16 October, 2014

माजोरडे


काल मतदान झालं आणि आता महाराष्ट्रात सत्तेवर कोण येणार यासाठी १९ तारखेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. भाजपला पुर्ण बहूमत की...?  असा प्रश्न असताना प्रचारादरम्यान शिवसेनेच्या नेतृत्वाने जे वक्तव्य केलं ते ‘माजोरडे’ या एकाच शब्दात जोखता येईल.

उत्तर प्रदेश, बिहारच्या पोटनिवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यापासूनच सामनामधून भाजपला कमी लेखण्याचे, टोमणे मारण्याचे, घालून पाडून बोलण्याचे उद्द्योग सुरू झाले आणि शेवटी मोदींचा ‘बाप’ काढण्यापर्यंत मजल गेली. या सगळ्या प्रचारात मातोश्री म्हणजे रायगड, उद्धव ठाकरे म्हणजे शिवाजी महाराज, निवडणूका म्हणजे अफजलखानाची भेट असं चित्र उभं करण्यात आलं. शिवसैनिक म्हणजे बाघनखं, कोथळा काढू, अफजलखानाची फौज, दिल्लीवरून स्वारी, हत्तीची सोंड कापून काढू (अमित शहांना उद्देशून), दिल्ली की बिल्ली, शिवसेनेशी फारकत म्हणजे हिंदुत्वाची काडीमोड, अशी खालच्या पातळीवरची आणि असंबद्ध टिका करण्यात आली. आदिलशहा, कुतूबशहाला लोळवला तसा अमितशहाला लोळवू आणि भांडी घासायला लावू अशी भाषा केली गेली. मोदींना ‘चायवाला’ म्हणून हिणवलं गेलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडायला निघालेत म्हणून खोटा प्रचार केला. मुख्य म्हणजे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसला विरोध न करता भाजप एक नंबरचा शत्रू म्हणून आरोळी ठोकली. एका अर्थी त्यांचाच प्रचार केला.      

भाजपने विश्वासघात केला, खंजीर खुपसला अशी टिका शेवटपर्यंत करीत असताना आपण निवडून आल्यावर काय करणार हे सांगायला ते विसरले, मराठी गुजराती वाद निर्माण करून समाजात नसलेली तेढ निर्माण केली, मुंबईतले उद्योग गुजरातमध्ये नेले जात आहेत अशी ओरड करून आपण महापालिकेत सत्ता असतानाही साधे खड्डेमुक्त रस्ते देवू शकत नाही याचा त्यांना विसर पडला. भारतातल्या पाच राज्यांपेक्षा जास्त अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेची सत्ता वीस वर्षाहून जास्तकाळ उपभोगूनही नागरी सुविधांची बोंब असताना राज्य पुन्हा आमच्या ताब्यात द्या असं हे लोक कसं म्हणू शकतात? मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणत असताना आपलं उत्पन्न आणि उद्योग याची वाच्यता न करण्याची काळजी घेतली. महाराष्ट्रात विरोध आणि तिकडे दिल्लीत मंत्रीपद शाबूत ठेवण्याची कसरत करताना दुटप्पीपणा केला. कोणतही कर्तृत्व नसताना आपला बाळबुद्धीचा मुलगा नेता म्हणून लादताना घराणेशाहीचा दुसर्‍यावर केलेल्या आरोपाचा विसर पडला. पंतप्रधान दिल्ली सोडून प्रचाराला का येतात असं विचारत असातानाच दहा वर्षापुर्वीची बाळासाहेबांची चित्रफित दाखवून मतांचा जोगवा मागितला.    


एकूण काय शिवकाळानंतर बराच काळ निघून गेला आहे, चौथीच्या पुस्तकानंतर इतिहास आहे हेच यांना माहीत नाही. मतदार मुर्ख नाही हे निकालात कळेलच. वानर्‍याच्या सभेत गुडघ्यावर आलेच आहेत पुढे किती दांभिकपणा करतात ते दिसेलच.    
  

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates