27 September, 2014

मुंबईचा पाऊस


महाराष्ट्र मंडळ न्युयॉर्कच्या स्नेहदिप अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख:

मुंबईत सदासर्वकाळ घामाचा पाऊस पडत असतो. ट्रेन, बस, फुटपाथ कुठेही जा घाम हा ठरलेला. त्याला कुणी इथलं दमट हवामान कारणीभूत आहे असं म्हणत असलं तरी मला ते तेवढं पटत नाही. कारण इथला माणूस सतत धावत असतो, श्रम करीत असतो. फुकट चकाट्या पिटत  बसलेला माणूस इथे दिसणार नाही. ट्रेनच्या गर्दीत या घामाच्या पावसाचा जोर वाढतो आणि अनेक वेळा दोन  माणसांच्या घामाचा संगमही होतो. खरा पाऊस बरसला की मात्र या घामकर्‍यांची धांदल उडते. पाऊस आला तरी दोन-चारदा भिजल्याशिवाय खरा मुंबईकर छत्री हातात घेत नाही. इमारतींचा आसरा घेत, टॅक्सी......, ऑटो........ असं ओरडत तो घर किंवा ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करतो. तो नेहमीच यशस्वी होतो असं नाही. पाऊस आला रे आला की सगळॆ रिक्षा टॅक्सीवाले तुम्हाला हवं ते ठिकाण सोडून विरुद्ध दिशेलाच जायला उत्सुक असतात. वाहन पकडण्याच्या नादात मात्र आपण ते पकडायच्या आधीच चिंब होतो. कधी पावसाने तर कधी रस्त्यातल्या खड्ड्यातल्या पाण्याचा सपकारा एखादं वाहन असं उडवतं की आपण नखशिखांत भिजून जातो. छत्री असल्याने भिजणारे किंवा भिजलेला रेनकोट घालून ट्रेनच्या गर्दीत घुसणारे कावळॆ दुसर्‍या स्टेशनला उतरताना अंग पुसून साफरूफ होवून बाहेर पडतात.   

कालच्या भिजण्याच्या अनुभवाने शहाणा झालेला मुंबईकर आता छत्री घेऊन बाहेर पडतो आणि पहिल्याच पावसाने बावरून गेलेली लोकल त्याला ‘आजका दिन मेरा है” अशा थाटात जेरीस आणते. नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने ही ‘लोकल’ मुंबईच्या ‘लो’ लाईन एरीयामे पानी भरने के कारण अभी ‘कल’ ही चलेगी असं वाटायला लागतं. ती लोकल मग जलराणीच होऊन जाते. वरून पडणारा पाऊस दारं-खिडक्यांची तमा नबाळगता आतल्या गर्दीला सर्दी होईल याची काळजी घेत असतो, काही भाग्यवान लोक जर त्यापासून बचावलेच तर मग छपरातून होणारा अभिषेक ती कमी भरून काढतो. वर हे जलधारांचं नाट्य तर खाली रुळांवर साचलेलं पाणी नौकानयनाचा आनंद देतं असतं. एका छोट्याश्या प्रवासात आणि अल्प दराच्या तिकीटात असे अनेक अद्भूत अनुभव देणारी वाहतूक जगाच्या पाठीवर दुसरी नसावी. आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेली मेट्रोही यात मागे नाही. रस्त्यावरील गर्दीला  टाटा करीत उन्नत मार्गावरून ऎटीत जाणारी मेट्रो सध्या कौतूकाचा विषय बनली आहे.  वातानुकुलीत असल्याने या मेट्रोत घाम येत नाही. उंचावरून प्रवास चालू असल्याने आता ट्राकमध्ये पाणी भरलं म्हणून वाहतूक अडणार नाही. मेट्रोने प्रवास करणार्‍यांचे तरी आता ‘अच्छे दिन’ आले असं वाटायला लागलं. पण स्वयंचलीत दरवाजे बंद झाल्यावर पावसाचं पाणी आत येण्याची शक्यता नसल्याने बाहेर पडणार्‍या पावसाची मजा घेत प्रवास करणार्‍या मुंबईकरावर त्या दिवशी छपर फाडके पावसाची बरसात प्रत्यक्ष मेट्रोत झालीच. मुबईचा पाऊस लोकांशी जवळीक साधायला असा कुठूनही प्रगट होत असतो.

मुंबईत पावसाळ्याआधी करण्याची कामं मात्र मुबईकर पहिल्या पावसाच्या सरी पडल्यानंतरच करताना दिसतो. या गोष्टीला महापालिका आणि रेल्वे प्रशानही अपवाद नाही. पहिल्याच पावसाने दणका दिल्यावर सगळेच जागे होतात आणि मग कामाला लागतात. महापालिकेचं अर्ध काम पाऊसच करतो. गटारात साचलेला कचरा वाहून जातो आणि ते साफ केल्याचं श्रेय मात्र अधिकारी घेत असतात. मुंबईचा डबेवाला सोडून मुंबईत कुणी टोपी घालताना दिसत नाही पण हल्ली बर्‍याच इमारतीना पावसाळ्यात टोप्या घातलेल्या दिसतात. (नशीब इकडे तो केजरीवाल नाही, अन्यथा त्याने या टोप्यांवर ही ‘हुँ आम इमारत’ असं लिहून टाकलं असतं.)

या मुंबईत तिनशे पासष्ठ दिवस काहीना काही उत्सव सुरू असतात. धार्मिक नसले तर मग ‘मुंबई फेस्टीव्हल’, ‘फिल्म फेस्टीव्हल’ असे अनेक उत्सव इथे घडत असतात. पावसाळ्यात शाळा कॉलेज सुरू झाल्यावर वर्षा सहलींचा एक उत्सव सोहळाच सुरू होतो. दर आठवडा अखेर जवळच्या नदी, तलाव, धबधबे, समुद्र किनारा जिथे म्हणून पाणी आहे तिथे हौशी आणि दर्दींची झुंबड उडते. माणसं आणि पाणी दोन्ही उसळत असतात. समुद्राला उधाण येत आणि गर्दीलाही. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाणारा मुंबईकर तेवढाच निसर्ग आपल्या कवेत घेवून सुखावतो. मामाचं गाव, गावाकडचं घर या संकल्पना आता पातळ होत चालल्यात पण दर आठवडा नाही जमलं तर निदान पंधरवड्याला तरी ट्रेकिंग करणारे अनेक मुंबईकर आपल्याला दिसून येतील.

मुबईकरांना असलेलं हे पावसाचं कौतूक पाहून कधी कधी पाऊसही हुरळून जातो आणि तो त्याची भेट घेण्यासाठी थेट त्याच्या घरात प्रवेश करतो. २६/७ ही तारीख मुंबाईकर विसरू शकत नाही २६/११ ला दहशत वाद्यांनी जशी दहशत माजवली तशीच दहशत त्या पावसाने २००५ साली माजवली होती. इमारतीच्या आवारात पाणी आलं म्हणून नातवाला घेवून कागदी होड्या पाण्यात सोडणार्‍य़ा आजोबांना काही वेळाने खर्‍या होड्यामधून सुरक्षीत स्थळी सोडावं लागलं. दहशतवाद्यांनी मारली तशीच माणसं पावसाने डोळ्यादेखत ओढून नेली. अवघी मुंबई जलमय झाली.

यंदा मात्र जुलै उजाडला तरी पाऊस बरसलाच नाही आणि मुंबाईकराच्या तोंडचं पाणी पळालं. शब्दश: पाणी पळालं. नळाला पाणी नाही तर काय करायचं? कुठं जायचं? मायानगरी म्हणून सगळे इकडे धाव घेतात आता या संकट समयी मुंबईकराने कुठं जायचं? कित्येक वर्ष चावून चोथा झालेले उपाय पुन्हा वर्तमान पत्रांचे रकाने भरून वाहू लागले. हे उपाय वेळीच केले असते तर पाणी राखता आलं असतं. आता काय करायचं? पावलोपावली अडथळ्याची शर्यत असल्याने सतत खाली बघून चालणारा मुंबईकर कधी नव्हे तो आभाळाकडे टक लावून पाहू लागला.  दोन दिवस पाऊस पडला आणि पाण्याची समस्या कमी झाली असं इथे होत नाही. चांगला महीनाभर पाऊस पडल्यानंतर इथल्या नळाला पाणी येतं. महापालिकेने पाणी कपात केली आणि बालदीत घ्यायचं पाणी मुबईकराला कपात घ्यायची पाळी आली. आता काय करायचं? बेडकाच लग्न लावायचं?  बेडकाच लग्न लावलं म्हणजे म्हणे पाऊस पडतो. कशाने का होईना पाऊस पडूदे म्हणून बेडकाची शोधाशेध सुरू झाली. आधीच पाऊस नाही, तो नाही म्हणून चिखल नाही, चिखल नाही म्हणून बेडूक नाही अशी साखळी समस्या उभी ठाकली. मुंबईत बेडूक नसतातच, अशा परिस्थितीत ते आणखी दुरापास्त. काय करावं? हल्ली मुंबईत कसलीही कमतरता भासली की चिनी ती भरून काढतात. मागे कांद्याची आवक घटली तेव्हा चिनी कांदे बाजारात आले होते. बघून कळतच नव्हतं ते खरे की खोटे. तर या वेळीही चिनी बेडूक वाजारात दिसले तेच बेडूक घेवून त्यांची लग्न लावली गेली. थेडा पाऊस पडला लगेच चिनी छत्र्या बाजारात आल्या. हल्ली सगळच चिनी असतं इकडे. फक्त बसक्या चिनी नाकाचाच कायतो तुटवडा आहे.


कुणाच्याका बेडकाने पडेना पण पडलेल्या पावसाचं मुंबईकराला भारी कौतूक. एकदा पाऊस पडला की तलावात किती पाणी भरलं याची आकडेवारी वर्तमानपत्रात यायला लागते. वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मोडकसागर एकदा का भरली की मुबईकरांचा जीव भांड्यात पडतो, तो भांड्यात जमवलेलं पाणी ओतून टाकतो आणि नळाचं पाणी वहायला लागतं, पुन्हा थेंब... थेब... गळे पर्यंत. 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates