27 June, 2015

विरले आक्रंदन


पुन्हा एकदा फुटून पालवी झाडे हिरवी झाली
पुन्हा एकदा तरू-लतांना आली नवी झळाळी

पुन्हा एकदा मृदू मुलायम झाली काळी आई
पुन्हा एकदा फुटल्याकोंबासाठी गाते ती अंगाई

पुन्हा एकदा माळावरती हिरवाईची गर्दी
पुन्हा एकदा मल्हाराची आली वरून वर्दी  

पुन्हा एकदा अमृत मंथन शेता शेतातून
पुन्हा एकदा आस उद्याची येते मातीतून  

पुन्हा एकदा तुडुंब भरले खळे-तळे आंगण
पुन्हा एकदा अदृष्यातच गेले तारांगण


पुन्हा एकदा दुथडीभरून वाहे इथली नदी
पुन्हा एकदा तुफान लाटा उठती दर्यामधी

पुन्हा एकदा धावून गेले जलदापुढती मन
पुन्हा एकदा विरून गेले सगळे आक्रंदन 

नरेंद्र प्रभू

२१/०६/२०१५  


21 June, 2015

पाऊस कधी चाsssअडतो


पाऊस कधी चाचपडतो
कधी पडतो असा उताणा   
करी पाणी-पाणी सगळ्यांचे
तो वाहून गेला बाणा
पाऊस कधी चाsssपडतो

दौर्‍यात न्याहाळी गटारे
सफाई फक्त हातांची
मग गटारगंगा आली
‘मिठी’ बसली का रे दातांची ?
पाऊस कधी चाsssपडतो

चापात अडकला वाघ
पन्नाशीची ती डरकाळी
चिरक्या आवाजाचीही
ती वेळही चुकून गेली   
पाऊस कधी चाsssपडतो

पाऊस कधी चाsssडतो
किती वर्षे झाली इथली
पाण्यात अडकली दुनिया
ही तुझीच ना रे खेळी ?
पाऊस कधी चाsssडतो

माजल्या उरावर तुझीया
पेटून उठो मतदार
तो असा पडो पाऊस
तू नको पुन्हा येवूस
पाऊस कधी चाsssपडतो




15 June, 2015

इज्जत


आपली समाजात किती इज्जत आहे, किंबहुना असावी यासाठी सगळेचजण सजग असतात. आपल्या इज्जतीला धक्का लागू नये म्हणून प्रयत्न करतात. जर एखद्याने सर्वांसमोर आपली अक्कल काढली किंवा घालूनपाडून बोलला तर आपल्याला आपल्या इज्जतीचा फालूदा होतोय असं वाटून समोरच्याचा खिमा करण्याची तिव्र इच्छा होते. घराण्याची इज्जत, मुलीची इज्जत, स्त्रीची इज्जत, हल्ली लग्नाच्या बाजारात मुलाची इज्जत असे इज्जतीचे अनेक प्रकार आहेत. जो तो आपापल्या परीने ती सांभाळण्याचा प्रयत्न करतो. एकूण काय प्रत्येकजण आपल्या समजानुसार आपल्या इज्जतीला जपण्याचा प्रयत्न करतोच करतो.

अगदी लहानपणापासून घरी आई आणि शाळेत शिक्षक आपल्याला कसं वागावं याचे धडे देत असतात आणि मुलं सर्वाथाने शहाणी होवून आपला आणि आपल्या घराण्याचा पर्यायाने समाजाचा उत्कर्ष कसा  होईल यासाठी प्रयत्न करीत असतात. मित्रहो... नमनाला घडाभर पाणी ओतल्यावर मी आता इज्जतीवर येतो. त्याचं काय झालं आज पार्ल्यात लोकमान्य सेवा संघाच्या पु.वि. भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्रातर्फे श्रीमती हर्षला चांदोरकर (Sr. Vice President, CIBIL) यांचं वैयक्तिक पत मानांकन (Credit Rating) या विषयावर व्याख्यान होतं. फार आधीपासूनच तुमचं क्रेडीट किती आहे यावर तुमची इज्जत अवलंबून असते. 

वाहन, घर कर्ज, क्रेडीट कार्ड इ. कारणासाठी प्रत्येक व्यक्तीचं ‘पत मानांकन’  बॅंका किंवा संबंधीत संस्था तपासत असतात. तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं हे तपासताना बॅंक तुमचं क्रेडीट रेटींग किती आहे याचा दाखला मिळवते आणि नंतरच कर्ज मंजूर करायच का? किती रक्कम द्यायची ? की कर्ज द्यायचंच नाही हे त्या दाखल्यावरून ठरतं. कोण देतो हा दाखला?

Credit Information Bureau (India) Limited किंवा CIBIL ही संस्था हे काम गेल्या पंधरा वर्षांपासून करीत आहे. कुणी बॅंकेकडून कर्ज घेतलं, क्रेडीट कार्ड घेतलं, फोन कनेक्शन घेतलं की कर्जाचा हप्ता, फोनचं बिल किंवा क्रेडीट कार्डची देय रक्कम वेळेत भरली जाते किंवा कसं याची माहिती त्या त्या संस्था वेळोवेळी सिबिलला कळवत असतात. या नोंदींची योग्य वर्गवारी करून सिबिल प्रत्येक व्यक्तीचं पत मानांकन करून त्याला मार्क देत असते. कधीतरी चुकवलेला कर्जाचा हप्ता, क्रेडीट कार्डचं न केलेलं पेमेंट किंवा फोनचं न भरलेलं बिल आपली बाजारातली पत घालवू शकतं. आणि तुम्ही जर वेळेवर रक्कम अदा करीत असाल तर आपल्याला चांगलं पत मानांकन प्राप्त होवू शकतं.

सिबिलकडे पाचशे रुपये भरून तुम्ही तुमचं मानांकन तपासू शकता. नोकरीला लागताना किंवा लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधी असा दाखला समोरच्याने मागितला तर आता नवल वाटायला नको. तेव्हा मित्रहो...,  यह इज्जत का मामला है। सिबिल सगळं बघतंय, तेव्हा इज्जतीला धक्का लागू देवू नका.          

07 June, 2015

पाऊसवेळा


रिमझिमत्या अंबरात आता
पाऊसवेळा आल्या ग
कृष्णपिसारा फुलवीत सार्‍या
घन घनमाला झाल्या ग

क्षणात गेले उष्ण उसासे,
तप्त धरेवर धारा ग
कुणी फिरवला रंगमंच हा,
कुठून आला वारा ग

न्हावून गेले घर, धरणी, तरू,
धावून आल्या धारा ग
नाचत आले तुषार ओले
कुणी छेडल्या तारा ग ।

कातर झाले मन अवघे अन
कातरवेळा झाल्या ग ।
कितीक पाऊस असे झेलले,
हळव्या झाल्या राना ग ।

असाच तुफान करतो पाऊस,
मनात माझ्या सारा ग ।
रिमझिमत्या अंबरात आता
पाऊसवेळा आल्या ग

नरेंद्र प्रभू

०७/०६/२०१५

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates