20 July, 2018

ओंजळीत स्वर तुझेच...





मराठी साहित्यात आपल्या विलक्षण प्रतिभेची कविता मागे ठेवून गेलेला कवी म्हणजे विंदा करंदीकर. विदांच्या त्या काव्यप्रतिभेचा समग्र आढावा घेणारा एक अप्रतिम कार्यक्रम काल आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झाला. औचित्य होतं भारतीय प्रसारण दिन, आकाशवाणी मुंबईचा ९१ वा वर्धापन दिन आणि विंदांचं जन्मशताब्दी वर्ष.  आज माध्यमांच्या गजबजाटात आणि टिपेच्या स्वरात सुन्न करणारे आवाज कानावर पडत असताना गेली ९ दशकं आकाशवाणीने जो अभिजातपणा आणि श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारा गोडवा जपला आहे त्याला तोड नाही. काल १९ जुलै २०१८ ला आकाशवाणीच्या तुडुंब भरलेल्या सभागृहात पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला.       

ओंजळीत स्वर तुझेच... अर्थात विंदांचं साहित्यदर्शन हा खास कार्यक्रम आकाशवाणी मुंबईने आयोजित केला होता. श्रोत्यांच्या समृद्धीच्या प्रवासात आकाशवाणीचं तब्बल नऊ दशकं योगदान! असं व्यासपीठावर लिहिलं होतं ते सार्थच आहे असं मी नक्कीच म्हणू शकतो. प्रसारमाध्यमांचं कुठलंही वारं नसलेल्या माझ्या कोकणातल्या गावी आकाशवाणीची झुळूक हाच आमच्यासाठी त्या काळात ज्ञानामृत पाजणारा अखंड झरा होता आणि आजही आहे.  काल सादर झालेल्या कार्यक्रमाचं  सुत्रसंचालन  डॉ. वीणा सानेकर यानी केलं होतं तर तुषार दळवी, शंतनू मोघे, अनघा मोडक, नंदेश उमप, सुचित्रा भागवत, डॉ. पुर्णिमा पटवर्धन, मंदार आपटे या नावाजलेल्या कलाकारांनी  या कार्यक्रमात भाग घेतला होता. सिंथसायझरसह बारा वांद्यांचा वाद्यवृंद आणि विंदांच्या कवितांना अभिजित लिमये यांनी दिलेलं संगीत तर लाजवाब!

विंदांच्या कवितांचा बाज हा विलक्षण वेगळा. विंदांनी प्रेमकविता, तालचित्रे, सामाजिक जाणिवेची कविता, व्यक्तिचित्रे, सूक्ते, बालकविता, विरूपिका आणि गझल या सर्वांचा धांडोळा या अडीज तासांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या कार्यक्रमात घेतला गेला.

 ‘मागू नको सख्या रे माझे राहिलेले’, ‘फाटेल शीड जेव्हा’, ‘माझ्या घरी मी पाहुणी’, ‘मी चांद झेलला गं, घेऊन जा सर्व माझे’. अशांसारख्या कविता म्हणजे प्रेमात वाटय़ाला येणाऱ्या विरहाची, वेदनेची, दु:खाची, वर्षांनुवर्ष झालेली मुस्कटदाबी. स्त्रीला जितकं काही सोसावं लागतं त्याचा हा दस्तावेज या कार्यक्रमात मांडला गेलाच पण विंदांचे लघुनिबंध आणि स्वगतं अतिशय परिणामकारक रुपात सादर केले गेले.

सहाय्यक केंद्र निदेशक सुजाता परांजपे यांची संकल्पना असलेला, विंदांची पुस्तकं पुन्हा एकदा हाती धरायला लावणारा हा कार्यक्रम शनिवार दि. २१ जुलै २०१८ रोजी दुरदर्शनच्या सह्याद्री  वाहिनीवर सायंकाळी ५.३० वाजता तर महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून सोमवार दि. २३ जुलै २०१८ ला रात्री. ९.३० ते ११ या वेळात प्रसारीत केला जाणार आहे.  जगभरातील श्रोत्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.     

नरेंद्र प्रभू


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates