27 June, 2016

पाऊस झिम्माड झिम्माड झाsssला
थेंब टपोरे नाचत येती
फेर धरोनी वाssरा
तरु-वेली या नर्तन करिती
अखंड झेलत धारा
पाऊस झिम्माड झिम्माड झाsssला   
पाऊस झिम्माड झिम्माड झाsssला

प्रचंड लाटा उसळत सागर
तुफान घेऊन येss
अविरत गरजे घोष तयाचा
तमा कुणाची नाही
मासोळ्यांचे थवे सोबती
चांदीचाच पसाssरा 
तरु-वेली या नर्तन......

सैरावैरा पाणी वाहे
थारा त्याला नाssही
कोसळती धबधबे सारखे
पूर दुधाला येई
हिरवी झाली अवघी धरती
आनंदच हा साssरा  
तरु-वेली या नर्तन......

नरेंद्र प्रभू


   


11 June, 2016

पाऊस आला आला रे !
नील नभातून झरते पाणी
पाऊस आला आला रे
मोर पिसारा फुलवित सार्‍या
वनात नाचता झाल रे

चमकत विज ही वरून आली
गगन भेदीते सारे रे
गडगडूनी ढग फुटून गेले
वर्षावाची हाळी रे  

गुरे वासरे चौखूर उधळूनी 
सैरावैरा झाले रे
ओलेत्याने पक्षी बघती
कुठे आसरा आहे रे

झर झर पागोळ्यांच्या धारा
जमीन ओली झाली रे
बघता बघता ओहळ भरूनी
दौडत दौडत आले रे

आभाळाचे देणे आहे
धरतीसाठी लेणे रे
नील नभातून झरते पाणी
पाऊस आला आला रेनरेंद्र प्रभू 

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates