28 April, 2013

यात्रा - एक चित्रानुभूती





शरद तावडे या प्रथितयश चित्रकाराने कैलास मानसरोवराची यात्रा करून यात्रा या आपल्या चित्रप्रदर्शनाव्दारे मुंबईकरांना कैलासची परिक्रमा करण्याची उत्तम संधी प्राप्त करून दिली आहे. वरळी इथल्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडीया बिल्डींग, डॉ. ऍनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०१८ या ठिकाणी ३० एप्रिल ते ६ मे २०१३ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात सदर प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्व रसिकांसाठी विनाशुल्क खुलं राहील.
चित्रकार - शरद तावडे


कैलास मानसरोवर मला नेहमीच खुणावत आलंय. इथली शिखरं ही तशी तपस्वीच. शिवशंकराचं हे कैलास प्राप्त करण्यासाठी कैलासवासी व्हावं लागतं, म्हणजे मरण आल्यावरच आपण तिथंपर्यंत जावू शकणार अशी धारणा असल्याने असेल कदाचीत निधन झाल्यावर त्या व्यक्तीचा उल्लेख कैलासवासी म्हणून करतात. दळणवळणाची साधनं नसतना कुणी कैलासला गेला तर तो परत येणं कठिण. आजही या जेट युगात कैलासला पोहोचणं सोपं झालं असलं तरी तिथे एवढ्या उंचीवर जावून परिक्रमा करणं किंवा मनाजोगते फोटो काढणं फारच कठिण काम आहे. तर असा हा कैलासचा खडतर प्रवास करून माझे मित्र शरद तावडे यांनी तिथली अप्रतिम चित्रं काढली आणि मनात भरून आणलेला कैलास कॅनव्हासवर मोकळा केला.
 आजवर कैलास पर्वताची विविध रुपं पाहून मी हरकून गेलो आहे. तिथला आगळा वेगळा निसर्ग फोटोत पाहण्यात आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तिथलं वातावरण पंचेद्रीयांनी अनुभवणं, आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेणं हे प्रत्येकाला जरी शक्य नसलं तरी तावडेंसारख्या कलाकाराने त्या निसर्गाशी एकरूप होवून, त्याचा एक भाग बनून साकार केलेल्या चित्रांच्या माध्यमातून आपण तो आनंद शोधू शकतो. या प्रदर्शनात तो,  तसा आनंद आपणाला नक्कीच घेता येईल.   

26 April, 2013

जुईच्या कळ्या




बघ जुई अंगणात चंद्र किती वर आला
तुला पाहून आता तो झाडा मागे ग लपला

तू ही लपवल्या कळ्या, कुपी बंद तुझा गंध
कुठे जाऊ? कसा घेऊ? तुझा भारला सुगंध

लाख आर्जवे ही केली, पाणी शिंदून घातले  
गोरसानेही मी आता सडा शिंपणं ते केले

हसे कोवळी पालवी, लता तरूवर गेली
चैतन्याच्या पानावर एक कळी उमलली

बघ जुई अंगणात चांद पुनवेचा आला
तुला पाहून हासला, तुझा गंध धुंद झाला 


नरेंद्र प्रभू


23 April, 2013

उपजत कलाकार - रोहन पवार




मुंबईस्थित तरुण शिल्पकार रोहन पवार आणि कोकणातले चित्रकार संदिप ताम्हणकर आणि किरण घाणेकर यांच्या अलिकडच्या काळात साकार झालेल्या शिल्पकृती आणि चित्रांचं प्रदर्शन  जहांगीर आर्ट गॅलरी, एम. जी. रोडकाळा घोडा, मुंबई ४०० ००१ येथे मांडण्यात आलं आहे. हे प्रदर्शन दि. २४ ते २९ एप्रिल २०१३ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी या वेळेत सर्व कलारसिकांना विनामुल्य खुलं राहील.

कोकणातच कलेचे धडे गिरवलेले हे गुणी कलाकार मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीत प्रथमच आपल्या कलेचं सादरीकरण करीत असून आज पहिल्याचं दिवशी कलारसिकांनी जहांगीरच्या कलादालनात गर्दी केली होती.

विशी नुकतीच ओलांडलेल्या रोहन पवारने प्रदर्शनात मांडलेल्या शिल्पकृती या कसलेल्या शिल्पकाराच्या तोडीस तोड असून हा शिल्पकार यशाचं एव्हरेस्ट नक्कीच गाठेल या बद्दल शंका उरत नाही. अधीरतेने वाट पाहणारी तरूणी, तल्लीन होऊन मृदूंग वाजवणारे लोककलाकार, आळस देणारी मांजरी, नाव हाकणारा नावाडी, शुभ संकेत देणारा हात, मान वाकडी करून अंग साफ करण्यात गुंग झालेली कबुतरं अशा अनेक शिल्पकृती साकार करताना रोहनने फायबर, ब्रांझ, संगमरव्हर, लाकूड, धातू, दगड  अशा अनेक माध्यमांचा वापर केला आहे. प्रत्येक शिल्पं हे आपली नैसर्गीक लय साधून अवतिर्ण झाल्याचा भास होणं हे या कलाकाराचं यश आहे आणि ती हातोटीच त्याला कलाक्षेत्रात उच्च स्थानी घेऊन जाईल.  रोहन सारख्या उपजत कलाकाराची कला पाहण्याची ही सुवर्णसंधी कलारसिकांनी घ्यावीच.

19 April, 2013

की देखावा मायेचा ?


केसांची किंमत २५0 कोटी
देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानला वर्षभरात भाविकांनी वाहिलेल्या केसाचा ई -लिलाव करून २५0 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. http://bit.ly/ZuhkdM

देवस्थानांना मिळालेली देणगी व लिलावातील रक्कम गरीब जनतेच्या हितासाठी वापरावी, असे आपल्याला वाटते का?

लोकमतच्या फेसबुक वर हा प्रश्न विचारला होता तो वाचून मला सुचलेली ही कविता:  





तूझे कितीक देव्हारे
देवा आज मांडलेले
दह्या दुधाचे सागर
असे, लाख सांडलेले

आला सोन्याचाही पूर
नसे अत्तरा कसर
माती पाण्याला पारखी
तूझ्या दयेच्या सारखी

तूझ्या तान्ह्या बालकाला
नसे टिपूस पाण्याचा
असे बाजार मांडला
बडव्यांनी रे भक्तीचा

पाप ताप सरो म्हणूनी
केला अहेर चोरीचा
तू आहे कारे तिथे ?
की देखावा मायेचा?


नरेन्द्र प्रभू

18 April, 2013

भाग तीन - नुब्रा व्हॅली



आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी वरून  परिसर या सदरात  सकाळी ६.३० वा. दि. १६ एप्रिल २०१३ पासून तीन दिवस लडाख प्रांतावर कार्यक्रम प्रसारीत होत आहे. आज सकाळी प्रसारीत झालेला हा तीसरा भाग: लेखन नरेंद्र प्रभू   



लडाख या प्रांताला वंडरलॅन्ड म्हटल्यास वावगं ठरणार नाही. १४,५०० फुट उंचीवर असलेला खार्‍यापाण्याचा पॅन्गॉन्ग लेक हा नेत्रदिपक विशाल असा तलाव तिथे आहे तसा १८३६० फुट उंचीवरून जाणारा जगातला सर्वात उंचावरचा मोटार वाहतूकीचा रस्ताही त्याच प्रांतात आहे. लेह शहर सोडून खारडुंगला पासच्या दिशेने गाडी जसजशी चढावाला लागते तसतसा अगदी दूरवरचा प्रदेश नजरेच्या एका टप्प्यात पाहाता येतो. विमान सोडल्यास  एवढ्या लांबवर पहाण्याचा योग क्वचीतच येतो. आणखी उंचावर गेल्यानंतर संपूर्ण लेह नजरेच्या एका टप्प्यात दिसायला लागतं. त्याही पलिकडे असणारं सिंधू नदीचं पात्रं, त्याच्या पुढचं स्तोक कांगरी हे लडाख मधलं सर्वात उंच शिखर असं विहंगम दृष्य पाहून आपण हर्षभरीत होतो. मध्येच दिसणारा एक हिरवा पट्टा आणि बाकीचा रुक्ष प्रदेश. आजपर्यंत डोळ्यानी न बघितलेलं असं चित्र डोळ्यात साठवत हा प्रवास सुरूच राहातो. रस्त्याच्या दुतर्फा असलेलं बर्फ अनुभवत आपण अचानक एका वळणानंतर खारदुंगला पासवर पोहोचतो तेव्हा उत्साहाला उधाण आलेलं असतं. पण अतीशीत आणि जोरदार वाहणारे वारे थंडीचा कडाका वाढवत असतात. खारदुंगला पासच्या रस्ता सोडून तिथे सगळं बर्फाचच साम्राज्य असतं. दोन्ही बाजूला बर्फाची तटबंदी आणि मधून जाणारं एखाद दुसरं वाहन, बारा महीने बर्फाच्छादीत असलेला खारडुंग ला पास पार करून पुढे गेल्यावर सियाचीन या पाकव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या जिल्ह्यात प्रवेश करता येतो. खारडुंगला पास नंतरचा हा प्रदेश म्हणजे, नुब्रा व्हाली. तिथे जाताना शोक नदीच्या काठाने आणि कधी प्रत्यक्ष पात्रातूनही प्रवास करावा लागतो.

समोर अथांग पसरलेल्या नुब्रा व्हॅलीचं दर्शन आणि दूरवर पसरलेल्या सियाचीन ग्लेशीयरच्या बर्फाच्छादीत पर्वत रांगा पाहून मन प्रसन्न होतं. बर्फामुळे निर्माण झालेले वेगवेगळे आकार पाहत असताना मन हरकून जातं. नुब्राव्हॅलीत उतरायला लागल्यावर हिरवा टापू दृष्टीस पडतो आणि मॅकपाय हा पक्षी आपणाला दर्शन देतो. वरती गडद निळा आणि छातीचा भाग पांढर्‍या रंगाचा असलेला हा पक्षी मन मोहून घेतो. पुढे तर मरमॅट हा दुर्मिळ प्राणी दिसतो. जमिनीच्या पृष्ठभागावर जेव्हा बर्फ असतं तेव्हा जमिनीला गुहेसारखा खड्डा पाडून हा प्राणी सहा-सात महीने आतमध्ये पडून राहतो आणि बर्फ वितळल्यावर पुन्हा वर येतो. त्या सहा-सात महीन्यात अंगात साठवलेल्या चरबीवर त्याचा निर्वाह होतो. त्या प्राण्याचे फोटो काढणं म्हणजे एक कसरत असते. तसं सगळ्याच वन्यप्राण्याचे फोटो काढताना काही पथ्य ही पाळावीच लागतात. ती पाळली तरच आपल्याला चंगले फोटो मिळतात. ते प्राणी कोवळ्या उन्हात बाहेर येतात. त्यांची चाहूल लागल्यावर शांतपणे थांबलं तर त्याच्या हालचाली टिपता येतात. जसे इथे मरमॅट दिसतात तसे याक सुद्धा दिसतात.

पुढच्या प्रवासात तिथल्या प्रदेशाचं चित्र बदलत जातं. मध्येच खोलगट भागात एखादा हिरवा टापू दिसायला लागतो आणि खार्दुंग, खालसर, डिस्कीट अशी मोजकी गावं लागतात. खालसर या गावानंतर रस्त्याच्या एका बाजूला शोक नदी आणि पलिकडे काराकोरम रेंजीस नजरेला पडतात.

हुंडर हे तिथलं प्रसिद्ध वाळवंट. डबल हॅम्प कॅमल म्हणजे दोन कोळी असलेले उंट आपल्या सिल्क रुटच्या इ तिहासात घेऊन जातात. ते उंट ही त्या काळची एक खुणच आहे. तर्‍हेतर्‍हेचे आकार घेतलेल्या वाळूच्या टेकड्या, सॅंड्युंस आणि त्या आकारांशी स्पर्धा करणारे आकाशातील ढग, दाही दिशांना तिथे निसर्गाच वर्चस्व असतं. माणूस इथे शून्य आहे असं वाटत आसतानाच तिथलं आकाशवाणी केंद्र बघून पुन्हा एक धक्का बसतो. दोन बैठ्या इमारती आणि एक मनोरा आपल्या आकाशवाणीचं  काम तिथेही सुरू असतं. छप्परही नसलेला पेट्रोलपंप सगळच आश्चर्यकारक.

नजरेच्या एकाच टप्प्यात बर्फाच्छादीत शिखरं, वाळवंट, पाण्याचा प्रवाह आणि त्याच्याकाठी झुडूपं असं दुर्मिळ दृष्य पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. तिथली डिस्कीट मॉनेस्ट्री ही तर सुंदर आहेच पण उंचावर असल्याने संपुर्ण नुब्रा व्हालीचं  विहंगम दृष्य तिथून पाहाता येतं. इकडे जाव तिथे काहीतरी वेगळं बघायला मिळतच. अगदी ते हिमालयीन कावळे सुद्धा कसे काळेकुट्ट, पिवळी चोच आणि भगवे तांबडे पाय.

वाटेत असलेल्या हॉटेल मध्ये लडाखी पक्वान्न म्हणजे मोमो खायला मिळतात. या भागात फिरताना तिथल्या लहरी निसर्गाचा अनुभव येतोच येतो. एकीकडे लख्ख उन पडलेलं असेल तर दुसर्‍या बाजूला बर्फवृष्टी होताना पाहायला मिळते. लडाखचा हा प्रांत डोळेभरून पाहायचा असेल तर मे ते सप्टेंबर या कालावधीत तिथे पर्यटनाचा आनंद घेता येतो.
         

17 April, 2013

भाग दोन – सिंधू व्हॅली



आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहीनी वरून परिसर या सदरात सकाळी ६.३० वा. दि. १६ एप्रिल २०१३ पासून तीन दिवस लडाख प्रांतावर कार्यक्रम प्रसारीत होत आहे. आज सकाळी प्रसारीत झालेला हा दुसरा भाग:  


लडाख प्रांताचं मुख्यालय असलेलं लेह शहर सिंधू व्हॅलीत वसलेलं आहे. लडाख प्रांतातल हे सर्वात मोठं शहर. तिबेटी स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या इमारती आणि घरं पाहताना आपल्या भारत देशाच्या इतर शहराहून एका वेगळ्याच शहरात आल्याचं लक्षात येतं. उत्तर-पुर्वेला काराकोरम रांगा, दक्षिण-पुर्वेला हिमालयाच्या रांगा आणि गाभा ट्रान्स हिमालयीन रांगाचा अशा पर्वतांच्या कुशीत असलेली सिंधू व्हॅली देखणी तर आहेच पण आर्यांनी ज्या नदीच्या काठाने आपला प्रवास केला ती सिंधू नदी तिथेच आपल्याला दर्शनही देते.

लेह शहरा पासून अठरा किलोमीटर असलेल्या सिंधू घाटावर जाण्यासाठी लेह-मनाली मार्गावरून जावं लागतं. लडाखला जसं श्रीनगरमार्गे जाता येतं तसं मनाली मार्गेही जाता येतं. हमरस्त्याच्या एका बाजूला संपुर्ण वैराण जमिन आणि दूसर्‍या बाजूला हिरवळ असं अनोखं दृष्य या ठिकाणी पाहायला मिळतं. लेह शहर मागे पडतं तसं हमरस्त्याच्या दुतर्फा छोट्या छोट्या डोंगरांच्या राशी ओतून ठेवाव्यात तशा टेकड्या दिसायला लागतात. पृथ्वीतलावरची सर्वात अलिकडच्या काळातली जमिन म्हणजेच हा भाग. वार्‍याच्या एका झुळूकीबरोबर इकडून तिकडे जाणारी माती पाहून अशाश्वतेची जणू जाणीव होत रहाते.  

सिंधू नदिचा बहूतांश भाग फाळणीनंतर आता पाकिस्तानात असला तरी सुमारे तीनशे किलोमीटर एवढा नदीचा भाग हा आजही भारताच्या जम्मू-काश्मिर राज्यातून वाहत जावून पुढे तो पाकिस्तानात जातो. जिच्या केवळ नामोच्चाराने कोट्यावधी भारतीयांच्या मनात पवित्र भाव निर्माण होतात, ती वेदांची जननी म्हणजे सिंधू. सिंधूवरून हिंदू आणि म्हणून हिंदूस्थान, तसच इंडस वरून इंडीया अशी आपल्या देशाला नावं पडली.  तिबेटमध्ये मानसरोवरनजीक सिन-का-बाव इथे उगम पावून पुढे सिंधू नदी आपल्या भारतात लडाख प्रांतात प्रवेश करते. ऋग्वेदापासून महत्वाच स्थान असलेल्या या नदीच्या काठी कधी काळी आर्यानी वस्ती केली होती. खळाळणारं स्वछ, शीतल जल घेवून वहात जाणार्‍या या नदीला पुढे झंस्कार व्हॅली मधून वाहत येणारी झंस्कार नदी मिळते आणि नंतर पाकिस्तानात जाते. लडाखमध्ये जी शेती होते ती बहुतांश या नदीच्या पाण्यावर. इतर ठिकाणी गवताची पातीही दिसणार नाही पण या नदीच्याकाठी मात्र हिरवळ दिसते. दरवर्षी जून महीन्यात सिंधू घाटावर सिंधूमहोत्सव साजरा केला जातो. या घाटावरून लडाखच्या सर्वात उंच अशा स्तोक कांगरी शिखराच सुरेख दर्शन होतं. 

लडाखमध्ये बौद्ध गुंफा खुप आहेत आणि त्या पहाण्यासारख्याही आहेत. 1430 साली बांधून पुर्ण झालेली थिकसे गुंफा ही सर्वात उत्तम अशी गुंफा आहे. त्याची सुरवात अगदी प्रवेशद्वारापासून होते. अत्यंत आकर्षक अशी रंगसंगती आणि कलाकुसर असलेलं हे प्रवेशद्वार आहे. सर्वच मॉनेस्टींची उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. ही गुंफा म्हणजे अख्ख गावच आहे. शाळा, बॅंक, निवासस्थानं प्रार्थनामंदीर सगळं एकाच ठिकाणी आहे. चार महीन्यांचा उन्हाळा सोडल्यास अतीशीत असलेल्या या ठिकाणी सगळी व्यवस्था जागच्या जागीच व्हावी अशीच त्या गुंफाची रचना आहे. शंभरेक पायर्‍या चढताना वाटेत एक भलं मोठ प्रेयींग व्हील आहे. त्या नंतर  सुबक अशी मैत्र्येय बुद्धाची मुर्ती पाहून थक्क व्हायला होतं. पंधरा फुट उंच असलेली ही मुर्ती मात्र अलिकडेच म्हणजे 1980 साली उभारण्यात आली. ही संपूर्ण गुंफा नीट पाहायला दोन तासाचा वेळ हाती असावा लागतो. ही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही अवडंबर न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे. उत्तम मूर्तीकाम, नक्षीकाम, कमानी, रंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा सर्व पाहात राहावं असं आहे. लडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं.  

लेह जवळचा शे पॅलेस ही मुळात  मुळात गुंफाच होती.  १६५० मध्ये देलडॉन नामग्याल   या राजाने या ठिकाणी स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे 'सिंग्ये नामग्याल'  यांच्या स्मरणार्थ हा राजवाडा बांधला. या ठिकाणी १८३४ पर्यंत राज निवासस्थान होतं.

लेह शहराच्या जवळच असलेला लेह पॅलेस आणि शांती स्तूप ही मुद्दाम भेट देण्यासारखी ठिकाणं आहेत. निळ्या आभाळाच्या पार्श्वभुमीवर लडाखच्या या रुक्ष प्रदेशात तिथल्या रंगी-बेरंगी गुंफा, स्तूप आणि राजवाडे उठून दिसतात.  

16 April, 2013

भाग एक - कारगील



आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनी वरून परिसर या सदरात सकाळी ६.३० वा.   आजपासून तीन दिवस (दि. १६, १७ आणि १८ एप्रिल २०१३) लडाख प्रांतावर कार्यक्रम प्रसारीत होत आहे. आज सकाळी प्रसारीत झालेला हा पहिला भाग:    

हिमालयाचं रांगडं रुप पहायचं असेल तर लडाख प्रांतात गेलं पाहिजे. आपल्या देशातील जम्मू-काश्मिर राज्यातला हा भाग तिथल्या अनोख्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. उंचच उंच पर्वत, बर्फाच्छादीत शिखरं आणि खोल दर्‍या, भव्यतेचं दर्शन घेताना आपण एका वेगळ्या जगात आल्याचं आपल्या लक्षात येतं. निळंशार आकाश, गोठलेले प्रवाह आणि क्षितीजापर्यंत दिसणारा भुभाग डोळ्यात काय काय साठवावं याचं कोडं पडावं असा हा देखणा प्रांत.  
  
कारगील हे ठिकाण लडाख प्रांताचाच एक भाग आहे. भारत पाक नियंत्रण रेषेला लागून हा भाग असल्याने आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने या भागाला अनन्यसाधारण महत्व आहे. हिमालयात वसलेल्या या भागात झंस्कार, सुरू,  द्रास आणि वाखा या चार व्हॅली येतात. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरून जाताना कारगील जिल्ह्याचं मुख्यालय लागतं पण हा संपुर्ण जिल्हा मात्र अतिशय दुर्गम भाग म्हणूनच ओळखला जातो. सीमेलगत तसंच राष्ट्रीय महामार्गालगत थोडी वस्ती आणि लष्करी जवानांची ये जा असली तरी झंस्कारसारख्या ठिकाणी गेल्यास फार अभावानेच माणसांचं दर्शन घडतं. सोनमर्ग लगतची जोझिला ही खिंड ओलांडल्यावर हिरवाई कमी कमी होत जाते आणि सगळा प्रदेश वनस्पतीविहीन दिसायला लागतो असं असलं तरी निसर्गसौंदर्यात काही कमी आहे असं मुळीच वाटत नाही. उलट अनंत रंगछटा असलेला आसमंत पाहाताना मन हरखून जातं.

आपला देश विविधतेने नटलेला आहे आणि कारगीलला गेल्यावर त्याची प्रकर्षाने जाणीव होते. द्रास व्हॅलीमध्ये २००५ सालच्या हिवाळ्यात वजा साठ एवढ्या कमी तपमानाची नोंद झाली होती. मानवी वस्ती असलेलं जगातलं थंड ठिकाण म्हणून द्रासचा उल्लेख केला जातो. तिथल्या उन्हाळ्यातल्या रात्रीही गारठवणार्‍या असतात, झंस्कार व्हॅलीमध्ये थंडीचं हे प्रमाण आणखी जास्त असतं. म्हणूनच जम्मू-काश्मिर राज्यातला कारगील हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याच कारगील भागात पाकिस्तान बरोबरचं युद्ध झालं होतं. द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आपल्या जवानांच्या शौर्याच्या गाथा ऎकायला आणि पहायला मिळतात.     

पेनसीला खिंडीच्या बर्फाच्छादीत शिखरांत उगम पावलेली सुरू नदी कारगील मधून वाहत जावून पुढे सिंधू नदीला मिळते. लडाख प्रांतातलं लेह नंतर दुसरा  नंबर असलेलं कारगील हे शहर सुरू नदीच्या किनारी वसलं आहे. १८५ किलोमीटर एवढी लांबी असलेली ही नदी पुर्णपणे कारगील जिल्ह्यातूनच वाहाते. पुरातन काळातला  सिल्क रोड याच नदीच्या काठाने जाऊन स्कार्डू या ठिकाणी मिळत असे, आता भारत-पाक नियंत्रण रेषेमुळे हा मार्ग बंद झाला आहे. या नदीच्या वेग असलेल्या खळाळत्या प्रवाहामुळे उन्हाळ्याच्या दिवसात राफ्टींगचा खेळ इथे चालतो. सुरू व्हॅलीमधूनच राफ्टींगला सुरूवात होते. नुन-कुन शिखरावर ट्रेकींग माउंटेनीअरींगला जाणारे साहसी ट्रेकर सुरू व्हॅली मधून आपल्या मोहीमेला सुरूवात करतात.

विरळ आणि कोरड्या हवामानामुळे कारगील जिल्ह्यात शेतीचं प्रमाणही खुप कमी आहे, असं असलं तरी सुरू नदीच्या खोर्‍यात उन्हाळ्यात तिथे शेती केली जाते आणि गहू, मोहरी, बार्ली अशा धान्यांचं आणि टुर्नीप या कंदमुळाचं उत्पन्न घेतलं जातं.   

लडाखचा प्रांत जुन ते संप्टेंबर या काळातच रस्ते मार्गाने देशाच्या इतर भागला जोडलेला असतो. जोझीला पासमध्ये असलेल्या बर्फाच्या राशी दूर करून दरवर्षी कारगीलला जाणारा मार्ग सीमा सडक संघटनेकडून मोकळा केला जातो. हिवाळ्याच्या काळात हा प्रदेश हवाई मार्गानेच देशाच्या इतर भागाशी जोडलेला असतो.   

कारगील जिल्ह्यात फोटूला पास पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेली लामायुरू ही बौद्ध गुंफा पर्यटकांचं एक मुख्य आकर्षण असून त्याच भागात असलेला मुनलॅन्ड हा भाग तिथल्या मातीच्या विशिष्ट रंगामुळे स्मरणात राहातो. चंद्रावर सापडलेल्या मातीच्या नमुन्याशी साधर्म्य असल्याने या ठिकाणाला मुनलॅन्ड असं नाव पडलं आहे. रम्य निसर्ग आणि संकृतीने नटलेल्या या प्रदेशात पर्यटनाला खुपच वाव आहे.    

15 April, 2013

तू असा प्रकटशी


तव मायेने वेड लावले
दूर जाहल्या चिंता
लांब उभा मी, जवळ घेशी मज
आशीश देशील पुरता

प्रचंड ते बळ तुज बाहूंचे
आश्वस्थ करी मज आता
तुझ्या कृपेने न्हाऊनी गेलो
सोप्या झाल्या वाटा

सरस्वतीची सेवा घडते
तुज रुपाची सरीता
तेच असावे भजन पुजन
शब्द असे की गाथा

तू असा प्रकटशी
स्वरूप सुंदर सगळा
तुझ्या करी रुद्राक्ष शोभते
करी माझ्या अक्षरमाळा


नरेन्द्र प्रभू

07 April, 2013

सुखांत




हितगुज गोष्टी सांगू कशा मी, तू असशी दूर देशी
कितीक जाहला आठवणींचा गुंता हा मज पाशी

ती नजर सुखाची अन ममतेची, गालावरची लाली
साद घालते तूझीच ती सय आम्रतरूच्या खाली

शितल वारा, धुंद गारवा, नको नकोसा होई
एक कटाक्ष तव मायेचा विसाऊन मज जाई

तो पदरव कसला? मंजुळसा स्वर पैजणात ग गाई
आभासाचा भास जाहला तरीही सुखांत होई


नरेन्द्र प्रभू
     

05 April, 2013

शेजार




शेजार कसा हसरा असावा
वेळ पडेल तेव्हा आसरा असावा
गम्मत जम्मत अन गोडवा असावा
आपल्याच अंगणाचा कोपरा असावा

शेजार मायेचा अन उबदार असावा
दुखण्या-खुपण्याला आधार असावा
निखळ आनंदावर स्वार असावा
मौज, मज्जा अन मस्ती असावा

शेजार फुलांचा ताटवा असावा
पारिजातकाचा सडा असावा
केवड्याचा तिथे दरवळ असावा
सुकला तरी बकुळीचा सुवास असावा

नरेन्द्र प्रभू

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates