08 March, 2017

जुगल तिवारीजुगल तिवारी

कच्छच्या रणात जाऊन पक्षी वैभव पहायचं म्हटलं तर ते नवख्या माणसाला अशक्यप्राय वाटेल, मुळात कच्छच्या रणात पक्षी पहाणं ही संकल्पनाच पचनी पडणारी नाही. असं असलं तरी जुगल तिवारी हा माणूस तिथले पक्षी दाखवण्याची किमया करून दाखवतोच. मोटी-विरानी या गावात आपल्या होमस्टेच्या माध्यमातून आपल्याशी संपर्कात आलेला हा अवलीया अथक जगभ्रमंतीवर असणारा माझा मित्र आत्माराम परब याला कसा काय भेटला (अशी माणसं आकर्षीत करणारा चुंबक त्याच्याजवळ आहे) हे अजून माहित करून घ्यायचं आहे. तर आत्मामुळेच मी या जुगल तिवारीच्या वाटेला गेलो. आणि एकदा का तुम्ही जुगल तिवारींना भेटला की ते तुम्हाला हाताला धरून आजू-बाजूचा सगळा परीसर दाखवतात. तसा वैराण वाळवंटात गणती होणारा हा प्रदेश एरवी फिरण्यासाठी कुणीच निवडणार नाही. पण आत्माने हा माणूस पारखला आणि मग आत्मा, त्याचा मित्र-परिवार आणि ईशा टुर्सचे पर्यटक गेली सात-आठ वर्षं इथे जात आहेत आणि या परिसराची आणि अर्थातच जुगल तिवारीच्या सान्निध्याची मजा लुटत आहेत.

जवळचं काटेरी झुडुपांचं रान, बनी ग्रासलॅंड, चारी-ढंड वेटलॅंड, लायलारी नदीचं कोरडं पात्र, व्हाईट रन, मांडवी, मोढवा किनारा अशी ठिकाणं पहावी तर ती जुगल तिवारी यांच्या सोबतच. एरवी फारसं इथे कुणी फिरकणार नाही, आपण जातो तेव्हाही तिथे कुणी माणसं आलेली नसतातच. डिस्कव्हरी चानेललाही पाच-पाच एपिसोड एवढी सामग्री पुरवणारा आणि चित्रणादरम्यान स्वत: त्याचा भाग असलेला हा महाभाग आपल्यासोबत असला की काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. जुगल तिवारींचा कटाक्ष पण तसाच असतो, प्रत्येक गोष्ट पत्येकाला समजलीच पाहिजे, काही चुकलं तर तेच जरा नाराज होतात. हा माणूस त्या रणच्या प्रेमात पडला आहे. स्वत: पक्षी तज्ज्ञ असलेला, जैव विविधतेची माहिती असलेला, बिएचएनएसचा पक्षी अभ्यासक, विज्ञानाचं पदवीत्तर शिक्षण घेतलेला, मुख्य म्हणजे परीसर आणि निसर्गाची आवड, जाण तसंच अभ्यास असलेला, तिथल्या माणसांना रोजगार पुरवणारा माणूस सोबतीला असला की कोणत्याही सिजनमध्ये ‘रण’ हा ‘उत्सव’ बनून जातो. तिथे एकदा तरी गेलंच पाहिजे.    
LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates