24 January, 2015

वसंत पंचमी

आज वसंत पंचमी.  माघ शुक्ल पंचमी. मदनाची जन्म तिथी. वैवाहिक जीवन आनंदाचं आणि सुख समाधानाचं व्हावं म्हणून आज त्याची पुजा केली जाते. तो आज रतीसह पृथ्वीवर भ्रमंती करायला येत असतो.

आजचा दिवस म्हणजे ऋतू बदलाचा दिवस. पानझडीतून आलेली मरगळ दूर करून सृष्टी एक नवं रुप घेत असते. तसं ते रुप नित्य नवंच असतं. या रुपालाच खरं तर नमन केलं पाहिजे. रोजच्या रोज उगवणारा सुर्य तोच असला तरी रोजच्या उषेचे रंग वेगळे, पालवीचे पालटत जाणारे रंग; आकार वेगळे, पक्षाची भरारी वेगळी आणि त्याने दिलेली तानसुद्धा नवोन्मेषी. हे सृष्टीचं रुप पालटणारी शक्ती, तीच पुजनीय. तीच वंदनीय, पण तिकडे पहायला आपणाला वेळ तर हवा किंवा वेळ खुप असला तरी थोडं बाहेर डोकावून पहायची तसदी तरी घेतली पाहिजे.  


रोजच्या रोज उमलणारी फुलं तीच असली तरी त्यांचं उमलणं किती आल्हादकारी असतं. ते उमलणं एकदा पाहिलं म्हणजे झालं, पुन्हा पुन्हा तेच काय पहायचं असं कधी होतं का? हेच चिरंतन आहे. त्याचा उत्साह आज पुन्हा एकदा नव्याने सुरू होत आहे. रंगांची नवी उधळण पुन्हा एकदा होत आहे, होवू घातली आहे. बघा या छायाचित्रातलं आकाश काल असं होतं. आज तेच आकश अगदी वेगळं होतं. हाच सृष्टीचा नियम आहे. ते क्षण धरून ठेवता येणारच नाहीत आणि म्हणूनच नित्य नव्याने येणार्‍या  क्षणाचा उत्सव केला पाहिजे. आज वसंत पंचमीच्या दिवशी बाहेर तो सुरूही झाला आहे. जरा बघाना रंगोत्सव सुरू झाला आहे. .                                    

12 January, 2015

आनंदाचं झाड


या मोहराला किती फळं लागणार आहेत हे काळच ठरवेल पण त्या आधी हे मोहरणं अत्यावश्यक आहे. गेल्या मोसमात हे झाड मोहरलं नव्हतं. तेव्हा त्याची तशी दखलही कुणी घेतली नव्हती, पण आता ते मोहरलं आणि त्याचं कोण कौतूक सुरू आहे. हे मोहरणं महत्वाचं.

हा उल्हास खुप महत्वाचा आहे. मनंसुद्धा अशीच मोहरून आली पाहिजेत. म्हणजे मग सगळ्या वातावरणात आनंदाची कारंजी उडू लागतात. तो उत्साहं मग उत्सव होवून जातो. त्याला कारण लागत नाही, असलच तर ते मोहरणं हेच कारण असतं. नमामनात वसंत ऋतू फुलू लागतो आणि मन मस्त डोलू लागतं. वार्‍याच्या एका झुळूकीबरोबर या मोहराचा सुगंध आसमंत भरून टाकतो आणि मग त्याचा प्रत्येक कण आनंदाचं एक नवं कारंजं बनतं.

भिरभिरणारी पाखारं मग आपसूकच या इकडे आकर्षली जातात. या मोहरावर बागडू लागतात आणि इथला आनंद टिपून तो दूरवर वाटायला लागतात. किती वाटला तरी न संपणारा हा आनंद प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणी त्याकडे चित्रं म्हणून पाहतो, कुणी स्वत:च मोहरून जातो तर कुणी त्याची धुंदी अनुभवतो. म्हणून हे मोहरणं महत्वाचं.    

हे मोहरणं पाहून मनपाखरूही डोलू लागतं, शीळ घालू लागतं आणि मग हलकं होवून उडू लागतं. या मोहरण्याने सगळं जडत्व निधून जातं आणि मगच पिसारा फुलतो. हाच तो मनमोराचा पिसारा. किती दिवस फुललाच नव्हता. या फुलण्यासाठी हे मोहरणं अत्यावश्यक असतं.
     
या आनंदाला मग गोड फळं लागतात. त्याचाही सुगंध सर्वदूर पसरतो. पुन्हा पक्षी येतात, गोड फळं खातात. पुन्हा एकदा आनंदाच्या या झाडाची बिजं सगळीकडे पसरतात आणि परत एकदा एका नव्या मोहरण्यासाठी झाडं जन्म घेतात. म्हणूनसुद्धा हे मोहरणं महत्वाचं.                   

मोहराआड दडली पाने
मोहरून गेली मने
सुगंधीत झाली वने
मोहरापायी 

08 January, 2015

किरण पुरंदरेंची धम्माल शीळ


Kika profile
दिवसभराच्या कामाचा थकवा क्षणार्धात दूर करणारी शीळ काल ऎकली आणि एरवी या आनंदाला आपण का मुकतो असा प्रश्नही पडला. मुळात निसर्गाचाच एक भाग असलेले आपण त्याच्यापासून एवढे दूर जातो की मग अरे! हे रोज आपणाला साद घालत असतं हे ही विसरून जातो. मॅजेस्टिक गप्पांमध्ये काल किरण पुरंदरेंची मुलाखत होती. ‘सखा नागझिरा’ पासूनची त्यांची ओळख काल आणखी दृढ झाली. हा माणूस पक्षांशी बोलतो एवढं माहित होतं पण काल त्यांची सुभग, नाचण, गरूड, पोपट यांच्या आवाजातली शीळ ऎकली आणि थक्क झालो.वानरांच्या नेत्याचा 'भद्या' चा आवाज 

जंगल, पक्षी, प्राणी हे तर आपणाला नातेवाईकांहून ही प्रिय आहेत असं सांगताना लहनपणापासून आपण त्यांच्या प्रेमात कसे पडलो याचा सगळा पट किरण पुरंदरेंनी काल उलगडवून दाखवला आणि निसर्ग प्रेम म्हणजे काय याचा साक्षात्कार घडवला. नागझिर्‍याचे चारशे दिवस, तिथे घडलेले वाघीणीचे दर्शन, मग थरकाप उडवून देणारा जंगलचा माहोल,  भल्यामोठ्या अस्वलीणीचं तीच्या पिलावळीसह घडलेलं दर्शन, यांचं प्रत्ययकारी वर्णन ऎकताना अंगावर रोमांच उभे राहिले. खरंच हा माणूस आपल्याला  आवडेल त्या प्रकारेच आपलं आयुष्य जगला. किती वेगळे अनुभव त्यांनी घेतले. व्यंकटेश माडगूळकरांपासून सालीम अली पर्यंत निसर्ग प्रेमींचा त्यांना लाभलेला सहवास सगळंच जाणून घेताना प्रथमच गाव सोडून मुंबईला आल्याचं वैशम्य वाटलं.


अस्वलाचा आवाज

भूतदया दाखवण्यासाठी पक्षांना खावू घालू नये, त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर होतोच पण कबूतरासारख्या पक्षांचा त्रासच माणसाला जास्त होतो आणि कबूतरांच्या विष्ठेत वीस हून जास्त विषाणू असतात, जे दम्यासारख्या रोगाला आमंत्रण देतात. अशोकासारखी निरुपयोगी झाडं लावण्यापेक्षा काटेसावर, पळस आणि पांगारा ही झाडं लावावीत. काटेसावर ज्याला शाल्मली असंही नाव आहे त्या झाडावर साठ पेक्षा जास्त पक्षी येतात. भारतीय झाडं लावल्यानेच इथल्या पर्यावरणाला त्याचा फायदा होणार आहे.

सुभगाशी केलेला संवाद

  
 

01 January, 2015

खुशी


दिसा मागूनी दिसही गेले
वर्षा मागूनी वर्षे
खेळत होतो पिटूकल्यांसवे
अंतरंगीच्या हर्षे

खुशीत होतो तेव्हा मी पण
आजही रमतो तसा
बागडण्याचे वय सरले पण
लहान होतो कसा!

गम्मत जम्मत मस्ती आणि
थोडा रुसवा फुगवा
रेखा रेषांमधे गुंफीतो
आयुष्याचा ठेवा

कुठे गोठले ते सुंदर क्षण
छायाचित्रांतूनी
अजून ओली आहे आठव
खुशी खुशी होवूनी  
 

(माझे परम मित्र श्री. महेश भिवंडीकर आणि चि. खुशी यांचा एक फोटो फेसबूकवर पाहिला आणि ही कविता सुचली.) 
नरेंद्र प्रभू
०१/०१/२०१५


     

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates