07 February, 2014

कैलास-मानसरोवर - भाग तीन


कोदारी, न्यालम, सागा, होरचू, चूई गुंफा आणि दारचेन असा काठमांडू पासून सुरू झालेला मोटार प्रवास आता संपून पायी किंवा घोड्यावरून परिक्रमा करण्याचा दिवस येवून ठेपतो आणि मनात एक आगळीच हुरहुर साठून राहाते. तासा-तासाला, काही वेळा मिनिटागणीक बदलत जाणारं वातावरण. बोचरे अतीशीत वारे, काळंकुट्ट आभाळ आणि  त्या वातावरणाला साजेशी बर्फ वृष्टी या सगळ्याच्या पार्श्वभुमीवर परिक्रमेत आपला तग लागणार का? हा प्रश्न आणि परिक्रमा करायची लागलेली अनिवार ओढ. इथे कस लागतो आपल्या मानसिक तयारीचा आणि आपल्या बरोबर असलेल्या सहलसाथीच्या नेतृत्व गुणांचा. मनाची पुर्ण तयारी करत आपण परिक्रमेसाठी सिद्ध होतो. आणि यमद्वाराकडून पावलं पुढे पडतात ती कैलासाच्या प्रदक्षिणेसाठीच.

यमद्वार मागे टाकून आपण जणू परलोकातच प्रवेश करीत असतो. दमछाक करणारा चढा रस्ता, कोरडं आणि शुष्क वातावरण, उन्हाचा चटका, थंडीचा शहारा, पायांना ओढ पण हे सगळं मागे टाकून मन मात्र पुढेच धावत असतं. त्या विराट रुपाच्या दर्शनासाठी. खरं तर एव्हाना आपणही त्याचाच एक भाग बनलेले असतो. तो निळकंठ, कैलासपती आपल्याला आत सामावून घेत असतो. जय... भोले....! चा नाद निनादत असताना पुन्हा एकदा बळ एकवटून आपण चालत राहातो. वाटेत उमेद वाढवणारं कैलासाचं दर्शन होत राहातं. कधी ते शिखर पर्वतापल्याड गुडूप होतं. असं करत करत पहिल्या दिवसाच्या चालीनंतरचा रात्रीच्या मुक्कामाचा पडाव येतो....दिरापूक. कैलास शिखराचं दर्शन इथे अगदी जवळून होतं. आता त्याच्या आणि आपणामध्ये कुणीच नसतं. त्या अनादी अनंताच्या दर्शनाने मन तृप्त होतं. दिवसभराचा १२ किलोमीटरचा प्रवासाचा शीण पळून जातो आणि दुसर्या दिवशीच्या २२ किलोमीटरच्या प्रवासासाठी मन सज्ज होतं.
दोन रात्री तीन दिवसात पुर्ण होणारी परिक्रमा या मधला महत्वाचा भाग म्हणजे दुसर्या दिवशी असलेला प्रवास. या प्रवासात १८,६०० फुट उंचीवरचा डोलमा पास पार करून जाणं हे फार महत्वाचं आणि त्याचीच चर्चा जास्त होत असते. पाठीवरचं ओझं (हे खुप नसलं तरी तिथे थोडसं वजनही नको होतं), पाण्याची उपयुक्तता, ताकद वाढवणारा सुकामेवा या सर्वांचं महत्व पहिल्याच दिवशी कळतं तसं हातातली आधाराची काठी ही तर जीवन साथीच वाटायला लागते.

दिरापूकचा मुक्काम हलवल्यावर लगेचच डोलमा पासची उंची खुणावू लागते. मजल दरमजल करीत प्रत्येक जण आपल्या ताकदी प्रमाणे अंतर कापत जातो. चहू बाजूला पसरलेला बर्फ आणि आकाशाला गवसणी घालायला निघालेले यात्रेकरू. एका वळणावर ही रांग दिशेनाशी होत होती. प्रत्येकाला तिच जागा खुणावत होती. तोच तो डोलमा पास होता. विजयी वीराप्रमाणे एक एक करत तिथे पोहोचत होते. आपल्या श्रद्धेप्रमाणे पुजा करीत होते. हाच तो यात्रेतला परमोच्च बिंदू. थोडा वेळ थांबून यात्री उताराला लागतात तोच समोर खाली गौरी कुंडाच दर्शन घडतं. इथेच गणेशाच जन्मस्थान असल्याच मानलं जातं. पुराणात वाचलेली ठिकाणं प्रत्यक्ष पाहताना मन उल्हसित होतं. आता त्या खिंडीतून उताराला लागलेले यात्रेकरू महत्वाचा टप्पा पार केल्याच्या आनंदात आणि बाजी मारल्याच्या ऎटीत मार्गक्रमण करीत जातात. पुन्हा कैलासाच दर्शन होतं. हात आपसूकच जोडले जातात. संध्याकाळपर्यंत लांबलेला प्रवास झुथूलपूक या गावात संपतो. आजचा पडाव इथेच. यात्रेतला महत्वाचा भाग पार पडल्याने सर्वांचीच कृतकृत्य झाल्याची भावना असते.

तिसर्या दिवशीचा आठ किलोमीटरचा प्रवास हा परिक्रमा पुर्ण होणार या आनंदातच सोपा वाटू लागतो. प्रवासादरम्यानची बर्फवृष्टी, पाऊस यांची तमा बाळगता आणि आधीच केलेल्या पुर्ण तयारीमुळे हा प्रवासही सुखरूप पार पडतो. पुन्हा लांबून मानसरोवराचं दर्शन होतं. परिक्रमेच्या आधी तिथे केलेलं होम हवन आठवतं. मंडळी परतीच्या प्रवासाला लागतात. काही लोकांना वाटतं की माणसं असा खडतर प्रवास का करतात? त्याच उत्तर म्हणून एक प्रश्नच विचारावा लागेल की गिर्यारोहक एव्हरेस्ट का चढतात? किंवा विक्रमवीर नायगारा का ओलांडतात? मित्रहो यालाच जगणं म्हणावं नाही का? अशा ठिकाणी गेल्यावर जगण्यातली मजा आणखी वाढते आणि उर्वरीत आयुष्याला ही काही अर्थ प्राप्त होतो. आज आपल्या घरी दारी ज्या सोयी सुविधा हात जोडून उभ्या असतात त्याचं एरवी आपल्याला काहीच कौतूक वाटत नसतं पण अशा ठिकाणी प्रवास करून आल्यावर आपणाला आपण किती आरामदायी जीवन जगत असतो याचा साक्षात्कार होतो.  या अशाच प्रवासांमधून आपण जगण्याची कला शिकत असतो. त्या विराट दर्शनाने आपलं मनही विशाल होतं. जगण्याचा दृष्टीकोन बदलून जातो
    





No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates