23 May, 2015

सांगला


काल्पा, रिकॉंग पिवो मागे टाकत पुन्हा राष्ट्रीय महामार्ग २२ वरून सांगला-छितकूलकडे वळलो आणि त्या दुर्गम प्रदेशातला आणखी दुर्गम भाग सुरू झाला. सतलज आणि बास्पा नदीच्या पाण्यावर या भागात ठिकठिकाणी जल विद्युत प्रकल्प उभारले आहेत. त्या प्रकल्प क्षेत्रात असणारीच काही बांधकामं वगळता या भागात फारशी वस्ती नाही आणि म्हणून बांधकामंही नाहीत.
      

हिमालयामधल्या रस्त्यांवर सर्व सुरळीत चाललं असताना ‘सुहाना सफर और यह मौसम हसी’ असं वाटत असलं तरी एखादा कडा कोसळण्याने ही पुढची सगळी वाहतूक बंद होवू शकते. काल्पाहून सांगला गावात निघतानाही त्याची शक्यता जास्त होती. पहाटे लवकर निघण्यापेक्षा दहा वाजताच निघावं हा चालकांचा सल्ला मी ऎकायचं ठरवलं. त्याचा प्रत्ययही लगेच दोन तासात आला. वाटेत एका 
जलविद्युत प्रकल्पासाठी बांधलेल्या पुलावरून गाडी पुढे गेली आणि तिथे बंदोवस्तासाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी आमच्या गाड्या थांबवल्या, गाडी वळवून मागे नेण्याची खुण हाताने केली. पुढे भली मोठी दरड कोसळून सांगला गावाकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. गाड्या मागे वळवून नदीपल्याडच्या रस्त्यावरून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की ती दरड नसून एक टेकाडच कोसळलं होतं. तिथे रस्ता असल्याची खुण मिटवणारी ती माती बघताना काल्पाच्या हॉटेलच्या मॅनेजरची आठवण झाली. सकाळी उठल्यापासून सांगलाचे रस्ते चालू आहेत ना? याची खात्री करून निघा असं तो पुन्हापुन्हा सांगत होता. आता लक्षात आलं त्याच्या म्हणण्याला आधार होता. तरी नशीब पर्यायी मार्ग उपलब्ध होता नाही तर मागे फिरावं लागलं असतं. दहाच दिवसांपुर्वी नेपाळला आलेल्या भुकंपाची आठवण झाली, कोडारीला भुकंपाचं केद्र होतं. दोन वर्षापुर्वीची कैलास-मानसरोवरची यात्रा आठवली. ते कैलास आणि हे किन्नौर कैलाश नावात जसं साम्य तसं परिस्थितीतही. सांगला, पुढे छितकूल हे भारत तिबेट सिमेवरचं भारताच्या बाजूचं शेवटचं गाव पुढे मानवी वस्ती नाही पर्वत ओलांडल्यावर तिबेटची सिमा सुरू होते. तिबेटच्या कोडारीकडच्या बाजूला जोरदार भुकंपाचे धक्के बसून होत्याचं नव्हतं झालेलं आणि इकडे छितकूलच्या बाजूला आम्ही उभे होतो.


इथे हिमालयात फिरताना बघायचे असे ठरावीक स्पॉट नसतात. सगळाच प्रवास एक देखावा बनून समोरून सरकत असतो. इथे जर एखादी डुलकी काढली तर काहीतरी नक्कीच चुकणार.
पर्वत, दर्‍या, नद्या, धबधबे, शिखरं, देवदार, सुचिपर्णी वृक्ष हे सगळीकडे असले तरी ठिकठिकाणंचं सौदर्य वेगळं, दृश्य वेगळी. म्हणून तर एकदाका तुम्ही हिमालयात गेलात की त्याचेच होऊन जाता, मग प्रदेश कुठला का असेना, हिमालय आपल्याला बोलावतच राहातो. पाचुच्या रंगाचे पर्वत लख्ख उन्हात न्हाऊन निघाले होते. तशी पुर्णप्रवासात नारकांड्याची एक सर तेवढी सोडली तर आकाश स्वच्छ होतं. प्रवास उत्तम चालला होता.

किन्नौर कॅम्प्स
गाडी सांगला गावात आली, छोटीशी वस्ती, सात-आठ ईमारती आणि त्यात थाटलेली दुकानं, तेवढा बाजार पार करून गाड्या पुढे गेल्या. ‘किन्नौर कॅम्प्स’ हे आमचं वासतव्याचं ठिकाण अजून पाच किलोमीटरवर होतं. एक अवघड वळण घेवून गाड्या उताराला लागल्या आणि  किन्नौर किन्नौर कॅम्प्सच्या तंबूंजवळ वरच्या बाजूला थांबल्या. किन्नौर कॅम्पसचे श्री. नेगी स्वागताला हजर होतेच, सर्वांच्या गळ्यात मानाचा स्कार्फ घालून त्यानी आमचं स्वागत केलं. नैसर्गीक साधनांचा उत्तम वापर करून उभारलेला जेवणासाठीचा भला मोठा मंडप पाहूनच त्यांच्या कल्पकतेची आणि ‘अथिती देवो भव’ची कल्पना येत होती. दोन दिवसाच्या आदरतिथ्याने त्यानी ती खरी करून दाखवली.
 
बास्पा नदीच्या खळाळत्या प्रवाहाकाठी असलेला किन्नौर कॅम्पस म्हणजे हिमालयचा मनमुराद आनंद लुटायचं उत्तम ठिकाण आहे. सहलीचा चांगला मार्ग पोटातून जातो, तिथे पोटोबा खुश असायचा. सगळ्या तंबूंकडे धावपळ करणारी मोजकी माणसं असूनही व्यवस्था चोख होती. चहू बाजूनी पर्वत शिखरानी वेढलेला तो परीसर, पक्षांचा किलबिलाट  आणि बास्पाचा खळाळता प्रवाह मन शांत करण्यासाठी अगदी योग्य जागा.
ही अशी जागा शोधणं हे ही तेवढंच महत्वाचं. माझा मित्र आत्माराम परब हा या बाबतीतही उजवा ठरतो. सहलीत आपण कुठे राहतो यावरून त्या सफरीचं यश बर्‍याच अंशी अवलंबून असतं. आत्माने हे ठिकाण शोधलं म्हणून मनातल्या मनात त्याला धन्यवाद देत मी बास्पाच्या प्रवाहाकडे वळलो. ही पण आत्माची खासीयत, जगात कुठल्याच ठिकाणी तो अनोळख्या सारखा वागत नाही. जणू काही सगळ्या वाटा त्याने आधीच धुंडाळल्या आहेत. बास्पा नदीचा तो प्रवाह आणि नदी काठची ती जागा कायम स्मरणत रहाण्यासारखी आहे. नदीच्या दोन्ही काठांना भल्यामोठ्या देवदार वृक्षांनी वेढलं आहे. खळातता प्रवाह सोडून आपली तपस्या भंग करायला तिथे कुण्णी म्हणून नसतं.



कामरू फोर्ट
सांगलाच्या जवळच असलेला तिबेटी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे कामरू फोर्ट. सांगला व्हॅलीच्या पार्श्वभुमीवर उठून दिसणारा हा पुरातन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या किल्ल्याच्या तीसर्‍या मजल्यावर विराजमान झालेल्या कामाक्षी देवीच्या मुर्तीमुळे आता जुना इतिहास मागे पडून ते कामाक्षी देवीचं मंदीर बनलं आहे. हा पुरातन किल्ला असला तरी आजही तिथलं नक्षीकाम शाबूत आहे. याच किल्ल्याच्या आवारात पंधराव्या शतकातलं बद्रीनाथ मंदीरही आहे तसंच मुख्य प्रवेश द्वारावर बुद्धाचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. छायाचित्रणाच्या दृष्टीने महत्वाची सांगलाव्हॅली, तीचं प्रसन्न करणारं लॅन्डस्केप आणि त्या परीसरात उठून दिसणारा कामरू फोर्ट फोटोग्राफर आणि  चित्रकार यांना हवातसा वाव देणारंच हे ठिकाण आहे. 


भारत तिबेट सीमेवरचं शेवटचं छितकूल हे गाव पाहिल्याशिवाय सांगलाची सफर पुर्ण होऊ शकत नाही. मोजकीच घरं असलेलं हे गाव निसर्गसौदर्याने वेढलं आहे. अगदी मे महिन्यातही तिथे बर्फात खेळण्याची मजा लुटत येते. बास्पा नदीचा निळा प्रवाह, वनरायी आणि शुभ्र  बर्फाच्छादीत शिखरं पाहून आपल्या देशात किती आणि काय काय फिरण्यासारखं आहे  याची कल्पना येते. त्या छोट्याशा गावात फेरफटका मारला तेव्हा तिथल्या जोरदार प्रवाहावर चालणार्‍या पिठाच्या गिरणीचं दर्शन घडलं. नैसर्गीक साधनसंपत्ती आणि स्त्रोत यावरच तिथलं जीवन अवलंबून आहे. चार पाच तासांच्या ट्रेकिंगला जाणार्‍यांना ही जागा योग्य अशीच आहे. दगड आणि लाकूड यांचा वापर करून बांधलेली इथली घरं आणि मंदीरं पाहून या भागाच्या वेगळेपणाची कल्पना येते.



परत निघण्याआधी भल्या पहाटे उठून तासभर फेरफटका मारल्यास पुढच्या कित्येक पहाट त्या आठवणींनीच नक्कीच सुखकारक होतील.    





किन्नौर कॅम्पसचे सूसज्य तंबू  















       

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates