोजच्या रोज तरूण होत आहे. या माणसात उत्साह, उर्जा एवढी आहे की एखाद्या लहान मुलासारख्या याला नेहमी नवनवीन कल्पना सुचत असतात आणि आम्हा मित्रांना पालवी फुटल्या सारखं होत राहतं. मला याने मुल तर केलच पण लेखकही केलं. या माणसाने पर्यटनाच्या क्षेत्रात जी काय वेगळी आणि साहसी वाट शोधून काढली आणि आज तीला मळलेली वाट केली त्या त्याच्या अनोख्या प्रवासामुळे मी आज आपल्यामध्ये उभा आहे. आत्माच्या पहिल्या मुंबई-लडाख-मुंबई अशा मोटारसायकल प्रवासाची खिळवून ठेवणारी कथा, त्या घटनांचा थरार म्हणजे हे पुस्तक आहे. आज पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशीत होताना माझ्या मनात संमिश्र भावना उचंबळून येत आहेत कारण या पुस्तकाचं आणि पुण्याचं हे पुस्तक जन्माला येताना पासूनचं नातं आहे. या पुस्तकाच्या काही प्रकरणांचं वाचन या पुण्यातच झालं. तेही रेणू दिदिंच्या घरात. मी पुस्तक वाचत होतो आणि दीदी मात्र मनाने त्या मोटारसायकलवर स्वार झाल्या होत्या. त्याच वेळी माझ्या लिखाणाने टॉप गेअर मघे जावून वेग घेतला होता. या पुस्तकाची जी मर्यादीत आवृत्ती लेह मध्ये जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशीत झाली त्या पहिल्या प्रिंटचे पहिले वाचक लेप्टनन जनरल रवी दास्ताने हे ही पुण्याचेच. हे पुस्तक आणि पुणं यांचं आणखीही एक नातं म्हणजे या पुस्तकाची प्रस्तावना श्रेष्ट सामाजसेविका, लेखिका आणि ज्या एकलव्य न्यासाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या न्यासाच्या अध्यक्ष रेणूदिदि गावस्कर यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे. असं हे पुस्तक आधीच पुण्याशी घट्ट बांधलं गेलं आहे.
    
हे पुस्तक लिखाणाचा जो प्रवास झाला तो प्रवासही फारच रोमांचकारी होता ते माला इथे सांगावसं वाटतं.  सोपानदेव आणि बहिणाबाई चौधरींमध्ये घडलेला एक किस्सा आहे. सोपानदेव एकदा विवेकानंदावर काही वाचत बसले होते. बहिणाबाईंनी विचारलं तू हे काय आणि कुणाबद्दल वाचतोस, तर सोपानदेव म्हणाले आई तो थोर माणूस होता तुला तो कसा कळणार? बहिणाबाई मात्र तो काय वाचतोय ते ऎकत राहिल्या. दुसर्‍या दिवशी पहाटे जात्यावर दळण दळताना त्या ओवी म्हणू लागल्या तेव्हा सोपानदेव चमकले आणि ते विचारू लागले ही स्वामी विवेकानंदावरची ओवी आहे तुला गं कशी माहित? बहिणाबाई म्हणाल्या काल तू हेच तर वाचत होतास.    

एका रात्री तीन साडेतीन तास या पुस्तकाला घटनाक्रम माझ्या या मित्राने मला सांगितला आणि सकाळी उठल्या उठल्या लाडाख प्रवास अजून सुरू आहेहे नाव आणि एकूण एकवीस प्रकरणांची नावं एका कागदावर लिहिली आणि आत्माला वाचून दाखवली. या माणसाला आम्ही जवळची मित्रमंडळी आत्मा म्हणतो आणि हे पुस्तक मी लिहिलं असलं तरी या पुस्तकाचा खरा आत्मा हाच माणूस आहे. एकदा एका दिव्यातून सुखरूप बाहेर आल्यावर पुन्हा त्या वाटेला सहसा कुणी जात नाही पण याने तर कस्टमची नोकरी सोडून हा मार्ग स्विकारला, त्या त्याच्या जीवन प्रवासाची सुद्धा ही कथा आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात असा एक हिरो असतो, आपल्याला त्या मनातल्या हिरो सारखं वागता आलं पाहिजे असं आतून कुठं तरी वाटत असतं, पण जोखीम पत्करायची आपली तयारी नसते. आत्मारामने ती जोखीम पत्करली आणि हिमालयातल्या अनेक वाटा प्रशस्त केल्या. नुसतीच जोखीम नव्हे तर कल्पकता, जिद्द, चिकाटी, माणसं जमवणं आणि ती राखणं, झोकून देणं असा अनेक गुणांनी युक्त असा हा माणूस एकदा का आपला मित्र झाला की मग तो सतत आपल्या संपर्कात येत राहातो. या पुस्तकात जो थरार मांडलाय त्या प्रत्येक घटनेत याचे हे गुण आपल्याला दिसून येतील. पुस्तक लिहून झाल्यापासून ते वाचकांना वाचायला मिळावं असं मला सारखं वाटत होतं. लिहून झाल्यानंतर तीन वर्षांनी या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि आता सहा महिन्यात हे दूसरी आवृत्ती निघत आहे.

आज पर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अनेक वाचकांचे फोन आले आणि त्यानी पुस्तकाचं कौतूक तर केलंच पण लडाखला जायची इच्छाही प्रगट केली. या पुस्तकाचे प्रिंटर माधव पोंक्षेसाहेब यानी हे पुस्तक छपाईला जायच्या आधी वाचून काढलं आणि आता लडाखला जायचंही नक्की केलय. लडखच्या पर्यटनाला चालना देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं म्हणूनही मला आनंद वाटत आहे. पुस्तक प्रकाशीत झालं आणि लगेचच वाचकांचे अभिप्राय यायला लागले. त्यातले बहूतेक वाचक एका दिवसात पुस्तक वाचून संपवलं म्हणणारे होते. काही निवडक अभिप्राय या आवृत्तीत छापले आहेत पण काही मनात घर करून राहिले त्यातला आत्माच्या आईचा अभिप्राय प्रातिनिधिक म्हणायला हवा. पुस्तकातला घटनाक्रम तिला चांगलाच माहित होता पण शेवटच्या दोन प्रकरणातलं लडाखचं वर्णन वाचून तीने आत्माला विचारलं लडाखाक जावक किती पैसे लागतत रे...., यंदा माका जावचा आसा. मला वाटतं याच्या एवढा उत्तम अभिप्राय असू शकत नाही. दिवसागणीक वेडी स्वप्न घेवून घराबाहेर पडणारा हा मुलगा आणि कायम कापरं काळीज घेवून त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ही माय. तीला एक फोन करण्यासाठी ऎशी-पंच्याऎशी किलोमिटर पायपीट करत, नद्या-नाले, डोंगर तुडवत गेलेला हा तीचा शिवबा त्या खडतर वाटेवरून परत आला त्या हृदयस्पर्षी नात्याचीही ही गोष्ट आहे. नुकतीच आपण उत्तरांचलची ढगपुटी टिव्हीवर पाहिली असेल तशाच प्रकारच्या ढगफुटीने हिमाचलप्रदेश मध्ये 1995 साली हाहाकार माजवला होता आणि नेमक्या त्याच जीवघेण्या आपत्तीत आत्माराम आणि त्याचे मित्र सापडले होते त्याची थरारक कथा म्हणजे हे पुस्तक आहे.     

एखादी संस्था माणूस म्हणून जन्माला येते हे मी याच्याबाबतीत अनुभवलय त्यामुळेच मला वाटतं हा एक संस्था म्हणून जन्माला आलाय. अनेक व्यवधानं सांभाळत त्याचा हा प्रवास अव्याहत सुरू आहे. मला दिदिंनी सांगितलेली एक चीनी गोष्ट सांगावीशी वाटते. एक शेतमजूर दमून भागून घरी आल्यावर एक मेणबत्ती लावायचा, झोपी गेल्यावर त्याला नेहमी एक स्वप्न पडायचं. त्या मेणबत्तीच्या ज्योतीमधून त्या स्वप्नाला सुरूवात व्हायची. तिथला राजा त्याच्या जवळ येवून आपल्या मुलीचं लग्न कसं होणार म्हणून चिंतामग्न स्थितीत बसायचा. याला वाटायचं मी यात काय करणार? मग एकदा सेवकाने शेतमजूराला सांगितलं, अरे तो राजा तूलाच गळ घालतोय, तू त्या सुंदर राजकुमारीशी लग्न कर. मग तो राजी होतो आणि त्यांचं लग्न होतं. तो शेतमजूर रोज एक मोणबत्ती पेटवाचा आणि त्याच्या स्वप्नाला त्या ज्योतीमधून सुरूवात व्हायची. आत्मा असंच रोज आम्हाला ज्योतीमधलं स्वप्न देतो आणि ती स्वप्न अशी सत्यात उतरतात. मग त्या स्वप्नांच्या अशा आवृत्या निघतात. या प्रसंगी मला वाटतं आमच्या नव्या पुस्तकाची इथे पुण्यात घोषणा करावी. मित्रहो, ईशा टूर्स आणि आत्माराम परब यांच्या जीवन प्रवासावर प्रभाव टाकणारी माणसं, प्रसंग आणि किस्से यावरचं पुस्तक लिहावं असं नक्की झालं आहे त्या आमच्या नव्या पुस्तकाचंही असंच स्वागत होईल याची मला खात्री आहे. 


नुकतीच आत्माची लडाखची शंभरावी सफर झाली आणि लगेचच एकशे एकावी पण झाली. शंभराव्या सफरीत ईशा टुर्सचे जे दिडेशे पर्यटक त्याच्या सोबत लेह लडाखला होते त्यांच्या बरोबर मी सुद्धा होतो. तिथे त्याचं जे भव्य स्वागत आणि सन्मान झाला तो पाहून मला आनंद तर झालाच पण एक मर्‍हाठी माणूस म्हणून खुप अभिमानही वाटला. मला वाटतं हे पुस्तक वाचताना आपल्याही मनात तशीच भावना उत्पन्न होईल. लडाखला गेला नसाल तर जावंसं वाटेल. गेला असाल तर पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल. या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी मी हे नक्की म्हणू शकतो कारण तशा प्रकारचे अभिप्राय महाराष्ट्रभरातून आम्हाला प्राप्त झाले आहेत. पुस्तक कसं आहे ते आपण वाचून ठरवालच पण हे पुस्तक वाचल्याने लडाखप्रांत मात्र आपल्या मनात घर करून राहील अशी मला खात्री आहे. धन्यवाद.  जय हिंद, जय माहाराष्ट्र.                  

नरेंद्र प्रभू 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates