19 July, 2018

तथागताच्या वाटेवरती





डिस्कव्हरी ऑफ तथागताज फूट प्रिंट हे कॉफी टेबल बुक म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्यावर एक सामान्य माणूस किती असामान्य कार्य  पूर्ण करू शकतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. सूप्रसिद्ध  छायाचित्रकार विजय मुडशिंगीकर हे पाठीच्या ण्याच्या दुखण्याने त्रस्त होऊन रुगणालयात  दाखल होतात, सगळीच हालचाल बंद झाली असताना आपण वाचू शकतो हे लक्षात आल्यावर आपला वाचनाचा छंद ते तिथेही जोपासतात. त्यांच्या वाचनात गंगा नदीचं प्रदूषण येतं. या दुखण्यातून बरा झालो तर गंगा नदीचं प्रदूषण दूर करण्यासाठी काम करेन असा संकल्प ते मनोमन सोडतात, जगप्रसिद्ध निरोसर्जन डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांनी शस्त्रक्रिया केल्यावर विजय मुडशिंगीकर पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहतात आणि गोमुख ते गंगासागर ही २२५० किलोमीटरची गंगा परिक्रमा सहा वर्षं वारंवार करतात. हे सगळंच विस्मय चकीत करणारं आहे. सहा वर्षं कॅमेरा हाती धरून त्यानी गंगेचं मनोहारी त्याबरोबरच विद्रूप रुपं  चित्रीत केलं आणि प्रदर्शनाच्यामाध्यमातून देशासमोर मांडलं. त्या प्रवासाची साहस कथा सांगणारं पंचगंगाते गंगा हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.

गंगेच्या किनाऱ्यावरून बुद्धांच्या पाऊलवाटांवर ते कसे वळले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. सहा वर्षांची ती गंगा भ्रमंती करीत असतानाच त्यांची पवलं पुढे तथागत गौतम बुद्धांच्या शोधात निघाली, तथागताची ती पवित्र पावलं जिथे जिथे पडली त्या अनेक ठिकाणांची यात्रा मुडशिंगीकरांनी नंतर केली. या यात्रेत प्रसिद्ध  छायाचित्रकार प्रकाश शेट्टी त्यांच्या मदतीला धाऊन आले. लुंबिनी या गौतम बुद्धांच्या जन्मस्थानापासून सुरू झालेला तो प्रवास जिथे गौतम बुद्ध पंचतत्त्वात विलीन झाले होते त्या कुशीनगर या ठिकाणी संपतो.  

भारत, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या देशातून भ्रमंती करीत असताना सांची, लुंबिनी, कपिलवस्तु, बोधगया, सारनाथ, नालंदा, वैशाली, श्रावष्टी,  सांकिसा, लडाख, अजंता केव्ह्ज,  बोरिवली, थायलंड, खुशीनगर, अनुराधापुरा अशा अनेक ठिकाणी फिरून त्यानी  हजारो छायाचित्रं  कॅमेर्यात  टिपली. त्यातलीच मोजकी छायाचित्रं आणि त्यांची माहिती त्यानी या पुस्तकात दिली आहेत. सांचीचा स्तूप, लुंबिनी हे बुध्दांचं जन्मस्थान, मयादेवी मंदीर, जिथे बुध्दांना ज्ञानाप्राप्ती झाली तो बोधगयेचा बोधीवृक्ष, चक्रमरा स्थळ, सारनाथ मंदीर, इसीपाटण, राजगीरची कुटी, नालंदा विद्यापीठ, वैशालीचा स्तूप, लडाखच्या हेमीस आणि थीकसे गुंफा, तिथला लडाख महोत्सव’, अजंता लेणी, बोरीवलीचा विश्व विपशन्ना पॅगोडा, थायलंड आणि श्रीलंकेतील बौद्धस्थळं आणि अनेक स्तूप अशी शेकडो  छायाचित्रं  या पुस्तकात दिलीआहेत. प्राचीन वास्तू घडवतानाची अदाकारी, नक्षीकाम आणि शिल्पं जिवंत करण्याचं असामान्य काम छायाचित्रकार विजय मुडशिंगीकर आणि प्रकाश शेट्टी  त्यांनी केलं आहे.

डिस्कव्हरी ऑफ तथागताज फूट प्रिंट हे कॉफी टेबल बुक म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि शांती यांचा संदेश देणारं तसंच भारताचा पुरातन वारसा जाणून घ्यायची जिज्ञासा पूर्ण करणारं पुस्तक आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन हे संचित न्याहाळावं अशी तीव्र इच्छा वाचकांच्या मनात निर्माण करण्याची ताकद या पुस्तकात आहे.

शांततेच्या आभास निर्माण करणारी ही छायाचित्र मन शांत तर करतातच पण हा प्रदेश फिरून पाहावा अशी आंतरिक ओढ हे पुस्तक हाती आल्यापासून पाहणाऱ्याच्या मनात लागून राहते.  एखाद्या जवाहिर्याने अत्यंत मन लावून कलाकृती घडवावी तेवढीच मेहनत ही छायाचित्र काढताना घेतल्याचं पानोपानी जाणवत राहतं. तलावाच्या पाण्यावर वाऱ्याने उठणारे तरंग देखील  अचूक टिपणारा कॅमेर्यामागच्या डोळ्यांला दाद देत राहावीशी वाटते. बौद्ध भिक्कूंचं समर्पित जीवन,  त्यांची देहबोली यांचं यथार्थ दर्शन या पुस्तकातून घडतं. राजस्थानी शिल्पकारांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घडवलेली मूर्ती पाहून प्राचीन कला अजुनही भारतात जिवंत असल्याची साक्ष देते. कागदावर झालेलं छाया आणि प्रकाशनचं नेमक अवतरण डोळ्यांचे पारण  फेडतं.

तथागताच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ठिकाणं या पुस्तकात पाहताना अनेक यात्रांचे नेत्रसुख वाचकाला देतात. इतिहास संस्कृती आणि प्राचीन कला याचबरोबर प्रेक्षणीय स्थळदर्शनाचा आनंद हे पुस्तक पाहताना होतोच होतो.

मनोहारी छायाचित्रं, सुबक रचना, उत्कृष्ट छपाई,१४x१०”  आकार, फोटो पेपर आणि नेमकी माहिती यामुळे पुस्तक संग्रहणीय झालं  आहे.

डिस्कव्हरी ऑफ तथागताज फूट प्रिंट
विजय मुडशिंगीकर,प्रकाश शेट्टी 
प्रज्ञा क्रिएशन प्रि ॅन्ड पोस्ट प्रॉडक्शन प्रा. लि.
९८६९०८६४१९



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates