09 November, 2019

तेजाची आरती





गीत रामायण हा मराठी गीत, गायन आणि सादरीकरणाचा मुकूटमणी. गीत रामायण हे एप्रिल १९५५ ते एप्रिल १९५६ या कालावधीत ग. दि. माडगूळकर यांनी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन रचलेलं, सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं आणि गायीलेलं महाकाव्य आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालं होतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या 'गीतरामायणा'स भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता.

अनघा मोडक
या वर्षी आकाशवाणीने ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्या दोघांच्याही कारकिर्दीवर आधारित मालिका २५ जुलै २०१९ पासून प्रत्येक गुरूवारी सकाळी प्रसारीत केली होती. १३ भागातली ही मालिका श्रोत्यांना आनंदाचा खजिनाच रिता करून गेली आहे. अतिशय तरल, भावमय आणि ओजस्वी वाणी असलेल्या अनघा मोडक यांनी त्या मालिकेचं लेखन आणि निवेदन केलं आहे. आकाशवाणीच्या सुजाता परांजपे (क्रेंद संचालक) आणि नेहा खरे (कार्यक्रम अधिकारी) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मालिकेला चेतना झांजे यानी निर्मिती सहाय्य केलं आहे.       

गदिमा आणि बाबूजी या दोन महान व्यक्तीमत्वांच्या एकुणच जीवनाचा आणि कारकिर्दीचा अतीशय रंजक असा अभ्यासपूर्ण आढावा या तेरा भागात घेतला गेला आहे. अनेक रंजक किस्से, डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग आणि उद्बोधक माहिती या प्रसारणातून मिळाली. हे तेरा भाग प्रसारित झाल्यानंतर गेल्या गुरूवारी या चमूने श्रोत्यांशी संवाद साधण्याचाही कार्यक्रम प्रसारीत केला तेव्हा त्याला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला, श्रोत्यांनी आपले सद्गदीत करणारे अभिप्राय दिले. गदिमा आणि बाबूजींच्या जीवन कार्याचा अभ्यास करून तो अल्प वेळात सादर करण्याचं शिवधनुष्य या कार्यक्रमाच्या लेखिका आणि निवेदिका अनघा मोडक यांनी लिलया पेललं आहे. 

नेहा खरे

लहानपणापासून दर्जेदार कार्यक्रम देणार्‍या आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत आलोय. माहिती आणि मनोरंजना बरोबर विश्वासार्हता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. बदलत्या युगात नवनव्या प्रसिध्दी माध्यमात मध्यंतरी आकाशवाणी काहिशी झाकोळून गेली होती. पण एफएम वाहिन्या आणि मुख्य म्हणजे मोबाईल अ‍ॅप (NewsOnAir)  या नव्या तंत्रज्ञानाचा वापर आकाशवाणीने सुरू केला आणि जगभरात पसरलेल्या आकाशवाणीच्या श्रोत्यांना पुन्हा एकदा जुने दिवस, जुनी गोडी आपल्या मुठीत आल्याचा आनंद झाला. मोबाईल अ‍ॅपमुळे तर कुठेही असलं तरी कार्यक्रम ऐकता येतात किंवा महत्वाच्या बातम्या कधीही ऐकता, पहाता, वाचता येतात.                   

हे भाग ऐकताना ते पुन्हा पुन्हा ऐकावे असं वाटत होतं, नेहा खरे आणि त्यांच्या चमूने ही बाब लक्षात घेऊन पहिले दोन भाग YouTube वर कधीही ऐकण्यासाठी उपलब्ध  करून दिले आहेत (पुढचे भागही लवकरच उपलब्ध होतील अशी आशा आहे)रसिकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. एवढा सुश्राव्य कार्यक्रम सादर केल्याबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद.   




1 comment:

  1. I have been using this app FINAL FANTASY 6 Apk : and downloaded and playing it regularly.

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates