17 November, 2017

प्रवासवर्णन आणि पर्यटन विकास


दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या  साहित्यरंग महोत्सव  २०१७ - "प्रवासवर्णन आणि पर्यटन विकास" या ४ दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत 


काल १६ नोव्हेंबर २९१७ रोजी "विविधरंगी पर्यटन" या विषयावर

श्री नरेंद्र प्रभू : देशभक्तीपर पर्यटन विकास
श्रीमती संपदा जोगळेकर : कृषी पर्यटन
श्री नरेंद्र मेस्त्री : सामाजिक पर्यटन
श्री प्रवीण दाखवे : नाविन्यपूर्ण पर्यटन
या विषयांवर चर्चासत्र आयोजित केलं होतं.आज पासून खाली दिलेल्या कार्यक्रम पत्रिके प्रमाणे इतर कार्यक्रमाना सर्व रसिक मंडळींनी उपस्थिती दर्शवावी ही विनंती. 


प्रवेश विनामूल्य आहे. 


पर्यटन आणि प्रवासवर्णन  या विषयाला वाहिलेला हा चार दिवसांचा कार्यक्रम  दर्जेदार असून महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटन संस्था, प्रवासवर्णकार, अनोखं पर्यटन करणारे अवलीये इथे भेटणार असून त्यांच्याकडून पर्यटन विषयक माहिती मिळणार आहे.        
14 October, 2017

प्राजक्ताची फुले
प्रिय सान्वीस

प्राजक्ताची फुले दिली तू 
दरवळ त्याचा अजून येतो 
पाहीन जेव्हा प्राजक्ताला 
तुझा हासरा चेहरा दिसतो 

प्राजक्ताचा सुवास जेव्हा
दिशादिशातून माझा होतो
तुझी आठवण दरवळते अन
नसानसातून वसंत फुलतो 

आठवणींचा घडा भराभर 
प्राजक्तासम बहरून येतो 
किती फुले ती हासत असती
मनात माझ्या सडा सांडतो

नरेंद्र प्रभू

25 July, 2017

स्मिता – लडाखची रणरागीणी‘लडाख’चं रुप कोणत्याही स्वरुपात पाहिलं तरी पहाणारा त्याच्या प्रेमात पडतोच. फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहिलेलं लडाख पत्यक्ष पहाण्याची आस मनात बाळगणारी व्यक्ती जेव्हा लडाखला पोहोचते तेव्हा ती हरकून जाते. न्युनगंडाने पछाडलेला त्यातून बाहेर पडतो आणि हवेत उडणार्‍याचे पाय अलगद जमिनीला लागतात. लडाखच्या हवेत ऑक्सिजनची थोडी कमी असली तरी माणसाला जाणीवेच्या पातळीवर लडाखवारी समृध्द करतेच करते.

मित्रहो लडाखला जायचं तर आत्माराम परब यांच्या बरोबर हे समजायच्या आधिच आम्ही आत्माराम बरोबर लडाखला जाऊन पोहोचलो होतो ‘तो दिवस’ आजही लख्ख आठवतो. त्यानंतर या आत्माच्या कृपेने अनेकदा लडाखवारी झाली ती गृप-लिडर म्हणून. हे गृपलिडर म्हणून जाणं म्हणजे खुप जबाबदारीचं काम असतं, निदान लडाखला तरी. अशा या लडाख सफरीवर आज स्मिता ५० व्या (पन्नासाव्या) वेळी जात आहे हे सोपं काम नाही महारजा. आज मी सोबत नसलो तरी मनाने त्या सफरीवरच आहे. आणि अशा सफरीवर असलो की आम्ही गृपलिडर वैगरे असलो तरी आमचा लिडर स्मिताच असते. सकाळी लडाखचं जग जागं व्हायच्या आधी उठायचं आणि रात्री सगळं लडाख झोपी गेलं की झोपायचं यामध्ये अनेक गोष्टींचा सामना गृपलिडरला करावा लागतो. यात स्मिता आघाडीवर असते. ‘ही’ हसतेय म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणार्‍यालाही टेंशन येत नसतं. सतत चैतन्यमय रहाणं तीच्या कडून शिकावं. या लडाखच्या टुरवर सारखं काहीतरी घडत असतं. जसा तिथला निसर्ग क्षणोक्षणी बदलत असतो तसा तिथे गेलेला माणूसही. या बदलाला सामोरं जाताना खमका गृपलिडर सोबत असणं खुप आवश्यक आहे. गेल्या अनेक सफरीवर लडाखला असताना तीने असे अनेक प्रसंग अशाप्रकारे हाताळले आहेत की समर प्रसंगी काय करावं याचा तो वस्तूपाठ म्हणता येईल. 

प्रत्येक वेळी वेगवेगळी माणसं, त्यांच्या समस्या, निसर्गाचा खेळ, हवामान, रस्ते असे अनेक अडथळे यावर मात करत सहल यशस्वी करण्यासाठी आत्मारामच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणार्‍या ‘टीम ईशा’चं नेतृत्व आज स्मिता करते तेव्हा  हे रसायन काही वेगळंच आहे याची जाणीव होते. यासाठी झोकून द्यायची वृत्ती लागते. २०१३ साली लेहला आम्ही आत्मारामची १०० वी सफर साजरी केली तेव्हा अनेक आठवणींना उजाळा मिळाला होता. लडाखची ढगफुटी, आयत्या वेळी अडवणार्‍या  तिथल्या खिंडी, काश्मिरमधला उपद्रव अशा अनेक समस्या असताना आजतागायत ईशा टुर्सने लडाखचा वसा सोडलेला नाही.  आता जगभरात सहलींचं यशस्वी आयोजन होत असताना ‘लडाख’कडे दुर्लक्ष होऊ दिलेलं नाही. हे सगळं शक्य होतं ते स्मितासारख्या जिवलगांमुळे. कैलास-मानससारखी सर्वार्थाने कठीण असलेली टुर संपवून लगेच दुसर्‍या दिवशी लडाख टुरवर निघायला फक्त आणि फक्त धैर्य लागतं. बाकी मग शरीर मागून येतंच. प्रसंग कोणताही उभा ठाकू शकतो. ४४० किमिचं डायव्हर्शन घ्याव लागेल किंवा एखाद्या खिंडीत कडाकाच्या थंडीत रस्त्त्यावर रात्र काढावी लागेल किंवा मध्यरात्रीत मैलोंमैल अडकलेला ट्राफिक सोडवावा लागेल. तुम्हाला तिथे मनाने ठामपणे उभं रहावंच लागतं, शरीर मग तुमचं गुलाम बनतं. हे आत्माराम करतो पण स्मिताने तोच कित्ता गिरवावा म्हणून तिला सलाम...!

लडाखला जावं आणि आपल्या मोठ्ठ्या वाटणार्‍या समस्या छोट्या-छोट्याहोत नाहीशा व्हाव्यात हे खुपदा अनुभवलंय. माझ्या छोट्याशा वर्तूळाला छेद देणारं मोठ्ठ वर्तूळ आत्मा मुळे निर्माण झालं. अनेक मित्र, जिवलग भेटले. लडाख आपलंच गाव वाटायला लागलं, या  प्रवासात जी माणसं गवसली त्यात स्मिताची आकृती ठळक आहे. लडाखच्या उंचीवर स्थिरावण्यासाठी मनानेही तेवढंच उंच व्हावं लागतं. पन्नासाव्या सफरी आधीच स्मिताने ती उंची नक्कीच गाठली आहे. या प्रवासात अनेकदा सहभागी होता आलं. हा एक मैलाचा दगड आज पार होत आहे. पुढच्या खुणेवर पुन्हा भेटूच. कारगील विजय दिन आणि त्याच्या पुर्व संधेला येणारा स्मिताचा वाढदिवस तिकडे या सफरीवर साजरा होण्यालाही खास महत्व आहे. स्मिता वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

                                                                                           

         

15 July, 2017

मन पाऊस-पाऊस


मन पाऊस-पाऊस
चिंब-चिंब रान ओलं
इथे मायेचा आसरा
उबार्‍यात न्हातं झालं

मन पाऊस-पाऊस
ढग_ढग एक होती
सरीवर सरी आल्या
आली उराला भरती   

मन पाऊस-पाऊस
धारा झर-झर येती
पूर सर्वांगाला आला
आठवणी वाहताती

मन पाऊस-पाऊस
अवचीत सांज झाली
अशी पावसाची याद
येता-येता रांग झाली  


नरेंद्र प्रभू  

१५/०७/२०१७  

04 July, 2017

विठ्ठल-विठ्ठल

तुळस साजिरी कपाळी घेऊन
चालली गोजिरी सान्वी पुढे
मेळा गोपाळांचा मागून चालला
गजर विठूचा कानी पडे   

आषाढ मेघांचा वरुनी वर्षाव
आनंदा या पार नाही असा
नामाचा गजर, डोळा पंढरपूर
विठ्ठल-विठ्ठल हृदयी वसा

उधळीत रंग अबिर-गुलाल
पडती नाचत पाउले मंदिरी
कसा शिल्पाकार ठाकलेला विठू
प्रसाद सर्वांना देई करी  

दयेचा सागर, प्रेमाचाच भार
कृपाळू ही माय हात धरी
करी वारंवार प्रेमाची सावली
ताप हा सर्वथा दूर करी   
   

नरेंद्र प्रभू
०४/०७/२०१७


29 May, 2017

मेजर लितुल गोगईंना पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत करण्यात यावे
पद्म पुरस्काराची उंची वाढवायची असेल तर मेजर लितुल गोगईंसारख्या खमक्या अधिकार्‍याला पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत केलं पाहिजे. काश्मिरमध्ये चाललेल्या देशद्रोही कारवाया आणि देशातील त्यांच्या पाठिराख्या नादान, नालायक घृणेसपात्र असलेल्या व्यक्तिंना त्यांची जागा दाखवायची असेल आणि योग्य संदेश द्यावयाचा असेल तर हे करणे अतिशय आवश्यक आहे. मुळात सैनिक हा हकनाक जीव देण्यासाठी नसतोच आणि या मेजरने तर कर्तव्य बजावणार्‍या निवडणूक अधिकार्‍यांना मृत्यूच्या दाढेतून मोठ्या हिमतीने परत आणलं. स्वत: मृत्यूला सामोरं जात, आपल्या सहकार्‍यांचा जीव वाचवला आणि एक प्रकारे मृत्यूवर विजय मिळवला. मुळात युद्धभूमीवरच्या असामान्य परिस्थितीला तोंड देण्याचंच ज्याना प्रशिक्षण मिळतं त्याना निवडणूकीच्या कामात जुंपलं जातं आणि तिथे युद्धजन्य परिस्थिती ओढवल्यावर त्यांनी तलवार म्यान करावी अशी अपेक्षा बाळगली जाते हे जगात आपल्याच देशात घडू शकतं. काश्मिरमध्ये सातत्याने सुरक्षा करणार्‍या जवानांवर हल्ले होतात आणि आपण फक्त हळहळत बसतो हे किती दिवस चालायचं?              

लष्करप्रमूख जनरल बिपीन रावत यांनी ‘जवानांना वार्‍यावर सोडू शकत नाही’ असं म्हटलं आहे ते या पार्श्वभूमीवर खुप महत्वाचं आहे. सैनिक, अर्धसैनिक आणि पोलिसांवर हात उगारणार्‍य़ांचे हात तत्काळ कलम केले गेले पाहिजेत. पण हे केव्हा घडेल तर त्यांच्या छुप्या पाठीराख्यांचा आणि घरभेद्यांचा बंदोवस्त होईल तेव्हाच ना? नक्षलप्रभावित राज्यांच्या प्रमुखांची केंद्रीय गृहमंत्रांबरोबर जी बैठक झाली त्या बैठकीत आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी हीच बाब निदर्शनास आणून दिली. शेवटी खलप्रवृत्तीला शासनाचा धाक हा असावाच लागतो. आपण शिवाजी महाराज्यांचा वारसा सांगतो, त्यानी स्वराज्यात हा भोंगळपणा सहन केला असता काय? अरुंधती राय, बरखा दत्त या सारख्यांची जिभ सडणार नाही तर ती हासडावी लागेल. भारतात बसून पाकिस्तानला गोंजारत विषवल्लीची वाढ करणार्‍या या नराधमांच्या फळीचा आधी बंदोवस्त केला गेला पाहिजे. सेक्युल्यारीझम, आझादी, स्वातंत्र्य असल्या शब्दांचा आधार घेत, त्या मागे लपत सुकमासारख्या अंतर्गत भागात आणि तिकडे सिमेवर शत्रूला थेट मदत करण्यापर्यंत मजल मारणार्‍या बोरूबहाद्दर आणि अतिरेक़ी यांच्यात आता फरक करण्याची आवशयकता नाही.  
           
भारतीय सैन्य दलाने मंगळवारी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि असंख्य बंकर उद्ध्वस्त केले आणि पाक सैन्याने केलेल्या गोळीबाराला तोफ गोळ्यांनी उत्तर देऊ, असे दाखवून दिले. आता देशांतर्गत शत्रूंचा निप्पात करायची वळ येऊन ठेपली आहे.  सारा देश भारतीय सैन्याच्या कामगिरीबद्दल अभिमान प्रकट करीत असताना काश्मीरमधील काही संघटना आणि काही राजकीय पक्ष व त्यांचे अवसान घातकी नेते मेजर लितुल गोगईच्या सन्मानावरून राजकारण करण्यात मग्न झाले आहेत.

मेजर लितुल गोगईंनी केलेली कृती ही देशात आणि देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालून देशरक्षणासाठी झटणार्‍या जवानांना स्पूर्ती दायक अशीच आहे. शिवाय आपल्यासरख्या देशवासीयांना दिलासा देणारी अशी आहे. बुर्‍हाण वाणी या दहशत वाद्याचा खातमा केल्यापासून सुरक्षादलाला रोजच्यारोज लक्ष केलं जात आहे.

नऊ एप्रिल रोजी श्रीनगर लोकसभा मतदार संघात मतदान सुरू होतं त्या दिवशी काश्मीरमध्ये कमालीच्या तणावात हे मतदान चाललं असताना बडगाममधील एका मतदान केंद्रावर काश्मिरी तरूणांनी दगडफेक करून निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्याचे प्रयत्न केले. दगडफेक व हिंसाचार चालू असताना मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाच्या सतरा कर्मचार्यांचे जीव धोक्यात आले होते. या सतरा जणांचे प्राण वाचले ते मेजर गोगई यांच्या कामगिरीनेच. त्यांनी दगडफेक करणार्‍य़ा तरूणांना चिथावणी देणार्‍य़ा फारूख दारला पकडले व त्याला बांधून जीपच्या बोनेटवर बसवले. ती जीप त्याच्या सह सुरक्षीत ठिकाणी आणण्यात आली . हिंसक जमावाला पांगवण्यासाठी मेजर गोगईंनी केलेली ही कृती यशस्वी ठरली. गोळीबाराच्या फैरी न झाडता किंवा रक्तपात न होता मेजर गोगई यांनी अपेक्षीत परीणाम साधला. मग मानवी हक्कांच्या मूल्यांचे उल्लंघन केले म्हणून ‘आजादी’ टोळीने टाहो फोडायला सुरूवात केली, पण तसे करून सतरा कर्मचार्यांचे प्राण वाचवले, त्याविषयी कोणीच बोलत नाही.

मेजर गोगई यांना लष्कर प्रमुखांनी दिलेला पुरस्कार हा काश्मिरी तरूणाला जीपवर बांधून फिरवल्याबद्दल नव्हे तर सतरा कर्मचार्‍यांचे प्राण वाचवले यासाठी आहे. मेजर लितुल गोगईंच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना   पद्म पुरस्कार देऊन गौरवांकीत करण्यात यावे. संपूर्ण देशाची ही मागणी असली पाहिजे, जनतेने आधिच त्यांना  धन्यवाद देऊन पुरस्कार प्रदान केला आहे.   


  

28 May, 2017

यांदा स्वर्गत जावक नाय!आये  : अरे मेल्या पाकरांका कित्या गुंडे मारत ?

बाबलो : तर....., रातभर निज नाय आणि सकाळच्याक जरा निजतलय तर हेना नुसतो जिव खाल्ल्यान.  नुसता          कुहू...... कुहू...... कुहू...... काय चल्ला.... काय?

आये  : आरडाने होती बाबडी, तुज्या कित्या पोटात चावता?      

बाबलो : ही बाबडी कोण?    

आये  : मेल्या तुच आता म्हणा होत मा? नुसता कुहू...... कुहू...... कुहू...... काय चल्ला....  म्हणान. ती कोण कोकीळा आराडता हा.    

बाबलो : (चमकान) अगे खय? खय आसा कोकीळा?     

आये  : अरे ती कोण मेल्या, तुका आता आयकाक येणाहा नाय? आता टाळो पडाक ईलो तिचो!    

बाबलो : अरे कर्मा, अगे आये ती कोक़ीळा नाय, कोकीळ तो...., कोकीळ.   

आये  : अरे कायतरी काय सागतंह, कोकीळ खयचो.    

बाबलो : खयचो, म्हन्जे आराडता तो.

आये  : आ....?

बाबलो : अगे आ.. काय. व्हयतो आराडता मा तो कोकीळच. कोकीळा कदी अशी आरडणा नाय.

आये  : ह्या मी काय आयकतय?  

बाबलो :  ताच ता.

आये  : काय?

बाबलो : कोकीळ आराडता...

आये  : मेल्या सारख्या सांग बगुया, तुझी भगल नको.

बाबलो : अगे आये, कुहू...... कुहू...... कुहू म्हणान यदळदर आराडता मा ती कोकीळा नाय. कोकीळ तो. तो...... बग काळो काळो कावळ्यासारखो दिसता मा त्या फादयेर तो कोकीळ. तोच फाटपटी पासून आरडता. रोज रोज ची ही कटकट झाल्या माज्या मस्तकाक.

आये  : कायतरी मेल्याचा.  तुका रे कसली कटकट?   

बाबलो : त....र, अगे आंबे म्होवारले तेवा पासून बगतय. ह्यो नुसतो आराडता..., आराडता...... आता पावस इलो तरी हेचा आराडणा संपणा नाय.

आये  : माजो बाबा इतको लक्ष नाय ? कित्या आरडता रे ती कोकीळा.  

बाबलो : अगे कोकीळ आराडता..., कोकीळा न्ह्यय.

आये  : ताच ता. कित्या आराडता?   

बाबलो : कित्या काय, यंदा तेची स्वर्गत जावक नाय.

आये  : अरे कोणाची स्वर्गत? काय बडबडतह काय?  

बाबलो : अगे तो कोकीळ आराडता... मा...? तेची स्वर्गत.

आये  : आ? काय? कोकीळ आराडता तेची स्वर्गत? बाबल्या राती कपाळार पडल की काय मेल्या?      
बाबलो : हो...! मे कित्या कपाळार पडतलय? निज खय येता? निजलय तर पडतलय मा?

आये  : असांदे सारक्या कायता सांग.  

बाबलो : अगे, आता आयक्शी माजा? कोकीळ आराडता मा तो कोकीळेक बोलवता. तशी एकादरी इली तर तेचा लगीन जमतला मा? तीन म्हयने गेले तरी कोण फीरकाक नाय म्हणान आजून ह्येचा आराडणा चालूच आसा. यांदा स्वर्गत काय जमणा नाय बहुदा. होय उन्हाळो गेलो.

आये  : अरे तेची कसली स्वर्गत. काय तोडाक येयत ता काय बडबडतह?  

बाबलो : अगे आये, कोकीळ  कुहू...... कुहू...... कुहू...... आराडता नाय ता समजा खयच्या तरी कोकीळेक आवाडला तर मगे ती जवळ येता. तेंची स्वर्गत जमता. आणि मगे लगीन जाता. कोकीळ आरडाचो बंद होता. माका राती नाय पण सकाळी तरी निज येता. समाज्ला तुका....?

आये  : माका बाबा तुजा काय कळणा नाय आणि तुजा लक्षणय बरा दिसणाहा हाय. मरांदे आरडांदे त्या कोकीळेक. आता उठलं मा, चाय पी आणि ती कवळा मळ्यात टाकून ये. पावस येतलोसो दिसता.     
बाबलो : येवंदे पावस, तो काय दरवर्षी येता. आमचा काय? तो मेलो कोकीळ आसा म्हणान लाज सोडून आराडता तरी.

आये  : शिरा पडो मेल्या तुज्या तोंडार. तू बडबडत रवलस आणि माका उशीर झालो. मी चललय मळ्यात. (आये तरातरा चलत रवता)       

बाबलो : जा मळ्यातच जा. मी रवतय हयच कोकीळ आराडता तसो बोंबलत. आमची स्वर्गत यंदाय नाय. तो कोकीळ तरी आराडता. मी तसो आराडलय तर आवस ठेवची नाय. मोठ्ठी मानकरीण नाय ही, होकले रांगो लावतले म्हणान वाट बगताहा. किती वर्सा झाली, आता काय, यंदाचो मिरगय गेलो हातचो.

आराड बाबा आराड
तुजी तरी स्वर्गत जमांदे            
खय आसली कोकीळा
तर घरा येंवदे.

आ...रा...ड         

     
   

  

  
  


    
    


18 March, 2017

कच्छचं आखात


लायारी नदीचं पात्र
लडाखचे उघडे पर्वत, किंवा कच्छसारखा वैराण प्रदेश यामध्ये काय पहायचं असा प्रश्न ते न पाहिलेल्या माणसांना नेहमीच पडतो. आता काय पहायचं असा प्रश्न पडला तर तो फक्त उपस्थित करून न थांबता जर त्या प्रदेशात गेलं तर किती म्हणून पहायचं असा प्रश्न पडू शकतो. ग्रेटर रण ऑफ कच्छ किंवा कच्छच्या आखातात जाऊन असाच प्रश्न मला पडला. मात्र अशा ठिकाणी जाताना माहितगार व्यक्ती किंवा संस्थेचा हात धरून गेलं तर थोडक्या वेळात खुप काही पहाता येतं. नुकताच मी ‘ईशा टुर्ससोबत कच्छ्ला जाऊन आलो. दोन रात्री तीन दिवस आम्ही सारखे हिंडत होतो. पण हे एक ट्रेलर होतं. कच्छला खुप काही पहाण्यासारखं आहे. 

नंदी रॉक

आत्माराम परब या माझ्या मित्राला माणसं आणि स्थळं (मला ठिकाणं म्हणायचं आहे) वश आहेत. जुगल तिवारी हे त्याचं आणखी एक उदाहरण आहे, हा माणूस बरोबर असला की कच्छच्या वैराण प्रदेशाचं नंदनवन होवून जातं. या धरातलावर असलेली प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण त्याचं सौदर्य पाहाण्याची दृष्टी पाहिजे किंवा ती सुंदरता विषद करून सांगणारी व्यक्ती तरी पाहिजे. जुगल तीवारी या माणसाजवळ या दोन्ही गोष्टी आहेत. आत्माराममुळे जुगल तिवारीची भेट झाली आणि जुगल तिवारी भेटल्याने कच्छ त्याच्या नजरेने पहाता आलं. 

कच्छ म्हणजे एरवी खुरटी झुडुपं आणि क्षितीजापर्यंत पसरलेला वैराण प्रदेश, प्रथम दर्शनी कुणालाही असंच वाटावं अशी स्थिती आहे. पण जुगल तिवारी भेटतात आणि मग पट उलगडत जातो. ऑरगॅनिक सेंटरवर चवदार रसपान केल्यावर चादुवा रिझर्व फॉरेस्ट या तिथल्या राजाच्या खाजगी जंगलाला आपण भेट देतो. एरवी उजाड असलेल्या या प्रदेशात हे जंगल म्हणजे ओयासीस वाटावं. तिथल्या राजाने निर्माण केलेल्या या जंगलात जुगल तिवारीनी झाडं लाऊन आपला वाटा उचलला आहे. दाट झाडी असलेल्या या जंगलात पक्षांना हक्काची जागा मिळाली असून या ठिकाणी पाण्याने भरलेला तलावही आहे. तिथून निघाल्यावर वाटेतच मगरींच साम्राज्य असलेला एक छोटा तलाव आहे, इथेही पक्षी आणि कासव पहायला मिळतात. 


पुढचा पडाव असतो बनी ग्रासलॅन्ड आणि नंदी रॉक. सभोवती क्षितीजापर्यंत नजर जाईल तिकडे पसलेलं हे ३,८४७ स्वे.कि.मी. एवढा पसारा असलेलं ग्रासलॅन्ड म्हणजे न संपणारा प्रवास वाटतो. जिकडे जाव तिकडे मध्यभागी आपण आहोत आणि सगळीकडे हा सपाट भूभाग आहे असाच भास होत रहातो. अपवाद आहे तो लाखो वर्षांपुर्वी लाव्हारसाच्या उद्रेकाने तयार झालेला काळा डोंगर. याच डोंगरावर आजही जीवाश्म (Fossils) सापडतात. लाव्हामुळॆ करपून गेलेले दगड, नंदी रॉक आणि तो काळा डोंगर सगळंच आपल्याला आदीम काळात घेऊन जातं. मग  उन्हं कलायला लागली की गाड्या चारी दंड लेक जवळ वळतात. या लेकवर अनेक पक्षी आपली वाट पहात असतात. पेलिकन्स, घुबड, ईगल, रातवा, टिटवी असे अनेक पक्षी सहज दिसतात आणि दुरवर बसलेले बाकी पक्षी दाखवण्यासाठी जुगल तिवारींची धडपड चाललेली असते. मावळतीला चाललेल्या सुर्याची किरणं आणि नंतर पसरणारी लाली त्या विस्तीर्ण तलावाच्या पाण्यावर पसरलेली असतात आणि सुर्यास्तानंतर परतणार्‍या कॉमन क्रेंसचे  थवे पहाण्यासाठी आपण तिथेच ठाण मांडून बसलेले असतो. 

दुसर्‍या दिवशी सुर्योदयापूर्वी लायारी या मृत नदीच्या पात्रात जायचं आहे अशी सुचना जुगल तिवारी देतात तेव्हाच आता तिथे काय असणार असं कुतूहल वाटायला लागतं. डिस्कव्हरी चानेलवरच्या अनेक चित्रफिती ज्यात जुगल तिवारींचा सहभाग आहे त्या दाखवण्याचा प्रयत्न ते करत असतानाच, त्यांच्याजवळ असलेला जीवाश्मांचा खजीना आपल्याला खुणावत असतो. जुगल तिवारींनी जमवलेला हा जीवाश्मांचा खजीना अमुल्य असाच आहे. तिथे गेल्यावर तो पाहण्याचा जरूर लाभ उठवलाच पाहिजे. 

पहाटे उठून लायारी या मृत नदीच्या पात्रात सर्वांना न्यायला जुगल तिवारी सज्ज असतात. वेळ जाऊ नये म्हणून त्यांनी निघतानाच नाष्टाही सोबत घेतलेला असतो. साधारण अर्ध्यातासाच्या प्रवासानंतर त्या पात्रातच गाड्या उभ्या रहातत. क्षितिजावर तांबडं फुटलेलं असतं. अजून सुर्यबिंब वर यायला वेळ असतो. झपझप पावलं टाकत आपण जुगल तिवारींच्या मागोमाग पात्रातील मोक्याच्या ठिकाणी जायला निघतो. पहिल्या किरणात दिसणारं नदीचं पात्र आणि खडकांची सुंदरता जुगल तिवारीच्या CEDO होमस्टेमध्ये आलेल्या प्रत्येकाला दिसावी अशी त्यांचे मनापासूनची इच्छा असते. सुर्य बिंब वर येतं आणि मग तासभर ते नदीच पात्र किती बघू आणि कॅमेर्‍याने किती टिपू असं होवून जातं. तासा दिडतासाच्या भ्रमंतीनंतर गाड्यांच्या बॉनेटवरचा नाष्टा हे सरप्राईज असतं.
लायारी नदीच्या पात्राचं गारूड मनावर स्वार झालं असतानाच आपण निरोना आर्टीसन व्हिलेज मध्ये पोहोचतो. लाखेचा वापर करून खेळणी, फर्निचर, लाटणी आदी वस्तू कशा रंगवल्या जातात त्याचं प्रात्यक्षीक पहायला मिळतं. दुसरीकडे वेगवेगळ्या आकाराच्या नादमधूर घंटा बनवणारा कलाकार आपली हातोटी दाखवतो आणि या सगळ्याच्या परमोच्य बिंदू असतो तो म्हणजे रोगन आर्ट. एरंडाच्या तेलातील रंगाने थेट कपड्यावर केलेली कलाकुसर म्हणजे रोगन आर्ट. ही कला जोपासलेले फक्त दोनच कलाकार आपल्या देशात आहेत त्यातला एक आपल्यासमोर हजर असतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना त्यांच्या भारत भेटीच्या वेळी हीच कलाकृती भेट म्हणून दिली होती.  

संध्याकाळच्या कलत्या उन्हात व्हाईट रण पहाण्यात काही औरच मजा असते. जर आपण जाऊ तेव्हा रण उत्सव चालू असेल तर त्याचीही मजा घेता येते. इथेही नजर जाईल तिकडे शुभ्र मिठाने आच्छादलेली हजरो एकर जमीन पहायला मिळते आणि त्यावरून चालताना येणारा कुरूकुरू आवाज मनात मुरत जातो. 

रोगन आर्ट
मोडवा बिच वरचे हजारो फ्लेमिंगो, मांडवी बंदर, तिथला बोटींच्या प्रतिकृती बनवण्याचा कारखाना, हम दिल दे चुके सनम सारखे चित्रपट जिथे चित्रीत झाले तो विजय विलास पॅलेस, सृजन हे हस्तकलांचं कायमस्वरूपी भव्य प्रदर्शन आणि विक्री केंद्र, शामजी कृष्ण वर्मा स्मारक अशी अनेक महत्वाची ठिकाणं पहात पहाता भुज शहरात आपण येऊन पोहोचतो. 

विजय विलास पॅलेस 
व्हाईट रणसृजन हस्तकला केंद्र
तीन दिवसाच्या अथक भ्रमंतीत कच्छचं एक आगळं रुप मनात साठऊन आपण त्याचा निरोप घेतो, पण ‘अभी कुछ नही देखा’ अशीच भावना मनात घर करून रहाते, पुन्हा एकदा आधिक दिवसांसाठी कच्छला गेलं पाहिजे असं वाटत रहातं. 

नरेंद्र प्रभू
             

                                                                        

                                                    

13 March, 2017

रंग झाले केसरीरंग सारे एक, झाले केसरी रे केसरी
पेटून उठली एक ज्वाला केसरी रे केसरी
न्हाऊन गेला लोक झाला केसरी रे केसरी
उधळून दे आयुष्य त्याचा पाठीराखा तो हरी

रंग हिरवा त्या मिळाला उजळून गेला केसरी
नीलरंगी धाऊन आले मिसळून झाले केसरी
केसरी रंगात जुळले लाल अन स्वेतांबरी
जनधनाची लाज राखी आज हो हा श्रीहरी   

देवभूमी रंगात न्हाली ललाट झाले केसरी
उत्तरेचा रंग झाला केसरी रे केसरी
पुर्वरंगी उदयास आली लाट आता केसरी
आरक्त दर्या आज झाला केसरी रे केसरी

नरेंद्र प्रभू


१३/०३/२०१७

08 March, 2017

जुगल तिवारीजुगल तिवारी

कच्छच्या रणात जाऊन पक्षी वैभव पहायचं म्हटलं तर ते नवख्या माणसाला अशक्यप्राय वाटेल, मुळात कच्छच्या रणात पक्षी पहाणं ही संकल्पनाच पचनी पडणारी नाही. असं असलं तरी जुगल तिवारी हा माणूस तिथले पक्षी दाखवण्याची किमया करून दाखवतोच. मोटी-विरानी या गावात आपल्या होमस्टेच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात आलेला हा अवलीया अथक जगभ्रमंतीवर असणारा माझा मित्र आत्माराम परब याला कसा काय भेटला (अशी माणसं आकर्षीत करणारा चुंबक त्याच्याजवळ आहे) हे अजून माहित करून घ्यायचं आहे. तर आत्मामुळेच मी या जुगल तिवारीच्या वाटेला गेलो. आणि एकदा का तुम्ही जुगल तिवारींना भेटला की ते तुम्हाला हाताला धरून आजू-बाजूचा सगळा परीसर दाखवतात. तसा वैराण वाळवंटात गणती होणारा हा प्रदेश एरवी फिरण्यासाठी कुणीच निवडणार नाही. पण आत्माने हा माणूस पारखला आणि मग आत्मा, त्याचा मित्र-परिवार आणि ईशा टुर्सचे पर्यटक गेली सात-आठ वर्षं इथे जात आहेत आणि या परिसराची आणि अर्थातच जुगल तिवारीच्या सान्निध्याची मजा लुटत आहेत.

जवळचं काटेरी झुडुपांचं रान, बनी ग्रासलॅंड, चारी-ढंड वेटलॅंड, लायलारी नदीचं कोरडं पात्र, व्हाईट रन, मांडवी, मोढवा किनारा अशी ठिकाणं पहावी तर ती जुगल तिवारी यांच्या सोबतच. एरवी फारसं इथे कुणी फिरकणार नाही, आपण जातो तेव्हाही तिथे कुणी माणसं आलेली नसतातच. डिस्कव्हरी चानेललाही पाच-पाच एपिसोड एवढी सामग्री पुरवणारा आणि चित्रणादरम्यान स्वत: त्याचा भाग असलेला हा महाभाग आपल्यासोबत असला की काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. जुगल तिवारींचा कटाक्ष पण तसाच असतो, प्रत्येक गोष्ट पत्येकाला समजलीच पाहिजे, काही चुकलं तर तेच जरा नाराज होतात. हा माणूस त्या रणच्या प्रेमात पडला आहे. स्वत: पक्षी तज्ज्ञ असलेला, जैव विविधतेची माहिती असलेला, बिएचएनएसचा पक्षी अभ्यासक, विज्ञानाचं पदवीत्तर शिक्षण घेतलेला, मुख्य म्हणजे परीसर आणि निसर्गाची आवड, जाण तसंच अभ्यास असलेला, तिथल्या माणसांना रोजगार पुरवणारा माणूस सोबतीला असला की कोणत्याही सिजनमध्ये ‘रण’ हा ‘उत्सव’ बनून जातो. तिथे एकदा तरी गेलंच पाहिजे.    
LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates