30 October, 2014

युग कुठलं ही असेना का!











दुष्ट प्रवृत्तीचा नाश करावा म्हटलं तरी
नरकासूरांचाच माज आहे
कितीदा भेद केला तरी
जरासंधाचाच बाज आहे   


तू म्हणाला होतास संभवामी युगे युगे, म्हणजे
तुझ्या येण्याची वाट पाहावी लागणार
आणि देवा तोपर्यंत तरी
आई-बापाला तुरूंगात सडावं लागणार

तुझी बहीण असली तरी
द्रोपदीची विटंबना होतच रहाणार, आणि
दुर्योधनाची मांडी फुटेस्तोवर
वाट ही पहावीच लागणार

म्हणजे मग भिम असण्याला
काय अर्थ आहे?
अर्जुनाचं गांडीवही
तिथं कुठं श्रेष्ठ आहे?

पण कर्ण आणि युधीष्ठीर होण्यापेक्षा   
भिम अर्जुनच योग्य आहेत
ते व्दापार युगातले, आणि
हे कलियुगातले असा भेद आहे

युग कुठलं ही असेना का!
तुझा पाठिंबा त्यास आहे
जो अन्यायाविरुद्ध उठतो
तुझा तिथेच वास आहे

29 October, 2014

नाही करणार पुन्हा माज



काय भाई सांगू? कसं हो सांगू?
मलाच माझी वाटे लाज
काही तरी होऊन गेलंय आज!

उगीच बोलूनी गोलो खान
गीडिवचला तव अभिमान
त्या रागाचा, त्या माजाचा
अंगावर मी ल्यालो साज
काही तरी होऊन गेलंय आज!

जरी लाजरा,  झालो धीट
घुरत राहिलो त्याला नीट
सेनेचा हा पोर कसा मी
विसरुन गेले रीतरिवाज?
काही तरी होऊन गेलंय आज!

सहज बोलले सले मी
मलाच हरवुन बसलो मी
एक अनावर हासडली जादा
नाही चालला काही इलाज
काही तरी होऊन गेलंय आज!

अमीत यताची शाही थोर
लहान आहे माझा पोर
सत्तेसाठी धरतो हाता  
नाही करणार पुन्हा मा
काही तरी होऊन गेलंय आज!



         

18 October, 2014

दक्षता दिवाळी अंकात हा लेख वाचा


जगभरातल्या पर्यटकांना ज्या हिमालयाने आकर्षीत केलं तो हिमालयच भारतभूने आपल्या शिरोभागी धारण केला आहे. या हिमालयाचं कितीही वर्णन केलं तरी काहीतरी सांगायचं उरतच. हिरव्यागार सूचीपर्णी वृक्षांनी, अनंत फळा-फुलांनी, अनेकविध पशू-पक्षांनी, खळाळते  नद्या-नाले, हिमाच्छादीत शिखरं आणि दर्‍याडोंगराने सुशोभित केलेली ही देवभूमी कितीही धुंडाळली तरी मन भरत नाही. एकदा का त्या हिमालयात गेलं की तो पुन्हा पुन्हा बोलावतच राहातो. त्या हिमालयाचंच एक साजरं रुप म्हणजे ‘लडाख’. 
        

17 October, 2014

चिनी फटाके नकोच नको


दिवाळी तोंडावर आली असताना फटाक्याच्या बाजारात गर्दी उसळेल. सगळीकडे प्रकाशाची उजळण आणि उधळण करताना करोडो रुपयांचे फटाकेही फोडले जातील. पण हे फटाके आता चीनी बनावटीचेच असतात आणि स्वस्त म्हणून त्याला मागणीही असते. पण आता आपल्याला भारतीय म्हणून विचार करायची वेळ येवून ठेपलेली आहे. चीन हा आता भारताचा सगळ्याच क्षेत्रातला प्रतीस्पर्धी आहे आणि सीमावर्ती भागात चीनच्या हालचाली या सतत त्रासदायक होवून बसल्या आहेत. लडाखसारखा प्रांत असो की अरूणाचल प्रदेश मधले रस्ते बांधकाम, चीन सदोदीत भारताची अडवणूक करीत आला आहे.

अरूणाचल प्रदेशच्या सिमेवरच्या भागात चीनच्या बाजूने प्रशस्त सहा पदरी रस्ते, विमानतळ असं बांधकाम झालं असताना भारताने मात्र आपल्या सीमेत रस्त्यांचं बांधकाम करूच नये असंच चीनला वाटत आलं आहे. ही दादागिरी भारत सरकार आपल्या पातळीवर मोडून काढेलच पण एक भारतीय नागरीक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. आजच्या जगात व्यापार हे सुद्धा एक अस्त्र आहे. आणि ते सगळ्यानाच पुरून उरतं. आज भारताच्या सगळ्या बाजारपेठा चीनी मालाने तुडुंब भरल्या आहेत. कपडे, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक उपकरणं इतकचं काय गणपतीच्या मुर्ती, आकाश कंदील, विजेचे दिवे, फळ फळावळ हे सगळंच चीनी होत चाललय. दिवाळीचा चीनी फराळ आला तर नवल वाटायला नको.  

सीमेवरच्या शत्रूला परत जा म्हणून सांगताना आता सैनिकांबरोबरच नागरीकही आपली भुमिका बजावू शकतात. चीनी मालाला नकार देवून आपण ती बजावली पाहीजे. फटाक्यांसारख्या आवाज आणि हवेचं प्रदुषण करणार्‍य़ा वस्तू तर कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.  चिनी फटाके तर नकोच नको.      



16 October, 2014

माजोरडे


काल मतदान झालं आणि आता महाराष्ट्रात सत्तेवर कोण येणार यासाठी १९ तारखेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. भाजपला पुर्ण बहूमत की...?  असा प्रश्न असताना प्रचारादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वाने जे वक्तव्य केलं ते ‘माजोरडे’ या एकाच शब्दात जोखता येईल.

उत्तर प्रदेश, बिहारच्या पोटनिवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यापासूनच सामनामधून भाजपला कमी लेखण्याचे, टोमणे मारण्याचे, घालून पाडून बोलण्याचे उद्द्योग सुरू झाले आणि शेवटी मोदींचा ‘बाप’ काढण्यापर्यंत मजल गेली. या सगळ्या प्रचारात मातोश्री म्हणजे रायगड, उद्धव ठाकरे म्हणजे शिवाजी महाराज, निवडणूका म्हणजे अफजलखानाची भेट असं चित्र उभं करण्यात आलं. शिवसैनिक म्हणजे बाघनखं, कोथळा काढू, अफजलखानाची फौज, दिल्लीवरून स्वारी, हत्तीची सोंड कापून काढू (अमित शहांना उद्देशून), दिल्ली की बिल्ली, शिवसेनेशी फारकत म्हणजे हिंदुत्वाची काडीमोड, अशी खालच्या पातळीवरची आणि असंबद्ध टिका करण्यात आली. आदिलशहा, कुतूबशहाला लोळवला तसा अमितशहाला लोळवू आणि भांडी घासायला लावू अशी भाषा केली गेली. मोदींना ‘चायवाला’ म्हणून हिणवलं गेलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला निघालेत म्हणून खोटा प्रचार केला. मुख्य म्हणजे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला विरोध न करता भाजप एक नंबरचा शत्रू म्हणून आरोळी ठोकली. एका अर्थी त्यांचाच प्रचार केला.      

भाजपने विश्वासघात केला, खंजीर खुपसला अशी टिका शेवटपर्यंत करीत असताना आपण निवडून आल्यावर काय करणार हे सांगायला ते विसरले, मराठी गुजराती वाद निर्माण करून समाजात नसलेली तेढ निर्माण केली, मुंबईतले उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहेत अशी ओरड करून आपण महापालिकेत सत्ता असतानाही साधे खड्डेमुक्त रस्ते देवू शकत नाही याचा त्यांना विसर पडला. भारतातल्या पाच राज्यांपेक्षा जास्त अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेची सत्ता वीस वर्षाहून जास्तकाळ उपभोगूनही नागरी सुविधांची बोंब असताना राज्य पुन्हा आमच्या ताब्यात द्या असं हे लोक कसं म्हणू शकतात? मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणत असताना आपलं उत्पन्न आणि उद्योग याची वाच्यता न करण्याची काळजी घेतली. महाराष्ट्रात विरोध आणि तिकडे दिल्लीत मंत्रीपद शाबूत ठेवण्याची कसरत करताना दुटप्पीपणा केला. कोणतही कर्तृत्व नसताना आपला बाळबुद्धीचा मुलगा नेता म्हणून लादताना घराणेशाहीचा दुसर्‍यावर केलेल्या आरोपाचा विसर पडला. पंतप्रधान दिल्ली सोडून प्रचाराला का येतात असं विचारत असातानाच दहा वर्षापुर्वीची बाळासाहेबांची चित्रफित दाखवून मतांचा जोगवा मागितला.    


एकूण काय शिवकाळानंतर बराच काळ निघून गेला आहे, चौथीच्या पुस्तकानंतर इतिहास आहे हेच यांना माहीत नाही. मतदार मुर्ख नाही हे निकालात कळेलच. वानर्‍याच्या सभेत गुडघ्यावर आलेच आहेत पुढे किती दांभिकपणा करतात ते दिसेलच.    
  

13 October, 2014

प्रकाश बाबा आमटे - एक सर्वांग सुंदर चित्रपट



डिप्रेशन आलेल्या माणसाला औषधाशिवाय बरं करणारा हा चित्रपट आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. फक्त प्रचंड इच्छाशक्ती घेवून आनंदवनातून सात दिवसाचा खडतर प्रवास करून एका अरण्यात प्रकाश आणि मंदाकिनी हे डॉक्टर दाम्पत्य पोहिचतं
आणि निवार्‍यापासून सगळ्या गोष्टी स्वत:च्या हाताने उभरतं. पहिल्या दिवसापासून केवळ संघर्ष करीत आदिवासींना अपलसं करतं. त्या जंगलात जे जे म्हणून आजारी पडतात त्यांना आपल्या दिव्यस्पर्शाने उपचार करीत रहातं. मग त्यात माणसं. जनावरं. माकडं, साप, वाघ, अस्वलं हे सगळं आलं.  

नक्षलग्रस्त भागात केवळ मानव सेवा करीत असताना सरकारी बाबूगिरीचा फटकाही त्याना बसतो. पद्म पुरस्कार डावावर लावावा लागतो. साप विंचू अंगाखांद्यावर झेलत असताना कमालीची गरीबी पाहून पुर्ण अंग झाकणारे कपडेही डॉ. प्रकाश आमटे घालायचं सोडून देतात. आदिवासीची सेवा करताना, कितीतरी शस्त्रक्रिया करताना, प्रत्यक्ष धन्वंतरीचाच अवतार असल्या सारखे ते भासत राहातात.    वाघाच्या मृत्यू झाल्यावर ते मुलगा जावा तसा शोक करतात, सगळंच विलक्षण. असा जीता जागता माणूस आज आपल्यात प्रत्यक्ष आहे हे सत्य आहे. इथेच आपल्या महाराष्ट्रात, हेमलकसा या गावी. नतमस्तक व्हायचं हे अशांपुढे.

चित्रपट पहिल्या क्षणापासून प्रेक्षकांचा ताबा घेतो. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा सहज सुंदर अभिनय. नाना तर कसलेला अभिनेता आणि सामाजिक कार्यकर्ताही. प्रकाश आमटेंची भुमिका नानाला समजावण्याचा प्रश्नच आला नसेल. आनंदवनात आणि हेमलकशाला जावून या माणसाने कितीतरी वेळा काम केलं आहे, आर्थिक मदत केली आहे.


वेगळ्या विषयावरचा चित्रपट असूनही तो कुठेही रेगाळत नाही की कुणावर आरोप करीत नाही. पहिल्या क्षणापासून प्रवाही असा हा चित्रपट प्रकाश आमटेच्या जीवनासारखा, प्रकाशा सारखा. आणि म्हणूनच प्रत्येकाने आवर्जून पहाण्यासारखा.
               


                            
 

हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालॅण्ड



पूर्वांचलातील नागालॅण्ड हे राज्य आता पर्यटकांच्या नकाशावर येत आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे नागालॅण्ड हे आणखी एक राज्य विकासाच्या नार्‍याला ओ देत प्रगतीकडे वाटचाल करायला सिद्ध झालं असून दरवर्षी मोठ्याप्रमाणात साजरा होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हे त्याचं द्योतक आहे.           

अखंड भारताचा अविभाज्य भाग असलेले उत्तर पूर्वेकडील नागालॅण्ड हे राज्य, उत्तर पूर्वेच्या इतर राज्यांप्रमाणेच सगळय़ाच बाबतीत उपेक्षित राहिलेले आहे. उत्तर पूर्वेच्या या राज्यांपैकी नागालॅण्ड हे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीमुळे वादग्रस्त आणि तणावग्रस्त होते. परंतु दहा-बारा वर्षांपूर्वी झालेल्या वाटाघाटीनंतर या राज्यामधील परिस्थितीत प्रचंड सुधारणा झाली आहे. परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे आणि पर्यटनासाठी पोषक होऊ लागली आहे. पर्यटनच या राज्याला समृद्ध करू शकेल हा विचार घेऊन दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन मंत्रालयाने विकासाला चालना मिळावी म्हणून 'हॉर्नबिल फेस्टिव्हल' सुरू केला. पहिल्या सहा-सात वर्षांत या फेस्टिव्हलला विशेष यश मिळाले नाही तरीही हा फेस्टिव्हल सुरू ठेवण्यात आला आणि आता गेल्या तीन वर्षांत याला पर्यटकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.

नागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या भूभागाच्याच रक्षणांसाठी प्रचंड रक्तपात करीत. मुळात या जमाती शूर योद्धे म्हणून प्रसिद्ध होत्या. अतिशय वेगळी आदिवासी संस्कृती असलेल्या या जमातींची प्रत्येकाची वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे आणि आजच्या आधुनिक जगातदेखील ती संस्कृती यांनी टिकवून ठेवली आहे. प्रत्येक जमातींचा पेहराव, दागिना, घरांची पद्धत, डोक्यावर परिधान करण्याची पद्धत, चालीरीती आणि शस्त्र अशा नाना भिन्न वेगवेगळय़ा गोष्टींमुळे हे राज्य सांस्कृतिकदृष्टय़ा आजही प्रचंड श्रीमंत आहे. पर्यटन विभागाने हीच श्रीमंती सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'ची सुरुवात केली.

या फेस्टिव्हलमध्ये किसामा नावाच्या एका गावाबाहेरील मोकळय़ा परिसरात या सर्व सोळा जमातींच्या प्रतिनिधींना एक जागा दिली जाते. या जागेमध्ये ही मंडळी आपापल्या पारंपरिक पद्धतीने घरांची बांधणी करतात. तिथे काही कुटुंबे त्यांच्या पूर्ण पारंपरिक वेशभूषेसह घरातील सर्व पारंपरिक वस्तूंसह फेस्टिव्हलच्या काळात पाहावयास मिळतात. त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यामुळेच आपणास केवळ काही एकरांच्या जागेत संपूर्ण नागालॅण्डचा अनुभव घेता येतो. नागालॅण्डची भौगोलिक रचना पाहता या सर्व भागांना आपण वेगवेगळी भेट दय़ायचे ठरवले तर किमान एक महिना लागतो.

या फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी १ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये केले जाते. १ डिसेंबर हा नागालॅण्ड या राज्याचा स्थापना दिवस. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून हे आयोजन केले जाते. १ डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, इतर निमंत्रित पाहुणे आणि पर्यटकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात येते आणि सुरू होतो आठवडय़ाभरासाठी जल्लोष. प्रत्येक जमातीच्या घरासमोर मोकळी जागा असते त्या जागेमध्ये ही मंडळी आपापली पारंपरिक नृत्ये साजरी करीत असतात. काही बायका-मुले बांधलेल्या घरांमध्ये काम करीत असतात. थोडा वेळ विश्रांती घेऊन हे असेच दिवसभर सुरू असते. सर्व घर जवळजवळ असल्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरात शिरताना जणू काही एका संस्कृतीमध्ये आपण जात आहोत असे वाटते.

प्रत्येक जण आपापली वाद्य्ो जोरजोरात वाजवत असतो. याची सर्वच नृत्ये समूह नृत्ये असतात. नाचताना एक विशिष्ट हेल काढून आवाज काढला जातो. त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उत्साह आणि जोश असतो. हे सर्व लोक योद्धे या श्रेणीत मोडत, त्यामुळे शिकारी हा त्यांचा शौर्याचा एक भाग असायचा. त्यामुळेच यांनी शिकारीत मारलेल्या प्राण्यांच्या हाडापासून, चामडय़ापासून बनविलेल्या अनेक वस्तू आपणास पाहायला मिळतात.

आलेल्या सर्व पर्यटकांना फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाच्याच घरासमोरील नृत्याखेरीज इतर नृत्याचा एकत्र आनंद घेता यावा म्हणून याच भागात असलेल्या एका मोकळय़ा मदानात सर्व जमातींच्या एकत्रित नृत्याचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर या जमातीच्या मनोरंजनासाठी थायलंड, म्यानमार अशा देशांमधून आलेल्या कलाकारांचे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. याच भागात पर्यटकांसाठी नागालॅण्ड राज्याची प्रातिनिधिक कलात्मक वस्तूंची बाजारपेठ असते. वेगवेगळय़ा प्रकारचे खादय़पदार्थाचे स्टॉल असतात. एकंदरच वातावरण उत्सवमय असते.

पर्यटकांसाठी पहिलाच दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी जवळपास सर्व गोष्टी आपल्याला जवळून पाहता येतात. त्यांचा पर्यटक आयुष्यभरासाठीचा अनुभव पाठीशी बांधून ठेवू शकतो. त्यानंतरच्या पाच दिवसांमध्ये सकाळी दहा ते बारा आणि दुपारी दोन ते चार या वेळांमध्ये पहिल्या दिवशी उपस्थित राहू न शकलेल्या लोकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते.
नागालॅण्ड हे राज्य पर्यटनास प्रतिकूल आहे, अशा प्रकारचा समज रूढ झालेला होता. त्यामुळे या भागात पर्यटन अतिशय तुरळक होते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने या भागात पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. सर्वात महत्त्वाचे, पर्यटकांच्या सुरक्षेविषयी सांगावेसे वाटते की, हा भाग अतिशय सुरक्षित आहे. या राज्यातील प्रत्येक गावाबाहेरच्या वेशीवर एक मोठे प्रवेशद्वार असते आणि त्यावर 'आम्ही आपले स्वागत करीत आहोत,' असा मजकूर गावाच्या नावासह लिहिलेला असतो. माझ्या आजवरच्या पर्यटनात कुठल्याही राज्यामध्ये अशा प्रकारचे स्वागत कोणीही केलेले दिसले नाही. एकंदरच पहाडी लोकांप्रमाणेच हे नागा लोक खूप प्रेमळ आणि दिलदार आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी लोकांनी जरूर जावे आणि त्याच्या आदरातिथ्यांचा लाभ घ्यावा.

पर्यटनाच्या माध्यमातूनच आपण आपल्या देशातील निसर्ग, सौंदर्य संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वास्तू अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी पाहू शकतो. 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'सारख्या उत्सवामुळे तर एकाच ठिकाणी आपणास संपूर्ण राज्याची ओळख होऊ शकते आणि नागालॅण्डसारख्या हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या राज्याची एक वेगळी आठवण मनावर कायमची कोरली जाते.

नागालॅण्डचे नवनियुक्त राज्यपाल ना. पद्मनाभ आचार्य यांची अलिकडेच मुंबईत भेट घेतली तेव्हा त्यांनी हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या माध्यमातून ते राज्य देशातील पर्यटकांना आकर्षित करू इच्छित आहे असं सांगितलं. तिथल्या जन-जातींच्या भाषेतले काही शब्द जरी आपण अवगत केले आणि त्यांच्याशी वार्तालाप केला तरी तिथलं समाजमन आपल्याशी जोडलं जाईल. या वर्षी १ ते १४ डिसेंबर २०१४  या कालावधीत साजर्‍या होणार्‍या हॉर्नबिल फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संखेने कोहीमा इथे यावं असा मनोदय राज्यपाल महोदयानी व्यक्त केला.

हॉर्नबिल फेस्टिव्हल आणि पूर्वांचलातील इतर उत्तमोत्तम स्थळांच्या सहलीवर जाण्याकरीता आत्माराम परब: 9892182655 वर संपर्क साधावा.


12 October, 2014

राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?



नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा परखड सवाल.  
(ईशान्य वार्ता या मासिकात आलेला माझा लेख : )


‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं? देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे’ असं परखड मत नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी नुकतंच मुंबई येथे मांडलं. जुहू, मुंबई येथे इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर ने बांधलेल्या राणी मॉं गायडिन्ल्यु भवनाचं उद्घाटन करताना त्यानी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणाचा गोषवारा आणि समारंभाचा वृतांत.


गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ इशान्येकडच्या राज्यात कार्यरत असलेल्या आणि आता नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या पद्मनाभ आचार्य यांनी जुहू, मुंबई येथे इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर ने बांधलेल्या राणी मॉं गायडिन्ल्यु भवनाचं उद्घाटन नुकतंच केलं. पुर्वांचलातील जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम या भवनातून होईल.


ईशान्य वार्ताचे संपादक श्री. पुरूषोत्तम रानडे यांचा या प्रसंगी सत्कार
करण्यात आला.  
सनदी लेखापाल असलेले श्री. दिलिप परांजपे यांनी उपस्थिताना राज्यपालांच्या कार्याची ओळख करून दिली.  महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुर्वांचलात   पद्मनाभ आचार्ययांच्या  बरोबरीने काम करीत असताना आलेल्या अनुभवांचा आलेखच त्यानी यावेळी मांडला. जनरल करीअप्पांना भेटण्यासाठी ओव्हल मैदानात व्यतीत केलेली रात्र, टाटा, गोदरेज, गोविंदभाई श्रॉफ अशा दिग्गज उद्योजकांच्या त्या काळात घेतलेल्या  भेटी  यांचे  किस्से ऎकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. या नंतर सुमारे चाळीस मिनिटं केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी कार्यकर्ता कसा असावा, राष्ट्रपेम म्हणजे काय याचा पटच उभा केला. या प्रसंगी बोलताना राज्यपाल महोदय म्हणाले:  


मा. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांना पुस्तक भेट देताना प्रस्तूत
 लेखक आणि श्री. आत्माराम परब.
 
इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरच्या माध्यमातून पुर्वांचलासाठी मुंबईमध्ये राहून आपण काय करू शकतो या विचारच खुप मोठा आहे. पुर्वांचलामधल्या लोकांना मुंबईत राणी मॉं गायडिन्ल्यु यांच्या नावाने एक भवन उभं राहिलय हे ऎकूनच किती बरं वाटलं आहे. आपल्यात राष्ट्रीय भावनेची कमतरता का आहे? याचा विचार आपण केला पाहिजे, तो काही मंडळींनी केला आणि या भवनाची उभारणी झाली. आपण भारतमाता की जय असं म्हणतो. ही भारतमाता कोण आहे? हिच्या कुठल्याही अंगाला काही दुखापत झाली तर आपली प्रतिक्रिया काय असते? काय असली पाहिजे? १९६२ साली चीनचं आक्रमण झालं, तेव्हाची गोष्ट, तेव्हा आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करीत होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करीत होतो. पंतप्रधान नेहरूंना प्रचंड धक्का बसला होता. वर्तमान पत्र, रेडीओ वरून या आक्रमणाची वार्तापत्र कानी येत होती. आम्ही शिकलेले होतो, रोज वर्तमानपत्र वाचत होतो, एवढं असूनही NEFA म्हणजे काय याची कल्पना आम्हाला नव्हती. मात्र लहानपणापासून संघाचे संस्कार आमच्यावर झाले होते. आपल्या देशावर आक्रमण झालं आहे, आपण या मध्ये काहीतरी केलं पाहिजे या भवनेने आम्ही पुर्वांचलात जावून पोहोचलो. अप्रतिम निसर्ग सौदर्याने भरून राहिलेली हा प्रदेश पाहिला आणि आम्ही अचंबीत झालो. आमची पाटी कोरी होती. मोकळ्या मनाने आम्ही तिथल्या लोकांना भेटलो. तेव्हा लक्षात आलं मिझोराम, नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, नेफा आसाम या भागातल्या कितीतरी लोकांनी भारत स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले होते, बलिदान दिलं होतं. त्या ठिकाणी कसलाच विकास झाला नव्हता. सोयी-सुविधा नव्हत्या असं असूनही नागालॅन्ड मधल्या राणी मॉं गायडिन्ल्यु, मेघालयातचे तिरोत सिंह, अरुणाचल प्रदेश मधील अबोर लिरेंग अशा अनोक महारथींनी देशासाठी खस्ता खाल्ल्या. सर्व सुविधा असताना काम करणं निराळं आणि पुर्वांचलासारख्या दुर्गम भागात काम करणं निराळं. आजही तो भाग तसाच आहे, संकटात आहे. मुळातच या प्रदेशाचा ९८% भाग हा आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेला आहे, फक्त दोन टक्के भूभाग भारताशी जोडलेला असल्याने या राज्यांचे प्रशन हे वेगळे आहेत. एका बाजूला आक्रमक चीन दुसर्‍या बाजूला घुसखोर बांगलादेश, तिकडे म्यानमार अशा देशांच्या सीमांनी व्याप्त असलेली ही राज्यं आपल्याच भारत मातेची अंग आहेत. अरुणाचल प्रदेश सारखं अख्खं राज्य आपलंच आहे असं चीन म्हणतो, कोणतंही सार्वभौम राष्ट्र हे स्विकारू शकत नाही. हा बाह्य धोका तर दिडशेहून जास्त फुटीर गट आपणाला स्वतंत्र व्हायचंय म्हणून सशस्त्र क्रांती किंवा आंदोलन करीत आहेत, असा आंतर्गत धोका.  लाखो घुसखोर बांगलादेश मधून आले आहेत. म्यानमारच्या सीमेवर अतिरेकी प्रशिक्षण केंद्र आहेत. चीन मधून प्रशिक्षीत आतंकवादी या भागात येत असतात. इथली जनाता या लोकांच्या भुलथापांना का बळी पडते आहे? नक्षलवादी का तयार होतात? याचा विचार केला तर असं लक्षात येतं की गेली साठ वर्ष सातत्याने हा भाग दुर्लक्षीततच राहिला आहे. आसाममध्ये कमीतकमी तीस विधानसभा क्षेत्रं अशी आहेत की ज्यात आपण प्रवेशही करू शकत नाही एवढे बांगलादेशी तिथे भरलेले आहेत. ऑल आसाम स्टुडंट युनियनने फार मोठं आदोलन या विरोधात उभारलं तरीही स्थिती बदललेली नाही.


तिथली जनाता डोंगर दर्‍यांमध्ये वास्तव्य करते. त्या काळी अगोदरच्या नेफा मध्ये आम्हाला जायचं होतं. मी आणि दिलीप परांजपे तिथे जायला निघालो. जे.बी. पटनाईकांनी तिथे मिठाचा पुरवठा करण्यासाठी कलिंग एअरलाईंस ची स्थापना केली होती. विमानातून मिठाच्या बोर्‍या ठिकठिकाणे टाकल्या जात. त्या विमानातून आमच्या वजनाच्या गोण्या खाली काढून आम्हाला बसवलं गेलं आणि आम्ही पासी घाट इथं पोहोचलो. आमच्याबरोबर एक पोलिटीकल ऑफिसर होते. वेगवेगळ्या जन-जातीच्या लोकांनी नृत्य करून आमचं स्वागत केलं. सुंदर दृष्य होतं ते. हे सर्व पहात असताना लक्षात येते गेलं की हे लोक भारतीयच आहेत. यांनाही आपल्यासरखाच मतदानाचा हक्क आहे. यांच्या सारखं एकच मत आपल्याला देता येतं, लोकशाही प्रक्रियेत सगळे समान असताना या लोकाशी एवढे दिवस जो भेदभाव केला गेला त्याला आपणच कारण आहोत. यांच्यावर जो अन्याय झाला किंवा होत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत आणि याना काही मदत करायची झाली तर ती प्रायश्चित्ताच्या भावनेने केली पाहिजे, उपकाराच्या भावनेतून नाही. या समाजाचं आपण काही देणं लागतो.


आपल्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलाची आवश्यकता आहे. व्यक्ती केंद्रीत शिक्षण, जे ब्रिटीशांनी केवळ कारकूनांची फौज निर्माण करण्याकरीता राबवलं तीच पद्धती आजही राबवली जात असल्याने देशप्रेम आपल्याला शिकवावं लागतं. चाळीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, त्या वेळी आम्ही विद्यार्थीपरिषदेचं काम करीत असताना एक जपानी विद्यार्थी मुंबईत माटुंग्याच्या कार्यालयात आला होता. आठ दिवस तो आमचं काम पहात होता, मुलाखती घेत होता. त्याला ते समजत नव्हतं, अखेर त्याने विचारलं की तुमचं मुख्य उद्देश काय आहेत? आम्ही म्हटलं ‘राष्ट्रप्रेम’, तो अचंबीत झाला म्हणाला “काय ‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?  ते निसर्गत:च असलं पाहिजे. देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे. तुम्ही जर एवढी मोठी संस्था या कामासाठी उभारली असेल तर तुमच्या जीवनपद्धतीतच काहीतरी दोष आहे.” त्याच्या या प्रतिक्रियेनंतर आमच्याही लक्षात आलं की आपण भारतासाठी, आपल्या मातृभूमी काही केलं पाहीजे याचं बाळकडूच आम्हाला शिक्षणातून मिळालं नसल्यानेच आपल्याला या विपनावस्थेतून जावं लागत आहे. काम करीत असताना आम्ही नागालॅन्ड मधल्या मोंड या ठिकाणी गेलो. तिथल्या जनजातीच्या राजाने आमचं मिठीमारून स्वागत केलं, आसनावर बसवलं आणि त्याच्याजवळ असलेलं सर्वात उत्तम रत्न आम्हाला देवू केलं. हा बंधूभाव, ‘अथिती देवो भव’ हा भाव त्यांच्या जवळ आहे तर आपण नागरी वस्तीत वाढलेले, उत्तम शिक्षण घेतलेले असताना आपण ते संस्कार का हरवून बसलो आहोत.                         


तिथे केरळचे मिशनरी आधीपासूनच काम करीत होते. मग आम्ही पोहोचलो. आज दुरदर्शनवर तिथली जनता शहरातील लोक किती मजेत आहेत ते पहातात, काय खातात ते पहातात आणि तिथले लोक किडे खातात. एवढं अंतर का? याचा विचार केला पाहिजे. ‘भारत मेरा देश है’ म्हणत असताना ही दरी कशी कमी होईल हे पाहिलं पाहिजे. आसाम मधल्या तेलाच्या विहिरी, पुर्वांचलात सर्वत्र आढळून येणर्‍या कोळशाच्या खाणी, विपूल वन संपदा, जल संपदा एवढं सगळं असतानाही तिथे अभ्यास करण्यासाठी लागणारी वीज नाही, तो भाग मागास का राहिला याचा विचार झाला पाहीजे. स्वातंत्र्याची फळं सर्वानाच मिळाली पाहिजेत. काही ठरावीक लोकांच्या हातातच संपत्ती एकवटली आहे ते चित्र बदललं गेलं पाहिजे. आपण सर्वांनी त्यात आपला वाटा उचलला पाहिजे. इथे बसून आता मी हा ‘ईशान्य वार्ता’चा अंक पहात होतो. हा ज्यानी कोणी काढला आहे त्यानी केवढं मोठं काम केलं आहे.


मिशनरी लोक छोटीशी वस्ती असली तरी शाळा सुरू करतात. माझ्या उडुपी या गावात केवळ तीनशे ख्रिश्चन असताना त्यांनी शाळा, त्याच्या बाजुला हॉस्पिटल, अनाथालय सुरू केलं. आपण देवळं बांधतो, देवाला सोन्याने मढवतो, जेवणावळी उठवतो. पण समाजाला काय देतो. दरिद्री नारायणाची सेवा आपण कधी करणार? १९८२ साली एक माणूस आणि एक टेबलवर इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरचं काम सुरू झालं तेव्हा ते काम एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विचार केला नव्हता.


आज देशात एक चेतनामय वातवरण आहे. पंतप्रधानांनी जन-धन योजना सुरू केली आहे. मी नागालॅन्ड राज भवनात माळीकाम करणार्‍या कामगारांना भोजनाचं आमंत्रण देवून त्याची विचारपूस केली आणि नागालॅन्ड राजभवनातून राज्यपाल या नात्याने मी त्या योजनेला चालना देण्याचं काम केलं आहे. मोठमोठ्या उद्येगपतींना तीन टक्क्याने कर्ज देण्यासाठी बॅका त्यांच्या घरी जातात पण बारा टक्के व्याज देवूकरणार्‍या स्वयंरोजगार कर्त्याला त्रास दिला जातो. जन-धन योजनेत हे चित्र बदललं जाईल. पहिल्याच दिवसात संपुर्ण देशातून दोन करोडच्या वर लोकांनी बचत खाती उघडली. हे काम आपण सर्वांनी पुढे नेलं पाहिजे.

आपल्या देशात 720 भाषा, बोलीभाषा बोलल्या जातात. पुर्वांचलात हे प्रमाण जास्त आहे. मुबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ अनेक विदेशी भाषा शिकवतात. या विद्यापीठानी जर या पुर्वांचलातील भाषा शिकवण्याचा सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्याक्रम सुरू केला तर पुर्वांचलातील मुंबईत काम करणारे लोक त्या भाषा शिकवायला तयार आहेत. पुर्वांचलातील माणसं या मुळे आपल्याशी जोडली जातील. मुंबईत आपली भाषा शिकवली जाते हे ऎकूनच त्यांना आनंद होईल. देश जोडण्याच्या असे अनेक पर्याय आहेत. इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरमध्ये हे काम जोमाने केलं जाईल. नागालॅन्डमध्ये आम्ही हे काम सुरू केलं आहे. नागालॅन्डच्या राज्यपालाची पत्नी तिथल्या सर्वजनिक शाळेत जाऊन शिकवायला लागली आहे. शिकलेल्या, पदवीधर महिलांनी; ज्या घरीच असतात त्यांनी शांळांमध्ये जावून विद्यादान करायला सुरूवात केली तर तिथली उपस्थिती वाढेल आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्वल बनेल.

नागालॅन्ड मध्ये राज्यपाल म्हणून मी गेलो आहे, स्वेच्छेने गेलो आहे. तिथला राज्यपाल ही शिक्षा कशी असू शकते. पुर्वांचलात आपण गेलं पाहिजे. तुमचं सर्वांचं तिथे स्वागत आहे. ‘ईशान्य वार्ता’ने हे काम सुरू केलं आहे. इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर हे काम करीत आहे. पुर्वांचलात आपण या. आपलं सर्वांचं तिथे स्वागत आहे.            

महामहीम राज्यपालांच्या या भाषणानंतर सर्व सभागृह अंतरमुख झालं होतं. त्याच भारलेल्या वातावरणात ईशान्य वार्ताचे संपादक श्री. पुरूषोत्तम रानडे यांचा आणि अन्य मान्यवरांचा राज्यपालानी नगालॅन्डच्या भेटवस्तू देवून सत्कार केला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात साजर्‍या होणार्‍या  नागालॅन्डच्या हॉर्नबिल फोस्टीव्हलसाठी सर्वांना आमंत्रित करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

मा. राज्यपालांशी नागालॅन्डच्या पर्यटनासंबंधी चर्चा करताना आत्माराम परब आणि नरेंद्र प्रभू.

  

11 October, 2014

सत्याचा अर्थ नोबेल


भारताचे कैलाश सर्त्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफजाई  यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल त्या महान व्यक्तींचं अभिनंदन. दोघांचही वैशिष्ट्य म्हणजे तरूण वयातच त्यांनी लहान मुलांसाठी स्वत:ला वाहून घेतलं आणि आपलं काम निष्ठेने करीत राहिले. कैलाश सर्त्यार्थी आज साठ वर्षाचे आहेत पण वयाच्या तीसाव्या वर्षीच अभियंता असलेल्या कैलाशनी भरभक्कम पगाराची नोकरी सोडून बाल मजूरी विरुद्ध आवाज उठवला.
मलाला युसूफजाईचं तर आणखीनच कौतूक करायला हवं कारण आज ती सतरा वर्षांची आहे आणि वयाच्या अकराव्या वर्षीच तीने मुलींच्या शिक्षणासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावली.  पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या धमक्यांपायी मुलींना शिकू दिले जात नाही व समाजात एकूणच त्यांची अवस्था दयनीय असते. याविरोधात तिने आवाज बुलंद केला होता. त्यामुळे चिडून जाऊन तालिबानी अतिरेक्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्लाही चढवला होता. तिच्या डोक्याला गोळी लागून ती गंभीर जखमी झाली होती, परंतु मोठय़ा जिद्दीने मृत्यूशी दोन हात करीत तिने ही लढाई जिंकली होती. त्यानंतरही तिने आपले काम सुरूच ठेवले आहे.  पाकिस्तानात आणि अफगाणीस्तानच्या सिमेवरच्या स्वात खोर्‍यात अतिरेक्यांचा वावर ही रोजचीच गोष्ट आहे त्याच अतिरेक्यांनी तिच्यावर गोळ्या चालवल्या आणि ती मृत्यूच्या दारातून परत आली.

कैलाश सर्त्यार्थी आणि मलाला युसूफजाई यांना नोबेल पुरस्कार मिळाला म्हणजे मनवतेलाच तो मिळाला आहे. या आनंदात आपणही सहभागी होवूया.




        

04 October, 2014

व.पु. एक आनंद ठेवा



आज वपुंची एक गोष्ट ऎकली. ही आधी न ऎकलेली गोष्ट होती. भांडणाचे क्लास घेणारे जे. पी. जोशी.  वपंचं निरिक्षण आणि त्यावर केलेले मिश्कील भाष्य, विनोद म्हणजे विरंगुळ्याची हमखास जागा आहे. तेव्हा वपुंच्या कथाकथनाच्या कॅसेट मिळायच्या. कितीतरी गोष्टी अशाच टेपरेकॉर्डर वर ऎकलेल्या. मग एकदा शिवाजी नाट्य मंदीरला त्यांना प्रत्यक्ष ऎकायचा योग आला. तसं सामान्य व्यक्तिमत्व पण एकदा स्टेजवर उभे राहिले की ते सगळी सभा भारून टाकत.



असंच एकदा बिर्ला मातोश्रीला ओशोंवर बोलण्यासाठी वपु येणार होते. ती शहाण्णव सालची गोष्ट असावी. कार्यक्रमाची वेळ झाली तरी वपु लाले नव्हते. सभागृह तुडुंब भरलेलं होतं. अर्धा पाऊण तास होवून गेला. लोक कंटाळले आणि अचानक वपु आले. नेहमिच्या पोशाखात नव्हते. त्यानी रुग्णाचा वेश धारण केला होता. पण तो आवेश नव्हता तर ते खरंच रुग्ण शय्येवरून थेट सभागृहात आले होते. ते सुद्धा रुग्णवाहिकेमधून. आल्या आल्या वपुंनी सर्व श्रोत्यांची हात जोडून माफी मागितली आणि भाषणाला सुरूवात केली. जे बोलले ते मनापासून बोलले. सगळं सभागृह स्तब्ध होतं. वपु प्रत्यक्ष शेवटचे भेटले ते तेव्हाच. त्यांचा अनंताचा प्रवास सुरू झाला. पण ते असे पुन्हा पुन्हा भेटत रहातात त्यांच्या कथांमधून, लेखनातून. कधी https://www.facebook.com/pages/Va-Pu-Kale/100839026670902?fref=ts या फेसबुक वर. वपु एक आनंद ठेवा आहे.                         

03 October, 2014

शस्त्र पुजा



आज दसरा. विजया दशमी. आज शस्त्रांची पुजा करायची. शेतकरी नांगराची, लोहार हातोड्याची किंवा भात्याची, सुतार रंध्याची आणि राजकारणी जिभेची पुजा करीत असतील. पण खवय्ये करतात ती जिभेची पुजा वेगळी आणि राजकारणी करतात ती वेगळी. खाणं खाणं आणि खाणार्‍यांचं खाणं किंवा पैसे खाणं यात अंतर आहे. गाडीवाले जेव्हा त्या गाडीची पुजा करतात तेव्हा ती शस्त्राची पुजा आहे की काय असा प्रश्न मला पडतो आणि आज त्या गाडीपासून आपल्याला जपून राहिलं पाहिजे असं मी मनोमन ठरवतो. कारण त्या गाडीवानाने जर ते शस्त्र वापरण्याचं ठरवलं तर काही धडगत नाही.

खंडे नवमी किंवा दसर्‍याला जशी शस्त्रांची पुजा करतात तशी दिवाळीत लक्ष्मी पुजनादिवशी हिशेबाच्या वहीची पुजा करतात. हिशेबाच्या चोपड्या जावून संगणकाने जेव्हा त्याची जागा घेतली तेव्हा पुजार्‍याला मात्र आता काय करू असा प्रशन पडला होता. शेवटी त्याने संगणकाच्या मॉनिटरवच शुभलाभ असं लिहून स्वस्तिक काढलं आणि ते पाहून पुढचे कितीतरी दिवस मला त्याची खेटराने पुजाकरावी असं वाटत होतं.

हे पुजा करणारे मात्र त्यांच्या पुजा करण्याच्या हट्टापायी अनेकदा अनावस्ता प्रसंग ओढवून घेतात. असंच एकदा एका शंकर नामक पुजार्‍याने लक्ष्मी पुजनाला नारळ फोडला आणि डोळ्याचं पात लवत न लवत तोच त्या नारळातलं पाणी ऑफिसमधल्या लक्ष्मीला म्हणजे तिजोरीला वाहिलं आणि आतमधल्या सकल लक्ष्मीला आंघोळ घातली. नेमकं त्या नारळातलं पाणी गोड गोड होतं, पुढचे दोन तीन दिवस रजेचे गेले आणि जेव्हा चौथ्या दिवशी ती तिजोरी उघडली गेली तेव्हा तिजोरीत लक्ष्मी बरोबर मुंग्याही रहायला आल्या होत्या, नोटा भिजल्या होत्या, काहींची लक्ष्मीशी झटापट झाली होती. आता उत्तरपुजा कशाने करावी हे तिथल्या लक्ष्मीधरालाही समजेना.

एरवी कार्यालयात ज्याला कामात रस नसतो अशा बर्‍याच जणांना हा असला दिवास मात्र आपलाच वाटत असतो. आजच्या दिवशी पुजा केली म्हणजे वर्षभर टंगळमंगळ करून पगाराच्या दिवशी लक्ष्मी प्राप्ती करता येते हे त्याना पक्के ठावूक असते.

या अशा पाश्वभूमीवर संगणकाची (माझ्या शस्त्राची) पुजा कशी करावी असा विचार सुरू असताना म्हटलं चला एक पोस्ट लिहूया म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या पुजाही आणि हसरा नव्हे नव्हे दसराही.

गावच्या घरात मात्र पिकाव, पारय, कोयता, कुदळ अशांची पुजा करायच्या आधी ती स्वच्छ करून पाटावर मांडायचो तेव्हा कळलं नाही, पण श्रमांनाही किंवा श्रमिकांनाही आपल्या आयुष्यात महत्व आहे हे संस्कार नकळत झाले. हत्यारांची निगा राखली जायची आणि पावसाळा संपत असताना ती  हत्यारं काळजीपुर्वक साफ करून ठेवावीत म्हणजे पुन्हा वापरताना गैरसोय होत नाही. शस्त्र पुजा केलीच पाहिजे पण ती डोळसपणे.                                       

02 October, 2014

बा देवा रवळनाथा sssss



बा देवा रवळनाथा.................. असं म्हणत आलेल्या भक्ताचं म्हणणं देवापर्यंत पोहोचवणारा राऊळ रवळनाथाच्या देवळात भेटला की मालवणी माणसाला देव दोन हात राहिल्याचा आनंद होतो. देवाने ऎकलं तर याचंच म्हणून ‘गार्‍हाणा’ घालण्यासाठी रावळाची तासंतास  वाट पाहणारे कितीतरी मालवणी मी पाहिले आहेत. पण मला भेटलेला हा राऊळ माझी तासंतास नसली तरी वाट पाहत पिंगुळीच्या तिठ्यावर रिक्षात बसला होता. हे राऊळ महाराज तसे माझी म्हणजे ’गिरायकाची’  वाट पहात होते.
साळगावाक जाव्क किती घेतलात ? या माझ्या प्रश्नाला दोनशे........ असं उत्तर त्यानी दिलं तेव्हा ‘कायते बरोबर घ्या’ म्हणताच सळगावाक खय? अशा त्यानी विचारलेल्या प्रश्नाला म्हाझ्याकडे नेमकं उत्तर नव्हतं. शेवटी चला.. असं म्हणत  मी रिक्षात बसलो. याने हे सांगितलेलं भाडं बरोबर आहे ना? या माझ्या संशयाला धरून त्यानी खुलाशाला सुरूवात केली.

“आमी तशे ओगिचच पैशे घेणव नाय. बावीस काय तेवीस वर्षा झाली मी रिक्षा चलवतय. लोक चतुर्थी इली काय तोंडाक येय्त ता भाडा सांगतत. माजा तसा नाय. खोटे पैसे घेवन काय माडी बांदाची आसा?” माझा सगळा संशय फिटला असं दिसताच मग त्यानी विषय बदलला.  

तो एकदम पॉझिटिइव्ह माणूस होता. एवढा गिर्‍हायकाशी चांगला बोलणारा आणि योग्य भाडं घेणारा रिक्षावाला मला क्वचितच भेटला असेल. मग पुढे साळगावच नहे तर माणगाव, सावंतवाडी, झाराप असा प्रवास त्याच्याबरोबर करून मी त्याला सोडला तेव्हा त्याचा फोन घेण्याचीही सुबुद्धी मला झाली आणि टिप देण्याचीही.

वाट चुकली तर सुवर्णपदक हुकल्याची हुरहुर नाही की ‘यंदा शेतीचा काय खरा नाय’ अशी रडवी वृत्ती नाही. म्हणाल तेव्हा म्हणाल तेवढा वेळ थांबताना कटकट नाही आणि उपकार केल्याचीही भावना नाही.

तसं आता गाव खुपच बदललय. अगदी प्रकर्शाने जाणवावं असं. किती वर्षानी कोकणात गणपतीच्या दिवसात गेलो. आत्माच्या आग्रहामुळे गेलो आणि त्याच्याच बरोबर खुप फिरलो. कुडाळमध्ये बरेच गणपती आणि तिथल्या घरांमध्ये जाण्याचा योग आला. बाहेरून कळत नाही पण कुडाळ अमुलाग्र बदललं आहे. घरं कमी आणि बहुमजली इमारती जास्त अशी व्यवस्था होताना दिसतेय. पण असे अस्सल मालवणी माणूस अजूनही तिथे आहेत. कधी गेलात पिंगुळीला आणि जर रिक्षात बसणार असाल तर रावळाला या 9860925118 फोन नंबरवर फोन करून बघाच.                    

‘बा रवळनाथा.......... तुझ्या सेवेकर्‍याकडसून अशीच सेवा करून घे’  असं गार्‍हाण घालत परत याल.             

                   

01 October, 2014

पुर्वांचल: फिरायलाच हवा


सन २००४ ची गोष्ट. लोकसत्ता मध्ये ‘तळ्यांचं तवांग’ हा लेख वाचल्यापासून मला पुर्वांचलाला जायची ओढ लागून राहिली होती. तवांग आपल्या देशाच्या पुर्वोत्तर सीमेला लागून असलेला भाग. अरुणाचल प्रदेश मधलं हे ठिकाण पुर्वांचलाचं प्रवेशव्दार समजल्या जाणार्‍या गुवाहाटीपासूनही शेकडो कि.मी. दूर आहे. तिकडे जायचं असं मनाने नक्की केलं असलं तरी तेव्हा ते एवढं सोप नव्हतं. असं असलं तरी जिथे जायचं तिथली माहिती गोळा करावी म्हणून मी त्या कामाला लागलो. त्या वेळी आत्ता एवढं माहितीचं महाजाल सक्षम नव्हतं आणि पर्यटन महामंडळाकडची माहिती अद्यावत नव्हती. एवढ्यात युथ हॉस्टेलच्या एका छोट्याश्या बातमीने माझं लक्ष वेधलं. तवांगची आठ दिवसाची एक सहल युथ हॉस्टेल नेणार होतं, मी त्या सहलीसाठी नाव नोंदणी केली. मात्र पुर्ण पैसे भरायला गेलो तेव्हा निराश झालो कारण त्यानी ती सहल रद्द केली होती. माझ्याच देशात मला हवं तिथे जायचं असलं तर आणखी कोण कशाला हवं असा विचार मनात आला आणि तवांगलाही स्वत:च जायचं असं ठरवून टाकलं. माझ्या बरोबर माझी पत्नी आणि मुलगीही यायला तयार झाली.
  
पुर्वांचल गाठायचंच अस मनात नक्की केलं तरी सहलीची रुपरेषा ठरवतानाच अडचणी येवू लगल्या, तशातच गुवाहाटीला बॉम्बस्फोट झाले. तिकडे जायचा माझा बेत ऎकून सर्वच मित्रपरिवाराने मला त्या पासून परवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मी माहिती जमवत होतो. ती महिती जमवता जमवता तवांगला जाण्यासाठी Inner Line Permit (ILP) घ्यावं लागतं हे समजलं. आता हे ILP कसं मिळवायचं? अरुणाचल प्रदेशच्या रेसिडेंट कमिशनरकडून ते मिळतं याची महिती मिळाली. हे कमिशनर कोलकाता, गुवाहाटी, तेजपूर या ठिकाणी असतात. मुंबईतल्या माणसाला ती कशी मिळायची? कोलकात्याला संपर्क साधून बघितला पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतरच ते मिळणार असं समजलं. इनर लाईन परमीट मिळाल्याशिवाय हॉटेल बुकिंग तरी कसं करणार? पुर्वांचलात फोन एकतर लागत नव्हते किंवा लागले तर ते चुकीच्या ठिकाणी लागत होते.  अनेक अडचणी समोर दिसत असतानाच मुंबईत सचिवालय जिमखान्यात पुर्वांचल मधल्या राज्यांचा हस्तकला मेळावा लागला. तिकडे गेलो. बहुतेक लोक गुवाहाटीचे होते. त्यांच्या जवळ तिथल्या परिस्थिती विषयी चौकशी केली. गुवाहाटीत झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले आम्हीसुद्धा मुंबईत यायला घाबरत होतो. मुंबईतही बॉम्बस्फोट झाले होतेच ना? एकूण काय भिती बळगली तर घराबाहेरच पडायला नको. त्या मेळाव्यात आलेले पुर्वांचलातील लोक आथित्यशील वाटले. त्यांनी आपले फोन नंबर, कार्ड दिली. गुवाहाटीत आल्यास मदत करायची तयारी दाखवली. माझा उत्साह वाढला.

पुर्वाचलात फोन लागत नव्हते पण एक फोन बरोबर लागला आणि माझं काम हलकं झालं. काझिरंगा नॅशनल पार्कच्या बोनानी लॉजचा फोन पटकन उचलला गेला आणि पलिकडून आश्वासक आवाज ऎकू आला. बोनानी लॉजचे व्यवस्थापक श्री. सैकिया बोलत होते. अगदी विनंम्रपणे त्यानी सर्व महिती दिली. त्या लॅजमधली खोली आरक्षित करण्यासाठी लागणारा डिमांड ड्राफ्ट बोकाखाट शाखेवर काढावा असं सांगितलं तसंच माझ्या अनेक शंकांना योग्य उत्तरं दिली. हे बोनानी लॉज आसम सरकारच्या पर्यटन खात्याचं आहे हे विशेष. या एका आधारामुळे मी आश्वस्त झालो. मुंबईहून तवांगला तीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करून जायचं तर पुर्वांचलातील इतरही भाग पहायला हवा असं वाटत होतं. काझिरंगा बरोबरच गुवाहाटी, तेजपूर, शिलॉंग, चेरापुंजी अशी अनेक ठिकाणं साद घालू लागली. एवढं सगळं फिरायचं तर पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस लागणार होते. एवढ्यालांब आपण जाणार तर ते फिरलच पाहिजे हेही लगोलग ठरवून टाकलं. सगळे नकाशे, फिरण्याची ठिकाणं, त्यांच्या मधलं अंतर, अवघड रस्ते असल्याने त्या वरून प्रवास करायला लागणारा वेळ या सर्वांचं गणीत करताना सहलीचा आनंद आणखी वाढत होता. आपल्याला कुठेही सहलीला जायचं असेल ना तर शक्य तेवढ्या लवकर त्या सहलीचं आयोजन करावं कारण सहल ठरल्यापासूनच त्या सहलीची खरी सुरूवात होत असते. काय पहावं, कसं पहावं, रस्ते कसे आहेत, रहाण्या-जेवण्याची काय व्यवस्था होईल हे नक्की करताना आपण नकळत त्या भागात जावून पोहोचतो आणि आपलं मन त्या प्रदेशाची एक आभासी सहल करायला लागतं. पुर्वांचलाचा अभ्यास करता करता मला त्याने खरंच वेड लावलं.

बोनानी लॉजचं आरक्षण पार पडलं तरी बाकी ठिकाणी राहण्याची काय व्यवस्था करायची ते ठरेना कारण एकच Inner Line Permit. काहीही करून जायचंच हे तर नक्की होतं. मग रेल्वे आरक्षणाची स्थिती पाहिली तेव्हा गितांजली एक्सप्रेसचं आरक्षण मिळणार नाही हे समजलं. कोलकत्याला जाण्यासाठी मग हावडा मेलचा वेळकाढू प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. कोलकात्या मध्ये दोन दिवस फिरावं, जमलंतर तिथेच अरुणाचल प्रदेशच्या रेसिडेंट कमिशनरकडून Inner Line Permit मिळतं का पहावं. असा बेत होता. कोलकाता ते गुवाहाटीचं विमानाचं तिकीट काढलं आणि गुवाहाटी पर्यंतचं जाणं नक्की झालं. पुढे इनर लाईन परमीट मिळालं तर तवांगला जावं किंवा पर्यायी ठिकाणांचं स्थलदर्शन करावं असा विचार करून परतीच्या प्रवासाचंही आरक्षण केलं. (या सहली नंतर पुर्वांचलाच्या आणखी दोन सफरी माझे मित्र ईशा टूर्सचे संचालक श्री. आत्माराम परब यांच्या सोबत केल्या. ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी सर्व सेवा-सुविधा हात जोडून उभ्या होत्या. पर्यटन संस्था आणि आपण स्वत:च केलेल्या सहलीत फरक तर असायचाच)

कोलकात्याचा दोन दिवसांचा मुक्काम संपवून भल्या पहाटे नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ गाठला. इंडीयन एअरलाईंसचं विमान पाच तास उशिराने सुटणार होतं. इनर लाईन परमीटचं काम कोलकात्यात झालं नव्हतं. सकाळी लवकर गुवाहाटीत पोहोचून ते मिळवण्याचा माझा प्रयत्न आणखी पाच तासांनी  पुढे गेला. साधारण अकराच्या सुमारास गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपिनाथ बार्डोलोई आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. खरं तर इथून आम्हाला काझिरंगाला जायचं होतं. पण पुन्हा इनर लाईन परमीटचं काम समोर दिसत होतं आणि ते गुवाहाटीलाच करावं लागणार होतं. शहरात जाण्यासाठी टॅक्सी केली आणि रेसिडेंट कमिशनर अरुणाचल प्रदेश यांच्या पत्त्यावर गेलो पण तिथलं कार्यालय दुसरीकडे स्थलांतरीत झालं होतं. दोन तासांच्या शोधाशोधी नंतर एका निवासी इमारतीमध्ये त्याचा पत्ता लागला. मला कोलंबसची सारखी आठवण येत होती.

रेसिडेंट कमिशनर अरुणाचल प्रदेश असा फलक सुद्धा नसलेल्या त्या इमारतीत कार्यालय कुठलं तेच समजत नव्हतं. दोन बाया एका लिहिण्याच्या टेबलावर पाय वर घेवून खिडकी शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या जवळ चौकशी केली तेव्हा समजलं की मला हवं असलेलं कार्यालय तेच आहे. मी त्या कार्यालयामध्ये प्रवेश मिळवला आणि त्याना मी तिथे येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यांचे साहेब कार्यालयात नव्हते आणि ते परत कधी येणार याची त्याना काहिच माहिती नव्हती. थोडं खावून घ्यावं आणि पुन्हा प्रयत्न करावा म्हणून मी बाजाराकडे वळलो. पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने त्या कार्यालयात गेलो तर साहेब नुकतेच आले होते. त्याना माझी फाईल आणि फॉर्म दाखवला. अरुणाचल मध्ये कशाकरीता जायचं आहे? असा त्यांच्या प्रश्न होता. तो माझ्या देशाचा भाग आहे आणि तो आम्हाला पहायचा आहे. माझ्या बरोबर माझी बायको आणि मुलगी आहे त्याना आत बोलावतो असं सांगून मी त्यानाही आत बोलावलं. साहेबाना माझं म्हणणं पटलं आणि त्यानी इनर लाईन परमीट देण्याच्या सुचना दिल्या. ते तयार होईपर्यंत बोलताना ते म्हणाले की पुढच्या चार दिवसात २५ खासदारांचा अरुणाचल प्रदेशचा दौरा आहे, तुम्ही हॉटेल बुकिंग केलं आहे का? अर्थातच माझं उत्तर नाही असं होतं. इनर लाईन परमीट मिळाल्याशिवाय मी आरक्षण करणार तरी कसं?

इनर लाईन परमीट मिळलं, आता लवकरात लवकर काझिरंगाला गेलं पाहिजे म्हणून मी घाईत होतो. दुपारचे तीन वाजून गेले होते. ज्या बाईनी इनर लाईन परमीट दिलं त्यांचं लक्ष माझ्या मुलीकडे गेलं. या एवढ्या छोट्या मुलीला घेवून तुम्ही आता काझिरंगाला जाणार का? असं म्हणत असताना त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. आता खुप उशीर झाला आहे तुम्ही उद्या जा असा त्यांचा सल्ला होता. आमच्यातला संवाद हिंदीतून होत होता. ठिक आहे आम्ही जावू असं म्हणत मी त्यांचे आभार मानले आणि पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो. चौकशी केली तेव्हा आम्हाला आता पलटन बाजार इथे जावं लागणार होतं.

पलटन बाजारला गेलो आणि काझिरंगाला जाण्यासाठी चौकशी केली तेव्हा समजलं की तिकडे जाणारी सगळी वाहनं निघून गेली होती. आणि आता पुढचं वाहन दुसर्‍या दिवशी सकाळी निघणार होतं. आता संध्याकाळचे चार वाजत आले होते आणि दिवस अस्ताला जायच्या तयारीत होता. आम्ही मुंबईहून गुवाहाटीला म्हणजे पश्चिमेकडून पुर्वेला गेलो होतो त्यामुळे दिवस लवकर मावळणार होता. काही करून मला काझिरंगाला पोहोचायचंच होतं. मुंबईत नेहमी रात्रीचा प्रवास करणारे आपण हा प्रवास सहज करू असं वाटत होतं. थोडी फार चौकशी केल्यावर एक तरूण त्याची खाजगी गाडी घेवून यायला तयार झाला. अखेर आम्ही काझिरंगाकडे प्रयाण केलं. या सगळ्या गडबडीमुळे एवढा वेळ बाहेरच्या दुनियेकडे पाहायला वेळच मिळाला नव्हता. आता गाडीत बसल्या बसल्या बाहेर बघताना नाविन्याचा आभास व्हायला लागला. ब्रम्हपुत्रेचं पात्र संध्याकाळच्या प्रकाशात गडद होत चाललं होतं. एखाद्या समुद्रासारखं ते पात्र अफाट पसरलं होतं. पुढे दिसपूर मधली असम सरकारची कार्यालयं दिसायला लागली. हे दिसपूरच असमचं राजधानीचं शहर आहे. पुराणकाळातलं प्रागज्योतिषपूर. पुर्वी कधीतरी वाचलेले संदर्भ आठवायला लागले. पुढे उजव्या बाजूला कामाख्या देवस्थानाकडे जाणारी कमान दिसली. गोव्याला जे कामाक्षीचं मंदिर आहे त्याचं हे मुळ पीठ. आता दुतर्फा झाड झाडोरा वाढू लागला. तो नोहेंबर महिना होता. हवेत बराच गारवा होता. हिमालयाच्या पुर्वरांगांमधून आमचा प्रवास सुरू होता. संधीप्रकाशाला जास्त संधी न देता आता काळोखाचं साम्राज्य सुरू झालं. दाट जंगलातून वळणं घेत गाडी चालली होती. अभयारण्याचा भाग सुरू झाला आणि ‘जंगली हत्तीं पासून सावध रहा’ असे फलक दिसायला लागले. जंगली हत्ती रस्त्यावर आले की सगळी वाहतूक थांबवली जाते. रात्रीच्या वेळी या जंगलातून प्रवास करणं धोक्याच आहे म्हणूनच तर मघाशी रेसिडेंट कमिशनरच्या कार्यालयातील बाईंना आमची काळजी वाटली होती.

काझीरंगाच्या मुख्य गेट समोरून एक सफाईदार वळण घेवून गाडी पुढे गेली आणि थोड्याश्या उंचवट्यावरील बोनानी लॉज समोर थांबली. गुवाहाटीपासून १९० किलोमीटर एवढा प्रवास करून आम्ही मुक्कामाला पोहोचलो होतो.  दिवस असता तर बाहेरचा रम्य देखावा पाहाता आला असता. असो पुढचे बारा-तेरा दिवस तो न्याहाळणारच होत. रात्रीचे नऊ वाजत होते. स्वागत कक्षात व्यवस्थापक श्री. सैकिया आमच्या स्वागताला तयारच होते. अगदी हात जोडून त्यानी आमचं स्वागत केलं. आधी जेवून घ्या, नंतर बोलू असं म्हणून त्यानी आमची रवानगी डयनींग हॉल मध्ये केली. जेवणं झाल्यावर पुन्हा सैकियांशी बोलणं झालं. एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे त्यानी आमची विचारपूस केली. दुसर्‍या दिवशी पहाटेच्या सफारीची सोय करून दिली आणि माझ्या पुढच्या प्रवासाबद्दलचे सर्व प्रश्न ऎकून घेतले व दुसर्‍या दिवशी सगळी सोय करून देतो निश्चिंत रहा असं आश्वासन दिलं. सैकियाना भेटल्याने माझा सगळा ताण हलका झाला. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ अशी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा त्यानी सार्थ ठरवली होती.               

                          

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates