12 January, 2015

आनंदाचं झाड


या मोहराला किती फळं लागणार आहेत हे काळच ठरवेल पण त्या आधी हे मोहरणं अत्यावश्यक आहे. गेल्या मोसमात हे झाड मोहरलं नव्हतं. तेव्हा त्याची तशी दखलही कुणी घेतली नव्हती, पण आता ते मोहरलं आणि त्याचं कोण कौतूक सुरू आहे. हे मोहरणं महत्वाचं.

हा उल्हास खुप महत्वाचा आहे. मनंसुद्धा अशीच मोहरून आली पाहिजेत. म्हणजे मग सगळ्या वातावरणात आनंदाची कारंजी उडू लागतात. तो उत्साहं मग उत्सव होवून जातो. त्याला कारण लागत नाही, असलच तर ते मोहरणं हेच कारण असतं. नमामनात वसंत ऋतू फुलू लागतो आणि मन मस्त डोलू लागतं. वार्‍याच्या एका झुळूकीबरोबर या मोहराचा सुगंध आसमंत भरून टाकतो आणि मग त्याचा प्रत्येक कण आनंदाचं एक नवं कारंजं बनतं.

भिरभिरणारी पाखारं मग आपसूकच या इकडे आकर्षली जातात. या मोहरावर बागडू लागतात आणि इथला आनंद टिपून तो दूरवर वाटायला लागतात. किती वाटला तरी न संपणारा हा आनंद प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणी त्याकडे चित्रं म्हणून पाहतो, कुणी स्वत:च मोहरून जातो तर कुणी त्याची धुंदी अनुभवतो. म्हणून हे मोहरणं महत्वाचं.    

हे मोहरणं पाहून मनपाखरूही डोलू लागतं, शीळ घालू लागतं आणि मग हलकं होवून उडू लागतं. या मोहरण्याने सगळं जडत्व निधून जातं आणि मगच पिसारा फुलतो. हाच तो मनमोराचा पिसारा. किती दिवस फुललाच नव्हता. या फुलण्यासाठी हे मोहरणं अत्यावश्यक असतं.
     
या आनंदाला मग गोड फळं लागतात. त्याचाही सुगंध सर्वदूर पसरतो. पुन्हा पक्षी येतात, गोड फळं खातात. पुन्हा एकदा आनंदाच्या या झाडाची बिजं सगळीकडे पसरतात आणि परत एकदा एका नव्या मोहरण्यासाठी झाडं जन्म घेतात. म्हणूनसुद्धा हे मोहरणं महत्वाचं.                   

मोहराआड दडली पाने
मोहरून गेली मने
सुगंधीत झाली वने
मोहरापायी 

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates