12 May, 2015

निरंतर

इंदापूरच्या आकार पॉट आर्ट चे कल्पक कलाकार राजेश कुलकर्णी यांचं  ‘निरंतर’ हे प्रदर्शन मुंबईत मांडण्यात आलं आहे. सदर प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, (ऑडीटोरीयम हॉल), एम. जी. रोड, काळा घोडा, मुंबई ४०० ०२३  येथे दिनांक १२ ते १८  मे  २०१५ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कला रसिकांना विनामुल्य खुलं राहील.

राजेश कुलकर्णी यांनी साकार केलेल्या या कलाकृती पाहिल्यावर फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार या गाण्याच्या ओळी सहज ओठावर येतात, पण इथला वेडा कुंभार मात्र परंपरागत कुभार नाही. राजेश कुलकर्णी यांना समोर पाहिल्यावर ते कॉर्पोरेट ऑफिसमधले अधिकारी वाटतात, पण त्यांनी कुंभाराच्या चाकावर केलेली अदाकारी पाहिली की थक्क  व्हायला होतं. या कलावंताने मातीला हात लावला की बघता बघता  समोरची माती पणती, मडकी, चंबू, घडा, नरसाळे असे अनेक आकार घ्यायला लागते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा गणनायक, तो गणपती त्या मधून प्रकट होतो. या सगळ्या कलाकृती पाहताना आणि राजेश कुलकर्णी यांच्या कडून या कले विषयी ऎकताना  मन हलकेच गावाकडे निघून जातं.

 
पेण, जवळचच माणगाव ही तर कलाकारंचीच भुमी. गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असलेला इलाखा हळूहळू शहरीकरणाने व्यापून जात असतानाच आणि इथले मुळचे कुंभार आपला व्यवसाय सोडून ऊपजीविकेसाठी इतर व्यवसायात गुंतले असताना राजेश कुलकर्णीनी मातीत हात घातला आणि त्यातून सोनं निर्माण केलं. आपल्या सोबत गावातील दहा-बारा तरूणांना त्या कलेचं बाळकडू पाजून तयार केलं आणि गावातच स्थिरस्थावर केलं. गाव आणि गावच्या मातीमध्ये ते भक्कमपणे उभे आहेत.
हे प्रदर्शन पाहताना आपण आपसूकच त्या मातीच्या प्रेमात पडतो. मोठी माणसं गतकाळच्या गावच्या आठवणीत रममाण होतात, इंदापूरच्या आकार पॉट आर्ट मध्ये उपलब्ध असणार्‍या कलाकृती आता या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांनी प्रदर्शनात मांडलेल्या छोट्या कलाकृती तर केवळ अप्रतिमच.

                            

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates