17 November, 2016

स्वरांचा जादूगार – सत्यजित प्रभूमहाराष्ट्रा मंडळ न्युयॉर्क, अमेरीका यांच्या स्नेहदीपदिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख     
’मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ असं म्हणतात. ही म्हण खरी ठरवणार्‍या एका मुलाचे पाय मात्र मी पाळण्यात पाहिलेत, त्या पुढे आयुष्यभर जेव्हा कधी त्याचं वादन, गप्पा ऎकण्याचं भाग्य लाभलं तेव्हा मौजच मौज अनुभवत आलो. पेटी (हार्मोनियम), त्याच्या न कळत्या वयात ती त्याच्या हातात आली आणि तो त्याच्याही नकळत सप्तस्वरांच्या या जादूयी नगरीत प्रवेश करता झाला. 

सत्यजित प्रभू, दिड वर्षाचा असताना त्याचे हात हार्मोनियमच्या भात्याकडेही पोहोचत नव्हते पण सुरांवर मात्र बोटं लिलया फिरत असत, ऎकणारे अवाक होत, बोटात जादू होती. या व्यासंगी वादकाने सुरांशी पक्की दोस्ती केली किंबहुना ते त्याच्या आतच होते म्हणाना. दिवसोंदिवस सुरांमध्ये डुंबत असताना तो व्यासपीठाचा अधीपती कधी झाला हे त्यालाच समजलं नसावं. याची सुरूवात त्याच्या बालवयातच झाली. एकदा असाच पाचवीत असताना सत्यजित आपल्या आई बरोबर तिच्या फोर्टमधल्या कार्यालयात चालला होता. फोर्टच्या फुटपाथवर कि-बोर्डची अनेक खोकी मांडलेली दिसत होती. सत्यजितच्या नजरेतून ते कि-बोर्ड सुटत नव्हते. त्या कि-बोर्डवर हात आजमाऊन बघण्याची त्याला अनिवार इच्छा झाली. शेवटी त्याने आईला ही गोष्ट सांगितली. त्यांचा मोर्चा त्या फुटपाथवरच्या दुकानात वळला. अनेक कि-बोर्ड तपासून सत्यजितने त्या पैकी एक पसंत केला. तिथल्याच एका मोडॅक्या स्टुलवर बसून त्याचं बजावणं सुरू झालं. ‘मेरा जुता है जपानी’ पासून सुरूवात झाली आणि त्या बालकाचं कौशल्य पहायला आणि गाण्याच्या सुरेल धुन ऎकलायला तिथे शंभरावर माणसांची गर्दी जमा झाली. सत्यजित ते वाद्य घेऊन आईच्या कार्यालयात गेला. त्याने ते पुन्हा तपासून पाहिलं, वाजऊन पाहिलं आणि त्या कि-बोर्डच्या मर्यादा त्याला जाणवू लागल्या. या किबोर्ड पेक्षा सरस कि-बोर्ड सत्यजितने तिथे त्या दुकानात पाहिला होता. त्याने ती गोष्ट आईला सांगितली. महागडा कि-बोर्ड घेतला तरी मी त्याची किंमत नक्कीच वसूल करीन असा आत्मविश्वास सत्यजितला होताच. दुसर्‍या दिवशी पुन्हा मंडळी त्या दुकानात पोहोचली आधी एक हजारला घेतलेला कि-बोर्ड परत करून ६००० रुपयांचा कि-बोर्ड घेऊन सत्यजित घरी आला. त्या कि-बोर्डकडून त्याने शक्य ते सर्व वसूल केलं. त्याची सर्व फिचर्स वापरून त्याने ऎकणार्‍याचे कान तृप्त केलेच. आज त्याच सत्यजितला जगातल्या सर्व कंपन्यांचे उत्तम कि-बोर्ड वश झाले आहेत.                                       

हिर्‍याचं तेज लपून रहात नाही तसं सत्यजितचं वाजवणं वाखाणलं जावू लागलं आणि अगदी चौदा वर्षांचा असतानाच तो अशोक हांडेंच्या ‘आवाज की दुनिया’,  ‘मराठी बाणा’ अशा गाजत असलेल्या कार्यक्रमांमधून सिंथेसायझरची करामत दाखवू लागला. काही वादनाचे तुकडे तर एवढे क्लिष्ट असत की ते वाजवल्यावर लोक मानायला तयार नसत की हे आत्ता प्रत्यक्ष वाजवलं गेलय, श्रोत्यांना ती रेकॉर्डच वाटायची. मग ते पुन्हा वाजवलं की ‘क्या बात है’ हे ठरलेलं. असंच एकदा यामाहाचा सिंथेसायझर घ्यायचा म्हणून सत्यजितला घेवून अशोक हांडे मुंबईतल्या वाद्यांच्या दुकानात गेले. तिथे महागडा सिंथेसायझर विकत घेण्याआधी त्यानी तो सत्यजितला वाजवून बघ आणि पसंत असेल तर घेऊया असं म्हणाले. दुकानाचा मालक एवढी किमती वस्तू पोरसवदा मुलाच्या हातात द्यायला कबूल होईना, शेवटी हांडे आपल्या लालबाग-परळच्या खास ठसक्यात त्याला म्हणाले “अरे, यही बजाने वाला है, वही परखेगा, वह हा बोलेगा तो मै लुंगा” ही भाषा त्याला समजली. सत्यजितने वाजवायला सुरूवात केली आणि त्या मालकाची खात्री पटली की ‘काम भारी आहे.’ तिथेही गर्दी जमा झाली. लोक उभे राहून ऎकत होते, त्या वेळ पासूनच कित्येक कार्यक्रमात प्रेक्षागारात बसलेल्या प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचं कौतूक केलं आहे.

अष्टपैलू वादक आणि कुशल वाद्यवृंद संचालक असलेले सत्याजित प्रभू हार्मोनियम, सिंथेसायझर ऍकॉर्डियन आणि पियानीका ही वाद्य स्टेजवर तर वाजवतातच शिवाय मराठी-हिंदी चित्रपट संगीत तसंच जाहिरातील मोजक्या लक्षवेधी जागा त्यानी आपल्या सुरावटींनी सजवल्या आहेत. आघाडीच्या बहुतेक सर्व गायक-गायीकांना सत्यजित प्रभूंनी साथ-संगत केली असून जगभरातील अनेक मैफिली गाजवल्या आहेत. अमेरिकेत बीएमएम आणि दुबईच्या प्रेक्षकांसाठी त्यांचा ‘जादूची पेटी’ हा कार्यक्रम झाला आणि तिथल्या मंडळीनी तो डोक्यावर घेतला. भारतातही कानसेन असलेले सुजाण श्रोते त्यांना कौतूकाची थाप देण्यात जराही मागे नाहीत. अशाच एका कार्यक्रमात शिवसेना प्रमूख मा. बाळासाहेब ठाकरे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सत्यजितचं वाजवणं ऎकून मंत्रमुग्ध झाले. मध्यंतरात त्यानी सत्यजितला बोलाऊन तूझी जादूयी बोटं आम्हाला दाखव म्हणून हात हातात घेऊन त्याला शाब्बासकीची दिली. अशा घटना मग त्याच्यासाठी नित्याच्याच झाल्या. ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’ किंवा ‘अप्सरा आली’, गाणं कुठलही असूद्या सत्यजितच्या हातून ते स्वर हुबेहूब निघतात आणि टाळ्यांसाठी हात आपसूकच एकत्र येतात.

स्टेजवर गाण्यांचे किंवा वादनाचे प्रयोग चालू असताना काही वेळा अक्षरश: क्रिकेट सारखी फिल्डीग लावावी लागते असं सत्यजितचं म्हणणं आहे. अनेकदा काही वादकांकडून एखादा पिस वाजवलाच जात नाही त्या वेळी क्षणाचाही विलंब न लावता तो ताल पकडून कि-बोर्डवर तो पीस तत्काळ वाजवावा लागतो. हे सांगणं सोपं असलं तरी एवढी हुकमत गाजवण्यासाठी अभ्यास आणि साधनाही तशीच दांडगी लागते. स्वरांनी तूमच्याशी मैत्री करावी लागते. कान तयारीचे लागतात आणि प्रसंगावधान राखावं लागतं. म्हणूनच सत्यजित ‘फिल्डीग लावावी लागते’ असं त्याचं सार्थ वर्णन करतात. कान किती तयारीचे लागतात त्याचा एक किस्सा त्यानीच सांगितलेला. एकदा गोव्याच्या एका मंदिरात एका  ख्यातनाम गायकाचा कार्यक्रम चालू होता, सत्यजित साथीला होते, लोक गायनाचा आनंद लुटत होते. गायक जरा अस्वस्थच होते. काही तरी गडबड आहे असं त्यांना वाटत होतं. साऊंड, साथ सगळं ठिक होतं. तरी त्याना करमेना शेवटी त्यानी सत्याजितना विचारलं काय गडबड आहे का? सत्याजितनी सगळं व्यवस्थित चाललय असं सांगितलं, पण खरंच काहीतरी चुकल्याचं गायकाला सारखं वाटत होतं. त्यानी पुन्हा सत्यजितकडे विचारणा केली तेव्हा शेवटी “तुमच्या हातातली पेटी....!” असं सांगताच त्यानीही सुटकेचा श्वास सोडला. काही कारणाने स्वत:च्या पेटी ऎवजी तिथल्या यजमानांची पेटी (हार्मोनियम) त्या दिवशी ते गायक वाजवत होते आणि तिथेच खरी गोम होती. स्टेजवर असताना अष्टावधानी असणं किती आवश्यक आहे आणि ते कसं असावं हे सत्यजितकडून शिकावं.

सत्यजित प्रभूंना कि-बोर्ड किमयागार किंवा वाद्याव्दारे गाणारा गायक असं अनेकदा संबोधलं जातं. एक माणूस शांत संयत राहून गाण्यामध्ये किती रंग भरू शकतो ते त्यांचं वाजवणं ऎकतानाच समजतं. ‘गगन सदन तेजोमय’ या गाण्यातील व्हायोलिंस, पियानोचे स्वर ऎकताना वाद्याना गातं करणार्‍या या वादकाला सलाम करावासा वाटतो. ट्रंपेट, व्हायोलिन, पियानो, सतार, सेक्साफोन, मेंडोलिन अशी कितीतरी वाद्यांचे स्वर हुबेहूब वठवणं ही जादू नव्हे तर काय? शंकर जयकिशनचं ‘अजी रुठकर अब कहा जायीयेगा’ मधली सतार, पियानो, व्हायोलिंस यांची एकत्रीत सुरावट असो की ‘निलेनिले अंबर’ मधली गिटार असो, की ‘ओ सजना बरखा बहार आयी’ मधली सतार कुठल्याही गाण्यातला प्राण श्रोत्यांपर्यत पोहोचवण्याचं काम सत्यजित प्रभूंचा कि-बोर्ड करतोच करतो.

खुप महाग कि-बोर्ड असला की त्या बरोबर रेडीमेड खुप साऊंडस मिळतात असा प्रकार नसतो. तर ते साऊंडस वादकाला तयार करावे लागतात. मुळ वाद्याच्या जवळ जाणारे स्वर तयार केले तरच ते वादन प्रत्ययकारी असू शकतं. सत्यजित हे साऊंड तयार तर करतातच पण इतर वादकांना जर ते हवे असतील तर ते कॉपी करून द्यायला ते सदैव तयार असतात.

एकाच वेळी दोन वेगवेगळ्या सुरावटी किंवा वेगवेगळी वाद्य वाजवण्याचं कसब असलेला हा कलाकार अनेक दिग्गजांकडून वाखाणला गेला आहे. पंचमदांच्या वाद्यमेळ्यात केरसी लॉर्ड (Kerasi Lord) ऍकॉर्डीयन आणि मनोहारी सिंह सेक्सोफोन वाजवात असत हे सर्वश्रूत आहे. ‘रुप तेरा मस्ताना’, ‘ये शाम मसतानी’ या सारखी गाणी त्यांच्या सुरावटींनी अजरामर झाली आहेत. संगितकार आणि संगित संयोजक कमलेश भडकमकरांच्या स्टुडिओमध्ये ‘गुलाबी आखे’ या गाण्याचं रेकॉर्डींग करायचं होतं. ‘गुलाबी आखे’ मधला ऍकॉर्डीयन चा पिस सत्यजितनी आदल्या दिवशी स्टुडिओत वाजऊन झाला होता. दुसर्‍या दिवशी मनोहारी सिंह सेक्सोफोन वाजण्याकरीता स्टुडीओत आले, त्यानी आदल्या दिवशी झालेलं रेकॉर्डींग ऎकलं आणि ‘ऍकॉर्डीयन किसने केरसी लॉर्डने बजाया है क्या?’ असा प्रश्न केला. मनोहारी सिंहसारख्या महान कलाकाराकडून अशी दाद मिळवणं ही साधी गोष्ट नक्कीच नाही. असाच एक किस्सा सारेगमप या झी वाहिनीवरच्या कार्यक्रमामधला आहे. त्या दिवशी लक्ष्मिकांत-प्यारेलाल या संगितकारांच्या जोडीमधले प्यारेभाई परिक्षक म्हणून आले होते. गायिका ‘आ... जानेजा’ गाण गात होती त्या गाण्यातली क्लिष्ट सुरावट सत्यजितनी हुबेहुब वाजवली तेव्हा प्यारेभाईना राहावलं नाही जागेवरच उभं राहून त्यानी सत्यजितना ‘सुरेख’ अशी खुण करून दाद दिली. वानगी दाखल हे दोन प्रसंग सागितले, असे अनेक उत्कट प्रसंग या वादकाच्या वाट्याला आले आहेत. सरेगमप या झी मराठी वाहिनीवरच्या कार्यक्रमात त्यांच्या वादनाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांनी घेताना असे अनेक सुखद क्षण अनुभवले आहेतच. 

असाहा गुणी कलाकार ‘जादूची पेटी’, जिवलग प्रस्तूत  म्युZeeशियंस, आवाज की दुनिया, गाने सुहाने, अमृत लता, अजय-अतूल संगित रजनी अशा अनेक कार्यक्रमांमधून ऎकता येईलच, पण सुरेशजी वाडकर, अजत-अतूल, वैशाली सामंत या बरोबरच अनेक मराठी–हिंदी संगिताच्या कार्यक्रमात त्यांच्या वादनाचा आनंद लुटता येईल.

नरेंद्र प्रभू

                                                                                                             

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates