29 September, 2015

या वाटेवर, त्या वाटेवर


पारल्यातला दोन वर्षांचा निसर्ग सहवास संपवून आता जायचा दिवस जवळ येतोय, इथल्या निसर्गाची आठवण निरंतर येत राहील.

प्राजक्ताची फुले सुगंधी
इथल्या वाटांवरची धुंदी
कधीच सरला इथला वावर
या वाटेवर या वाटेवर

धुळीत मस्ती करीती चिमण्या
डौलाने जणू फिरती राण्या
चालेल उद्याही खेळ बरोबर
या वाटेवर या वाटेवर

तारेवर झोके घेते मैना
मधूनच उडती राघू राना
मारून भरारी लांब दूरवर
या वाटेवर या वाटेवर

शीळ सुरांची मंजूळ मैफिल
इथे गातसे सुरेल कोकीळ
बहरेल प्रेम ते आम्रतरूवर
या वाटेवर या वाटेवर

आभाळाचा रंग निराळा
असतो इथल्या कितीक वेळा
धावेल उद्याही मेघ धरेवर
या वाटेवर या वाटेवर

येईल चिमणा पक्षी अवचीत
तरुशिखरावर बसेल ऎटीत
हसून करीन मी त्याचे स्वागत
त्या वाटेवर, त्या वाटेवर

नरेंद्र प्रभू

२७-०९-२०१५  

27 September, 2015

निरोप


निरोप...., ही गोष्टच संमिश्र भावभावनांनी ओथंबलेली असते. आपल्या प्रिय जनांचा निरोप घेताना होणारी घालमेल, गावचा निरोप घेताना तो पार, वड-पिंपळ, वळणा-वळणाचा रस्ता, स्वर्गरोहणासाठी असल्या सारख्या रामेश्वराच्या पायर्‍या, खळाळणारे ओहळ, खेळवणारं मंदीर, भावईचा तलाव, आणि कुडाळचा स्टॅँडही. या सगळ्यानीच केव्हाना केव्हा मन हेलावून टाकलं आहे. पण पुढे जाताना या सर्वांचाच कधीना कधी निरोप हा घ्यावाच लागतो. असे दोन डोळ्यात वेगवेगळे भाव आणणारे अनेक निरोप आजपर्यंत घ्यावे लागले.

ही मनात घर करून राहिलेली घरं हा हळू-हळू आनंदाचा ठेवा होवून जातात, पुन:प्रत्ययाचा आनंद देत रहातात. हा देवचाफा मला कित्येकवेळा माझ्या गावी घेवून गेलाय, मारुतीच्या देवळासभोवती जेव्हा पालखी फिरायची तेव्हा गुलालासारखा सुगंध देणारे याचे वडीलबंधू बालपणी मला भेटायचे त्या विस्मृतीत गेलेल्या गोष्टी यानेच पुन्हा ताज्या केल्या. आईच्या हातची बाई रेगेने दिलेल्या नीरफणसाची भाजी इथल्या नीरफणसाने पुन्हा भरवली. अमृताच्या बिजातून उगवलेले  इथले प्राजक्त तर आजवरच्या सगळ्या वाटांवरच्या प्राजक्ताचं संमेलन मनात भरवतात. इथली रातराणी कोल्हापूरच्या राजवाड्यातली सायंकाळ पुन्हा जिवंत करते. मुंबईसारख्या शहरात, निवासी वस्यात अभावाने आढळणारी इवलीशी रानफुलं हात हालवताहेत. इथलं आभाळही वेगळं, गच्चीवर धाव घ्यायला लावणारं.              
हिमालयाच्या कुशीत विसावलेलं ‘मनाली’ असो की नवभूमी असलेलं ‘लडाख’, किन्नौर व्हाली असो की अरूणाचलचं ‘तवांग’ या सागळ्यांचा निरोप घेताना पुन्हा येईन अशी आस मनात असते. पण काही ठिकाणं अशी असतात की ती जवळ असली तरी आपण पुन्हा तिथे जावून तेच विसाव्याचे क्षण शोधू शकत नाही. हे ठिकाण तसं आहे. आता निरोप घेतल्यावर पुन्हा ती खिडकी, तिच्यातून डोकावणारा मी किंवा तो गुलमोहर, पक्षांचा किलबिलाट, ती माझी मैत्रिण झालेली खारूताई,  कैर्‍या देणारे हे आम्रतरू, ही सगळीच झाडं पुन्हा भेटणार नाहीत. हळद्या, तांबट, चिऊताई, सनबर्ड, राघू, मैना, धोबी, नाचण, कोकीळ-कोकीळा असे कितीतरी पक्षी पुन्हा कुठे ना कुठे दिसतील तेव्हा पुन्हा मला इथली आठवण येईल. पहाटेचा किंवा सकाळचा चिवचिवाट तर अप्रतिम. हे मधूर संगीत ऎकायला पुन्हा इथे येणे नाही. या सगळ्यांनी खुप शिकवलं.                  

शाळेतले आवडते शिक्षक नाही का असेच मागे ठेवून आपण पुढच्या वर्गात जातो. पुढे गेलंच पाहिजे, आठवणींचा हा पुलिंदा बरोबर घेवून.  

22 September, 2015

भिकेचे डोहाळे आतातरी पुरे


“अंथरूण पाहून पाय पसरावेत’, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, अशा म्हणी आणि ‘नको देवू पैसा अडका’ असली गाणी यांवरच मराठी पिंड पोसला गेला आहे. एवढंच नव्हे तर स्वत: धनाढ्यांच्या थैलीकडे डोळे लावून बसलेले मराठी राजकारणीही मराठी माणसाला मात्र वडापाव आणि चपराशाची नोकरी यापुढे न्यायला तयार नाहीत. पैसा हा मराठी माणसाचाही ‘लोकाधिकार; आहे हे मराठी माणसाला कळेल तो सुदि. लोकसत्ताच्या अर्थवृतांतमध्ये जयंत विद्वांस यांचा म्हणे, आपण अर्थ साक्षर!’ हा मराठी माणसाच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. आपण तो जरूर वाचावा.

पारल्याच्या लोकमान्य सेवा संघात चालवल्या जाणार्‍या Investment Guidance Cell ला एकदा तरी भेट द्या. बचतीचे धडे आतातरी गिरवा.       
                
लोकसत्ताच्या अर्थवृतांतमधला लेख:  

मराठी माणसांमध्ये पूर्वापार श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. बुद्धिमत्ता व कष्ट याद्वारे आíथक सुबत्ता येईल व ती मराठी समाजाला पतदेईल. मात्र यासाठी आपल्या पुढच्या पिढय़ांना प्रयत्नपूर्वक आíथक साक्षर बनविले गेले पाहिजे.
आपल्यावर पिढय़ान् पिढय़ा साक्षरतेचे संस्कार झाले आहेत. परंतु आíथक साक्षरता आपल्या डीएनएमध्ये आलेलीच नाही. त्यामुळेच मराठी माणसांमध्ये श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंताबद्दलही विचित्र दृष्टीकोन आढळून येतो. आता पुढची पिढी शिक्षण, नोकरी धंद्यानिमित्ताने परदेशी जाऊ लागली आहेत. त्यामुळे हळूहळू हा दृष्टीकोन बदलत चालला आहे इतकेच. या आíथक निरक्षरतेपायी मराठी समाज म्हणून आपल्याला पतनाही.

वैयक्तिक आíथक पत या बद्दल मी म्हणत नसून संपूर्ण मराठी समाजाची पत म्हणत आहे. ही पत असेल तर समाजाच्या उन्नतीसाठी किंवा मराठी समाजासाठी खूप काही करता येणे शक्य असते. साधे उदाहरण बघा, महाराष्ट्रात ज्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण देता येईल असे असंख्य समाजसेवक आहेत परंतु त्यांना पद्मश्रीवर समाधान मानावे लागते किंवा पद्मश्रीसुद्धा मिळालेली नाही. याचे कारण आपली दिल्ली लॉबी नाही(पत नाही). आपली जी काही थोडीफार मराठी म्हणून पत असते ती आपण रोजच्या दिवसांत तोंडात पोळ्या कोंबून घालवून बसतो.

हे सर्व आज आठवण्याचे कारण? पर्युषणकाळांत मांस विक्रीवर घातलेली बंदी. ही बंदी जैन लोकांची आíथक पतदाखवते. आज महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास तेरा कोटी आहे. त्यापकी एक शतांशसुद्धा जैन नाहीत पण त्यांच्यासाठी पर्युषणकाळात मांस विक्रीवर बंदी. याच काळात आपला गणपती उत्सव असतो, आणि बहुसंख्य समाज गौरीला नवेद्य मासांहारी दाखवत असतो, तरीही बंदी!
आज सर्व पंचतारांकित हॉटेलात जैन पदार्थ मिळतात. पंचतारांकित हॉटेलात भरलेल्या मोठय़ा परिषदात जेवणाची सोय जैन पद्धतीत असतेच असते. समजा नसेल, तर ‘‘जैन फूड नहीं है क्या?’’ म्हटल्याबरोबर दोन माणसांसाठी सुद्धा जैन जेवणाची सोय केली जाते. हे सर्व त्यांच्या आíथक शक्तीमुळे होते. पुरणाची पोळी मात्र कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात मिळत नाही.

या आíथक सुबत्तेपायी जैन समाजाने काय काय मिळविले, मिळवीत आहेत याची उदारहणांनाही तोटा नाही. काही महिन्यांपूर्वी एका मोठय़ा उद्योगपतीने सांगितले होते की एका राजकीय पक्षाचे दुकान आम्हीच चालवतो. पण वस्तुस्थिती अशी आहे आज हा जैन समाज सर्वच दुकाने चालवत आहे. हे सर्व आíथक सुबत्तेद्वारे चालू आहे. या उलट आपली आíथक सुबत्ता काहीही नाही व वाचाळपणा मात्र सुरू आहे. परिणाम चार पकी तीन दुकानदारांची तोंडे बंद झाली आणि चौथ्यासाठी आता हा विषय संपलेला आहे.

ज्यावेळेस आपण समाजाची पत किंवा समाजाची श्रीमंती म्हणतो त्यावेळेस त्या समाजातील प्रतिष्ठित चारशे-पाचशे अब्जाधीश डोळ्यांसमोर येतात, जे आपल्या समाजासाठी आपली पत उभी करतात. अशी चार-पाचशे मराठी माणसे संपूर्ण महाराष्ट्रात दिसतात का? मग तुमची दिल्लीत काय तुमच्या राजधानीतसुद्धा पत राहिल का? यासाठी ‘‘कानाखाली’’ची भाषा उपयोगाची नसते. तर त्यांच्या शस्त्राला (श्रीमंतीला) तुमच्या त्याच शस्त्राने (श्रीमंतीने) उत्तर द्यायचे असते.

जैन समाज म्हटला की आपल्यासमोर फक्त गुजराती समाज येतो. मारवाडी जैन, संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकात विखुरलेला, स्थानिक भाषा आणि आडनावे धारण केलेला जैन समाज आपल्या डोळ्यासमोर येत नाही. आज मुंबईतील व्यापार प्रामुख्याने जैन समाजाच्या ताब्यात आहे, (व कष्टकरी व्यावसायिक उत्तरेतील आहेत.) म्हणजे नोकरी करणारे जैन नाहीत असे नाहीत. ते ज्या ठिकाणी आहेत तेथे वरचढच आहेत. वॉरेन बफेचा उत्तराधिकारी जैन आहे तर भारतातला सर्वात श्रीमंत भिकारी भरत जैन आहे.( याच्या नावावर मुंबईत दोन घरे व दोन भाडय़ाने दिलेली दुकाने आहेत.)
जैन समाजाने मिळवलेली श्रीमंती त्यांच्या क्षेत्रातील ज्ञानामुळे व कष्टामुळे मिळवलेली आहे. मुंबईतील एल अँड टी कंपनीला पूर्वी चेष्टेत लार्सवानी टुब्रमणीयम म्हणत असत. तिथे मराठी टक्का वाढला पण कष्ट करण्याची वृत्ती नसल्याने पवईची मोक्याची जागा सोडून कारखाना केरळ व गुजरातमध्ये हलवणे चालू झाले.

यासाठी उपाय काय? आपल्या पुढच्या पिढय़ांना आíथक साक्षर बनवू या. बुद्धिमत्ता व कष्ट याद्वारे आíथक सुबत्ता येईल व ती मराठी समाजाला पतदेईल. मुलांना लहानपणापासून आíथक शिक्षण द्या. आपल्या मागच्या पिढय़ांमधील हा भाग बदलू या. हे आíथक शिक्षण कोणत्याही शाळा कॉलेजांत मिळत नाही, याचे क्लासेस नाहीत. आपल्या मुलांसाठी तुम्हीच वेळ बाजूला काढा व हे शिक्षण द्या.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सिक्युरिटीज् मार्केट (सेबीचा एक उपक्रम) मार्फत शाळा कॉलेजमध्ये आíथक विषय शिकवण्यासाठी अभ्यासक्रम बनविला गेला आहे. पाचवी/सहावीपासून हा विषय शिकवता येतो. पुस्तके फुकट दिली जातात. शिक्षकांना शिकवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. सेबी, रिझव्‍‌र्ह बँक, आयआरडीए, शेअर बाजार सर्वानी काही हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करून ठेवली आहे. पण शिक्षक हा विषय, शिकवण्यास तयार नाहीत. काही शाळांमध्ये शिक्षकांजवळ बोलल्यावर कळले, ‘‘चार-चार महिने उशिराने पगार मिळतो, त्यात हे नवीन झेंगट आमच्या मागे कशाला?’’

नव्याने निवडून आलेल्या शिक्षणमंत्र्यांनाही भेटलो. या विषयाची दोन पुस्तके व पत्र दिले. एक महिन्यानंतर एका ओळीचे उत्तर आले – ‘‘आपला अर्थ शिक्षणाबाबतचा विचार अभ्यास समितीसमोर ठेवण्यात येईल.’’ धन्यवाद.’’

म्हणजे महाराष्ट्रात नव्याने १५-२० शेरेगर, शेळ्या-मेंढय़ा पाळणारे, सागाची झाडे लावणारे येऊन जनतेला फसवत नाहीत तोपर्यंत हा विषय आमच्या अजेंडय़ावर नाही.

ज्ञानगंगा दारात येऊन उभी आहे. त्यासाठी पसा, शैक्षणिक पुस्तके सर्व तयार आहे; पण तिला घरात घ्यायला कोणी तयार नाही. मग यावर उपाय काय? सर्व पालकांनी एकत्र येऊन, पालक सभेमध्ये हा विषय मांडणे गरजेचे आहे. आज आपण मुलांना सर्व प्रकारचे क्लासेस लावतो. शिक्षकाऐवजी आपण हा विषय शिकून घेऊन (ऐच्छिक विषय म्हणून) गटागटाने आपल्या पाल्याच्या वर्गातील सर्व मुलांना रविवार किंवा सुटीच्या दिवशी शिकवणे गरजेचे आहे. घरातील आजी-आजोबा या उपक्रमात मदत करू शकतात. असे पालक किंवा शाळा तयार झाल्यास त्यांना सर्वप्रकारे मदत करण्यास / मिळवून देण्यास मी तयार आहे. चला आपल्या पुढच्या पिढीला ही पतयेण्यासाठी आजपासून झटूया.
लेखक सेबीद्वारा नोंदणीकृत सल्लागार आहेत.

sebiregisteredadvisor@gmail.com

14 September, 2015

कोकणचा गणेशोत्सव


लोकप्रभा अंकामधून प्रसिद्ध झालेला माझा लेख :


कोकणात घरोघरी साजरा होणाऱ्या अमाप उत्साह, आनंद भरलेल्या गणेशोत्सवामध्ये कोकणाला सांस्कृतिक पर्यटनाच्या नकाशात जागतिक पातळीवर नेऊन ठेवण्याची ताकद आहे. हा उत्सव ही सांगण्याऐकण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे.

कोकणात अमाप उत्साहात साजरा करण्यात येणारा सण म्हणजे गणेश चतुर्थी. ‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. इतर प्रांतात गणरायाच्या आगमनाबरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणसाच्या मनात तसा पावसाळ्याबरोबरच सुरू होतो. आपल्या घरात यंदा येणारी गणपतीची मूर्ती कशी असावी यावर खल केला जातो. कॅलेंडरवरचं उत्तम चित्रं अगदी जपून ठेवलेलं असतं आणि या वेळी गणपतीच्या शाळेत अशी हुबेहूब मूर्ती बनवायला सांगायची असा गुप्त बेत घरची वरिष्ठ मंडळी आखतात, तेव्हाच पोरासोरांना येणाऱ्या गणेशोत्सवाचे वेघ लागलेले असतात. या आराध्य दैवताचा कोकणातला रुबाबच काही और असतो. आता कोकणी माणूस पूर्वीसारखा चाकरमान्यावर अवलंबून नसला तरी फार पूर्वीपासून चाकरमानी आणि गावचा त्याचा परिवार गणपतीसाठी काय वाट्टेल ते, अशाच मन:स्थितीत असायचा. आजही हा गणपतीच सर्वाना एकमेकांजवळ आणतो. कोकणातली गणेश चतुर्थी हा आबालवृद्धांसाठी अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो.

गणपतीच्या शाळेत घराघरांतून नागपंचमीपर्यंत गणपतीची मूर्ती ठेवायचे पाट पोहोचलेले असतात आणि मग शाडूच्या मातीला आकार येऊ लागतो. कारागिराचे कसलेले हात लीलया फिरू लागतात आणि शाळेत एक एक मूर्ती अवतरायला लागते. गणपतीच्या मूर्ती बनवण्याची ही निर्मिती प्रक्रिया न्याहाळण्यात शाळकरी मुलांना खूपच आनंद मिळतो आणि त्यांच्यावर मूर्तीकलेचे संस्कार नकळत होत जातात. शाडूचा मूर्तीवर शेड आणि मग होणारं रंगकाम एवढं सफाईदारपणे केलं जातं की त्या मनोहारी मूर्तीसमोरून पायच निघत नाही. कोकणातल्या या गणपतीच्या शाळा ही खरी तर कलामंदिरं आहेत. मुंबईसारख्या शहरात चिनी गणेश मूर्तीची आवक झालेली दिसते, पण कोकणात अजूनही पारंपरिक पद्धतीने गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात.

इकडे गणपतीसाठी घराघरांतही भिंती रंगवल्या जातात. मातीच्या भिंतींना कोकणच्या लाल मातीचा मुलामा चढवला जातो तर गणपतीच्या खोलीतली भिंत रंगवणं हा बालगोपालांचा आवडता कार्यक्रम असतो. देखण्या देखाव्यांनी भिंती सजतात. नक्षीदार वेलबुट्टीने त्यावर अखेरचा हात फिरवला जातो. आता चतुर्थी अगदी जवळ आलेली असते. माटवीला सजवण्यासाठी रानफुलं, वेली, नारळ, सुपारीपासून काकडी अशा अनेक गोष्टी एकत्र केल्या जातात आणि माटवी सजते. मखराच्या कलाकुसरीचं काम करण्यात येतं. गणपतीला विराजमान होण्यासाठी चौरंगाची जागा, दारातून थेट दर्शन होईल अशी निवडली जाते. आता गणपतीचं स्वागत करायला मन अगदी अधीर झालेलं असतं.

श्रावणातली सोनपिवळी उन्हं रंगांचा उत्सव साजरा करायला लागतात तेव्हा कोकणातला निसर्गही नेत्रसुखाची उधळण करायला ठेवणीतले रंग घेऊन आधीच तयार असतो. पावसाचा जोर जरा ओसरलेला असतो आणि आकाशात काळ्या ढगांची जागा इंद्रधनूने घेतलेली असते. शेतीची कामं आता थोडी कमी झालेली असतात, कापणीच्या हंगामाला अजून अवकाश असतो. रंगीबेरंगी रानफुलांनी धरणी सजलेली असते. वाऱ्याच्या झोक्यावर डुलणारी हिरवी शेतं मखमलीचा भास निर्माण करीत असतात, पण हे सर्व थोडं नजरेआड कतरच मंडळी शेतीच्या बांधावरून लगबगीने गणपतीच्या शाळेकडे निघालेली असतात. नारळ आणि बोलीचे पैसे मूíतकाराच्या हातावर ठेवून मूर्ती उचलली जाते. बाहेरच्या अंगणात अगरबत्ती लावून झपझप पावलं टाकत तरणा गडी गणपती घेऊन वाडीकडे निघतो, घराच्या अंगणात येताच त्याच्या पायावर पाणी ओतून मूर्तीला आत घेतलं जातं. सुतळी बॉम्बचा बार उडवला जातो. तुळशीजवळ उदबत्तीचा सुगंध दरवळायला लागतो. तिथेच अंगणात शेजारचा माणूस त्या मूर्ती आणणाऱ्याला आपल्या गणपतीची मूर्ती आणण्यासाठी आपल्याबरोबर न्यायला आलेला असतो. सगळ्या अवाठातल्या (वाडीतल्या) मूर्ती आणण्याचं काम करणाराही तसा कसबीच म्हणायचा, पावसाळ्यात निसरडय़ा वाटेवरून मूर्ती आणणं हे फार जोखमीचं काम असतं.

हरितालिका पूजनात गृहिणी व्यस्त असतानाच शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून शहाळं-केळं भेट म्हणून आलेलं असतं. मनातल्या मनात त्याची परतफेड ठरवत असतानाच अनेक कामांचा उरक कसा करावा असा प्रश्न तिला पडलेला असतो, पण गणपतीच सगळं यथासांग पार पाडणार हा आत्मविश्वासच तिला बळ देत असतो. त्यातच चाकरमान्यांचं आगमन होतं. सकाळपासून त्यांच्या वाटेकडे डोळे लागलेले असतात. पण ते घरी पोहोचल्याशिवाय काही खरं नसतं. गेल्या वर्षी आदल्या दिवशी पोहोचणारा तो चतुर्थी दिवशीही आला नाही हा अनुभव तिच्या गाठीशी असतो. कोकण रेल्वे आणि परिवहन महामंडळाच्या गाडय़ा अव्याहत धावत असल्या तरी काही वेळा दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो आणि मग चतुर्थीची आरती मंडळीना वाटेतच जिथे असतील तिथे करण्यावाचून गत्यंतर नसतं. असा सगळा व्याप झाला तरी त्याचा उत्साह काही कमी झालेला नसतो. उलट पुढे वर्षांनुवर्षे सांगण्यासाठीचा एक किस्सा त्याला मनोमन सुखावून टाकतो.

घरोघरी गणपतीच्या मूर्ती आलेल्या असतात. मुलाबाळांचा जल्लोश सुरू असतो. उद्यापासून ‘भजनाक जावक व्हया’ म्हणून काही लोक पेटी, तबला, मृदुंग, टाळ, झांज यांची जुळवाजुळव करीत असतात. या वर्षी कुणाकडे किती दिवस गणपती राहाणार याचा अंदाज देवळात जमलेली मंडळी घेत असतात. त्याप्रमाणे रोज करण्याच्या भजनांचं आणि आरतीचं नियोजन त्यांना करायचं असतं. इथे पेटी वाजवणारा आणि ती उचलून घरोघरी नेणारा यांची विशेष खबर काढली जाते. तो पूर्ण दिवसांसाठी उपलब्ध आहे ना याची खातरजमा केली जाते. तबल्यावरची शाई या वर्षीही तशीच उडालेली आहे म्हणून कटाक्ष टाकले जातात. ‘जावदे पुढच्या वर्षांक काय तरी व्हयाच नाय?’ असं म्हणून तो विषय संपवण्यात येतो. शेवटी वाडीतल्या घरांचा क्रम ठरतो, वेळेवर हजर राहण्याची तंबी दिली जाते. ‘सकाळी भटजी लवकर इले पुरे’ म्हणत त्या बैठकीची सांगता होते.

भल्या पहाटे उठून आंघोळ करून फुलं, तुळशी, दुर्वा काढल्या जातात. सगळीकडे अमाप उत्साहाचं वातावरण असतं. गणपतीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठापना केली जाते. पूजा आटोपल्यावर सजावटीकडे विशेष लक्ष पुरवलं जातं. उकडीच्या मोदकांचा आणि सुग्रास भोजनाचा दरवळ सगळ्याच घराघरांतून येत असतो. अख्खं कोकण खऱ्या अर्थाने हा सण साजरा करीत असतं. महाराष्ट्रात इतरत्र दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी कोकणात मात्र गणेश चतुर्थीलाच होते. त्या अर्थाने इथे चतुर्थीतच दिवाळी साजरी केली जाते. घरोघरी गणरायाला षोडशोपचारे पुजलं जातं. विजेच्या तोरणांची आरास मांडली जाते. सत्यनारायणाची महापूजा केली जाते. पाहुणे, मित्र-मंडळी यांची सतत ये-जा सुरू असते. याच दिवसांत करंज्या, मोदक, पंचखाद्य, लाडू असे फराळाचे पदार्थ घरी बनवले जातात. अगदी सगळ्या घरात हमखास गोडाधोडाचे पदार्थ बनवण्याचे वर्षांतले हेच दिवस असतात. भजनाला येणाऱ्यांत मंडळींसाठी खास उसळीचा बेत आखला जातो. जिकडे बघावं तिकडे उत्सव सुरू असतो. प्रत्येक माणूस चैतन्याने भरून गेलेला दिसतो.

अनेक रूढी आणि परंपरा यांचं पालन करण्यात कोकणातला देवभोळा माणूस चुकत नाही. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये हे माहिती असलं तरी चुकून वर नजर गेली आणि चंद्र दृष्टीस पडलाच तर मात्र तो बेचैन होतो. मग कुणाच्या तरी परडय़ातली भाजी गुपचूप तोडून तो त्या दोषाचं परिमार्जन करू पाहतो. या उत्सवात दिवस आणि रात्रही कमी पडते. बाजारपेठा उशिरापर्यंत उघडय़ा असतात. अनेकानेक वस्तूंनी दुकानं खचाखच भरलेली असतात. नव्या कपडय़ांची खरेदी केली जाते. मुलाबाळांची चंगळ होते. या दिवसात शाळेलाही सुट्टी असते.

गणेशोत्सवाच्या दिवसात कोकणात अशा प्रकारे मंगलमय वातावरण असतं. जगात अनेक उत्सव साजरे केले जातात, पण कोकणात साजरा होणारा हा उत्सव अगदी आगळावेगळा असाच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याला बराच काळ होऊन गेला, असं असलं तरी पर्यटनाच्या दृष्टीने या उत्सवाकडे म्हणावं तसं लक्ष पुरवलं गेलं नाही. पर्यटनाच्या दृष्टीने या सणाचा विचार केल्यास या उत्सवाला जागतिक महत्त्व प्राप्त होऊ शकतं. प्रत्येक घरात आरास केलेले देखावे, पारंपरिक भजनं, मेळे, फुगडय़ा, खेळ, संगीतबारी, कोकणी पदार्थाची रेलचेल, देखण्या मूर्ती, जुन्या पद्धतीची घरं यामुळे या दिवसात इथे येणाऱ्याला वेगळ्याच वातावरणाची अनुभूती घेता येईल.

हरितालिकेपासून गणपती विसर्जनापर्यंतच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं आणि त्या त्या दिवशी ते ते सर्व सोपस्कार अगदी मनोभावे पूर्ण केले जातात. पंचमी दिवशी दीड दिवसाचे गणपती जातात. त्याच दिवशी ऋषिपंचमी साजरी केली जाते. अळू, कंदमुळं आदी पाच भाज्यांची चविष्ट भाजी त्या दिवशी बनवली जाते. उंदरबी असल्याने उंदराला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. याच दिवसात गौरींचं आगमन होतं. गौरी पूजन आणि विसर्जनाचा सोहळा यथासांग पार पाडला जातो. काही गणपतींचं विसर्जन गौरीसोबतच केलं जातं. अकराव्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशी दिवशी सर्वच गणपतींचं विसर्जन होतं. विसर्जनाच्या वेळी आरती केल्यावर गणपतीला गाऱ्हाणं घातलं जातं. नवस बोलले जातात. गाऱ्हाणं, ते घालण्याची पद्धत हा खरा तर कोकणातला सांकृतिक ठेवाच आहे. एवढं सगळं झालं की गणपतीच्या हातावर दही ठेवलं जातं. एका माणसाने गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन जाण्याएवढं त्या मूर्तीचं वजन असतं. वाजतगाजत गणपतीची मिरवणूक काढली जाते. फटाक्यांची आतषबाजी होते. गावातल्या तलावाजवळ किंवा विहीर, ओढय़ाजवळ वाडीतले गणपती विसर्जनासाठी एकत्र आणले जातात. अनेक देखण्या गणेश मूर्ती, धूप, अगरबत्तीचा घमघमाट, संधिप्रकाशातला उजेड, निरांजनांचा मूर्ती उजळून टाकणारा प्रकाश आणि भावनांचा कल्लोळ अशा वेगळ्याच वातावरणात पुन्हा एकदा मनोभावे आरती केली जाते. पंचखाद्यं, नारळ, फळं यांनी युक्त असा प्रसाद वाटला जातो. खूप जड अंत:करणाने गणरायला निरोप दिला जातो. जिवलगाने दूरदेशी निघून जावं तशी माणसं हेलावतात. पण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ म्हणणारा चाकरमानी पुन्हा एकदा गावाला राम राम करून मुंबयकडे वळतो तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच. वर्षभरात गणपतीच्या दिवसात वाडीमधली, गावातली सर्व घरं सदोदीत सगळ्यांसाठी उघडीच असतात. या दिवसात कुणाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. सगळ्या गावाचं एक मोठ्ठं कुटुंबच एकत्र नांदत असतं. मंगलमय सुरांच्या साथीने, मोहक सुगंधात न्हाऊन निघालेली घरं, वाडय़ा, गावं अपार श्रद्धा आणि आनंदाने ओतप्रोत भरलेली दिसतात. घराघरांत दिमाखात साजरा होणारा हा सण प्रत्येक कोकणवासीयांचा सांकृतिक ठेवाच आहे.
नरेंद्र प्रभू 

11 September, 2015

वळणावरती


हा लपाछपीचा खेळ वळणा वळणावरती
तू दिसता दिसता गायब होशी वळणावरती
क्षण हाती आला निसटूनी गेला वळणावरती
किती धोके तिकडे टपून बसले वळणावरती

संपेल यातना पुढच्या त्या वळणावरती
मग का थांबावे? चालत जावे वळणावरती
हि संपून गेली निराशाच या वळणावरती
कधी कुढत होतो मागल्याच त्या वळणावरती

किती भव्य-दिव्य अन अथांग सागर वळणावरती
भेटीच्या त्या आतूर लाटा वळणावरती
ही चाहूल मज लागली मागल्या वळणावरती
मी गात जातसे पुढल्या पुढल्या वळणावरती


नरेंद्र प्रभू 

05 September, 2015

श्रीकृष्णा येशील ना तू ?
श्रीकृष्णा येशील ना तू ?
संभवामी युगे युगे,
असं तू म्हटलं होतंस.
धर्माच्या रक्षणासाठी तू पुन्हा अवतरणार होतास.
मला वाटतं श्रीकृष्णा तो दिवस आलाय रे.
ही बघतोस ना तूझी भावंडं!
तो कंसच यांची हत्या करतोय,                                                   
तुझ्यासारखा यांना नाही प्रवाह पार करता आला.
या मुलाचा, आयलानचा वसुदेव याच्या बरोबर असतानाही नाही.
कदाचीत डोक्यावरच्या पाटीत तू नव्हतास; म्हणून असं घडलं असेल.
पण शेवटी याचा प्राण गेलाच ना?
खरंच कंस आज मातलाय रे.
तूझी किती तरी भावंडं अशी हकनाक मरताहेत.
तुझ्या त्या युगात कंस एकच होता.
आज ते अनेक आहेत.
अमेरीकेच्या बुश ने हे हत्याकांड सुरू केलं.
आता इसिसचे कंस ते करताहेत.
तिकडे भारताच्या सिमेवरही असंच चाललंय़.      
ही बालंकं फुलण्याआधी कोमेजताहेत.
सगळीकडे अधर्माचंच राज्य आहे बघ.
म्हणून म्हणतो; तो दिवस आलाय रे !
आज तुझ्या जन्मदिनी तुला हे साकडं आहे.
घेशील ना पुन्हा जन्म,  येशील ना तू ?
  
    

     

02 September, 2015

स्वप्न उरातले
इथे कोवळ्या रातीला, स्वप्ने घेऊन उद्याची
वाट चालताना नसे, भिती गाढ काळोखाची

असो भयाण काळोख, असो अनोळखी वाट
तिथे दूर माझ्यासाठी, असे सानुली पहाट

वर रात रातभर, जसे तारेही फिरती
खाली पायाला भिंगरी, खाच-खळगे नी माती

कधी सापडते वाट, कधी वाट हरवते
काही पाहतो म्हणता, सारे दिसेनासे होते

ठेचाळतो अध्ये-मध्ये, पाय चोळामोळा होई
तरी उद्याचे सपान, मला पुढे पुढे नेई

अशी रात ‘ही’ सरेल, झुंजूमुंजूही होईल
स्वप्न उरातले माझ्या, क्षितीजाशी उमलेल

नरेंद्र प्रभू
०२\०९\२०१५

               

01 September, 2015

निज रुप


(परमस्नेही सौ. रेखा भिवंडीकर आणि अरुण आंबेरकर यांचं ‘कलासिद्धि हे चित्र, शिल्प प्रदर्शन पाहिल्यावर सुचलेलं गीत)


किती रुप रंगी, तुला पाहतो मी
आणिक अभंगी गात असे
अनंत आकार एकच उकार
तुझे निज रुप त्यात दिसे

तुझ्या या कळांना नाही रे उपमा
काय अनुपम साज असे
चौसष्ट कलांचा तुच अधिपती
विद्येचा सांगाती आद्य असे

देखणे ते रुप, रंग आणि रेषा
तुच परमेशा ठायी ठायी
अखंड व्यापशी कलासक्त मन
त्याची परिणीती आज होई

०१-०९-२०१५
नरेंद्र प्रभू
 


LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates