05 February, 2014

कैलास-मानसरोवर - भाग दोन


नेपाळ मध्ये दाखल झाल्यावर तिथल्या पशुपतीनाथासह अनेक उत्तम आणि प्राचिन मंदीरांचा परिसर फिरून पाहताना यात्रेला जाण्यासाठी योग्य वातावरणाची निर्मिती होते आणि पावलं आपसूकच मानसरोवरला प्रस्थान करण्यासाठी उतावीळ होतात. काठमांडू शहर सोडल्यावर लगेचच हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटत आपला प्रवास सुरू होतो. मनोहारी धबधबे आणि नदीचा खळखळता प्रवाह याचा रम्य देखावा पाहात हा प्रवास काही ठिकाणी रस्ता खराब असला तरी सुखद होतो. काठमांडू शहरापासून जस जसे आपण दूर येवू लागतो तसतशी थंडी आपली जाणीव करून देवू लागते. काठमांडूपासून रस्ते मार्गाने कोदारी या नेपाळ-तिबेटच्या सीमेलगतच्या गावात गेल्यावर पारपत्र आणि प्रवेश विषयक बाबींची पुर्तता केल्यावर आपण तिबेटमध्ये येवून दाखल होतो. तिबेटमधले रस्ते हिमालयातले असूनही उत्तम असल्याने पुढचा प्रवास चांगला होतो आणि गाडी बाहेरच्या देखाव्यांचा आनंद मनोसोक्त लुटता येतो. घनदाट पर्वतराजींमधून नागमोडी वळणं घेत जाणारे रस्ते, खळाळते प्रवाह, आल्हाददायक हवा, बौद्ध धर्मियांनी ठिकठिकाणी बांघलेल्या प्रार्थनेच्या पताका या सर्वांचं धावतं दर्श घेत गाडी तिबेटच्या निर्जन प्रदेशातून जात असते आणि क्षितिजापर्यंत पसरलेला पठारी प्रदेश सुरू होतो. आता झाडा-झुडुपांची दाटी कमी होते आणि थोडासा वैराण प्रदेश सुरू होतो. हवेतला गारवा वाढतच जातो आणि त्याच बरोबर समुद्र सपाटीपासून वाढत जाणारी उंची आपण एका वेगळ्याच प्रदेशात आल्याची आपणाला जाणीव करून देते. सुर्य कलतीला जात असतानाच आपलं मुक्कामाचं गाव येतं, मंडळी गाड्यांमधून पाय उतार होतात, वाफाळता चहा आणि शेरपा लोकांच आतिथ्य याची मजा घेताना प्रसन्न मोकळ्या हवेत दिवसभराच्या प्रवासाचा शीण नगण्यच वाटतो.

मानसरोवरला १५,६०० फुटांच्या उंचीवर जाण्याआधी वाटेतल्या एखाद्या गावात एखादी टेकडी चढण्याचा सराव केल्यास आपल्याला आपली क्षमता कळते शिवाय अशा उंचीवर वावरण्याची सवयही होवून जाते. मानसरोवरच्या पुढे कैलासची परिक्रमा करण्यासाठी अशा सरावाचा नक्कीच फायदा होतो आणि या भागात कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी त्याची उजळणी होते.

तिबेटमधल्या डोंगराळ आणि मागास भागातून आपला प्रवास सूरू असला तरी निसर्ग आणि बदलत जाणारा प्रदेश पाहात असताना मानसरोवरला पोहोचण्याची ओढ आणखीच वाढत जाते. निसर्गाच्या अफाट आणि बदलत्या रुपाने आपली जिज्ञासा वाढीस लागते. आपलं धावणारं वाहन, वाटेत लागणार एखादं छोटसं गाव आणि मेंढ्या हाकणारे मेंढपाळ एवढाच काय तो चर सृष्टीचा संपर्क, बाकी सगळा कॅनव्हास चित्रवत वाटावा असाच. मुक्कामाचं ठिकाणही नेहमी पेक्षा वेगळं, चार भिंती आणि झोपण्या-जेवण्याची सोय. आधुनिक युगापासून चार पावलं दूर असण्यातली मजा इथेच अनुभवावी. सर्व अध्ययावत सोयी-सुविधांपासून वंचित असणारी ही ठिकाणं आपलं लक्ष कैलासकडे केंद्रित करण्यासाठी आवश्यकच असतात. सभोवताली विशाल पसरलेला निसर्ग अनुभवत असताना आपसूकच मन विरक्त होत जातं.


मैलोनमैल पसरलेला प्रदेश न्याहाळत असतानाच अचानक मानसरोवराची पहिली झलक नजरेस पडते आणि आजवर केलेल्या तपश्चर्येचं फळ मिळाल्याचा आगळाच आनंद नसानसातून प्रवाहीत व्हायला लागतो. मग तो क्षण जवळ येतो, मानसरोवरच्या काठी आपण उभे असतो, समोर दूरवर पसरलेलं निळ्याशार जलाने भरून वाहणारं मानसरोवर. सुर्यप्रकाशात चमचम करणारं पाणी, त्याचे बदलते रंग, अंगावर रोमांचं उभा करणारा गार-गार स्पर्श, पवित्र तीर्थाची याचीदेही याची डोळा झालेली पहिली वहिली भेट. आकाशातले अनंत रंग, पिंजारलेल्या ढगांच्या क्षणाक्षणाला बदलत जाणार्या आकृती आणि त्या सर्वांसमोर उभं असणारं साक्षात कैलास शिखर. हे जसं बाहेर तसाच मनात उचंबळून आलेला भावभावनांचा कल्लोळ. अतिव प्रेमाने सहलसाथींची घेतलेली गळाभेट. एका दर्शनाने सारं कसं क्षणात बदलून जातं. सारा शीण, सारा भार सत्वर नाहीसा होतो, मन भारावून जातं. आपण भानावर येतो तेव्हा आता एकच ध्यास लागलेला असतो तो कैलासाच्या परिक्रमेचा. मानसरोवरच्या दर्शनाने पावन झालेलं मन-शरीर आता त्या एकाच विचाराने प्रेरीत झालेलं असतं. परिक्रमा.....! परिक्रमा.....! 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates